पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गांधीनगर इथल्या गिफ्ट सिटी इथे आयएफएससीए च्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 29 JUL 2022 10:40PM by PIB Mumbai

 

नमस्कार !

कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाई, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला जी, मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारी, उद्योगजगतातील सर्व सन्माननीय लोक, इथे उपस्थित इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!

आज भारताचे वाढते आर्थिक सामर्थ्य, भारताचे तंत्रज्ञान सामर्थ्य आणि भारतावर जगाच्या वाढत असलेल्या विश्वासासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे. अशा  वेळी, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आधुनिक होत असलेल्या भारतातल्या नव्या संस्था आणि नव्या व्यवस्था, भारताचा गौरव वाढवत आहेत.

आज गिफ्ट सिटी इथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण - IFSCA चे मुख्यालय असलेल्या इमारतीचा शिलान्यास करण्यात आला आहे. मला विश्वास आहे, या भवनाची संरचना तिचे स्थापत्य जितके भव्य असेल, तेवढीच ही इमारत भारताला आर्थिक महाशक्ती बनवण्यासाठी असीम संधी देखील तयार करेल.  IFSCA अनेक गोष्टी साध्य करण्यासाठीचे साधन बनेल, नवोन्मेषालाही आधार देईल आणि त्या त्यासोबतच विकासाच्या संधींसाठी एक उत्प्रेरक म्हणूनही काम करेल. गिफ्ट सिटीमध्ये NSE IFSC- SGX  यांना एकमेकांशी जोडण्यासाठी आज ही सुरुवात होत आहे.

 

मित्रांनो,

आज भारतीय आंतरराष्ट्रीय सराफा विनिमय केंद्राचेही उदघाटन करण्यात आले आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भारतीय प्रादेशिक कार्यालय, तीन परदेशी बँका आणि चार आंतरराष्ट्रीय व्यापार वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म या सगळ्यांसोबतच, अनेक महत्वाचे टप्पे देखील आम्ही आज पार केले आहेत. यामुळे 130 कोटी देशबांधवांच्या सामर्थ्याला आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडले जाण्यास अधिक मदत मिळेल. आता भारत अमेरिकाइंग्लंड आणि सिंगापूर सारख्या जगातील अशा देशांच्या रांगेत उभा आहे जिथे जागतिक वित्तव्यवस्थेला दिशा दिली जाते. या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना, सर्व देशबांधवांचे खूप खूप अभिनंदन करतो. विशेषतः सिंगापूर मधल्या माझ्या सहकाऱ्यांचे देखील मी अभिनंदन करतो. त्यांच्या सहकार्याने दोन्ही देशांमध्ये संधीचे अनेक आयाम खुले होत आहेत.

 

मित्रांनो,

गुजरात मध्ये असताना मी गिफ्ट सिटीची कल्पना मांडली होती, तेव्हा ती कल्पना केवळ व्यापार - व्यवसाय या पुरतीच मर्यादित नव्हती. गिफ्ट सिटीच्या काल्पनेत देशाच्या सर्वसामान्य व्यक्तींच्या आकांक्षा सामावलेल्या आहेत. गिफ्ट सिटी मध्ये भारताच्या भविष्याचा दृष्टीकोन आहे, भारताच्या सुवर्णमयी इतिहासाची स्वप्न देखील निगडीत आहेत.

