पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधील सुरत येथे विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 29 SEP 2022 2:29PM by PIB Mumbai

भारत माता की– जय

भारत माता की– जय

 

तुम्हा सर्व सुरतवासियांना नवरात्रीच्या अनेक-अनेक शुभेच्छा. खरे तर नवरात्रीच्या दरम्यान माझ्यासारख्या व्यक्तीला सुरतमध्ये येणे  आनंददायक असते, छान वाटते मात्र  नवरात्रीचा उपास सुरु असतो , त्यामुळे सुरतमध्ये येणे थोडे अवघडल्यासारखे होते.  सुरतमध्ये यायचे आणि सुरती जेवण न खाता जायचे. 

हे माझे  सौभाग्‍य आहे की  नवरात्रीच्या या पवित्र प्रसंगी मी आज आणि उद्या गुजरातच्या भूमीवर पायाभूत विकास, क्रीडा-संस्कृती आणि श्रद्धेशी संबंधित अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.  गुजरातचा गौरव आणखी वाढवण्याचे भाग्य लाभणे, तुम्हाला भेटणे आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेणे, तुमचे हे प्रेम, तुमचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे.  गुजरातच्या लोकांचे , सुरतच्या लोकांचे आभार मानण्यासाठी माझे शब्द देखील अपुरे पडत आहेत एवढे प्रेम तुम्ही दिले आहे.  

सुरतमध्ये विकासाचा  लाभ ज्याप्रमाणे घरोघरी पोहचत आहे, ते जेव्हा मी पाहतो , ऐकतो तेव्हा मला होणारा आनंद कैक पटीने वाढतो. याच अनुषंगाने आज सुरतच्या विकासाशी निगडित  अनेक प्रकल्पांचे  उद्घाटन किंवा पायाभरणी करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश प्रकल्प  सामान्य सुरतवासी,  मध्यम वर्गीय आणि व्यापारी समुदायाला  अनेक प्रकारच्या  सुविधा आणि लाभ पोहचवणारे आहेत. मला सांगण्यात आले आहे की 75 अमृत सरोवरांच्या निर्मितीचे  काम सुरतमध्ये अतिशय वेगाने सुरु आहे. यासाठी देखील जिल्ह्यातील सर्व सहकारी, शासन-प्रशासन, प्रत्येकजण आणि माझे सुरतचे नागरिक देखील  अभिनंदनास पात्र आहेत. 

मित्रांनो, 

सुरत  शहर हे लोकांची एकी आणि लोकसहभाग या दोन्हींचे अप्रतिम उदाहरण आहे. भारतातील असा एकही प्रदेश नसेल जिथले लोक सुरतमध्ये राहत नाहीत, त्यामुळे एक प्रकारे  मिनी भारत आहे. सुरतचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की हे शहर श्रमाचा आदर करणारे शहर आहे आणि याचा मला कायम अभिमान वाटत राहील. इथे प्रतिभेचा आदर केला जातो, प्रगतीच्या आकांक्षा पूर्ण होतात , पुढे जाण्याची स्वप्ने साकार होतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे विकासाच्या शर्यतीत मागे पडतात, त्यांना हे शहर अधिक संधी देते, त्याचा हात धरून त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करते. सुरतची हीच वृत्ती स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताच्या निर्मितीसाठी खूप मोठी प्रेरणा आहे.

मित्रांनो, 

या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये जेव्हा जगात 3 'P'  अर्थात सार्वजनिक - खाजगी भागीदारीची चर्चा व्हायची, तेव्हा मी म्हणायचो की सूरत हे 4 P चे उदाहरण आहे.  “4 P म्हणजे  लोक, सार्वजनिक, खाजगी भागीदारी. या मॉडेलमुळे सुरत विशेष ठरते.सुरतचे लोक तो काळ कधीही विसरणार नाहीत ,  जेव्हा महामारी,पुराच्या संकटामुळे हे शहर बदनाम झाले होते. त्याकाळात इथले  व्यापारी आणि  व्‍यापारी समुदायाच्या अनेक लोकांना मी एक गोष्ट सांगितली होती. मी म्हटले होते की जर सुरत शहराचे  ब्रॅंडिंग झाले तर प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कंपनीचे आपोआप ब्रॅण्डिंग होईल. आणि आज पहा, सुरतमधील तुम्ही सर्वानी  हे करून दाखवले आहे.मला आनंद आहे की आज  जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये सुरतचा समावेश आहे आणि याचा  लाभ इथल्या प्रत्येक व्यापार-उद्योगाला होत आहे.

