पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये भावनगर येथे विविध विकासप्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमात केलेले भाषण


Posted On: 29 SEP 2022 11:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2022 

 

भावनगरच्या सर्व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मला भावनगरची माफी मागायची आहे, यापूर्वी मी कधीही इतक्या जास्त काळाने भावनगरला आलो नव्हतो, ही पहिली घटना आहे, मधल्या काळात येऊ शकलो नाही, यासाठी माफी मागत आहे. आणि आज तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर आशीर्वादाची बरसात केली आहे, जे प्रेम दिले आहे, हे मी कधीही विसरू शकणार नाही. दूरदूरपर्यंत माझी नजर पोहोचत आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आणि ते देखील इतक्या उष्णतेमध्ये तुम्ही आला आहात, तुम्हा सर्वांना शत-शत नमन करत आहे. आज माझी भावनगरची भेट विशेष आहे. एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, तर याच वर्षी भावनगर आपल्या स्थापनेची 300 वर्षे पूर्ण करणार आहे. 300 वर्षांच्या या प्रवासात भावनगरने शाश्वत विकासाची, सौराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकासाच्या या प्रवासाला नवे आयाम देण्यासाठी आज या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे. हे प्रकल्प भावनगरची ओळख आणखी बळकट करतील, सौराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सिंचनाची नवी भेट देतील, आत्मनिर्भर भारत अभियानाला आणखी मजबूत करतील. रिजनल सायन्स सेंटर उभारले गेल्यामुळे शिक्षण आणि संस्कृतीचे शहर म्हणून भावनगरची ओळख आणखी समृद्ध होईल. या सर्व प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

बंधू आणि भगिनींनो

ज्या ज्या वेळी मी भावनगरला येतो, एक गोष्ट नक्की सांगतो, गेल्या अडीच-तीन दशकांमध्ये सूरत, वडोदरा आणि अहमदाबादचं जे प्रस्थ राहिलं होतं आता राजकोट, जामनगर, भावनगर  यांचं देखील तशाच प्रकारचं प्रस्थ निर्माण होणार आहे. सौराष्ट्राच्या समृद्धीबाबत मला नेहमीच ठाम विश्वास वाटत राहिलेला आहे कारण येथील उद्योग, शेती, पर्यटन या तिन्ही घटकांसाठी येथे अभूतपूर्व संधी आहेत. आजचा हा कार्यक्रम याच दिशेने वेगाने पुढे जाणाऱ्या डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांचा एक जिवंत पुरावा आहे. भावनगर समुद्राच्या काठी वसलेला जिल्हा आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात जास्त लांबीची किनारपट्टी आहे. पण स्वातंत्र्यानंतर अनेक दशके किनारपट्टीच्या विकासाकडे कोणीही हव्या त्या प्रमाणात लक्ष दिले नसल्याने ही विशाल किनारपट्टी एका प्रकारे लोकांसाठी मोठे आव्हान बनले होते. समुद्राचे खारे पाणी या भागासाठी अभिशाप बनला होता. समुद्रकिनाऱ्यावर वसलेली गावे ओस पडली होती. लोक इथे-तिथे पलायन करू लागले होते. कित्येक तरुण सूरतला जात असायचे आणि तिथे एका खोलीत 10-10, 15-15, 20-20 लोक कसे बसे आपला चरितार्थ चालवत असायचे. अतिशय दुःखद परिस्थिती होती.

