पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील उना येथे बल्क ड्रग पार्कची केली पायाभरणी


पंतप्रधानांनी आयआयआयटी उना राष्ट्राला केले समर्पित

“बल्क ड्रग पार्क आणि वंदे भारत ट्रेन हिमाचल प्रदेशप्रती आमच्या स्नेहाचे आणि समर्पणाचे प्रतीक”

"दुहेरी इंजिनाचे सरकार संपूर्ण हिमाचल प्रदेशात रेल्वे दळणवळण सुधारण्यासाठी वचनबद्ध"

"नवा भारत भूतकाळातील आव्हानांवर मात करत वेगाने विकसित होत आहे"

"आमचे सरकार 21 व्या शतकातील भारताच्या आकांक्षा पूर्ण करत आहे"

"आधी हिमाचलला त्याच्या क्षमतेसाठी कमी आणि संसदीय जागांच्या संख्येच्या आधारावर जास्त महत्त्व दिले जात असे"

"आम्ही फक्त पूर्वीच्या सरकारांनी ठेवलेली विकासाची दरी भरून काढत नाही, तर राज्याच्या पायाभरणीचे भक्कम आधारस्तंभही उभारत आहोत"

"हिमाचल प्रदेशात उत्पादित औषधांची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे"

“हिमाचलला आयआयटी, आयआयआयटी आयआयएम आणि एम्स मिळण्यासाठी दुहेरी इंजिनच्या सरकारची वाट पाहावी लागली”

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हिमाचलच्या विकासाचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे, असा माझा विश्वास आहे"

Posted On: 13 OCT 2022 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13  ऑक्टोबर  2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील उना येथे बल्क ड्रग पार्कची पायाभरणी केली आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) उना राष्ट्राला समर्पित केली. त्याआधी आज, पंतप्रधानांनी अंब अंदौरा, उना ते नवी दिल्ली या नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

शीख धर्माचे गुरु, गुरू नानक देव जी, आणि माता चिंतापौर्णि यांना नमन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आणि धनत्रयोदशी, दिवाळीपूर्वी हिमाचल प्रदेशाला प्रकल्पांची भेट सादर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हिमाचल प्रदेशशी असलेल्या नात्याला उजाळा देत, पंतप्रधानांनी तिथल्या नैसर्गिक सौंदर्यावर गुणगान केले. माता चिंतापौर्णीसमोर माथा टेकवण्याचे भाग्य मला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने हा एक मोठा दिवस असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दळणवळण आणि शिक्षण हा राज्याच्या या दौऱ्याचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे नमूद केले. आज उना येथे देशातील दुसऱ्या बल्क ड्रग पार्कचे काम सुरू होत आहे. हिमाचल प्रदेशात आज विविध प्रकल्पांची उद्घाटने तसेच पायाभरणी झाली. याचा जनतेला खूप फायदा होईल, असेही ते म्हणाले.

बल्क ड्रग पार्कसाठी हिमाचल राज्याची निवड करण्यात आली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  "बल्क ड्रग पार्कसाठी केवळ तीन राज्यांमधून निवड होणे हा राज्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि या राज्याप्रती आमची आपुलकी आणि समर्पणाचे हे द्योतक आहे", ते म्हणाले. त्याचप्रमाणे वंदे भारत हिमाचल प्रदेशात आणण्याच्या निर्णयातूनही सरकारने राज्याला दिलेले प्राधान्य दिसून येते. त्यांनी निदर्शनास आणून दिले की राज्यातील पूर्वीच्या पिढ्यांनी ट्रेन देखील पाहिली नव्हती आणि आज हिमाचलमध्ये सर्वात प्रगत ट्रेन्सपैकी एक येथून धावत आहे. दुहेरी इंजिन असलेले सरकार जनतेच्या प्रगतीसाठी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

हिमाचल प्रदेश आणि केंद्रातील यापूर्वीच्या सरकारांनी हिमाचल प्रदेशातील नागरिकांच्या गरजा आणि आकांक्षांकडे लक्ष दिले नाही, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.  "आमच्या माता-भगिनींना अशा परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे", असे पुढे म्हणाले. आता काळ चांगलाच बदलला आहे आणि सध्याचे सरकार केवळ लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच काम करत नाही तर त्यांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण समर्पणाने आणि ताकदीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. "आम्ही फक्त पूर्वीच्या सरकारांनी ठेवलेली विकासाची दरी भरून काढत नाही, तर राज्याच्या पायाभरणीचे भक्कम आधारस्तंभही उभारत आहोत", असे ते म्हणाले.

गेल्या शतकाच्या सुरूवातीस अनेक देश आणि अगदी गुजरातसारख्या काही राज्यांनी आपल्या नागरिकांना शौचालये, ग्रामीण रस्ते आणि आधुनिक आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत सुविधा पुरवल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. 

भारतात मात्र, याआधीच्या सरकारने सामान्य लोकांसाठी या मूलभूत गरजांची पूर्तताही कठीण केली. याचा सर्वाधिक फटका डोंगराळ भागात बसला. इथे राहताना मला हे अगदी प्रकर्षाने जाणवले, असे ते म्हणाले. नवा भारत भूतकाळातील आव्हानांवर मात करत वेगाने प्रगती करत आहे. गेल्या शतकात ज्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या त्या आता उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  आपल्याला 20 व्या शतकातील सुविधा मिळतील आणि हिमाचल प्रदेशला 21 व्या शतकातील आधुनिक सुविधांशी जोडू, असेही ते म्हणाले. ग्रामीण रस्ते दुप्पट वेगाने बांधले जात असून ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी ग्रामपंचायतीपर्यंत नेण्यात येत आहे. "आपले सरकार 21 व्या शतकातील भारताच्या आकांक्षा पूर्ण करत आहे असे त्यांनी सांगितले"