बंधू आणि भगिनींनो, 

गेल्या 20 वर्षांमध्ये सुरतने देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत खूप जास्त प्रगती केली आहे, वेगाने प्रगती केली आहे. आज आपण अनेकदा देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये सुरतचा अभिमानाने उल्लेख करतो.  मात्र हा सुरतच्या लोकांच्या अव्याहत मेहनतीचा परिणाम आहे.  शेकडो  किलोमीटरहून अधिक नव्या ड्रेनेज  नेटवर्कने सुरतला एक नवे  जीवनदान दिले आहे. दोन दशकांमध्ये या शहरात सांडपाणी प्रक्रियेची क्षमता वाढली आहे, त्यामुळेही  शहर स्वच्छ ठेवण्यात मदत झाली आहे. आज भाकर आणि  बामरौली मध्ये आणखी क्षमता वाढवण्यात आली आहे. इथे ज्यांना काम करताना  20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, ते या बदलाचे मोठे साक्षीदार आहेत. गेल्या काही वर्षात सुरतमध्ये झोपडपट्ट्यांची संख्या खूप कमी झाली आहे. या  2 दशकांमध्ये इथे गरीबांसाठी , झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी सुमारे  80 हजार घरे बांधण्यात आली आहेत. सुरत शहराच्या लाखो लोकांचा  जीवनस्तर यामुळे सुधारला आहे.

मित्रांनो, 

दुहेरी इंजिन असलेल्या सरकारच्या स्थापनेनंतर आता घरांच्या बांधकामालाही वेग आला आहे आणि सुरतमधल्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अन्य अनेक सुविधा देखील मिळू लागल्या आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील सुमारे 4 कोटी गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. यात गुजरातमधील 32 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा समावेश असून सुमारे 1.25 लाख रूग्ण सुरतमधील आहेत. 

तर  पीएम स्वनिधि योजनेअंतर्गत फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते , ठेल्यावर काम करणाऱ्या देशातील सुमारे 35 लाख लोकांना आतापर्यन्त बँकांकडून विना हमी स्वस्त कर्ज मिळाले आहे.  कदाचित तुम्ही जगातील अतिशय प्रसिद्ध दानशूर बिल गेट्स यांचा  एक लेख वाचला असेल, त्यात त्यांनी याचा उल्लेख केला आहे.   एक लेख लिहिला आहे ज्यात त्यांनी या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. मित्रांनो, यात गुजरातच्या अडीच लाखांहून अधिक लोकांना आणि सुरतच्या सुमारे 40 हजार लोकांना ही  मदत मिळाली आहे.

मित्रांनो,

सुरत शहराचा पश्चिमेकडील भाग,  रानदेर, अरायण, पाल, हज़ीरा, पालनपुर, जहांगीरपुरा आणि अन्य भाग आज गजबजलेला आहे,  तो 20 वर्षांच्या अथक एकनिष्ठ परिश्रमाचा परिणाम आहे. शहराच्या विभिन्न भागात तापी नदीवर  आज एक डझनाहून अधिक पूल आहेत, जे शहरालाही जोडत आहेत आणि सुरतवासियांना समृद्धीशी देखील जोडत आहेत.  या स्तरावरील आंतरराज्य  कनेक्टिविटी खूप कमी पहायला मिळते. सुरत खऱ्या अर्थाने पुलांचे शहर आहे. जे  मानवता, राष्ट्रीयत्व आणि  समृद्धि मधील दरी सांधून त्यांना जोडण्याचे काम करते. 

बंधू आणि भगिनींनो, 

आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे, त्या सर्वांमुळे सुरतची ही ओळख अधिक भक्कम होणार आहे. सुरतच्या  कापड आणि हिरे व्यवसायाने देशभरातील अनेक कुटुंबांच्या जगण्याला आधार  दिला. ड्रीम सिटी प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा सुरत हे शहर जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात सोयीस्कर हिरे व्यापार केंद्र म्हणून विकसित होईल.

तो दिवस दूर नाही, जेव्हा सूरत हे जगभरातले हिरे व्यापारी, कंपन्यांसाठीची,  आधुनिक कार्यालयांचे शहर  म्हणून ओळखलं जाईल.  

