माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'आंबेडकर अँड मोदी: रिफॉर्मर्स आयडियाज परफॉर्मर्स इम्प्लिमेंटेशन' या पुस्तकाचे प्रकाशन


हे पुस्तक डॉ आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी करण्‍यात येत असलेल्‍या अथक प्रयत्नांचे दस्तऐवजीकरण : अनुराग ठाकूर

''208 महाविद्यालये सुरु करत 1 लाखांच्यावर जागा वाढवून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी,”

''आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन समता, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी केले समर्पित"

Posted On: 16 SEP 2022 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरमाजी सरन्यायाधीश के जी बालकृष्णन, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री  डॉ. एल. मुरुगन आणि ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनचे संचालक हितेश जैन यांच्या उपस्थितीत, 'आंबेडकर अँड  मोदी: रिफॉर्मर्स आयडियाज परफॉर्मर्स इम्प्लिमेंटेशन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

हे पुस्तक केवळ महान समाजसुधारक  बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांच्या उदात्त विचारांचा आणि दूरदृष्टीचा संग्रह नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात त्या विचारांची अंमलबजावणी कशाप्रकारे  केली आहे याचेही संकलन आहे.डॉ. आंबेडकरांचे स्वप्न  साकार करण्यासाठी  होत असलेल्या अथक प्रयत्नांचे हे दस्तऐवजीकरण आहे,असे अनुराग ठाकूर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

ठाकूर यांनी यावेळी डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचे स्मरण केले आणि ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर   एक उत्कृष्ट राजकारणी होते आज आपल्या देशाची जी ओळख आहे त्याचा पाया त्यांच्या  कल्पना, हस्तक्षेप आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून  रचला गेला आहे.  आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य समता, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित केले. उपेक्षित आणि सामाजिक शोषितांचा ते आवाज होते. त्यांच्या जीवनाचा आणि प्रभावाचा आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये  व्यापक प्रभाव राहणार आहे असे मंत्र्यांनी सांगितले.

देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून, डॉ. आंबेडकरांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी , विकासाची फळे सर्वांना समान रीतीने चाखता यावीत यादृष्टीने भेदभाव विरहित समाजाची संकल्पना मांडली होती,मात्र ही  संकल्पना  प्रत्यक्षात आणण्यात स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांचे प्रयत्न कमी पडले. 2014 पासून मात्र सरकारने या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अथक पाठपुरावा केला आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकार स्थापन केल्यानंतर अगदी सुरुवातीपासूनच पंतप्रधानांनी दलित, रंजले गांजलेले  आणि समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी  समर्पित राहू अशी घोषणा केली होती, असे सरकारचे  मूळ तत्वज्ञान अधोरेखित करताना ठाकूर यांनी सांगितले. तेव्हापासूनच सरकारच्या  कृती आणि धोरणांनी अंत्योदयाच्या  दिशेने वाटचाल सुरु केली आहे. मेक इन इंडिया असो किंवा उत्पादन संलग्न  प्रोत्साहन योजना असोत, डॉ. आंबेडकरांच्या कल्पनेनुसार आधुनिक भारत साकारण्यासाठी सरकारचे हे उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' (जनतेच्या सुखासाठी, जनहितासाठी) हा जीवनमंत्र पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या मॉडेलचा नेहमीच गाभा राहिला आहे. देशात शिक्षणाच्या क्षेत्रात आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी आणि इतर उच्च शैक्षणिक संस्थांच्या संख्येत वाढ झाली आहे. आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांच्या स्वतःच्या  विश्वासाने प्रेरित होऊन, पंतप्रधान मोदी यांनी प्राथमिक, उच्च आणि वैद्यकीय शिक्षणावर लक्ष केंद्रित करून, वेगाने शिक्षण क्षेत्राचा कायापालट करण्यात कोणतीही कसर सोडलेली  नाही.गेल्या आठ वर्षांत 208 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत  आणि वैद्यकीय जागांची संख्या 78 हजारांवरून 1 लाखांहून अधिक झाली आहे, ही एक अतुलनीय कामगिरी आहे,आम्ही देशातील डॉक्टरांच्या संख्येतील दरी भरून काढण्यासाठी  आणि सर्वात गरीब लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी कार्यरत आहोत.

देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा अधोरेखित करत केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की आता देशाच्या कानाकोपऱ्यात विजेची जोडणी पोहोचली आहे, 45 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत, संकटकाळात महिलांच्या बँक खात्यांमध्ये 31 हजार कोटींहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ही विकासकामे म्हणजे सरकारची ओळख आहेत.एकीकडे बीएचआयएमने सशक्त डिजिटल भरणा प्रणालीचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले, देशभरात 11 कोटींहून अधिक शौचालये बांधली तर दुसरीकडे आपण3 कोटी घरे बांधून पूर्ण केली.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिला-केंद्रित आणि महिलांद्वारे संचालित विकासाची संकल्पना म्हणजे सरकारच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. देशातील 12 कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर्स दिली जातील याची सुनिश्चिती सरकारने केली असून महिलांच्या पूर्वी मंजूर असलेल्या 12 आठवड्यांच्या बाळंतपणाच्या रजेचा कालावधी वाढवून आता 26 आठवडे करण्यात आला आहे.

मागास समुदायांना देण्यात आलेल्या लाभांबद्दल बोलताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की मुद्रा योजनेमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागास समुदायांतील 34 कोटी सदस्यांना कोणत्याही तारणाविना सुमारे 18 लाख कोटी रुपयांची कर्जे देण्यासाठी मदत झाली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील 3.1 सदस्य उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत तर या समुदायांतील नागरिकांना 1.31 कोटी पक्की घरे बांधून देण्यात आली आहेत.

तरुणांना प्रोत्साहन देण्यासंदर्भातील डॉ. बाबासाहेब यांच्या संकल्पनेवर आधारित आंबेडकर सामाजिक नवोन्मेष आणि मंथन अभियानाची सुरुवात 2020 मध्ये करण्यात आली.  पंतप्रधान दक्ष योजनेतून 2 लाख 27 हजार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांचा समावेश कुशल कार्यबळात करण्यात आला आहे. वर्ष 2014 पूर्वी कामगारांची राज्य विमा योजनेसाठीची वेतन मर्यादा केवळ 15,000/- रुपये होती ती आता वाढवून 21,000/- रुपये करण्यात आली आहे, केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले.

बाबासाहेबांप्रती वाटणाऱ्या आदराचे प्रतीक म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सरकारने पंच तीर्थांची निर्मिती केली आणि संसद भवनात डॉ.आंबेडकर यांची प्रतिमा देखील स्थापित केली असे त्यांनी सांगितले.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या भाषणात, डॉ. आंबेडकर यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेतला. स्वतंत्र भारताच्या उभारणीच्या वर्षांमधील त्यांच्या योगदानाचे स्मरण करत कोविंद म्हणाले की, बाबासाहेबांच्या योगदानामुळे बँकिंग, सिंचन, वीज प्रणाली, शिक्षण व्यवस्था, कामगार व्यवस्थापन, महसूल वाटप यंत्रणा इत्यादी विषयांशी संबंधित धोरणांची उत्तम प्रकारे सांगड घालता आली.

कोविंद यांनी 2010 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या गौरव यात्रे दरम्यानची  आठवण सांगितली. एका सुशोभित केलेल्या हत्तीच्या पाठीवर भारतीय संविधानाची एक मोठी प्रत ठेवण्यात आली होती, तर मुख्यमंत्री मोदी लोकांबरोबर पायी चालत होते. संविधानाचा सन्मान आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या आदराचे यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण सापडणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि पंतप्रधान मोदी यांची धोरणे यांच्यातील समांतर सांगताना कोविंद म्हणाले की देशभरातून सादर केलेल्या दोन लाखांहून अधिक कल्पनांमधून निर्माण झालेले आणि मातृभाषेतून शिक्षण देणारे नवीन शैक्षणिक धोरण बाबासाहेबांच्या विचारांशी सुसंगत आहे. ते पुढे म्हणाले की अनेक जटील कायदे बदलून त्याची जागा घेणाऱ्या चार कामगार संहिता आणि कामगारांसाठीचा सार्वत्रिक खाते क्रमांक हे डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे फलित आहे.

भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बाळकृष्ण यांनी भारतातील महान विचारवंतांपैकी एक म्हणून डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचे स्मरण केले. औद्योगिकीकरण, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि भारताचे आधुनिकीकरण याबाबतच्या बाबासाहेबांच्या विचारांचे त्यांनी स्मरण केले. डॉ. आंबेडकरांनी भारताबाबत मांडलेल्या कल्पनेचे सार सध्याच्या सरकारची धोरणे अमलात आणत असल्याचेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

या कार्यक्रमापूर्वी न्यायमूर्ती के जी बाळकृष्ण आणि अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय दळणवळण संस्थेच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमा  अंतर्गत डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे जीवन, शिकवण आणि योगदान यावर भर देणाऱ्या तीन दिवसीय डिजिटल परस्पर संवाद मल्टी मिडिया प्रदर्शनाचे उद्घाटन केले. डॉ. आंबेडकरांचे विचार आणि सरकारचे विकासात्मक उपक्रम याबाबत जागरुकता निर्माण करत अभ्यागतांना एक परिपूर्ण अनुभव देईल अशी या प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये होलोक्यूब्स, डिजिटल इंटरएक्टिव्ह पझल्स, आरएफआयडी आधारित डिजिटल इंटरएक्टिव्ह डिस्प्ले, इंटरएक्टिव्ह टच वॉल्स आणि फ्लिप बुक्सचा समावेश आहे.

'आंबेडकर अँड मोदी: रिफॉर्मर्स आयडियाज परफॉर्मर्स इम्प्लिमेंटेशन' या पुस्तकाविषयीः

भारतातील प्रतिभेचा सुयोग्य वापर करणाऱ्या आणि समाजाच्या कल्याणासाठी चाकोरीबाहेरच्या संकल्पना वापरून भारतीय समाजाचे सक्षमीकरण करणाऱ्या ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशन या संस्थेने  अतिशय काळजीपूर्वक आणि कुशलतेने या पुस्तकाचे संकलन केले आहे.

राज्यसभेचे खासदार इलायाराजा( अतिशय प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार म्हणूनही ओळखले जाणारे) यांनी यामध्ये विवेचन केले आहे ज्यामुळे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामामध्ये आढळणारे व्यापक बुद्धीसामर्थ्य आणि त्यांचे  ज्ञान याविषयी अतिशय बहुमूल्य मार्गदर्शन होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून भारताच्या प्रगतीसाठी आखलेली धोरणे आणि सुधारणा यामधील समानतेची माहिती मिळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य याविषयी सतत सुरू असलेल्या संशोधनकार्यामध्ये ‘आंबेडकर आणि मोदी’ हे पुस्तक महत्त्वाची भर घालत आहे आणि देशातील धोरणविषयक परिदृश्यात त्याचे मोलाचे योगदान असेल. एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताच्या वाटचालीमधील मैलाचा दगड म्हणून ते काम करते आणि डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा दृष्टीकोन पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टी असलेल्या आणि गतिमान नेतृत्वाखाली अखेर कशा प्रकारे साकार होत आहे याचे विश्लेषण या पुस्तकात पाहायला मिळते.

डॉ. आंबेडकर यांचे आयुष्य, कार्य आणि कामगिरी यांचा हे पुस्तक विद्वत्तापूर्ण दृष्टीकोनातून सखोल आढावा घेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श आणि नव्या भारताच्या विकासाचा प्रवास यामधील निर्विवाद अभिसरण दाखवून देते.

 

 

 

  

 

 

 

 

S.Patil /Sonal C/Sanjana/Rajashree/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859886) Visitor Counter : 204