पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील भरूच मधील आमोद येथे 8000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
"आज, गुजरातच्या या भूमीवरून आणि माता नर्मदेच्या तीरावरून आदरणीय मुलायमसिंहजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
देशाच्या आणि गुजरातच्या विकासात भरुचचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे
एखाद्या उल्केच्या गतीने कामे पूर्ण करण्याच्या नरेंद्र - भूपेंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या कार्याचे हे फलित आहे.
सक्षम वातावरण निर्मितीचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी उद्देश आणि धोरणे यांची नितांत आव्यश्यकता असते.
भारतीय अर्थव्यवस्थेने 2014 पासून दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
कोविड विरुद्धच्या लढ्यात गुजरातने राष्ट्राला फार मोठे साहाय्य केले आहे. देशाच्या औषधनिर्माण निर्यातीत गुजरातच्या 25 टक्के वाटा आहे.
विकासाच्या या प्रवासात आदिवासी समाजाने अतिशय मोलाचे योगदान दिले आहे.
भरूच आणि अंकलेश्वरचा विकास हा ट्विन सिटी विकास मॉडेलच्या धर्तीवर केला जात आहे.
Posted On:
10 OCT 2022 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधील भरूच मधील आमोद येथे 8000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. पंतप्रधानांनी जंबुसर येथे बल्क ड्रग पार्क. दहेज येथीलखोल समुद्रातील पाइपलाइन प्रकल्प, अंकलेश्वर विमानतळाचा पहिला टप्पा आणि अंकलेश्वर आणि पानोली येथे बहुस्तरीय औद्योगिक शेडचा विकास या प्रकल्पांची पायाभरणी केली. गुजरातमधील रसायन क्षेत्राला चालना देणारा गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड (GACL) प्रकल्प, भरुच भूमिगत ड्रेनेज आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (IOCL) दहेज कोयाली पाइपलाइन असे अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले
सर्वप्रथम पंतप्रधानांनी दिवंगत मुलायमसिंग यादव यांना श्रद्धांजली वाहिली. मुलायमसिंग यादव यांच्या समवेतचे माझे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते, मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा आमची भेट होत असे तेव्हा परस्परांमधील जवळीक आणि आपुलकीची जाणीव होत असे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान पदाचा उमेदवार होतो तेव्हा विविध नेत्यांना भेटत होतो, तेव्हा मुलायम सिंग यांनी दिलेला सल्ला आणि आशीर्वाद आपल्यासाठी आजही तितकाच महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. बदलत्या काळातही मुलायम सिंग यांनी 2013 मध्ये दिलेले आशीर्वाद कायम राहिले आहेत, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी मागील लोकसभेच्या शेवटच्या सत्रात मुलायमसिंगजींनी दिलेल्या आशीर्वादाचेही स्मरण केले. मुलायम सिंग यांनी कोणतेही राजकीय मतभेद मनात न बाळगता 2019 मध्ये पंतप्रधानपदी मोदींच्या पुनरागमनाचे भाकीत केले होते, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. मुलायमसिंग जी हे सर्वाना सोबत घेऊन जाणारे नेते होते, असे ते म्हणाले. "आज, गुजरातच्या या भूमीवरून आणि माता नर्मदेच्या तीरावरून आदरणीय मुलायमसिंगजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो." त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना हे असह्य नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात आपण भरूच मध्ये आलो होतो, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भरूचच्या या भूमीने अशा सुपुत्रांना जन्म दिला आहे ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाचे नाव एका नवीन उंचीवर नेले आहे. त्यांनी संविधान सभेचे सदस्य आणि सोमनाथ चळवळीतील सरदार पटेल यांचे प्रमुख साथीदार कन्हयालाल माणेकलाल मुन्शी आणि भारतीय संगीतातील महान कलाकार पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचे स्मरण केले. भरुचने गुजरातच्या आणि भारताच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, जेव्हा जेव्हा आपण भारताच्या इतिहासाचे वाचन करू आणि भविष्यातील भारताविषयी भाष्य करू, तेव्हा तेव्हा भरुचचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाईल, असे ते म्हणाले. भरुच जिल्ह्याच्या उदयोन्मुख जागतिक स्वरूपाचीही त्यांनी नोंद घेतली.
