युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते येत्या 19 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या चांदणी चौकात, स्वच्छ भारत 2022 कार्यक्रमाअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या महा स्वच्छता अभियानांचे होणार उद्घाटन


स्वच्छ भारत 2022 कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशभरातील सर्व जिल्ह्यांमधून 60 लाख किलोहून अधिक कचरा संकलित करण्यात आला

Posted On: 18 OCT 2022 10:54AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर 2022

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते येत्या बुधवारी, 19 ऑक्टोबर 2022 रोजी, दिल्ली येथील चांदणी चौक येथे स्वच्छ भारत 2022 मोहिमेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या महा स्वच्छता अभियानांचे उद्घाटन होणार आहे. देशभरातील सर्व गावांमध्ये 19 ऑक्टोबर 2022 पासून अशाच प्रकारची स्वच्छता अभियाने सुरु करण्यात येणार आहेत.केंद्रीय युवा व्यवहार मंत्रालयाने नेहरू युवा केंद्र संघटना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतलेल्या स्वच्छ भारत 2022 या कार्यक्रमाअंतर्गत होणाऱ्या सर्व उपक्रमांचे एकत्रीकरण करणे तसेच देशभरातील सर्व गावांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणात लोक सहभाग मिळविण्याची सुनिश्चिती करण्यासाठीचे प्रयत्न आणखी वाढविणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे.    

एक लहान स्वरुपात केलेली सुरुवात भरीव बदलांना आणि मोठ्या कायापालटाला कारणीभूत ठरू शकते. केंद्रीय युवा व्यवहार मंत्रालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरु केलेला स्वच्छ भारत कार्यक्रम याची साक्ष देतो.

एका महिन्याच्या कालावधीत एक कोटी किलोग्रॅम कचरा संकलित करण्याच्या उद्दिष्टासह केवळ 17 दिवसांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला देशभरातील सर्व जिल्ह्यांच्या प्रत्येक स्तरातील लोकांकडून तसेच युवा वर्गाकडून मिळालेल्या भरीव पाठींबा आणि प्रतिसादातून आतापर्यंत 60 लाख किलोहून अधिक कचरा संकलित करण्यात आला आहे.

ही एक प्रकारे नव्या पद्धतीची घडी बसविण्याची प्रक्रिया आहे. केवळ विविध प्रकारची पार्श्वभूमी आणि वेगवेगळ्या विचारसरणीशी जोडलेले लोक, विशेषतः युवा वर्गच या कार्यक्रमात सहभागी होत आहे असे नव्हे तर निव्वळ स्वयंस्फूर्तीने इतरांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका देखील बजावत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2014 मध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात केली होती आणि तेव्हापासून या संदर्भात झालेली उल्लेखनीय प्रगती लक्षात येण्याजोगी आहे. स्वच्छ भारत 2022 हा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या स्वच्छता अभियानाचा नवे लक्ष्य आणि कटिबद्धतेसह करण्यात आलेला विस्तार आहे.

युवा केंद्री स्वच्छ भारत कार्यक्रमामध्ये जागृती निर्माण करणे आणि या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी यामध्ये युवकांना मध्यवर्ती भूमिका असेल असे संकल्पित करण्यात आले आहे. देशभरातील युवा वर्गाचे विकासाच्या  मुख्य प्रवाहात सहभागी होणे देशासाठी अत्यंत चांगले  मानले जात आहे.
गाव हा या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू असला तरीही, धार्मिक संस्था, शिक्षक, कॉर्पोरेट संस्था, महिलांचे गट आणि देशातील असेच इतर विशिष्ट वर्गांतील घटक देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले आहेत आणि त्यामुळे या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे रूप घेतले आहे.
ऐतिहासिक दृष्ट्या किंवा इतर विशिष्ट कारणाने महत्त्वाच्या असलेल्या विविध स्थळांवर तसेच पर्यटन स्थळे, बस स्थानके, रेल्वे स्थानके,राष्ट्रीय महामार्ग आणि शैक्षणिक संस्था यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची अभियाने राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचा आवाका आणि प्रसार अशा दोन्ही दृष्टींनी हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण असून त्याची संकल्पना युवकांचा सहभाग ते लोक चळवळ अशा नमुन्यावर आधारित आहे. आणि या माध्यमातून कार्यक्रमाची सफलता आणि शाश्वतता याकरिता प्रत्येक नागरिकाची या कार्यक्रमातील भूमिका आणि योगदान आकारास आणले गेले आहे.
स्वच्छ भारत हा केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून त्यातून सामान्य माणसाची स्वच्छतेविषयीची कळकळ आणि स्वतः पुढाकार घेऊन ही समस्या सोडविण्याचा निर्धार दिसून येतो.
या विषयाशी संबंधित सर्व भागधारकांनी आपापली चाकोरी विसरून समन्वय आणि एकतानतेसह उपक्रमासाठी काम करण्याची दाखविलेली भावना हा या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा प्रेरक घटक आहे. सरकारचे विविध विभाग आणि संस्था, सीबीओज आणि नागरी सहकारी संस्था असे सर्वजण एकल वापराचे प्लास्टिक समूळ निपटून काढण्याच्या आणि स्वच्छतेची सुनिश्चिती करण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी एकत्र येत आहेत.
स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यासाठी, एखादी मोहिम तडीस नेण्याच्या आवेशाने अथकपणे कार्य करणाऱ्या नेहरू युवा केंद्र संघटना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या लाखो युवा स्वयंसेवकांचा पाठींबा आणि योगदानाशिवाय स्वच्छ भारत कार्यक्रमाचा प्रवास शक्य झाला नसता. तसेच कोणताही नावलौकिक अथवा प्रसिद्धी मिळविण्याची इच्छा न ठेवता या कार्यक्रमात स्वतःहून सहभागी होऊन योगदान देणारे लाखो निनावी स्वच्छता दूत या अभियानाचे खरे नायक आहेत.

 

***

Gopal C/Sanjana/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1868759) Visitor Counter : 161