मित्रांनो,

गेल्या 2 दशकांमध्ये गुजरातच्या किनारपट्टीला भारताच्या समृद्धीचे प्रवेशद्वार बनवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. रोजगाराच्या अनेक नवीन संधी उभ्या केल्या आहेत. गुजरातमध्ये आम्ही अनेक बंदरे विकसित केली, अनेक बंदरांचे आधुनिकीकरण केले, गुजरातमध्ये आज तीन मोठे एलएनजी टर्मिनल आहेत, पेट्रोकेमिकल हब्ज आहेत आणि देशात गुजरात पहिले राज्य होते, जिथे पहिले एलएनजी  टर्मिनल बनले होते. राज्याच्या किनारपट्टीच्या भागात आम्ही शेकडो कोस्टल इंडस्ट्रीज विकसित केल्या. लहान मोठे उद्योग विकसित केले. उद्योगांची उर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही कोल-टर्मिनल्स चे जाळे देखील तयार केले आहे. आज गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या भागात अनेक पॉवर प्लान्ट जे केवळ गुजरातलाच नाहीत संपूर्ण देशाला उर्जा देत आहेत. आमच्या मच्छिमार बंधु-भगिनींच्या मदतीसाठी आम्ही फिशिंग हार्बर्स बनवले, फिश लँडिंग सेंटर्स आणि फिश प्रोसेसिंगला देखील प्रोत्साहन दिले. फिशिंग हार्बरचे जे  नेटवर्क आम्ही तयार केले आहे, त्याचा देखील सातत्याने विस्तार करण्यात येत आहे, त्याचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात मॅन्ग्रोव्हच्या जंगलांचा विकास करून आम्ही किनारपट्टीची परिसंस्था आणखी सुरक्षित केली आहे आणि मजबूत केली आहे आणि त्यावेळी भारत सरकारमध्ये एक मंत्री होते त्यांनी एकदा म्हटले होते की भारताच्या किनारपट्टीवरील राज्यांनी मँग्रोव्हचा विकास कसा करता येतो हे, गुजरातकडून शिकले पाहिजे. हे काम तुमच्या सहकार्याने गुजरातमध्ये झाले आहे. आम्ही  मत्स्यपालनाला देखील सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. गुजरात देशातील त्या अग्रणी राज्यांपैकी एक आहे जिथे समुद्री तणांच्या शेतीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. आज गुजरातची किनारपट्टी देशाच्या आयात-निर्यातीमध्ये खूप मोठी भूमिका बजावण्याबरोबरच लाखो लोकांच्या रोजगाराचे माध्यम देखील बनली आहे. आज गुजरातची किनारपट्टी, री-न्यूएबल एनर्जी आणि हायड्रोजन इकोसिस्टमचा पर्याय बनून उदयाला येत आहे. आम्ही सौराष्ट्राला देखील उर्जेचे एक महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरात आणि देशाच्या उर्जाविषयक ज्या गरजा आहेत त्यासाठी जे काही हवे आहे, आज हे क्षेत्र त्याचे सर्वात मोठे केंद्र बनत आहे. आता तर सौर ऊर्जेचे देखील अनेक प्रकल्प देखील या क्षेत्रात उभारले जात आहेत. पालितानामध्ये आज ज्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे, त्यामुळे या भागातील अनेक कुटुंबांना स्वस्त आणि पुरेशी वीज मिळणार आहे. एक काळ होता, जे आज 20-22 वर्षांचे असतील त्यांना तर या गोष्टी माहिती देखील नसतील, आपल्या याच गुजरातमध्ये एक काळ होता, जेव्हा रात्री जेवायच्या वेळी वीज आली तर तो आनंदाचा दिवस ठरायचा. आणि मला लक्षात आहे, मी मुख्यमंत्री बनल्यावर पहिल्या दिवसापासून लोक सांगत असायचे की कमीत कमी रात्री जेवताना तरी वीज मिळेल, असे काही तरी करा. ते सर्व दुःखाचे दिवस आता सरले आहेत मित्रांनो.

आज येथे पुरेशा प्रमाणात वीज असल्याने व्यवसायाच्या नव्या संधी या ठिकाणी निर्माण होत आहेत. उद्योगधंद्यांची भरभराट होत आहे. धोलेरामध्ये री-न्यूएबल एनर्जी, स्पेस आणि सेमीकंडक्टर उद्योगामध्ये जी गुंतवणूक होणार आहे, त्याचा लाभ देखील भावनगरला मिळणार आहे. कारण एका प्रकारे भावनगरच्या शेजारी असलेल्या भागाचा विकास होऊ लागला आहे आणि तो दिवस आता दूर नसेल ज्यावेळी अहमदाबादपासून धोलेरा, भावनगर हा संपूर्ण भाग विकासाची नवनवी शिखरे गाठणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भावनगर आज बंदर-प्रणित विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. या बंदराची देशभरातील विविध औद्योगिक क्षेत्रांसोबत एक मल्टीमोडल कनेक्टिविटी स्थापित होणार आहे. मालगाड्यांसाठी जे वेगळे ट्रॅक बसवले जात आहेत, त्यांनी देखील हे बंदर जोडले जाईल आणि दूसरे महामार्ग, रेल्वे नेटवर्क यांच्याशी देखील त्याची अतिशय चांगली कनेक्टिविटी असेल. पीएम गतिशक्ति नॅशनल मास्टर प्लान अशा कनेक्टिविटीच्या प्रकल्पांना आणखी नवे बळ देणार आहे. म्हणजेच भावनगरचे हे बंदर आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावेल आणि रोज़गाराच्या शेकडो संधी येथे निर्माण होतील. येथे मालसाठवणूक, वाहतूक आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित व्यापार-उद्योगांचा विस्तार होणार आहे. हे बंदर गाड्यांचे स्क्रॅपिंग, कंटेनर उत्पादन आणि धोलेरा स्पेशल इन्वेस्टमेंट रीजन सारख्या मोठ्या प्रकल्पांच्या गरजा देखील पूर्ण करेल. यामुळे या ठिकाणी नवीन रोजगार निर्माण होतील, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

