पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते 5-जी सेवेचा शुभारंभ


पंतप्रधानांनी इंडिया मोबाईल कॉँग्रेसच्या सहाव्या परिषदेचे केले उद्घाटन

“5-जी ही देशाच्या प्रवेशद्वारी झालेली नव्या युगाची नांदी आहे. 5-जी अमर्याद संधीच्या आकाशाची सुरुवात आहे.”

‘नवा भारत केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक म्हणून राहणार नाही, तर या तंत्रज्ञानाचा विकास आणि अंमलबजावणीतही तो महत्वाची भूमिका बजावेल”

“5-जीच्या आगमनासोबतच, भारताने, दूरसंचार तंत्रज्ञानात पहिल्यांदाच जागतिक मापदंडाशी बरोबरी साधली आहे”

“2014 मध्ये आपण एकही मोबाइल फोन निर्यात करत नव्हतो, तिथून आज आपण हजारो कोटी रुपयांच्या मोबाईल फोन्सची निर्यात करणाऱ्या देशापर्यंतचा प्रवास केला आहे”

“देशातील सर्वसामान्य माणसाची समज, त्यांची सदसद्विवेकबुद्धी आणि जिज्ञासू वृत्ती यावर माझा कायम अढळ विश्वास राहिलेला आहे”

“डिजिटल इंडियाने छोटे व्यापारी, छोटे स्वयंउद्योजक, स्थानिक कलाकार आणि कारागिरांना एक सशक्त व्यासपीठ दिले आहे.”

“5-जी तंत्रज्ञान केवळ जलदगती इंटरनेट सुविधा उपलब्धतेपर्यंत मर्यादित नाही, तर यात लोकांचे जीवनमान बदलण्याची क्षमता आहे”

Posted On: 01 OCT 2022 5:08PM by PIB Mumbai

देशात एका नव्या तंत्रज्ञान युगाची पहाट आणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे, 5-जी सेवेचा शुभारंभ केला. तसेच, त्यांच्या हस्ते, सहाव्या भारतीय मोबाईल कॉँग्रेसचेही उद्घाटन करण्यात आले. इथे सुरु असलेल्या आयएमसी प्रदर्शनाचेही त्यांनी अवलोकन केले.

या ऐतिहासिक प्रसंगी, उद्योग जगतातील लोकांनी आपले विचार व्यक्त केले.

देशाला, 2047 पर्यंत विकसित देशबनवण्याची उमेद जागवणाऱ्या पंतप्रधानांच्या प्रेरणादायी द्रष्टेपणाबद्दल  रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. सरकारचे प्रत्येक धोरण आणि कृती लक्षपूर्वक आणि भारताला समृद्ध बनवण्यासाठी केली जाते, निश्चित उद्दिष्ट ठेवून केली जाते. भारताला, 5-जी युगात जलद गतीने नेण्यासाठी, जी पावले टाकण्यात आली, ती पंतप्रधानांच्या दृढनिश्चयाचाच पुरावा आहे. असे ते यावेळी म्हणाले. शिक्षण, हवामान बदल अशा सगळ्या क्षेत्रात, 5-जी मुळे काय काय संधी उपलब्ध होऊ शकतील, याविषयी त्यांनी माहिती दिली. आपल्या नेतृत्वामुळे आज भारताची प्रतिष्ठा, कार्यकर्तृत्व आणि ताकद जागतिक स्तरावर पूर्वी कधीही नव्हती एवढी वाढली आहे. आजच्या अत्यंत वेगाने बदलत जाणाऱ्या जगात, पुनरुत्थानास उत्सुक अशा या भारताला सर्वोच्च स्थानी पोहोचण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. असे अंबानी यावेळी म्हणाले.