मला आठवतं, जानेवारी 2013 मध्ये जेव्हा मी गिफ्ट वनच्या उद्घाटनाला इथे आलो होतो, तेव्हा लोक याला गुजरातची सर्वात उंच इमारत म्हणत असत. अनेक लोकांसाठी हीच याची ओळख होती. पण गिफ्ट सिटी ही अशी कल्पना होती, जी आपल्या काळाच्या कितीतरी पुढे होती. तुम्हाला आठवत असेल, 2008 मध्ये जागतिक आर्थिक संकट आणि मंदी होती. भारतात देखील दुर्दैवाने त्या काळात धोरण लकव्याची परिस्थिती होती, त्या काळी, म्हणजे कल्पना करा त्या काळातली जगाची परिस्थिती, त्या काळात गुजरात फिनटेकच्या क्षेत्रात नवी आणि मोठी पावलं उचलत होता. मला आनंद आहे की ती कल्पना आज इतकी पुढे गेली आहे. गिफ्ट सिटी व्यापार आणि तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून आपली मजबूत ओळख बनवत आहे. गिफ्ट सिटी संपत्ती आणि ज्ञान, दोन्हीचं केंद्र आहे. मला हे बघून देखील आनंद होतो की गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारत, जागतिक स्तरावर सेवा क्षेत्रात आपली मजबूत दावेदारी सांगत पुढे जातो आहे.

 

मित्रांनो,

गिफ्ट सिटीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, हा त्री- शहर दृष्टीकोन आहे. अहमदाबाद, गांधीनगर आणि गिफ्ट सिटी, तीनही शहराचं अंतर केवळ 30 मिनिट आहे. आणि तीनही शहरांची स्वतःची एक खास ओळख आहे. अहमदाबादला एक गौरवशाली इतिहास आहे, गांधीनगर प्रशासनाचं केंद्र आहे, धोरण आणि निर्णय याचं मुख्य केंद्र आहे आणि गिफ्ट सिटी आर्थिक व्यवहारांचं प्रमुख केंद्र आहे. म्हणजे, जर तुम्ही या तीन पैकी कुठल्याही शहरात गेलात तर भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यापासून केवळ 30 मिनिटं दूर असाल.

 

मित्रांनो,

गिफ्ट सिटीशी निगडित उपक्रम, ‘व्यवसाय करण्याची सुलभताआणि जगण्यातील सुलभताया दिशेने आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचाच भाग आहेत. आपण हे लक्षात घ्यायला हवे की एक गतिशील,आधुनिक फिनटेक क्षेत्र म्हणजे केवळ सुलभ व्यवसाय वातावरण, सुधारणा आणि नियंत्रण या पुरतेच मर्यादित नाही. तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना एक उत्तम आयुष्य आणि नव्या संधी देण्याचे ते माध्यम देखील आहे. गिफ्ट सिटी अशा ठिकाणी बनत आहे, जिथून नवनव्या कल्पना येत आहेत, संपत्ती तयार होत आहे, आणि जगातले सर्वोत्तम लोक इथे येऊन शिकत आहेत, त्यांचा विकास होत आहे. म्हणजे गिफ्ट सिटी एक प्रकारे भारताचे जुने आर्थिक वैभव प्राप्त करण्याचे माध्यम देखील बनत आहे. इथे उद्योग क्षेत्रातले जे दिग्गज आहेत, त्यांना माहित आहे की भारताचे लोक शेकडो वर्षांपासून व्यापार आणि व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण जगात जात आहेत. जगाचा कदाचितच एखादा भाग असा असेल जिथे भारतीय पोचले नसतील. भारतीय व्यापारी नवनव्या वित्तीय तंत्रज्ञानाचा देखील वापर करत असत.

मी ज्या ठिकाणाहून येतो, माझं जे जन्मस्थान आहे - वडनगर, तिथे उत्खनन सुरु आहे. आणि तिथे देखील उत्खननात प्राचीन काळची नाणी सापडत आहेत. आपली व्यापारी संस्था आणि संबंध किती व्यापक होते याचा हा पुरावा आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर आपण स्वतःच आपला वारसा, आपली ही शक्ती ओळखायला घाबरू लागलो. कदाचित हा गुलामगिरी आणि आत्मविश्वासाचा अभाव याचा परिणाम म्हणून आपण आपले व्यावसायिक, सांस्कृतिक आणि इतर संबंध शक्य तितके मर्यादित केले. मात्र, आता नवा भारत ही जुनी विचारसरणी बदलतो आहे. आज एकीकरण आपल्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपण एका जागतिक बाजारपेठेशी, जागतिक पुरवठा साखळीशी वेगाने एकीकृत होत आहोत. आणि गिफ्ट सिटी भारता सोबतच जागतिक संधींशी जोडले जाण्याचा एक महत्वपूर्ण मार्ग आहे. जेव्हा तुम्ही गिफ्ट सिटीशी एकीकृत व्हाल, तेव्हा आपण संपूर्ण जगाशी देखील जोडले जाऊ.