मित्रांनो,

जगातील मोठ्या शिप ब्रेकिंग यार्डपैकी एक म्हणून अलंग ओळखले जाते. अलंग माहीत नाही असा जगात एखादाच कोणी असू शकेल. केंद्र सरकारने जे नवीन व्हेईकल स्क्रॅपिंग धोरण म्हणजे जुन्या गाड्या भंगारात काढण्यासाठी जे धोरण तयार केले आहे, ते जेव्हा लागू होईल, मित्रांनो मी अगदी ठामपणे सांगेन संपूर्ण भारतात या व्हेईकल स्क्रॅपिंग धोरणाचा सर्वात पहिल्यांदा आणि सर्वाधिक लाभ कोणाला होणार असेल तर तो तुम्हा लोकांना मिळणार आहे. याचे कारण आहे, अलंगकडे स्क्रॅपिंगशी संबंधित विशेष कौशल्य आहे. मोठ-मोठ्या जहाजांची तोडणी कशा प्रकारे केली जाते याची माहिती त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर जहाजांसोबत लहान-लहान वाहनांच्या स्क्रॅपिंगचे देशातील हे एक मोठे केंद्र बनू शकते. भावनगरच्या माझ्या होतकरू उद्योजकांना मला ही आठवण करून द्यायची गरज नाही कारण परदेशातून देखील या लहान लहान गाड्या आणून त्यांना येथे स्क्रॅप करण्याचे काम ते सुरु देखील करतील.

मित्रांनो,

या ठिकाणी जहाजांना तोडून जे लोखंड मिळवले जाते, आतापर्यंत बांधकाम क्षेत्रात त्याचा खूप उपयोग होतो. अलीकडेच आपण पाहिले आहे की कंटेनर्ससाठी कोणत्या एकाच देशावर अतिजास्त अवलंबून राहण्यामुळे केवढे मोठे संकट निर्माण होऊ शकते. भावनगरसाठी ही एक नवीन संधी आहे आणि मोठी संधी आहे.

एकीकडे जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा  वाढत आहे आणि दुसरीकडे जगही  कंटेनरच्या  विश्वासार्ह पुरवठादाराच्या शोधात आहेत. संपूर्ण जगाला लाखो कंटेनर्सची गरज आहे. भावनगरमध्ये बनणाऱ्या  कंटेनर्समुळे आत्मनिर्भर भारतालाही ऊर्जा मिळेल आणि इथे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.

मित्रांनो,

जेव्हा मनात लोकांच्या सेवेची भावना असते , परिवर्तन घडवून आणण्याची इच्छाशक्ती असते , तेव्हाच सर्वात मोठे ध्येय गाठणे शक्य होते. सुरतहून भावनगरला येणाऱ्या -जाणाऱ्या गाड्यांची काय अवस्था होती हे तुम्हाला चांगलेच माहित आहे.तास तास प्रवास, रस्ते अपघात, पेट्रोल-डिझेलचा खर्च, अशा अनेक अडचणी होत्या,  आता जीवावर बेतणारे  संकटही कमी झाले आहे. प्रवास भाड्याला लागणारा  पैसा आणि वेळेचीही बचत होत आहे. अनेक अडचणी असूनही  आम्ही घोघा-दहेज फेरी सुरू करून दाखवली , हे स्वप्न पूर्ण केले. घोघा-हजीरा रो-रो फेरी सेवेने सौराष्ट्र आणि सुरतचे अंतर सुमारे 400 किलोमीटरवरून कमी होऊन 100 किलोमीटरपेक्षा कमी केले आहे.अल्पावधीतच सुमारे 3 लाख प्रवाशांनी या सेवेतून प्रवास केला आहे.80 हजारांहून अधिक वाहनांना इथून तिकडे पोहोचवण्यात आली आहेत .  आणि यावर्षी आतापर्यंत 40 लाख लिटरहून अधिक पेट्रोल-डिझेलची बचत झाली आहे.म्हणजे तितके पैसे तुमच्या खिशात राहिले आहेत. आजपासून या मार्गावर मोठी जहाजे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मित्रांनो,

तुम्ही समजू शकता की, या भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी यांना किती मोठी ही सेवा उपलब्ध झाली आहे. पण या सगळ्या गोष्टी कुठलाही गाजावाजा न करता, मोठमोठ्या जाहिरातींच्या मागे पैसा न घालवता ही सगळी कामे होत आहेत , मित्रांनो.कारण आमची प्रेरणा आणि ध्येय कधीच सत्ता सुख  उपभोगण्याचे नव्हते. सत्तेला आम्ही नेहमीच  सेवेचे माध्यम मानतो .हा आमच्या  सेवेचा यज्ञ सुरु आहे..  या सेवाभावामुळेच  इतके  प्रेम, एवढा आशीर्वाद निरंतर उत्तरोत्तर वाढतच आहे, वाढतच आहे.

