पंतप्रधान कार्यालय

पहिल्या अरुण जेटली स्मृती व्याख्यानाला पंतप्रधान उपस्थित


“शिंझो आबे पुढील अनेक वर्षे भारतीयांच्या हृदयात राहतील”

''अरुण जेटली यांचे व्यक्तिमत्व विविधतेने परिपूर्ण होते आणि त्यांचा स्वभाव सर्वांशी मैत्रीपूर्ण होता. प्रत्येकाला त्यांची उणीव जाणवते"

सरकारचे प्रमुख म्हणून माझ्या 20 वर्षांच्या अनुभवांचे सार असे आहे की, - सर्वसामावेशकतेशिवाय प्रत्यक्ष विकास आणि विकासाशिवाय सर्वसमावेशकतेचे ध्येय पूर्ण होऊ शकत नाही"

"गेल्या 8 वर्षांत सर्वसामावेशकतेचा वेग आणि आवाका अभूतपूर्व आहे"

“आजचा भारत ‘असहाय्य्यतेतून सुधारणा ’ ऐवजी ‘दृढनिश्चयाने सुधारणा ’ यासह पुढील 25 वर्षांचा मार्गदर्शक आराखडा तयार करत आहे”

"आम्ही सुधारणांना आवश्यक कुकर्म मानत नाही तर सर्वांसाठी अनुकूल पर्याय मानतो. "

"आमची धोरणे लोकांच्या आकांक्षांवर आधारित आहेत"

"आम्ही लोकप्रियतेच्या लाटेच्या दबावाखाली धोरण येऊ दिले नाही"

" सरकारने खाजगी क्षेत्राला प्रगतीतील भागीदार म्हणून प्रोत्साहन देण्याची वेळ आता आली आहे आणि आम्ही या दिशेने वाटचाल करत आहोत

Posted On: 08 JUL 2022 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली येथे आयोजित  पहिल्या ‘अरुण जेटली स्मृती व्याख्यानाला ’ (एजेएमएल )  पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सिंगापूर सरकारमधील  ज्येष्ठ मंत्री थर्मन षण्मुगररत्नम यांनी मुख्य व्याख्यान दिले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनीही उपस्थितांना संबोधित केले.

 

याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी, आज ज्यांचे निधन झाले ते जपानचे माजी पंतप्रधान  शिंझो आबे यांच्याशी असलेल्या त्यांच्या घनिष्ठ मैत्रीचे स्मरण केले. आजचा दिवस त्याच्यासाठी कधीही भरून न येणारी हानी आहे  आणि असह्य वेदनांचा आहे असे सांगत पंतप्रधानांनी आबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आबे यांना भारताचे विश्वासू मित्र  संबोधत,पंतप्रधानांनी शिंझो आबे यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांच्या सामायिक वारशावर आधारित भारत-जपान संबंधांचा विकास    अधोरेखित केला. जपानच्या मदतीने हाती घेतलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आबे  पुढील अनेक वर्षे भारतीयांच्या हृदयात राहतील, असे ते म्हणाले.

 

 आजचा कार्यक्रम ज्यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता, ते त्यांचे दुसरे मित्र अरुण जेटली यांचे  पंतप्रधानांनी स्मरण केले. "जेव्हा आपण जुने दिवस   आठवतो, तेव्हा मला त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आठवतात, त्यांच्याशी संबंधित अनेक घटना आठवतात.त्यांच्या वत्कृत्वाचा आम्हा सर्वांसाठी  आदरयुक्त दरारा होता. त्यांचे व्यक्तिमत्व विविधतेने परिपूर्ण होते, त्यांचा स्वभाव सर्वांशी मैत्रीपूर्ण होता'', असे पंतप्रधान म्हणाले.  एकाच  वाक्यात एखादी गोष्ट पोहोचवण्याचे  जेटली यांचे वैशिष्ट्य चिरकाल स्मरणात राहील. त्यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवते असे सांगत पंतप्रधानांनी जेटली यांना श्रद्धांजली वाहिली.

