पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित


“आज आदिवासी समाजातील महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आहेत, त्यामुळे आजचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी महत्वपूर्ण दिवस आहे.”

“हरमोहन सिंग यादव यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला."

“हरमोहन सिंग यादव यांनी शीख हत्याकांडात केवळ राजकीय भूमिका घेतली नाही तर शीख बंधू भगिनींच्या संरक्षणासाठी त्यांनी लढा दिला.”

“अलीकडच्या काळात आपले वैचारिक किंवा राजकीय हितसंबंध समाजाच्या आणि देशाच्या हितापेक्षा सर्वोपरी मानण्याचा कल दिसून येतो आहे.”

“एखाद्या पक्षाचा किंवा व्यक्तीचा विरोध देशाच्या विरोधात परिवर्तीत होऊ नये याची काळजी घेणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे.“

“डॉ लोहिया यांनी रामायणाविषयी माहिती देणारे मेळावे आयोजित करून आणि गंगा नदीच्या स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करून देशाचे सांस्कृतिक सामर्थ्य वाढवले”

“समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी प्राप्त होणे म्हणजे सामाजिक न्याय होय, जीवनाच्या मुलभूत गरजांपासून कोणीही वंचित राहू नये.”

Posted On: 25 JUL 2022 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.  हरमोहन सिंग यादव हे माजी संसदपटू, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आणि यादव समाजातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि नेते होते.

हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज प्रथमच आदिवासी समाजातील महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. हा भारताच्या लोकशाहीतील अत्यंत महत्वाचा दिवस आहे,असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशला लाभलेल्या अनेक महान  नेत्यांच्या गौरवशाली वारशाचे स्मरण केले. ''हरमोहन सिंग यादव यांनी आपल्या प्रदीर्घ  राजकीय कारकिर्दीत डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचारांना कानपूर आणि उत्तर प्रदेशच्या मातीतून पुढे नेले. राज्य आणि देशाच्या राजकारणात

त्यांनी दिलेले योगदान, समाजासाठी त्यांनी केलेले कार्य येणाऱ्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील,'' असे पंतप्रधान म्हणाले. ‘ग्रामसभा ते राज्यसभा’या त्यांच्या  प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रवासात समाज आणि समुदायाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांनी यावेळी हरमोहन सिंग यादव यांच्या अतुलनीय धैर्याचा उल्लेख केला आणि ते म्हणाले, “हरमोहन सिंग यादव यांनी शिखांच्या शिरकाणाविरुध्द राजकीय भूमिका तर घेतलीच  शिवाय त्यांनी पुढे येऊन शीख समाजातील बंधू-भगिनींचे संरक्षण करण्यासाठी लढा देखील दिला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, त्यांनी अनेक निष्पाप शीख कुटुंबांचा जीव वाचविला. देशाने त्यांच्या नेतृत्वाला मान्यता देऊन त्यांना शौर्य चक्राने गौरविण्यात आले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दांचे स्मरण करत, पंतप्रधानांनी पक्षीय राजकारणापेक्षा देशाला नेहमीच असलेले प्राधान्य अधोरेखित केले. ते म्हणाले, “लोकशाही आहे म्हणून राजकीय पक्ष आहेत आणि देशामुळेच लोकशाहीचे अस्तित्व आहे. आपल्या देशातील बहुतांश राजकीय पक्ष, विशेषतः सर्व बिगर-काँग्रेस पक्षांनी देखील या संकल्पनेचे तसेच देशासाठी सहकार्य आणि समन्वयाच्या आदर्शांचे पालन केले आहे.” देशहितासाठी संयुक्त आघाडी उभारण्याबाबत राजकीय पक्षांच्या भावना स्पष्ट करण्यासाठी यावेळी त्यांनी 1971 चे युद्ध, अणुचाचणी तसेच आणीबाणीविरुध्द दिलेल्या लढ्याचे उदाहरण दिले. “आणीबाणीच्या काळात जेव्हा देशातील लोकशाही चिरडली गेली तेव्हा देशात असलेले सर्व प्रमुख पक्ष एकत्र आले आणि आम्ही सर्वांनी देशाच्या राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी लढा दिला. चौधरी हरमोहन सिंग यादव देखील त्या संघर्षातील एक शूर शिपाई होते. याचा अर्थ असा की, आपल्या देशाचे आणि समाजाचे हित नेहमीच आपल्या स्वतंत्र विचारसरणीपेक्षा मोठे असते,” ते पुढे म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, “मात्र, अलीकडच्या काळात, आदर्श विचारसरणी आणि राजकीय स्वारस्यांना समाज आणि देशाच्या हितापेक्षा मोठे मानण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. अनेकदा, सरकारच्या कार्यात काही विरोधी पक्ष केवळ एवढ्यासाठीच अडचणी निर्माण करतात की ते पक्ष जेव्हा सत्तेत होते, तेव्हा ते स्वतः त्यांचे निर्णय लागू करू शकले नाहीत.” पंतप्रधान म्हणाले की, देशातील लोकांना हे अजिबात रुचत नाही. “राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला असलेला विरोध देशाच्या विरोधात परिवर्तीत होऊ नये ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. विविध विचारसरणी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांना त्यांची विशिष्ट स्थाने आहेत, आणि ती असायलाच हवीत. मात्र, देश, समाज आणि राष्ट्र यांना नेहमीच प्रथमस्थान दिले गेले पाहिजे.”

