पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, म्हैसूर इथल्या म्हैसूर पॅलेस मैदानावर सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी, म्हैसूर येथे पंतप्रधानांच्या योग कार्यक्रमाबरोबरच देशभरातील 75 ऐतिहासिक ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रम


देशभरात विविध अशासकीय संस्थांद्वारेही सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित, कोट्यवधी लोक झाले सहभागी

म्हैसूर येथे पंतप्रधानांचा योग कार्यक्रम हा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा भाग- ‘गार्जियन योग रिंग’ – ‘एक सूर्य, एक पृथ्वी’ या संकल्पनेला अधोरेखित करणारा

"योग हा केवळ एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे"

"योग आपल्या समाजात, राष्ट्रात, जगात आणि संपूर्ण भूतलावर शांतता आणतो "

"योग दिनाची व्यापक स्वीकृती म्हणजे भारताच्या त्या अमृत भावनेचा स्वीकार ज्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला दिली ऊर्जा"

"भारताच्या ऐतिहासिक स्थळांवर सामूहिक योग प्रात्यक्षिके म्हणजे भारताचा भूतकाळ, भारताची विविधता आणि भारताची महानता यांची सांगड "

"योगाभ्यास हा आरोग्य, संतुलन आणि समन्वय यासाठी अद्भुत प्रेरणा देत आहे"

"आज योगाशी संबंधित अपार शक्यता लक्षात घेण्याची वेळ आली आहे"

"आपण योग अनुसरायला सुरुवात करतो, तेव्हा योग दिवस हे आपले आरोग्य, आनंद आणि शांतता साजरे करण्याचे माध्यम बनते"

Posted On: 21 JUN 2022 8:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान,  नरेंद्र मोदी यांनी आज  आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (आयडीवाय) म्हैसूरच्या, म्हैसूर पॅलेस मैदान येथे सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात हजारो लोकांसह भाग घेतला. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.

 

म्हैसूरसारख्या भारतातील अध्यात्मिक केंद्रांद्वारे शतकानुशतके जोपासलेली योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याला दिशा देत आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आज योग हा जागतिक सहकार्याचा आधार बनत आहे आणि मानवजातीला निरामय जीवनाचा विश्वास प्रदान करत आहे, असेही ते म्हणाले. आपण पाहतो की घरातल्याघरात केला जाणारा योग आज जगभरात  पसरला आहे. हे अध्यात्मिक अनुभूतीचे, नैसर्गिक आणि सामायिक मानवी जाणीवेचे चित्र आहे, विशेषत: गेल्या दोन वर्षांत अभूतपूर्व महामारीच्या काळात हे दिसून आल्याचे ते म्हणाले. “योग आता जागतिक उत्सव बनला आहे. योग हा केवळ एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळेच, यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे - मानवतेसाठी योग”, असे त्यांनी सांगितले. ही संकल्पना जागतिक पातळीवर नेल्याबद्दल त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि सर्व देशांचे आभार मानले.

 

भारतीय ऋषीमुनींचा दाखला देत पंतप्रधानांनी, “योगामुळे आपल्याला शांतता लाभते यावर जोर दिला.  योगातून मिळणारी शांतता केवळ व्यक्तीसाठी नाही. योगामुळे आपल्या समाजाला, राष्ट्राला, जगाला आणि, अवघ्या भूतलालाही  शांततेचे देणे लाभते” असे ते म्हणाले. “हे संपूर्ण विश्व आपल्या शरीरापासून आणि आत्म्यापासून सुरू होते. विश्व आपल्यापासून सुरू होते. आणि, योग आपल्याला आपल्यातील प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देतो, जागरूकतेची भावना निर्माण करतो” असेही त्यांनी सांगितले.
 