भारती एन्टरप्रायजझेसचे अध्यक्ष, सुनील भारती मित्तल म्हणाले, की देशांत 5-जी सेवा सुरु होणे, ही नव्या युगाची सुरुवात आहे. आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असतांना येणारी ही आधुनिक सेवा अधिकच विशेष आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नांतून येणाऱ्या या सेवेमुळे, देशात नव्या ऊर्जेचा प्रवेश झाला आहे. ज्यांना तंत्रजज्ञानाची अतिशय बारकाईने समज आहे, आणि त्याचा देशाच्या विकासासाठी कसा वापर करायचा याचा ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्ययच घालून दिला आहे, असे नेतृत्व आपल्याला पंतप्रधानांच्या रूपाने लाभले, हे आपले भाग्यच आहे. असे ते पुढे म्हणाले. 5-जी तंत्रज्ञान, देशातल्या लोकांसाठी अमर्याद संधीचा सागर घेऊन येणार आहे, विशेषतः ग्रामीण भागात, यामुळे विपुल संधी उपलब्ध होतील, असे मित्तल म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पंतप्रधानांनी राबवलेल्या उपक्रमांचे त्यांनी स्मरण केले. या कोविड महामारीच्या काळात, देशातील बहुसंख्य लोक गावांकडे किंवा आपल्या मूळगावी परतले मात्र देशाच्या हृदयाचे ठोके एक क्षणही थांबले नाहीत, ते धडधडत राहिले. याचे श्रेय डिजिटल व्हीजनला आहे, असेही ते म्हणाले. मेक इन इंडियाच्या दूरदृष्टीमागचे धैर्य आणि कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. डिजिटल इंडिया सोबत, पंतप्रधानांनी तेवढेच लक्ष स्टार्ट अप इंडियाकडेही  दिले, आणि म्हणूनच अल्पावधीतच, भारताने युनिकॉर्न निर्मिती सुरु केली आहे असे मित्तल पुढे म्हणाले. 5-जी च्या आगमनानंतर, देशांत, अधिकाधिक युनिकॉर्न उभ्या राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, देशात 5-जी तंत्रज्ञानाचे आगमन होणे ही जागतिक मंचावर भारताची ताकद दर्शवणारी घटना आहे. तसेच, भारताच्या प्रगतीत दूरसंचार विभागाची भूमिका भक्कम आधाराची आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. तंत्रज्ञानात एका जनरेशनची उडी घेण्याच्या भारताच्या प्रगतीमागे असलेली पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी आणि नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले. त्यांच्या नेतृत्वामुळेच आज जागतिक मंचावर भारताने आपली छाप सोडली असल्याचे ते म्हणाले. कोविडच्या काळात दूरसंचार उद्योगाला पाठबळ देण्यात तसेच, या क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा आणण्यात त्यांच्या प्रेरणादायी भूमिकेबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. 5-जी ची देशांत होणारी सुरुवात, भारताच्या रोमहर्षक प्रवासाची सुरुवात आहे, असे बिर्ला म्हणाले. 5-जी च्या विकासासाठी, असलेला अमर्याद वाव आपण बघू शकतो, आणि त्यानुसार, ह्या सेवेचा येत्या काळात वापर करु शकतो. असेही बिर्ला म्हणाले.

यावेळी दूरसंचार क्षेत्रातल्या या तीन महत्वाच्या कंपन्यांनी, पंतप्रधानांसमोर, 5-जीच्या भारतातील एकेका वापराचे प्रात्यक्षिक दिले.

रिलायन्स जिओने मुंबईतील एका शाळेतील शिक्षकांना 5-जी नेटवर्क ने, एकाचवेळी महाराष्ट्र, गुजरात आणि ओदीशा अशा तीन ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी जोडून दाखवले. या प्रात्यक्षिकातून, 5-जी नेटवर्कमुळे, देशातील शिक्षक आणि विद्यार्थी, भौगोलिक अंतर असूनही एकमेकांशी कसे संपर्क साधू शकतात, जवळ येऊ शकतात, हे अनुभवता आले. तसेच, स्क्रीनवर ऑगमेंटेड रिअॅलिटी च्या (एआर) तंत्रज्ञानाची ताकदही दिसली. ज्याद्वारे, एआर डिवाईस नसतानाही, दुर्गम भागात असलेल्या विद्यार्थ्यांना दुरून स्क्रीनवर शिक्षण देणे शक्य होऊ शकेल. यावेळी, पंतप्रधानांनी, महाराष्ट्रातील रायगडच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्या विद्यार्थ्यांशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संवादही साधला.  तसेच, गुजरातच्या गांधीनगरच्या रोपडा प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांशी तिथले मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, यांच्या उपस्थितीत संपर्क-संवाद साधला. त्याशिवाय, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या उपस्थितीत, मयूरभंज इथल्या एस. एल. एस. मेमोरियल शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, बीकेसी, मुंबईतील, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या अभिमन्यू बसू या विद्यार्थ्यानेही 5-जी तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मुलांचा उत्साह वाखणण्यासारखा आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. लेखक आमिश त्रिपाठी यांनी या भागाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

व्होडाफोन आयडियाच्या 5-जी प्रात्याक्षिकात, दिल्ली मेट्रो इथे भूमिगत बोगद्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेविषयीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यासाठी मंचावर डिजिटली दोन बोगदे तयार करण्यात आले होते. या डिजिटल टवीन बोगद्यामुळे अगदी दुरूनही, वास्तविक वेळेत, मजुरांच्या सुरक्षेविषयीच्या सूचना देणे शक्य झाले होते. पंतप्रधानांनी व्ही आर आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत, मंचावरूनच या बोगद्यातील कामांवर देखरेख ठेवण्याचे थेट प्रात्यक्षिक घेतले. दिल्ली मेट्रोच्या बोगद्यात, द्वारका इथे काम करणाऱ्या रिंकू कुमार यांच्याशी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना  यांच्या उपस्थितीत त्यांनी संवाद साधला. तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आवश्यक अनुभव आणि या शिक्षणाविषयी असलेला कल त्यांनी जाणून घेतला. कामगारांचा सुरक्षिततेबाबतचा आत्मविश्वास हे नवीन तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे योगदान आहे, असे ते पुढे ते म्हणाले. त्यांनी देशाच्या विकासात भारतातील कामगारांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.

एअरटेल कंपनीच्या प्रात्यक्षिकातडंकौर, उत्तर प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या मदतीने सौर यंत्रणेबद्दल जाणून घेण्यासाठी एक जिवंत आणि रोमांचक शैक्षणिक अनुभव घेतला.  तर, खुशी नावाच्या विद्यार्थिनीने होलोग्रामद्वारे मंचावर बसून पंतप्रधानांसोबत तिचा अनुभव शेअर केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ, वाराणसीच्या रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर इथून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. व्हीआरद्वारे शिक्षणाच्या अनुभवामुळे संकल्पना सर्वसमावेशकपणे समजण्यास मदत झाली का, असे पंतप्रधानांनी खुशीला विचारले असता, या अनुभवानंतर नवीन गोष्टी शिकण्याकडे तिचा कल वाढला आहे, असे तिने सांगितले.

संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की आजची शिखर परिषद जागतिक असेल पण त्याचे परिणाम आणि दिशा स्थानिक आहेत. ते म्हणाले, 21 व्या शतकातील वेगाने विकसित होणाऱ्या भारतासाठी आजचा दिवस विशेष आहे. आज, 130 कोटी भारतीयांना देशाकडून आणि देशाच्या दूरसंचार उद्योगाकडून 5G च्या स्वरुपात एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G , देशातील नवीन युगाची दारे ठोठावत आहे. 5G ही संधींच्या अनंत अवकाशाची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन करतो, ते म्हणाले.  5G च्या प्रारंभामध्ये  आणि तंत्रज्ञानाच्या वाटचालीत ग्रामीण भाग आणि श्रमिक समान  भागीदार आहेत, हे नमूद करून त्यांनी समाधान व्यक्त केले.

5G सेवा सुरु होण्यामधून मिळत असलेल्या आणखी एका संदेशावर भर देत पंतप्रधान म्हणाले, नवा भारत हा केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाचा विकास आणि कार्यान्वयनामध्ये भारत सक्रिय भूमिका बजावेल. भविष्यातील वायरलेस तंत्रज्ञानाचे आरेखन  आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनात भारत मोठी भूमिका बजावेल. पंतप्रधानांनी हे निदर्शनास आणले की भारत 2G, 3G आणि 4G तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता. पण 5G सेवा सुरु करून भारताने एक नवा इतिहास रचला आहे. 5G सह, भारत प्रथमच दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये जागतिक मानक प्रस्थापित करत आहे", असे त्यांनी सांगितले.    

डिजिटल भारताबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, काही लोकांना वाटते  की ही केवळ सरकारी योजना आहे. पण डिजिटल भारत हे केवळ एक नाव नाही, तर देशाच्या विकासासाठीचा तो एक मोठा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनाचे उद्दिष्ट, हे तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे, जे तंत्रज्ञान लोकांसाठी काम करते, लोकांशी जोडून घेऊन काम करते.

डिजिटल भारतासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करून पंतप्रधानांनी स्पष्ट केले, आम्ही एकाच वेळी चहूबाजूंनी  4 आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित केले. प्रथम, उपकरणाची किंमत, दुसरे, डिजिटल संपर्क सक्षमता (कनेक्टिव्हिटी), तिसरे, डेटाची  किंमत, चौथे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘डिजिटल सर्वप्रथम’ (डिजिटल फर्स्ट) हा विचार.

पहिल्या स्तंभाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, उपकरणाची कमी किंमत केवळ आत्मनिर्भरतेद्वारे प्राप्त होऊ शकते. आठ वर्षांपूर्वीपर्यंत भारतात फक्त दोन मोबाईल उत्पादन युनिट (यंत्रणा) होती, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. हीच संख्या आता 200 वर गेली आहे, मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी हे नमूद केले की 2014 मधील मोबाईल फोनच्या शून्य निर्यातीवरून, आज आपण काही हजार कोटींचे मोबाईल फोन निर्यात करणारा देश बनलो आहोत. स्वाभाविक आहे, या सर्व प्रयत्नांचा परिणाम उपकरणाच्या किमतीवर झाला. आता आपल्याला कमी किमतीत अधिक वैशिष्ट्ये (फीचर्स) मिळू लागली आहेत, ते म्हणाले.     

डिजिटल  कनेक्टिव्हिटी या दुसर्‍या स्तंभाबद्दल पंतप्रधान म्हणाले की इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2014 मधील 6 कोटींवरून 80 कोटी झाली आहे.  ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेलेल्या पंचायतींची संख्या 2014 मध्ये  100 पेक्षा कमी होती, ती आता 1.7 लाख वर पोहोचली  आहे. सरकारने  ज्याप्रमाणे वीज पुरवण्यासाठी घरोघरी जाऊन अभियान सुरू केले, हर घर जल अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाला शुद्ध पाणी देण्याच्या अभियानावर काम केले आणि उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरीबातील गरीब लोकांपर्यंत गॅस सिलिंडर पोहोचवले, त्याचप्रमाणे  आमचे सरकार सर्वांसाठी इंटरनेट या ध्येयावर  काम करत आहे, ते म्हणाले.

तिसरा स्तंभ, डेटाच्या खर्चाबाबत, पंतप्रधान म्हणाले की उद्योगाला अनेक प्रोत्साहने देण्यात आली आणि 4G सारख्या तंत्रज्ञानाला धोरणात्मक पाठबळ  मिळाले. यामुळे डेटाची  किंमत कमी झाली आणि देशात डेटा  क्रांती सुरु झाली. हे तिन्ही स्तंभ सगळीकडे आपला गुणक  प्रभाव दाखवू लागले, असे पंतप्रधानांनी सांगितले.  