 

मित्रांनो,

आज भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. म्हणूनच, भविष्यात जेव्हा आपली अर्थव्यवस्था आजच्यापेक्षा देखील खूप मोठी असेल, आपण त्यासाठी देखील आतापासूनच तयार असायला हवे आणि आपली अर्थव्यवस्थेची वाढ निश्चित आहे. यासाठी आपल्याला अशा संस्था गरजेच्या असतील, ज्या जागतिक अर्थव्यवस्थेत आपल्या आजच्या भविष्यातील भूमिकेशी अनुरूप पावलं उचलू शकू. भारतीय आंतरराष्ट्रीय सराफा विनिमय केंद्र - IIBX याच दिशेनं उचललेलं पाउल आहे.

भारतीयांचं सोन्यावर किती प्रेम आहे, हे जगाला माहित आहे. सोनं म्हणजे भारतात महिलांच्या आर्थिक शक्तीचं एक मोठं माध्यम आहे. महिलांच्या सोन्यावरच्या विशेष प्रेमामुळे सोनं आपल्या समाज आणि सांस्कृतिक व्यवस्थेचा देखील तितकाच महत्वाचा भाग आहे. आज भारत सोने - चांदी क्षेत्रात एक फार मोठी बाजारपेठ असण्याचं हे एक मोठं कारण आहे. पण भारताची इतकीच ओळख असायला हवी का? भारताची ओळख एक बाजारपेठ निर्माता म्हणून देखील असायला हवी. IIBX याच दिशेने महत्वाचं पाउल आहे. आपल्या सोन्याशी संबंधित उद्योग क्षेत्रातील व्यापाऱ्यांना, विशेषतः सोने चांदी व्यापाऱ्यांना, व्यवसाय वाढविण्यात यामुळे मदत होईल, त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण होतील. ते थेट आणि पारदर्शक पद्धतीने थेट सोने खरेदी करू शकतील आणि आंतरराष्ट्रीय किंमत ठरविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.

याशिवाय, आयआयबीएक्स अर्थात इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून थेट सोन्याचा व्यापार करण्याची संधी देखील उपलब्ध करून देईल. सोन्याच्या व्यापाराचा बाजार जसजसा संघटित होईल, तसतशी भारतातील सोन्याच्या मागणीवरही परिणाम होईल, सोन्याच्या किमती निश्चित होतील.

 

मित्रांनो,

आगामी काळात भारतात जे काही घडेल, त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल, संपूर्ण जगाला दिशा मिळेल. आम्ही स्थानिक आकांक्षांना देखील महत्त्व देतो आणि जागतिक सहकार्याचे महत्त्व समजतो. एकीकडे, आम्ही स्थानिक कल्याणासाठी जागतिक भांडवल आणत आहोत. दुसरीकडे, आम्ही जागतिक कल्याणासाठी स्थानिक उत्पादकता देखील वापरत आहोत.

विक्रमी थेट परकीय गुंतवणूक आज भारतात येत आहे. या गुंतवणुकीमुळे देशात नवनवीन संधी निर्माण होत असून, तरुणांच्या आकांक्षा पूर्ण होत आहेत. हे आपल्या उद्योगाला ऊर्जा देत आहे, आपली उत्पादकता वाढवत आहे. आणि ही उत्पादकता केवळ भारताची ताकद बनत नसून संपूर्ण जगाला त्याचा लाभ मिळत आहे. आज भारतात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवत आहेत हे खरे आहे. पण, त्याचे परिणाम, त्याच्याशी निगडित शक्यतांपेक्षा खूप व्यापक आहेत. आज आपली निर्यात विक्रमी पातळी गाठत आहे. आमची उत्पादने नवीन देशांमध्ये, नवीन बाजारपेठेत पोहोचत आहेत.