हिमाचल प्रदेशने भारताला जगातील प्रथम क्रमांकाचा औषध उत्पादक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि याबाबतची संधी आणखी वाढणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.  "हिमाचल प्रदेशात उत्पादित औषधांची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे, असे मोदी पुढे म्हणाले. आता औषध निर्मितीसाठी कच्चा माल हिमाचल प्रदेशमध्ये तयार केला जाईल, भारताचे इतर राष्ट्रांवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होणार आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आयुष्मान भारत योजने अंतर्गत जनऔषधी केंद्रामार्फत गरीब आणि गरजूंसाठी सरकार पाच लाख रुपयांपर्यंत उपचार खर्च मोफत देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  बल्क ड्रग पार्क लोकांना दर्जेदार आणि परवडणारी वैद्यकीय सेवा देण्याच्या सरकारच्या मोहिमेला आणखी बळ देईल  याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेती असो वा उद्योग, विकासाच्या गतीला दळणवळण व्यवस्था चालना देतेअसे मोदी म्हणाले.  40 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नांगल धरण-तलवाडा रेल्वे मार्गाचे उदाहरण त्यांनी दिले. सध्याच्या सरकारने तो मार्गी लावेपर्यंत गेली 40 वर्षे प्रत्यक्षात कोणतीही प्रगती झाली नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुहेरी-इंजिन सरकार संपूर्ण हिमाचल प्रदेशात रेल्वे दळणवळण सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे.  देश स्वदेशी वंदे भारत ट्रेनने जोडला जात असताना, हिमाचल हे देशातील आघाडीचे राज्य बनत आहे, असे ते म्हणाले.

आश्वासने पूर्ण करणे तीही वेळेत पूर्ण करणे ही नवीन कार्यशैली पंतप्रधानांनी अधोरेखित केली. आधीच्या काळाच्या अगदी उलट हे होत आहे. आधी हिमाचलला त्याच्या क्षमतेवर कमी आणि संसदीय जागांच्या संख्येच्या आधारावर जास्त महत्त्व दिले जात होते. राज्यातील शैक्षणिक संस्थांची प्रलंबित मागणी आता तातडीने हाताळली जात आहे.  हिमाचलला आयआयटी, आयआयआयटी आयआयएम आणि एम्स मिळण्यासाठी दुहेरी इंजिनच्या सरकारची वाट पाहावी लागली.  हिमाचल प्रदेशातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित उपक्रमांचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. उना येथील आयआयआयटीच्या कायमस्वरूपी इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनीच आयआयआयटी इमारतीची पायाभरणी केली होती त्यांनी आज बदलत्या कार्यसंस्कृतीला अधिक अधोरेखित करण्यासाठी इमारत समर्पित केली. महामारीचे आव्हान असतानाही प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी या प्रकल्पाशी संबंधित लोकांचे कौतुक केले.

देशभरात कौशल्य आणि नाविन्यपूर्ण संस्थांच्या गरजेकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, तरुणांची कौशल्ये आणि क्षमता वाढवणे हे आज आमचे सर्वात मोठे प्राधान्य आहे. सैन्यात सेवा करून देशाच्या सुरक्षेत नवे आयाम निर्माण करून हिमाचलच्या तरुणांनी दिलेल्या योगदानाचीही त्यांनी दखल घेतली. आता विविध प्रकारच्या कौशल्यांमुळे त्यांना सैन्यातही उच्च पदांवर पोहोचण्यात मदत होईल, असेही ते म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा स्वप्ने आणि संकल्प मोठी असतात, तेव्हा प्रयत्नही तसेच केले जातात. दुहेरी-इंजिन सरकारच्या प्रारुपात असा प्रयत्न सर्वत्र दिसून येत आहे असे ते म्हणाले. यातून एक नवा इतिहास निर्माण होईल आणि नव्या प्रथेचा उदय येईल.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हिमाचलच्या विकासाचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे, असा माझा विश्वास आहे.  हा सुवर्णकाळ हिमाचलला विकासाच्या त्या उंचीवर घेऊन जाईल, ज्यासाठी तुम्ही सर्वांनी अनेक दशके वाट पाहिली आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी समारोप केला.

यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री  जय राम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप आदी मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे सरकारच्या विविध नवीन उपक्रमांच्या पाठिंब्याने देश अनेक क्षेत्रांमध्ये स्वावलंबनाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. असेच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे औषध निर्मिती. या क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी, पंतप्रधानांनी उना जिल्ह्यातील हरोली येथे बल्क ड्रग पार्कची पायाभरणी केली. यासाठी 1900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.  बल्क ड्रग पार्क एपीआय आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल.  यामुळे सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे तर 20,000 हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामुळे या भागातील आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळेल.

पंतप्रधानांनी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) उनाही राष्ट्राला समर्पित केली. त्याची पायाभरणी पंतप्रधानांनी 2017 मध्ये केली होती. सध्या या संस्थेत 530 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

याआधी आज, पंतप्रधानांनी नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.  अंब अंदौरा ते नवी दिल्ली पर्यंत धावणारी, ही देशातली चौथी वंदे भारत ट्रेन असून पूर्वीच्या तुलनेत ती प्रगत आवृत्ती आहे. जास्त हलकी आणि कमी कालावधीत उच्च गती गाठण्यात ती सक्षम आहे. ही गाडी फक्त 52 सेकंदात ताशी 100 किमी वेग गाठते. या गाडीमुळे प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल आणि प्रवासाचा आरामदायी आणि जलद मार्ग उपलब्ध होईल.

 

 

 

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1867440) Visitor Counter : 208