महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बाल विकास मंत्रालय 5 वा राष्ट्रीय पोषण माह 2022 साजरा करणार
Posted On:
31 AUG 2022 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2022
पोषण अभियान हा देशातील 6 वर्षांखालील लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांचे पोषण सुधारण्यासाठी भारत सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पोषण (पंतप्रधान सर्वसमावेशक पोषण योजना) अभियानाचे उद्दिष्ट एकत्रित प्रयत्नांतून कुपोषणावर मात करणे हे आहे. पोषण अभियानाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून, मिशन पोषण 2.0 (सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0) हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये पोषक घटक, वितरण, संपर्क आणि परिणाम बळकट करण्याबरोबरच आरोग्य, कल्याण आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालय 1 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत 5 वा राष्ट्रीय पोषण माह 2022 साजरा करत आहे. यावर्षी, "महिला और स्वास्थ्य" आणि "बच्चा और शिक्षा " वर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून पोषण पंचायत म्हणून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पोषण माहला चालना देणे हा उद्देश आहे.
'स्वस्थ भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात गर्भवती आणि स्तनदा महिला, सहा वर्षांखालील लहान मुले आणि किशोरवयीन मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करून जनजागृती , संपर्क , ओळख मोहिम, शिबिरे आणि मेळाव्यांद्वारे तळागाळापर्यंत पोषणविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
पंचायत स्तरावर, संबंधित जिल्हा पंचायती राज अधिकारी आणि सीडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कार्यकर्त्यांद्वारे जनजागृती उपक्रम राबवले जातील. आंगणवाडी केंद्रे (AWCs), ग्राम आरोग्य आणि पोषण दिन (VHNDs) आणि इतर संबंधित मंचांद्वारे समस्या सोडवण्यासाठी आणि सेवा पुरवण्यास समर्थन देण्यासाठी तसेच सर्व गरोदर आणि स्तनदा महिला, सहा वर्षांखालील मुले आणि किशोरवयीन मुलींना मूलभूत एकात्मिक बाल विकास सेवा सुनिश्चित करण्यासाठी पोषण पंचायत समित्या क्षेत्रीय कामगार (FLWs) - अंगणवाडी कर्मचारी, आशा , आरोग्य कर्मचारी (ANM) यांच्यासह एकत्रितपणे काम करतील.
अंगणवाडी सेवा आणि चांगल्या आरोग्य पद्धतींबाबत जनजागृती मोहीमही आयोजित केली जाईल. अधिकाधिक लाभार्थ्यांना अंगणवाडी सेवांच्या कक्षेत आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. - अंगणवाडी कर्मचारी, आशा , आरोग्य कर्मचारी , जिल्हा कार्यकत्रे आणि लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी संस्थांच्या मदतीने स्वस्थ बालक स्पर्धा अंतर्गत या मोहिमेचे आयोजन केले जाईल. ऍनिमिया तपासणीसाठी विशेषतः किशोरवयीन मुलींसाठी अंगणवाडी केंद्रात आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील.
याशिवाय, अंगणवाडी केंद्रांवर (AWC) किंवा आसपासच्या परिसरात पोषण-उद्यान किंवा पोषण वाटिका साठीही जमीन निवडण्यात येईल.
अंगणवाडी केंद्रांमध्ये महिलांना पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याचे महत्व पटवून देण्यावर तसेच आदिवासी भागात निरोगी माता आणि बाळासाठी पारंपारिक खाद्यपदार्थांवर विशेष भर दिला जाणार आहे.
राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत ‘अम्मा की रसोई’ किंवा पारंपारिक पौष्टिक पाककृतींचे आजीचे स्वयंपाकघर आयोजित केले जाईल. या महिन्यात पारंपारिक पदार्थांना स्थानिक सण उत्सवांशी जोडण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील.
अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकण्यासाठी देशी आणि स्थानिक खेळण्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर खेळणी निर्मिती कार्यशाळाही आयोजित केली जाईल.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत महिला आणि बाल विकास विभाग, आशा, एएनएम, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, शाळांमार्फत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग , पंचायती राज विभाग आणि बचतगटांच्या माध्यमातून ग्रामविकास विविध उपक्रम राबवतील आणि महिला आणि मुलांचे आरोग्यदायी भविष्य सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण महिनाभर सर्वांगीण पोषणाचा महत्त्वाचा संदेश पसरवतील .
राष्ट्रीय पोषण माह हे पोषण आणि उत्तम आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचे एक व्यासपीठ म्हणून काम करते. पंतप्रधानांच्या सुपोषित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जनआंदोलनाचे जन भागिदारीमध्ये रूपांतर करणे हे 5 व्या राष्ट्रीय पोषण माहचे उद्दिष्ट आहे.
* * *
S.Kane/Sushma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856091)
Visitor Counter : 506