जागतिक पुरवठा साखळी अनिश्चिततेने ग्रासलेली असताना, जगाला या अनिश्चिततेची भीती वाटत असताना भारत जगाला दर्जेदार उत्पादने आणि सेवांची हमी देत आहे. म्हणूनच, मी म्हटल्याप्रमाणे, स्थानिक कल्याणासाठी जागतिक भांडवल आणि जागतिक कल्याणासाठी स्थानिक उत्पादकता यांचे हे एक अद्भुत संयोजन आहे. गिफ्ट सिटीशी संबंधित सर्व संस्था हे बंध आणखी मजबूत करण्यासाठी काम करतील. येथे अनेक संस्था आहेत ज्यांनी जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवलेला आहे आणि स्थानिकदृष्ट्याही जोडलेल्या आहेत.

 

मित्रांनो,

मला नव्या भारताच्या नव्या संस्थांकडून, नवीन प्रणालींकडून खूप अपेक्षा आहेत आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज 21 व्या शतकात वित्त आणि तंत्रज्ञान एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि जेव्हा तंत्रज्ञान, विज्ञान आणि सॉफ्टवेअरचा विचार केला जातो तेव्हा भारतालाही एक बाजू आणि अनुभव आहे. आज रिअल टाइम डिजिटल पेमेंटमध्ये संपूर्ण जगात 40 टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. आज आपण यात आघाडीवर आहोत. फिनटेक क्षेत्रातील भारताची ही ताकद संपूर्ण जगाला आकर्षित करत आहे. म्हणून, मी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी फिनटेकमध्ये नवीन नवकल्पनांचे लक्ष्य ठेवावे. गिफ्ट आयएफएससी ही फिनटेकची जागतिक प्रयोगशाळा म्हणून उदयास आली आहे.

 

मित्रांनो,

मी तुमचे लक्ष आणखी एका महत्त्वाच्या पैलूकडे आकर्षित करू इच्छितो. भारतासाठी यश आणि सेवा, हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. लोककल्याणापासून जगकल्याणपर्यंत ही आमची भावना आहे. त्यामुळेच, आज भारत शाश्वत विकासाच्या क्षेत्रात जागतिक संभावनांमध्ये आघाडीवर आहे. आम्ही आमच्यासाठी निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे. राष्ट्रीय स्तरावर, आम्ही गतिशक्ती मास्टर प्लॅनचा पाठपुरावा करत आहोत, अक्षय ऊर्जा आणि ई-मोबिलिटीसाठी नवीन विक्रम प्रस्थापित करत आहोत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मार्गदर्शन करत आहे. हे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये आपले समर्पण अमर्याद शक्यता खुल्या करेल. मला गिफ्ट आयएफएससीला शाश्वत आणि हवामान प्रकल्पांसाठी जागतिक कर्ज आणि इक्विटी भांडवलाचे प्रवेशद्वार बनवायचे आहे. त्याचप्रमाणे, विमान भाड्याने देणे, जहाज वित्तपुरवठा, कार्बन ट्रेडिंग, डिजिटल चलन आणि गुंतवणूक व्यवस्थापनासाठी आयपी अधिकारांपासून अनेक आर्थिक नवकल्पनांची भारताला आवश्यकता आहे.

आयएफएससीए ने या दिशेने काम केले पाहिजे. आयएफएससीए ने केवळ भारतातच नव्हे तर दुबई सिंगापूर सारख्या देशांच्या तुलनेत नियमन आणि ऑपरेशनचा खर्च देखील स्पर्धात्मक बनवला पाहिजे. तुमचा उद्देश आयएफएससीए नियमांमध्ये प्रमुख नेतृत्व बनणे, कायद्याच्या शासनासाठी उच्च मापदंड तयार करणे आणि जगासाठी पसंतीचे मध्यस्थ केंद्र म्हणून उदयास येणे हा असला पाहिजे.