रसायन उद्योग क्षेत्रातील अनेकविध प्रकल्पांसोबतच भरूच मध्ये पहिल्या बल्क ड्रग पार्कचे लोकार्पण होत आहे. “दळणवळणाशी संबंधित दोन मोठे प्रकल्प देखील आज सुरू करण्यात आले आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. अंकलेश्वर येथे भरूच विमानतळाची पायाभरणी देखील करण्यात आली आहे, जेणेकरून भरूच मधील नागरिकांना बडोदा आणि सुरत विमानतळांवर अवलंबून राहावे लागणार नाही. देशाच्या इतर कुठल्याही लहान शहरांपेक्षा भरूच मध्ये सर्वाधिक उद्योगधंदे आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आणि आता विमानतळाच्या उभारणीसह या क्षेत्राच्या विकासाला नवीन गती मिळेल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. एखाद्या उल्केच्या गतीने कामे पूर्ण करण्याच्या नरेंद्र - भूपेंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या कार्याचे हे फलित आहे, असे ते म्हणाले. हा गुजरातचा नवीन चेहरा आहे, गेल्या दोन दशकात गुजरातने झपाट्याने प्रगती केली असून सर्वच बाबतीत पिछाडीवर असलेले राज्य अशी ओळख असलेल्या गुजरातचा चेहरामोहरा बदलून एक संपन्न औद्योगिक आणि कृषी राज्य अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. सतत कार्यमग्न असणारी बंदरे आणि विकसित होणाऱ्या किनारपट्ट्यामुळे आदिवासी आणि मच्छीमार समाजाचे जीवन बदलले. गुजरातच्या जनतेच्या मेहनतीमुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालखंडात राज्यातील तरुणांसाठी सुवर्णकाळ सुरू झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण आता अडथळेविरहित सक्षम वातावरणाची निर्मिती करायला हवी आणि या संधीचा लाभ घ्यायला हवा. सक्षम वातावरण निर्मितीचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी उद्देश आणि धोरणे यांची नितांत आवश्यकता असते. भरूच मधील सुधारलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत कृषी , आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी सुधारत गेली, याचाही त्यांनी उल्लेख केला. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी एकावेळी एकच प्रश्न कसा हाती घेऊन ते कसे सोडवले याची आठवण त्यांनी सांगितली. " आजकालच्या मुलांना एकेकाळी अतिशय प्रचलित असलेला संचारबंदी हा शब्द माहित नसावा. आज आमच्या मुली केवळ सन्मानाने जगत नाहीत आणि उशिरापर्यंत काम करत नाहीत तर समाजाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करत आहेत, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे भरूच मध्येही शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने युवा वर्गाला नवनवीन संधींची द्वारे खुली झाली आहेत. दीर्घकालीन नियोजन आणि आतापर्यन्त कमी प्रमाणात वापरलेल्या संसाधनांचा लाभ घेतल्यामुळे, गुजरात एक उत्पादन, औद्योगिक आणि व्यवसाय केंद्र म्हणून उदयास आले आहे त्याचप्रमाणे जागतिक दर्जाच्या अनेक सुविधा येथे उदयास आल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. डबल-इंजिन सरकार हे दुहेरी फायद्याचे उत्तम उदाहरण बनले आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या वोकल फॉर लोकल या धोरणाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. स्थानिक उत्पादनांचा जास्तीत जास्त अवलंब करून आणि विदेशी वस्तूंचा त्याग करून आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करू शकत, असे ते म्हणाले. यंदाच्या दिवाळीत आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तू वापरूया स्थानिक व्यवसाय आणि कारागिरांना मदत करूया, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय अर्थव्यवस्थेने 2014 पासून दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. आणि भारतावर राज्य करणाऱ्या वसाहतवादी राष्ट्राला मागे टाकून आपण हे यश साध्य केले आहे, त्यामुळे हा पराक्रम अधिक महत्त्वाचा झाला आहे, असे ते म्हणाले. या यशाचे श्रेय तरुण, शेतकरी, कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक आणि उद्योगपती यांचे आहे, असे ते म्हणाले. औषधनिर्मिती करून लोकांचे आयुष्य वाचवण्याच्या अतिशय उद्दात कार्यात आघाडी घेतल्याबद्दल त्यांनी भरूच मधील जनतेचे अभिनंदन केले. महामारीने फार्मा क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले. “कोरोनाविरुद्धच्या लढाईत गुजरातने देशाला मोठी मदत केली. देशाच्या औषध निर्यातीत गुजरातचा वाटा 25 टक्के आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.