चौथा स्तंभ अर्थात 'डिजिटल फर्स्ट' ची कल्पना.  या विषयावर, पंतप्रधानांनी त्या काळाची आठवण करून दिलीजेव्हा मूठभर उच्चभ्रू वर्गाने गरीबांना डिजिटलचा अर्थ तरी समजेल का असा प्रश्न विचारला आणि त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली होती. पंतप्रधान म्हणाले, देशातील सामान्य माणसाची समज, शहाणपण आणि जिज्ञासू विचार क्षमतेवर त्यांचा नेहमीच विश्वास होता. ते म्हणाले की देशातील गरीब जनता त्यांना नेहमीच नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला तयार असल्याचे आढळून आले. 

डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करत  पंतप्रधानांनी सांगितले की यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेतला आणि डिजिटल पेमेंटचा मार्ग सुकर केला. ''सरकारने स्वतः नागरिक केंद्रित वितरण सेवा  ऍपच्या माध्यमातून करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मग ते शेतकरी असोत किंवा लहान दुकानदार असोत, आम्ही त्यांना त्यांच्या रोजच्या गरजा भागवण्याचा मार्ग ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे,'' असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महामारीच्या काळात एकीकडे अनेक देशांना त्यांच्या सेवा सुरू ठेवण्यासाठी अडचणी येत असताना भारतात  डीबीटी, शिक्षण, लसीकरण आणि आरोग्य सेवा आणि घरून काम करण्याच्या सुविधा अशा सर्व प्रकारच्या सुविधा कशा प्रकारे कोणत्याही अडचणीविना सुरू राहिल्या याकडे लक्ष वेधले.

डिजिटल इंडियाने एक मंच उपलब्ध करून दिल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की लहान व्यापारी, लहान उद्योजक, स्थानिक कलाकार आणि कारागीर आता स्वतःची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवून आपल्या सेवा आणि उत्पादनांचे विपणन करू शकतात. त्यांनी सांगितले की ''तुम्ही स्थानिक बाजारात किंवा भाजीबाजारात जाता त्यावेळी अगदी रस्त्यावर बसलेला विक्रेतासुद्धा तुम्हाला रोख रक्कम देऊ नका यूपीआयद्वारे मालाचे पैसे द्या, असे सांगतो. यातूनच हे सिद्ध होते. ज्यावेळी एखादी सुविधा उपलब्ध असते त्यावेळी विचार देखील पक्के होऊन जातात. जेव्हा सरकार स्पष्ट हेतूने काम करत असते त्यावेळी नागरिकांच्या हेतूमध्येही बदल होऊ लागतात,'' असे पंतप्रधानांनी सांगितले. हाच सरकारच्या 2जी आणि 5जीच्या  हेतू( नियत) मधला महत्त्वाचा फरक आहे.

डेटासाठी द्यावी लागणारी किंमत जगातील सर्वात कमी किंमतींपैकी एक आहे. ही किंमत प्रतिजीबी 300 रुपयांवरून प्रतिजीबी दहा रुपयांपर्यंत कमी झाली आहे. सरकारच्या ग्राहकाभिमुख केंद्रित प्रयत्नांविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की ''भारतामध्ये डेटाची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. त्याचा फार मोठा गाजावाजा आम्ही करत नाही आणि किंवा त्याच्या मोठमोठ्या जाहिराती लावत नाही, हा भाग वेगळा,'' असा टोला पंतप्रधानांनी लगावला. ''आम्ही देशातील लोकांचे जीवनमान कसे सुकर होईल आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांमध्ये कशा प्रकारे वाढ होईल यावर  लक्ष केंद्रित करत असतो,'' असे ते म्हणाले. भारताला पहिल्या तीन औद्योगिक क्रांतींचा लाभ बहुधा झाला नसेल पण चौथ्या औद्योगिक क्रांतीचा पुरेपूर लाभ भारताला मिळेल आणि ्प्रत्यक्षात भारत त्याचे नेतृत्व करेल असा मला विश्वास वाटत आहे,'' असे त्यांनी सांगितले.