मित्रांनो,

आमच्या प्रयत्नांमुळे दळणवळण, वाहतुकीचीच नाही , तर इतक्या सुविधा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे  पर्यटनालाही चालना मिळाली आहे. गुजरातच्या किनारी भागात सागरी वारशाचे  जतन करून त्याला  पर्यटनाचे  सामर्थ्य  बनवण्यासाठी अभूतपूर्व काम केले जात आहे.लोथलमध्ये तयार होत असलेले सागरी संग्रहालय, कदाचित तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहित असेल. लोथलमध्ये जगात नाव होईल असे सागरी संग्रहालय उभारले जात आहे. जशी स्टॅच्यू ऑफ युनिटीची  ओळख निर्माण झाली आहे. तशीच ओळख लोथलचे सागरी संग्रहालयही निर्माण करणार आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.  जगातील सर्वात जुने बंदर लोथल, आपल्या गुजरातच्या धरतीवर आहे, ते आपल्या भावनगरच्या किनाऱ्यावर आहे. लोथल हे आपल्या वारशाचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे., ज्याला संपूर्ण जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्यासाठी खूप मेहनत घेतली जात आहे. लोथल सोबतच  वेलावदर राष्ट्रीय उद्यानांमधील पर्यावरण -पर्यटनाशी  संबंधित सर्किटचाही भावनगरला फायदा होणार आहे.विशेषत: जे छोटे उद्योजक आहेत, छोटे  व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, त्यांना विशेष फायदा होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या 2 दशकात सौराष्ट्रतील शेतकरी आणि मच्छिमार या दोघांच्या जीवनात मोठे परिवर्तन आले आहे. एक असा काळ होता , जेव्हा माहिती अभावी अनेकदा मच्छिमारांचे जीव धोक्यात येत असत, जेव्हा मी येथे मुख्यमंत्री होतो तेव्हा  मच्छिमारांना एक लाल रंगाची  बास्केट  देण्यात आली होती, त्यावर वेगवेगळी बटणे होती. एखादी दुर्घटना घडल्यास बटण दाबल्यानंतर  थेट तटरक्षक दलाच्या कार्यालयाला संदेश प्राप्त होत असे. त्यामुळे तातडीने मदत मिळणे शक्य होत असे. याच सेवेचा 2014 नंतर  आम्ही संपूर्ण देशापर्यंत विस्तार केला. मच्छिमारांच्या बोटी आधुनिक करण्यासाठी अनुदान दिले, शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड दिले.

मित्रांनो,

सौनी योजनेमुळे बदल होत असल्याचे पाहून आज मला खूप समाधान वाटते.मला आठवतेय, जेव्हा मी सौनी योजनेबद्दल बोललो होतो, तेव्हा मी आपल्या  सौराष्ट्रमध्ये  राजकोटला येऊन याची सुरुवात केली होती. सगळ्या प्रसारमाध्यमांनी  लिहिले होते की बघा, निवडणुका आल्या आहेत, म्हणूनच मोदीजींनी घोषणा केली आहे. निवडणूक होऊन जाईल ,विस्मरणात जाईल. पण मी सगळ्यांनाच चुकीचे  सिद्ध केलं. आज सौनी योजना, नर्मदा मातेसह  तिला जिथे जिथे नेण्याचा संकल्प केला होता, वेगाने पोहोचत आहे बंधुंनो . आम्ही शब्दाला जागणारे लोक आहोत, समाजासाठी जगणारे लोक आहोत.

मित्रांनो,

या सौनी प्रकल्पाच्या एका भागाचे लोकार्पण आज होत असून दुसऱ्या भागाचे काम सुरू होत आहे. आम्ही काम थांबू देत नाही.आज ज्या भागाचे लोकार्पण झाले आहे, यामुळे  भावनगर आणि अमरेली जिल्ह्य़ातील अनेक धरणांमध्ये पाणी पोहोचत आहे.याचा फायदा भावनगरमधील गारियाधर, जेसर आणि महुवा तालुक्यांतील आणि अमरेली जिल्ह्यातील राजुला आणि  खांभा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे.भावनगर, गीर सोमनाथ, अमरेली, बोटाद, जुनागढ, राजकोट, पोरबंदर या जिल्ह्यातील शेकडो गावे आणि डझनभर शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज या कामात नव्याने भर पडली आहे.

बंधु आणि भगिनींनो,

अभाव दूर  करून विकासात मागे राहिलेल्यांना आधार देत  पुढे घेऊन जाणे ही दुहेरी  इंजिन सरकारची वचनबद्धता  आहे. जेव्हा गरीबातील गरीबांना  साधने मिळतात, जेव्हा सरकार त्यांना संसाधने देते तेव्हा ते त्यांचे नशीब बदलण्याचा प्रयत्न करू लागतात. ते रात्रंदिवस कष्ट करतात  आणि गरिबीशी लढून गरिबीला हरवतात. गुजरातमध्ये आम्ही अनेकदा गरीब कल्याण मेळावे आयोजित करतो. अशाच एका कार्यक्रमादरम्यान मी भावनगर येथील एका भगिनीला तीन चाकी सायकल दिली होती. ती  दिव्यांग भगिनी होती, तेव्हा ती मला काय म्हणाली ? तुम्ही पहा ,स्वभाव पहा भावनागरच्या लोकांचा, गुजरातींची भावना बघा, माझ्या  अजून स्मरणात आहे. ती भगिनी म्हणाली की ,मला सायकल तर चालवता येत नाही . मला इलेक्ट्रिकल ट्रायसायकल द्या. हा स्वभाव आहे माझ्या गुजरातचा , हा स्वभाव आहे माझ्या भावनगरचा आणि हा जो विश्वास होता , त्या भगिनींच्या  मनात जो विश्वास होता,हा विश्वासच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे बंधुंनो. गरीबांची ही स्वप्ने, या आकांक्षा मला सतत काम करण्याची उर्जा देतात. तुमच्या आशीर्वादाने ही ऊर्जा कायम राहो आणि तुमचे प्रेम असेच वाढत राहो. आणि मी आज हे  नक्की सांगेन की,  मला यायला काही वर्षे लागली, मी उशिरा आलो, पण रिकाम्या हाताने आलो नाही. मागील वर्षांची जी थकबाकी  आहे ती देखील मी घेऊन आलो आहे. आणि असेही भावनगरचा माझ्यावर हक्क आहे. तुम्ही भावनगरला या आणि नरसीबापा चा गांठीया , दास चे पेढे  आणि जेव्हा मला गांठीया  आठवतो,तेव्हा मला माझ्या हरिसिंह  दादाची आठवण येते.अनेक वर्षांपूर्वी मी छोटा कार्यकर्ता म्हणून तेव्हा मी राजकारणातही नव्हतो.मला ज्यांनी  गांठीया  खायला शिकवले ते  म्हणजे  हरिसिंह  दादांनी शिकले.  अहमदाबादला आल्यावर गांठीया घेऊन यायचे ,त्यांना  आमची काळजी वाटायची.आज भावनगरला आलो आहे, तेव्हा नवरात्रीचे उपवास सुरू आहेत, त्यामुळे आता सगळ्याचा काही उपयोग नाही.तरीही भावनगरच्या गांठीया देशात आणि जगात प्रसिद्ध आहे, ही काही छोटी बाब नाही मित्रांनो. ही भावनगरची ताकद आहे. मित्रांनो, आज मी अनेक विकास प्रकल्प घेऊन आलो आहे. मी अनेक प्रकल्प घेऊन आलो आहे. भावनगरच्या तरुण पिढीचे भविष्य निश्चित करणाऱ्या  या योजना आहेत.भावनगरचे भविष्य उज्वल करण्याच्या या योजना आहेत.  कोणी  कल्पनाही करू शकणार नाही इतक्या वेगाने भावनगरचा विकास  होईल, त्यासाठी या योजना सुरू आहेत.आणि त्याचा लाभ संपूर्ण सौराष्ट्राला मिळेल, संपूर्ण गुजरातला मिळेल आणि देशालाही त्याची फळे चाखायला मिळतील. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जे  प्रेम दिले आहे , तुम्ही जे  आशीर्वाद दिले आहेत .तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला आहात, मी तुमचा मनापासून आभारी आहे. माझ्यासोबत  दोन्ही हात वरकरून  सर्व शक्तीनिशी  बोला,

भारत माता की-जय,

भारत माता की-जय,

भारत माता की-जय

खूप -खूप धन्यवाद !!
 

* * *

S.Kane/G.Chippalkatti/S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1863916) Visitor Counter : 136