देश आपल्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष, अमृत महोत्सव साजरे करत असताना भारत योग दिवस साजरा करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. योग दिनाची ही व्यापक स्वीकृती, भारताच्या त्या अमृत भावनेचा स्वीकार आहे, ज्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली.  म्हणूनच भारताच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या आणि सांस्कृतिक उर्जेचे केंद्र राहिलेल्या देशभरातील 75 ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.  “भारताच्या ऐतिहासिक स्थळांवर सामूहिक योगाचा अनुभव हा भारताचा भूतकाळ,भारताची विविधता आणि भारताची महानता यांची सांगड  आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी ‘गार्जियन योग रिंग’ या अभिनव कार्यक्रमाचीही माहिती दिली. राष्ट्रीय सीमा ओलांडून योगविषयक  एकात्म शक्ती दर्शवण्यासाठी 79 देश आणि संयुक्त राष्ट्रांसह परदेशातील भारतीय दूतावास यात सहभागी आहेत. सूर्य जगभर पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असताना, पृथ्वीवरील कोणत्याही एका बिंदूवरून पाहिल्यास, सहभागी देशांमधील सामूहिक योग प्रात्यक्षिके, जवळजवळ एका तालात एकामागून एक होत असल्याचे दिसून येईल. 'एक सूर्य, एक पृथ्वी' ही यामागची संकल्पना आहे. "योगच्या या पद्धती आरोग्य, संतुलन आणि सहकार्यासाठी अद्भुत प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

योग हा आपल्यासाठी आयुष्याचा केवळ एक भाग नसून, आज तो आयुष्याचा एक मार्गच बनला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, योग एका ठराविक जागेसाठी, काळासाठी मर्यादित राहू नये. ते म्हणाले ``आपल्याला किती ताण आहे, ते महत्त्वाचे  नाही, मात्र  काही मिनिटांचे ध्यान आपल्याला आराम देते आणि आपल्यातील नवनिर्मितीला प्रोत्साहन देते. त्यामुळे योगाकडे  अतिरिक्त काम म्हणून पाहता कामा नये.आपल्याला देखील योग जाणून घेणे आणि योग जगणे आवश्यक आहे. आपल्याला योग साध्य करून घेता आला पाहिजे, आपण योग अंगिकारला देखील पाहिजे. आपण जेव्हा योग जगण्यास प्रारंभ करू,तेव्हा  योग दिन हे आपल्यासाठी केवळ योग करण्याचे नव्हे  तर आपले आरोग्य, आनंद आणि मनःशांतीचे  माध्यम बनेल.``

पंतप्रधान म्हणाले की, आज योगाशी संबंधित अपार  शक्यता लक्षात घेण्याची वेळ आली आहे. आज योगाच्या क्षेत्रात अनेक नवनवीन कल्पना घेऊन आपले युवा पुढे येत आहेत. आयुष मंत्रालयाच्या स्टार्टअप योगा चॅलेंजबद्दलही त्यांनी माहिती दिली. योगाचा प्रसार आणि विकास यामध्ये मोलाच्या   योगदानासाठीच्या  2021 च्या  पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

आझादी का अमृत महोत्सव आणि आठवा  आंतरराष्ट्रीय योग दिन यांची सांगड घालून  म्हैसूर येथे पंतप्रधानांच्या योग प्रात्यक्षिकांसह 75 केंद्रिय मंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली देशभरातील 75 महत्वाच्या  ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिके आयोजित केली जात आहेत. विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, व्यावसायिक आणि अन्य नागरी संस्थांच्या माध्यमातून योग विषयक प्रात्यक्षिके आयोजित केली जात आहेत आणि देशभरातली कोट्यवधी  जनता यामध्ये सहभागी होत आहे.

पंतप्रधानांचा मैसूर येथील योग विषयक गार्डियन योगा रिंग हा कार्यक्रम देखील या अभिनव उपक्रमाचा एक भाग आहे, जो 79 देश आणि संयुक्त राष्ट्र संघटना आणि परदेशातील भारतीय दूतावासामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून योगाची एकात्म शक्ती दर्शविण्यासाठी एक सराव आहे.

2015 पासून, 21 जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) म्हणून साजरा केला जातो.``मानवतेसाठी योग`` ही या वर्षीच्या योग दिवसाची संकल्पना आहे. कोविड महामारीच्या काळात योगाने मानवतेची कशी सेवा केली हे ही संकल्पना साकार करते.

 

****

NC/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835800) Visitor Counter : 275