 

पंतप्रधानांनी 'अरुण जेटली स्मृती व्याख्यान 'बद्दल सिंगापूर सरकारचे ज्येष्ठ मंत्री   थर्मन षणमुगररत्नम यांचे आभार मानले.त्यांची कुशाग्र बुद्धी, संशोधन आणि त्याच्या संशोधनात असलेला स्थानिक स्पर्श याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.  आजच्या व्याख्यानाचा विषय “सर्वसमावेशकतेतून विकास, विकासातून  सर्वसमावेशकता” हा सरकारच्या विकासाच्या  धोरणाचा पाया आहे, असे पंतप्रधान म्हणाले. माझ्या मते, हा विषय सोप्या भाषेत सांगायचा म्हणजे , सबका साथ सबका विकास”, असे ते म्हणाले

आजचा विषय ,आजच्या धोरणकर्त्यांसमोरील आव्हाने आणि समस्या मांडतो, असे पंतप्रधान म्हणाले.  “सर्वसमावेशकतेशिवाय योग्य विकास  शक्य आहे का? विकासाशिवाय सर्वसमावेशकतेचा  विचार केला जाऊ शकतो का?" असा प्रश्न  विचारत पंतप्रधान पुढे म्हणाले की, “सरकारचा  प्रमुख म्हणून माझ्या 20 वर्षांच्या अनुभवांचे  सार असे  आहे की - सर्वसमावेशकतेशिवाय खरा  विकास  शक्य नाही.आणि, विकासाशिवाय सर्वसामावेशकतेचे  उद्दिष्टही पूर्ण होऊ शकत नाही''‘ म्हणूनच आम्ही सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून विकासाचा  मार्ग स्वीकारला आणि प्रत्येकाच्या समावेशनासाठी प्रयत्न केले’, असे ते म्हणाले.

 

 गेल्या 8 वर्षांत भारतातील सर्वसमावेशकतेचा  वेग आणि आवाका जगात अभूतपूर्व आहे, असे त्यांनी सांगितले.  9 कोटींहून अधिक महिलांना गॅस जोडणी , गरिबांसाठी 10 कोटींहून अधिक शौचालये, 45 कोटींहून अधिक जनधन खाती, गरिबांसाठी 3 कोटी पक्की घरे यासारख्या उपाययोजनांची यादी सादर करत पंतप्रधानांनी त्यांचा मुद्दा स्पष्टपणे मांडला. आयुष्मान योजनेंतर्गत 50 कोटी लोकांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे विनामूल्य उपचार सुनिश्चित करण्यात आले आहेत आणि गेल्या 4 वर्षांत 3.5 कोटींहून अधिक रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे.सर्वसमावेशकतेवर  लक्ष केंद्रित करण्यात आले  यामुळे मागणी वाढली आणि चांगला विकास झाला  आणि संधी निर्माण झाल्या. भारतातील जवळपास एक तृतीयांश लोकसंख्या दर्जेदार आरोग्यसेवेच्या कक्षेत आली आहे, असे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. आयुष्मान भारत या योजनेने भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा कायापालट केला आहे, असे सांगत त्यांनी आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमधील प्रगतीचे वर्णन केले.  ''10 वर्षांत 50 वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली, ही 2014 पूर्वीची , आपल्या देशाची सरासरी  होती तर गेल्या 7-8 वर्षात भारतात 209 नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात आली आहेत, जी पूर्वीपेक्षा 4 पटीने जास्त आहेत''.या शिवाय, “गेल्या 7-8 वर्षांत भारतात पदवीपूर्व वैद्यकीय जागांमध्ये 75% वाढ झाली आहे. आता भारतात वार्षिक एकूण वैद्यकीय जागांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.”,याकडे त्यांनी लक्ष वेधले. या आकड्यांद्वारे आपण या क्षेत्राच्या विकासावर पडलेला  सर्वसमावेशकता योजनेचा प्रभाव पाहू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.

5 लाख सामायिक सेवा केंद्रे, युपीआय  आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी पीएम  स्वनिधी योजनेच्या माध्यमातून समावेशनाची व्याप्ती वाढवली आहे, त्याचप्रमाणे, आकांक्षी जिल्हा तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मातृभाषेतून  शिक्षण, हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी उडान  योजना यांसारखे पुढाकार  हे सर्वसमावेशकता  आणि विकास दोन्हीच्या दिशेने नेत आहेत , असे पंतप्रधानांनी सांगितले. हर घर जलच्या माध्यमातून 6 कोटी नळपाणी जोडण्या देऊन मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशकता  साध्य केली जात असल्याबद्दलही त्यांनी सांगितले.  स्वामित्व योजनेच्या माध्यमातून सर्वात असुरक्षित  घटकांचे मालमत्ता हक्क सुनिश्चित केले जात आहेत.त्यांना आर्थिक लाभ घेता येईल यादृष्टीने आधीच 80 लाख मालमत्ता पत्र  जारी करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