काही समाजविघातक शक्तींनी भरूचच्या विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्याविषयीच्या आठवणींचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. ज्यावेळी 2014 मध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा गुजरातने डबल इंजिन सरकारच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला, आमच्या सरकारने विकासाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले. सरदार सरोवर धरणाच्या विकासादरम्यान शहरी नक्षलवाद्यांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. झारखंड, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये नक्षलवाद्यांचे अस्तित्व असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात मधील आदिवासी समुदायाने नक्षलवाद्यांचा प्रसार गुजरात मध्ये होऊ दिला नाहीआणि राज्यातील लोकांचे प्राण वाचवले, असे सांगून पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. शहरी नक्षलवादाचा शिरकाव राज्यात होऊ नये याकरता सदैव दक्ष राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. विज्ञान आणि गणित या विषयात योग्य आणि उत्तम शिक्षण घेतल्याशिवाय सरकारी प्रयत्नांमुळे होत असलेल्या सकारात्मक कृती आणि इतर योजनांचा योग्य लाभ मिळणे शक्य नाही, असे ते म्हणाले. आज आदिवासी तरुण प्रशिक्षण घेऊन डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वकील बनत आहेत. आदिवासी समाजाने राज्याच्या आणि देशाच्या विकासाच्या या प्रवासात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ज्यांना देशभरातील आदिवासी बांधव आपले दैवत मानतात . अशा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सरकारने शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला समर्पित जनजाती गौरव दिवस घोषित केला होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.
भरूच आणि अंकलेश्वरचा विकास अहमदाबाद आणि गांधीनगर सारख्या विकासाच्या जुळ्या शहरांच्या मॉडेलच्या धर्तीवर केला जात आहे. "लोक जसे न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीबद्दल बोलतात तसे भरूच आणि अंकलेश्वरबद्दल बोलतील, असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया , खासदार सी आर पाटील आणि मनसुख वसावा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
भारताला औषधनिर्माण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने टाकलेलं आणखी एक पाऊल म्हणून जंबुसर येथे पंतप्रधानांच्या हस्ते बल्क ड्रग पार्कची पायाभरणी झाली. 2021-22 मध्ये, एकूण फार्मास्युटिकल आयातीपैकी 60% पेक्षा जास्त वाटा औषधांचा होता. औषधांच्या आयातीला पर्याय म्हणून आणि भारताला मोठ्या प्रमाणात औषधांसाठी स्वावलंबी बनवण्यात मदत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधानांनी दहेज येथे खोल समुद्रातील पाइपलाइन प्रकल्पाची पायाभरणीही केली, ज्यायोगे औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. याशिवाय देशातील सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योगांना चालना देणाऱ्या अंकलेश्वर विमानतळाचा पहिला टप्पा आणि अंकलेश्वर आणि पानोली येथे बहुस्तरीय औद्योगिक शेडचा विकास या प्रकल्पांची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते झाली
पंतप्रधानांच्या हस्ते अनेक औद्योगिक पार्क्सच्या विकासासाठी भूमिपूजन समारंभ झाले. यामध्ये वालिया (भरूच), अमीरगड (बनासकंठा), चकलिया (दाहोद) आणि वानार (छोटा उदयपूर) या चार आदिवासी औद्योगिक उद्यानांचा समावेश आहे; त्याच प्रमाणे मुडेठा (बनासकांठा) येथील अॅग्रो फूड पार्क; काकवाडी दांती (वलसाड) येथील सी फूड पार्क; आणि खांडीवाव (महिसागर) येथील एमएसएमई पार्कचा देखील समावेश आहे.
रसायन उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक प्रकल्प या कार्यक्रमात पंतप्रधानांनी राष्ट्रांला समर्पित केले. त्यांनी 800 TPD (Temperature Programmed Desorption) कॉस्टिक सोडा प्रकल्प समर्पित केला जो दाहेज येथील 130 मेगावॅटच्या सहवीजनिर्मिती वीज प्रकल्पाशी जोडला गेला आहे. यासह त्यांनी दहेज येथील विद्यमान कॉस्टिक सोडा प्रकल्पाचा विस्तारित प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित केला, ज्यामुळे आता क्षमता वाढली असून ती प्रतिदिन 785 मेट्रिक टन वरून प्रतिदिन 1310 मेट्रिक टन इतकी झाली आहे. पंतप्रधानांनी दाहेज येथे प्रतिवर्षी एक लाख मेट्रिक टन क्लोरोमेथेनच्या उत्पादनक्षमतेचा प्रकल्प समर्पित केला. पंतप्रधानांनी समर्पित केलेल्या इतर प्रकल्पांमध्ये दाहेज येथील हायड्रॅझिन हायड्रेट प्लांटचा समावेश आहे या योगें या उत्पादनाच्या आयातीला पर्याय मिळू शकेल , तसेच IOCL दाहेज-कोयाली पाइपलाइन प्रकल्प, भरूच भूमिगत गटार आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि उमल्ला आसा पनेथा रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण यांचा समावेश आहे.
* * *
SK/G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866531)
Visitor Counter : 258
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam