गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे, टाकाऊ वस्तूंपासून खेळण्यांची रचना करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचे आयोजन
इच्छुक अर्जदारांना 26 सप्टेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत https://innovateindia.mygov.in/swachh-toycathon/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल
Posted On:
26 SEP 2022 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2022
खेळण्यांसाठीच्या राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ या टाकाऊ वस्तूंपासून खेळण्यांची रचना करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सेवा दिवस अर्थात 17 सप्टेंबर 2022 पासून स्वच्छता दिवस अर्थात 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत, स्वच्छतेशी संबंधित कृतींवर भर देणाऱ्या या पंधरवड्यात, ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांनी मायगव्ह पोर्टलवर ऑनलाईन मंचाचे अनावरण करून आणि टूलकिट जारी करून या स्वच्छ टॉयकॅथॉनचा शुभारंभ केला. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्यांच्या निर्मितीमध्ये किंवा उत्पादनांमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यासाठीचे उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमात गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे नॉलेज पार्टनर म्हणून सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग, आयआयटी गांधीनगर ही संस्था सहभागी होत असून, या संस्थेमार्फत अध्यापनशास्त्र आणि सर्जनशीलता या पैलूंवर सहाय्य प्रदान केले जाणार आहे.
स्वच्छ टॉयकॅथॉन ही वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन गटात घेतली जाणारी राष्ट्रीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा तीन व्यापक संकल्पनांवर आधारित आहे. (i) फन अँड लर्न – या गटात घर, कामाचे ठिकाण आणि आसपासच्या टाकाऊ वस्तूंपासून खेळण्यांची रचना आणि नमुन्यादाखल खेळणे तयार करायचे आहे, (ii) यूज अँन्ड एन्जॉय – या गटात, टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या, बागेत किंवा मोकळ्या जागी खेळता येणाऱ्या खेळण्यांची रचना करणे अपेक्षित आहे. (iii) न्यू अँड ओल्ड – या संकल्पनेअंतर्गत, खेळणी उद्योगात पुनर्वापर करता येणाऱ्या बाबींसंदर्भातल्या कल्पना आणि/किंवा उपाय सुचवून खेळण्यांची रचना करायची आहे.
टाकाऊ आणि पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर करून तयार केलेली खेळणी आणि प्ले-झोनच्या रचना, पर्यावरणपूरक खेळणी आणि पॅकेजिंग तसेच खेळणी उद्योगाचा नव्याने विचार करणाऱ्या इतर नाविन्यपूर्ण कल्पनांचा समावेश, या स्पर्धेत अपेक्षित आहे.
26 सप्टेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत इच्छुक अर्जदारांना
https://innovateindia.mygov.in/swachh-toycathon/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. (i) फन अँड लर्न (ii) यूज अँन्ड एन्जॉय आणि (iii) न्यू फ्रॉम ओल्ड, अशा तिन्ही किंवा कोणत्याही एका संकल्पनेवर आधारित गटासाठी इच्छुक अर्जदारांना आपले अर्ज पाठवता येतील.
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या: https://innovateindia.mygov.in/swachh-toycathon/
* * *
S.Patil/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862320)
Visitor Counter : 202