पंतप्रधानांनी यावेळी डॉ. लोहिया यांच्या सांस्कृतिक सामर्थ्याच्या संकल्पनेचा उल्लेख केला.  ते म्हणाले की, मूळ भारतीय विचारधारेत, वादाचा किंवा स्पर्धेचा मुद्दा म्हणून नव्हे तर एकसंधता आणि सामुहिकतेची चौकट म्हणून समाजाकडे पाहिले जाते. डॉ.लोहिया यांनी  रामलीला आणि गंगा मातेच्या सेवेबद्दलचे कार्यक्रम करून देशाच्या सांस्कृतिक सामर्थ्याला बळकटी देण्याचे कार्य केले याचे स्मरणदेखील पंतप्रधानांनी यावेळी केले. ते म्हणाले की, नमामि गंगेसारख्या उपक्रमाद्वारे भारत ही स्वप्ने साकारत आहे, समाजाच्या सांस्कृतिक प्रतीकांचे पुनरुज्जीवन करत आहे आणि हक्क सुनिश्चित करण्याबरोबरच कर्तव्याचे महत्त्व पटवून देत आहे.

समाजसेवेसाठी आपण सामाजिक न्यायाची भावना स्वीकारून तिचा अंगीकार करणेही आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त  अमृत महोत्सव साजरा करत असताना हे समजून घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. सामाजिक न्याय म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळाव्यात आणि जीवनाच्या मूलभूत गरजांपासून कोणीही वंचित राहू नये, असे पंतप्रधानांनी नमूद केले. दलित, मागास, आदिवासी, महिला, दिव्यांग हे जेव्हा पुढे येतील, तेव्हाच देशाची प्रगती होईल. या परिवर्तनासाठी हरमोहनजींनी शिक्षण सर्वात महत्त्वाचे मानले. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ, आदिवासी भागासाठी एकलव्य शाळा, मातृभाषेतून शिक्षणाचा प्रसार यासारख्या उपक्रमांतून देश या मार्गावर वाटचाल करत आहे, “शिक्षणातून सक्षमीकरण मंत्रानुसार देश मार्गक्रमण करत आहे आणि शिक्षणातच सक्षमीकरण आहे,” असेही ते म्हणाले.

हरमोहन सिंग यादव (18 ऑक्टोबर 1921 - 25 जुलै 2012)

हरमोहन सिंग यादव (18 ऑक्टोबर 1921 - 25 जुलै 2012) हे यादव समाजाचे एक महान व्यक्तिमत्व आणि अग्रणी होते. या दिवंगत नेत्याने शेतकरी, मागासवर्गीय आणि समाजातील इतर घटकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल  आदर  व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान या कार्यक्रमात सहभागी झाले.

हरमोहन सिंग यादव दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहिले आणि त्यांनी विधान परिषदेचे सदस्य, विधानसभेतील सदस्य, राज्यसभा सदस्य आणि 'अखिल भारतीय यादव महासभेचे' अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. त्यांचे पुत्र सुखराम सिंग यांच्या मदतीने कानपूर आणि आसपास अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

1984 च्या शीख विरोधी दंगलीत अनेक शिखांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी शौर्य दाखविल्याबद्दल हरमोहन सिंग यादव यांना 1991 मध्ये शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kakade/Vasanti/Sanjana/Bhakti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844761) Visitor Counter : 149