एवढंच नाही, काही महिन्यांपूर्वीच केंद्रसरकारने सूरत यंत्रमाग मेगाक्लस्टरला मंजूरी दिली आहे. हा भारत सरकारचा खूप मोठा निर्णय आहे. यामुळे सायन आणि ओलपाडो, या भागातल्या यंत्रमाग धारकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागत होता, त्या समस्या कमी होतील. एवढंच नाही, यामुळे प्रदूषणाशी संबंधित समस्या देखील दूर होतील.

मित्रांनो,

सूरतच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे सुरतीलालांना मौज केल्याशिवाय चालत नाही,  आणि बाहेरून येणारी व्यक्ती देखील बघता बघता सुरतीलालांच्या रंगात रंगून जाते. आणि मी तर काशीचा खासदार आहे, त्यामुळे लोक मला रोज सांगतात की सूरतचं भोजन आणि काशीचा मृत्यू. संध्याकाळ होताच ताप्ती नदीच्या आसपासच्या भागात फिरून थंड हवेचा आनंद घेतात आणि काहीतरी खाऊन-पिऊनच घरी परततात. म्हणूनच ताप्ती नदीच्या किनाऱ्यासह, सूरतला आणखी आधुनिक बनवण्याचे प्रयत्न पुढे नेण्याबद्दल भूपेंद्र भाई आणि सी आर पाटील आणि महापालिकेशी संबंधित लोक, या ठिकाणचे आमदार, या सर्वांचं तुमच्या या प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो. जैवविविधता उद्यान प्रकल्पामुळे सूरतवासीयांच्या या फिरण्याच्या सवयीला आणखी सुविधा मिळेल, उठा-बसायला-शिकायला नवीन ठिकाणं मिळतील.

बंधुनो आणि भगिनींनो.

शहराला विमानतळाबरोबर जोडण्यासाठी जो रस्ता बनला आहे, तो सूरतची संस्कृती, समृद्धी आणि अधुनिकतेचं दर्शन घडवतो. पण या ठिकाणी अनेक मित्र असे आहेत, ज्यांनी विमानतळासाठीचा आमचा दीर्घ संघर्ष देखील पहिला आहे, ते याचा भागही राहिले आहेत. तेव्हा दिल्लीमध्ये जे सरकार होतं, आम्ही त्यांना सांगून सांगून थकलो होतो की सुरतला विमानतळाची गरज किती आहे, या शहराचं सामर्थ्य कायकाय आहे. आज पहा, किती विमानं या ठिकाणाहून उड्डाण घेतात, किती लोक रोज या विमानतळावर उतरतात. आपल्या लक्षात असेल, हीच परिस्थिती मेट्रोबाबत देखील होती. पण आज जेव्हा डबल इंजिन सरकार आहे, तेव्हा मंजूरी देखील जलद गतीने मिळते आणि कामही तेवढ्याच वेगाने होतं.

बंधुंनो आणि भगिनींनो,

व्यापार-उद्योगात लॉजिस्टिक्सचं किती महत्वं असतं हे सूरतवासी चांगलं जाणतात. नवीन राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणामुळे सुरतला मोठा फायदा होणार आहे. मल्टी मोडल संपर्कासाठी देखील सूरतमध्ये एका मोठ्या योजनेवर काम सुरु झालं आहे. घोघा-हजीरा रोपॅक्स प्रवासी बोट  सेवेने सौराष्ट्राच्या कृषी हबला सूरतच्या व्यापारी हब बरोबर जोडण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. घोघा आणि हजीरा दरम्यानच्या रोरो प्रवासी बोट सेवेमुळे लोकांचा वेळी वाचत आहे आणि पैसाही वाचत आहे. रस्ते मार्गाने घोघा आणि वजीरा मधील आंतर जवळजवळ 400 किलोमीटरच्या आसपास असतं. तेच समुद्रा मार्गे हेच अंतर अगदी थोडेच किलोमीटर होतं. आता  ही, यापेक्षा मोठी सोय काय असू शकते. म्हणूनच यापूर्वी घोघाहून हजीराला यायला-जायला जे 10-12 तास लागत होते, तेच आता हा प्रवास साडे तीन-चार तासांच्या आत पूर्ण होतो. फेरी बोटीमुळे भावनगर, अमरेली आणि सौराष्ट्राच्या दुसर्‍या भागातून सूरतमध्ये आलेल्या लोकांना मोठा फायदा होईल. आता कायम स्वरूपी थांबा तयार झाल्यामुळे, येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी काही मार्ग खुले होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे इथल्या उद्योगांना, शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त फायदा होईल.              

मित्रांनो,

आमचं सरकार सूरतचे व्यापारी-उद्योजकांची प्रत्येक गरज लक्षात घेऊन काम करत आहे, नव-नवीन शोध लावत आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो. आपल्याला माहित आहे की सूरतच्या कपडा उद्योगाचा एक मोठा बाजार काशी आणि पूर्व उत्तरप्रदेशला देखील जोडलेला आहे. इथून मोठ्या प्रमाणात ट्रकमधून, पूर्व उत्तरप्रदेश मध्ये समान पाठवलं जातं. आता रेल्वे आणि टपाल खात्यानं एकत्र येऊन एक नवीन उपाय देखील शोधला आहे, एक नवीन शोध लावला आहे. रेल्वेने आपल्या डब्याची रचना अशा प्रकारे बदलली आहे, की त्यामध्ये माल सहज बसतो. त्यासाठी खास एक टन क्षमतेचे डबे देखील बनवले गेले आहेत. हे डबे सहजगत्या चढवले आणि उतरवले जाऊ शकतात. सुरुवातीच्या यशानंतर आता सूरतहून काशीसाठी एक नवीन रेल्वे गाडी चालवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही गाडी, सूरतहून काशीपर्यंत माल घेऊन जाईल. याचा खूप मोठा फायदा सूरतच्या व्यापाऱ्यांना होईल, इथल्या व्यापाऱ्यांना होईल, इथल्या माझ्या श्रमजीवी बंधू-भगिनींना होईल.

लवकरच सूरत विजेवर चालणारी इलेक्ट्रिक वाहनं, विजेवर चालणार्‍या गाड्यांसाठी देखील सूरत ओळखलं जाईल. सूरतची रोज नव-नवीन ओळख बनत आहे, कधी सिल्क सिटी, कधी डायमंड सिटी, कधी सेतू सिटी आणि आता वि‍जेवरच्या वाहनांचं शहर, या रुपात ते ओळखलं जाईल. केंद्रसरकार आज संपूर्ण देशात वि‍जेवरची वाहनं चालवण्यासाठी राज्य सरकारांना सहाय्य करत आहे. सूरत या बाबतीत देखील देशातल्या इतर शहरांच्या तुलनेत खूप वेगाने काम करत आहे आणि मी या कामासाठी सुरतचं अभिनंदन करतो. आज सूरत शहरात 25 चार्जिंग स्टेशन्सचं लोकार्पण आणि तेवढ्याच स्टेशन्सचं भूमिपूजन झालं आहे. आगामी काळात सूरतमध्ये 500 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या दिशेने हे खूप मोठं पाउल आहे.

मित्रांनो,

गेल्या दोन दशकांपासून विकासच्या ज्या मार्गावर सूरतचा प्रवास सुरु आहे, तो आगामी वर्षांमध्ये आणखी वेगाने होणार आहे. हाच विश्वास आज डबल इंजिन सरकारवरील विश्वासाच्या रुपात समोर येत आहे. जेव्हा विश्वास वाढतो, तेव्हा प्रयत्न वाढतो. आणि सर्वांच्या प्रयत्नांनी देशाच्या विकासाची गती वाढते. ही गती आपण कायम ठेवू, याचा आशेने सूरतच्या लोकांप्रति जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी कमीच आहे. सूरतने आपलं उदाहरण ठेवून प्रगती केली आहे. मित्रांनो, हिंदुस्तानात सुरतच्या बरोबरीची अनेक शहरं आहेत, पण सूरतने सर्वांना मागे टाकलं आहे. आणि हे सामर्थ्य गुजरातमधेच आहे मित्रांनो, गुजरातच्या या सामर्थ्याला जराही धक्का लागू नये, गुजरातच्या विकास यात्रेत कुठलीही उणीव राहू नये, यासाठी कोटी-कोटी गुजराती कटिबद्ध आहेत, वचनबद्ध आहेत. याच विश्वासाने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप-खूप आभार.

भारत माता की- जय,

भारत माता की-जय,

भारत माता की- जय,

धन्यवाद!  

***

GopalC/SushamaK/RAgashe/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1863660) Visitor Counter : 117