 

असहाय्यतेमधून  सुधारणा करण्याऐवजी दृढनिश्चयाने सुधारणा करत  आजचा भारत  येत्या 25 वर्षांचा मार्गदर्शक आराखडा तयार करत आहे.  पूर्वीच्या सरकारांकडे  जेव्हा दुसरा पर्याय नव्हता तेव्हाच भारतात मोठ्या सुधारणा झाल्या आम्ही सुधारणांना आवश्यक कुकर्म  मानत नाही तर सर्वांसाठी अनुकूल पर्याय  मानतो, ज्यामध्ये राष्ट्रीय हित आणि सार्वजनिक हित सामावलेले आहे , असे त्यांनी सांगितले. सुधारणांबाबत सरकारचा दृष्टीकोन विशद करत पंतप्रधान  म्हणाले की,  “आपली  धोरणे लोकांच्या आकांक्षांवर आधारित आहेत.आम्ही अधिकाधिक लोकांचे ऐकतो, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षा समजून घेतो. म्हणूनच आम्ही हे धोरण  लोकप्रियतेच्या लाटेच्या  दबावाखाली येऊ दिले नाही.”

किमान शासन  आणि कमाल प्रशासनाचा  दृष्टिकोन उत्तम परिणाम देत आहे, असे त्यांनी सांगितले.  कोविड प्रतिबंधक  लस विकसित करण्यामध्ये  खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या भागीदारीचे त्यांनी उदाहरण दिले. “आपल्या देशातील खाजगी कंपन्यांनी  खूप चांगली कामगिरी केली आहे.मात्र त्यांच्या मागे प्रगतीमधील  भागीदाराच्या रूपात सरकारची पूर्ण ताकद उभी होती. आज भारत संपूर्ण जगात सर्वात विश्वासार्ह आणि अत्याधुनिक अंतराळ सेवा प्रदात्यांपैकी एक आहे.आपले  खाजगी क्षेत्रातील व्यवस्था  या क्षेत्रातही उत्तम काम करत आहे.पण त्यांच्या पाठीमागे ‘प्रगतीमधील भागीदार’ म्हणून सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे”, असे ते म्हणाले.“आता केवळ खाजगी क्षेत्र किंवा सरकारचे वर्चस्व असलेले मॉडेल्स  कालबाह्य झाले आहेत. सरकारने खाजगी क्षेत्राला प्रगतीतील  भागीदार म्हणून प्रोत्साहन देण्याची वेळ आता आली आहे  आणि आम्ही या दिशेने वाटचाल करत आहोत”, असेही ते म्हणाले.

 

 भारतातही पर्यटनाबद्दलचा  विचार विस्तारत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.नुकत्याच झालेल्या 75 प्रतिष्ठित ठिकाणी योग दिन साजरा केल्यामुळे लोकांना पर्यटनाच्या अनेक नवीन ठिकाणांची जाणीव झाली, असे त्यांनी सांगितले.

 

स्वातंत्र्याचा अमृतकाळ  देशासाठी अनेक संधी घेऊन येत आहे आणि त्या साध्य करण्याचा आमचा संकल्प अढळ आहे, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

 

 

पहिल्या अरुण जेटली स्मृती व्याख्यानामधील  मुख्य व्याख्यान सिंगापूर सरकारचे वरिष्ठ मंत्री   थरमन षणमुगररत्नम यांनी “सर्वसमावेशकतेद्वारे विकास  विकासाद्वारे  सर्वसमावेशकता” या विषयावर दिले. व्याख्यानानंतर  मॅथियास कॉर्मन (ओईसीडी , सरचिटणीस) आणि  अरविंद पनगारिया (प्राध्यापक, कोलंबिया विद्यापीठ) यांनी गट चर्चा केली.

 

 अरुण जेटली यांनी  देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने पहिले ‘अरुण जेटली स्मृती व्याख्यान ’ आयोजित केले.

 8 ते 10 जुलै या कालावधीत आयोजित तीन दिवसीय उपक्रम कौटिल्य आर्थिक परिषदेत  (केईसी )  सहभागी झालेल्या प्रतिनिधींशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.

***

Jaydevi PS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840318) Visitor Counter : 161