5जी तंत्रज्ञानाचा वापर इंटरनेटच्या वेगवान उपलब्धतेपुरता मर्यादित नाही तर लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.  या तंत्रज्ञानाद्वारे मिळणारे फायदे प्रत्यक्षात आपल्या हयातीमध्येच पुरेपूर मिळतील याकडे आम्ही लक्ष पुरवत आहोत. उद्योगांमधल्या धुरिणांनी शाळा आणि महाविद्यालयांना भेटी द्याव्यात आणि या नव्या तंत्रज्ञानाच्या प्रत्येक पैलूचा उलगडा करावा असे आवाहन पंतप्रधानांनी दूरसंवाद उद्योग संघटनेच्या नेत्यांना केले. इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी सुटे भाग निर्माण करता यावेत यासाठी एमएसएमईंना पूरक पाठबळ देणारी व्यवस्था निर्माण करावी अशी सूचना त्यांनी केली. ''देशात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्यासाठी 5जी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले. नव्याने सुरू केलेल्या ड्रोन धोरणामुळे ड्रोन तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे फायदा मिळू लागला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अनेक शेतकऱ्यांनी ड्रोन उडवण्याचे कसब शिकून घेतले आहे आणि ते आपल्या शेतात कीटकनाशक आणि जंतूनाशकांची फवारणी ड्रोनच्या सहाय्याने करू लागले आहेत, असे  ते म्हणाले. यापुढच्या काळात उदयाला येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत संपूर्ण जगाला मार्गदर्शन करेल आणि भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी सर्वांना दिली.

केंद्रीय दूरसंचार  मंत्री अश्विनी वैष्णव, दूरसंचार  राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, भारती एंटरप्रायजेसचे अध्यक्ष सुनील मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, दूरसंवाद विभागाचे सचिव के राजारामन या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

5जी तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य माणसाला अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत. यामुळे विनाअडथळा नेटवर्क कव्हरेज, हाय डेटा रेट, लो लेटन्सी आणि उच्च दर्जाची भरवशाची दूरसंचार  सुविधा मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊर्जा कार्यक्षमता, स्पेक्ट्रम कार्यक्षमता  आणि नेटवर्क कार्यक्षमतेतदेखील वाढ होणार आहे. अब्जावधी इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणे कनेक्ट करण्यामध्ये या तंत्रज्ञानाची मदत होईल, प्रवास करत असतानाही उच्च दर्जाच्या व्हिडिओ सेवा उपलब्ध होतील, त्याचबरोबर टेलिसर्जरी आणि चालकरहित तंत्रज्ञानावर चालणाऱ्या गाड्या यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या सेवा उपलब्ध होणे शक्य होणार आहे. आपत्तींवर रियल टाईम मॉनिटरिंग, कृषीमध्ये अचूकता आणि खोल खाणींमधल्या खाणकामासारख्या अतिधोकादायक कामांमध्ये मानवाचा प्रत्यक्ष वापर कमी करता येईल.  

न्यू डिजिटल युनिव्हर्स या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबरदरम्यान आयएमसी 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. आघाडीचे विचारवंत, उद्योजक, नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा अतिशय वेगाने अंगिकार करण्यामुळे आणि त्याचा प्रसार करण्यामुळे उदयाला येत असलेल्या वैशिष्ठ्यपूर्ण संधींवर  एकत्र येऊन विचारमंथन करण्यासाठी आणि ्त्यांचे प्रात्यक्षिक  घडवण्यासाठी यामुळे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

***

S.Tupe/S.Kakade/R.Aghor/R.Agashe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864129) Visitor Counter : 551