 

मित्रांनो,

बँकिंग क्षेत्रातील भागीदारांच्या पाठिंब्याने गेल्या 8 वर्षांत देशाने आर्थिक समावेशनाची नवी लाट पाहिली आहे. गरिबातील गरीब लोकही आज औपचारिक वित्तीय संस्थांमध्ये सामील होत आहेत. आज, जेव्हा आपली मोठी लोकसंख्या वित्तसंस्थेत सामील झाली आहे, तेव्हा सरकारी संस्था आणि खाजगी संस्थांनी एकत्रितपणे पुढे येणे ही काळाची गरज आहे.

उदाहरणार्थ, आज आर्थिक साक्षरतेच्या क्षेत्रात, मूलभूत बँकिंगच्या पुढे जाऊन आर्थिक शिक्षणाला खूप वाव आहे. आज भारतात एक मोठा महत्त्वाकांक्षी वर्ग आहे ज्याला विकासासाठी गुंतवणूक करायची आहे. त्यांच्यासाठी असे आर्थिक अभ्यासक्रम असतील जे त्यांना वेगवेगळ्या आर्थिक साधनांबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल शिकवू शकतील, तर त्यांना खूप मदत होईल.

म्युच्युअल फंडाचेही उदाहरण आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या मते, 2014 मध्ये भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सुमारे 10 लाख कोटी होती. या आठ वर्षांत जून 2022 पर्यंत ती 250 टक्क्यांनी वाढून 35 लाख कोटी झाली आहे. म्हणजेच लोकांना गुंतवणूक करायची आहे, ते त्यासाठी तयार आहेत. आम्ही त्यांच्यासाठी शिक्षण आणि माहितीची हमी देणे आवश्यक आहे. मी म्हणेन की आपली आर्थिक परिसंस्था नॉन-फायनान्स कॉलेजांशी जोडली गेली पाहिजे, तरुणांना शिक्षित केले पाहिजे.

शेवटी, तरुणच आगामी काळात कमावणारे आणि गुंतवणूकदार बनतील. या अभ्यासक्रमांवर लोकांचा विश्वास जागृत करण्यासाठी ते ना नफा तत्त्वावर चालवले जावेत. खासगी संस्थांची कामगिरी पाहून यासाठी चांगला रोडमॅप आणि ग्राउंड नियम तयार करण्याचे कामही गिफ्ट सिटी करू शकते. यंदाच्या अर्थसंकल्पात गिफ्ट सिटीतील परदेशी विद्यापीठांबाबतची घोषणाही त्याला मदत करेल.

 

मित्रांनो,

मला खात्री आहे की तुम्ही देशाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर कराल आणि देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाच्या अपेक्षा पूर्ण कराल. त्याच भावनेने, सर्वांचे मनःपूर्वक आभार! गिफ्ट सिटीच्या एवढ्या मोठ्या मिशनमध्ये गुजरात सरकारची धोरणे अतिशय पूरक आणि पोषक ठरत आहेत याबद्दल मी गुजरात सरकारचे आभार मानतो. आणि यासाठी मी गुजरात सरकारच्या सर्व उपक्रमांचे कौतुक करतो, मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो.

येथे मला रत्ने आणि दागिन्यांच्या दुनियेतील लोकही मोठ्या संख्येने दिसत आहेत. मला खात्री आहे की त्यांना या संधीबद्दल चांगली माहिती आहे. त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या मोठ्या संधींची त्यांना चांगली जाणीव आहे आणि ते त्याचा पुरेपूर लाभ घेतील. या विश्वासाने मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

धन्‍यवाद !

***

S.Patil/R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846470) Visitor Counter : 203