पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बंगळुरूमध्ये 27000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रेल्वे आणि रस्ते संबंधी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली


बंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी, बंगळुरु छावणी परिसराचा आणि यशवंतपूर जंक्शन रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास , बंगळुरू रिंगरोड प्रकल्पाच्या दोन मार्गांची तसेच , विविध रस्ते सुधारणा प्रकल्प आणि मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी

पंतप्रधानांनी भारतातील पहिले वातानुकूलित रेल्वे स्थानक, कोकण रेल्वे मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे केले लोकार्पण

"बंगळुरू हे देशातील लाखो तरुणांच्या स्वप्नांचे शहर आहे, हे शहर एक भारत श्रेष्ठ भारत भावनेचे प्रतिबिंब आहे"

"'डबल-इंजिन' सरकार बंगळुरूच्या लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी शक्य त्या सर्व उपायांवर काम करत आहे"

"गेल्या 8 वर्षांत सरकारने रेल्वे कनेक्टिव्हिटीचा संपूर्ण कायापालट करण्यावर काम केले आहे"

"गेल्या 40 वर्षांपासून अपूर्ण असलेली बंगळुरूच्या लोकांची स्वप्ने पुढील 40 महिन्यांत पूर्ण करण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन"

“भारतीय रेल्वे वेगवान, स्वच्छ, आधुनिक, सुरक्षित आणि नागरिक-स्नेही बनत आहे”

"भारतीय रेल्वे आता तशा सुविधा आणि वातावरण पुरवण्याचा प्रयत्न करत आहे ज्या पूर्वी केवळ विमानतळ आणि विमान प्रवासात मिळत होत्या "

"सरकारने सुविधा पुरवल्या आणि नागरिकांच्या जीवनातला हस्तक्षेप कमी केला तर भारतीय तरुण काय करू शकतात हे बंगळुरूने दाखवून दिले आहे"

"माझा असा ठाम विश्वास आहे की उपक्रम सरकारी असो वा खाजगी, दोन्ही देशाची संपत्ती आहेत, त्यामुळे सर्वांना समान संधी मिळायला हवी "

Posted On: 20 JUN 2022 8:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू येथे  27000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते संबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी आयआयएससी बंगळुरू येथे मेंदू वरील संशोधन केंद्राचे उद्‌घाटन केले आणि  बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली. त्यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (बीएएसई) विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्‌घाटनही केले आणि संकुलात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यांनी 150 औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे  टेक्नॉलॉजी हब म्हणून लोकार्पण केले.

यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

उपस्थितांना  संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, कर्नाटकमध्ये 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, 7 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे आणि आज कोकण रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कर्नाटकातील युवक , मध्यमवर्ग, शेतकरी, कामगार आणि उद्योजकांना नवीन सुविधा, नवीन संधी मिळणार आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, बंगळुरू हे देशातील लाखो तरुणांसाठी स्वप्ननगरी आहे, हे शहर एक भारत श्रेष्ठतेचे प्रतिबिंब आहे. बंगळुरूचा विकास लाखो स्वप्ने पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच गेल्या 8 वर्षांत केंद्र सरकार बंगळुरूच्या क्षमता वाढवण्याचे काम करत आहे.

बंगळुरूला वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी ‘डबल इंजिन’ सरकार रेल्वे,रस्ते , मेट्रो, अंडरपास, उड्डाणपूल यासारख्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासारख्या  शक्य त्या सर्व उपायांवर  काम करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. केंद्र सरकार बंगळुरूच्या उपनगरी भागांना चांगल्या कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठी वचनबद्ध आहे असे ते  म्हणाले.  गेल्या चार दशकांपासून या सर्व उपाययोजनांबाबत नुसती चर्चा सुरू होती आणि आता ‘डबल इंजिन’ सरकारमुळे लोकांनी हे प्रकल्प पूर्ण करण्याची संधी सध्याच्या प्रशासनाला दिली  आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि गेल्या 40 वर्षांपासून अपूर्ण असलेली बंगळुरूच्या लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढील 40 महिन्यांत कठोर परिश्रम करू असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, बंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पाद्वारे संपर्क व्यवस्था बंगळुरू शहराला त्याची उपनगरे आणि सॅटेलाइट टाउनशिपशी जोडेल आणि त्याचा गुणक परिणाम होईल. त्याचप्रमाणे बंगळुरू रिंगरोड प्रकल्पामुळे शहरातील गर्दी कमी होणार आहे.

पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की सरकारने गेल्या 8 वर्षांत रेल्वे जोडणीच्या संपूर्ण परिवर्तनावर काम केले आहे. त्यांनी नमूद केले की भारतीय रेल्वे वेगवान, स्वच्छ होत आहे, ती आधुनिक, सुरक्षित आणि नागरिकांसाठी अनुकूल होत आहे. आम्ही देशाच्या अशा भागांमध्ये रेल्वे नेली आहे जिथे याबद्दल विचार करणे देखील कठीण होते. भारतीय रेल्वे आता त्या सुविधा आणि वातावरण देण्याचा प्रयत्न करत आहे जे पूर्वी फक्त विमानतळ आणि विमान प्रवासात मिळत असे. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांचे नाव असलेले बंगळुरूमधील आधुनिक रेल्वे स्थानक देखील याचा प्रत्यक्ष पुरावा आहे, ते म्हणाले. एकात्मिक मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की या मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीला पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टरप्लॅनमुळे नवीन चालना मिळत आहे. आगामी मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क हा या संकल्पनेचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. गतिशक्तीच्या भावनेने हाती घेतलेल्या अशा प्रकल्पांमुळे तरुणांना रोजगार मिळेल आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ मिळेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, बंगळुरूची यशोगाथा 21व्या शतकातील भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित करते. सरकारने सुविधा दिल्यास आणि नागरिकांच्या जीवनात हस्तक्षेप कमी केल्यास भारतीय तरुण काय करू शकतात हे बंगळुरूने दाखवून दिले आहे. बंगळुरू ही देशातील तरुणांची स्वप्ननगरी आहे आणि त्यामागे उद्योजकता, नवोन्मेष, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्राचा योग्य उपयोग यांचा समावेश आहे. ते म्हणाले की जे अजूनही भारताच्या खासगी उद्योगाच्या भावनेचा अनादर करतात त्यांच्यासाठी बेंगळुरू हा वस्तुपाठ आहे. 21व्या शतकातील भारत हा संपत्ती निर्माण करणारा, रोजगार निर्माण करणारा आणि नवोन्मेषकांचा भारत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून ही भारताची संपत्ती आणि सामर्थ्य आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की लघु, मध्यम उद्योगांच्या व्याख्येतील बदलामुळे त्यांच्या वाढीचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. आत्मनिर्भर भारतावरील विश्वासाचे प्रतीक म्हणून, भारताने 200 कोटी रुपयांपर्यंतच्या करारांमधील परदेशी सहभाग काढून टाकला आहे. केंद्र सरकारच्या विभागांना एमएसएमईकडून 25 टक्के खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ते म्हणाले, सरकारी ई-मार्केट पोर्टल एमएसएमई विभागासाठी एक उत्तम सक्षमकर्ता बनत आहे.

स्टार्टअप क्षेत्रातील मोठ्या प्रगतीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, आधीच्या दशकात अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या मोजक्याच कंपन्या तयार झाल्या पण गेल्या 8 वर्षात 100 हून अधिक अब्ज डॉलर्सच्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत आणि दर महिन्याला नवीन कंपन्या जोडल्या जात आहेत. 2014 नंतर पहिल्या 10000 स्टार्टअप्सना 800 दिवस लागले, पण आता हे अनेक स्टार्टअप 200 दिवसांपेक्षा कमी कालावधीत जोडले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. गेल्या 8 वर्षांत तयार झालेल्या युनिकॉर्नचे मूल्य सुमारे 12 लाख कोटी रुपये आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

उपक्रम सरकारी असो की खासगी, दोन्ही देशाची संपत्ती आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले कि, त्यामुळे सर्वांना उद्योगाची समान संधी दिली पाहिजे. सरकार देत असलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांबद्दलचा दृष्टिकोन आणि संकल्पना जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील तरुणांना आमंत्रित केले. कष्ट करणाऱ्या तरुणांना सरकार प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असल्याचे ते म्हणाले. सरकारी कंपन्याही समान उद्योग क्षेत्रात स्पर्धा करतील, असे त्यांनी समारोप प्रसंगी सांगितले.

प्रकल्पांचा तपशील:

बेंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्प (BSRP) हा प्रकल्प बेंगळुरू शहराला त्याची उपनगरे आणि सॅटेलाइट टाउनशिपशी जोडेल.सुमारे 15,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या  प्रकल्पाद्वारे एकूण 148 किमी पेक्षा जास्त लांबीच्या मार्गासह 4  मार्गिका उभारण्याची संकल्पना आहे. 500 कोटी रुपये आणि 375 कोटी रुपये अनुक्रमे खर्च करून विकसित केले जाणाऱ्या बेंगळुरू कॅंटच्या पुनर्विकासाची आणि यशवंतपूर जंक्शन रेल्वे स्थानकाचीदेखील पायाभरणी यावेळी केली.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी सुमारे 315 कोटी रुपये खर्चून आधुनिक विमानतळाच्या धर्तीवर विकसित केले गेलेले बायप्पनहल्ली येथील भारतातील पहिले वातानुकूलित रेल्वे स्थानक- सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानक राष्ट्राला समर्पित केले.तसेच पंतप्रधानांनी उडुपी, मडगाव आणि रत्नागिरी येथून इलेक्ट्रिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रोहा (महाराष्ट्र) ते ठोकूर (कर्नाटक) या कोकण रेल्वे मार्गाच्या (सुमारे 740 किमी) 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे घोषित करत ते राष्ट्राला समर्पित केले.1280 कोटींहून अधिक खर्च करून या कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे.  पॅसेंजर ट्रेन आणि मेमू रेल्वे सेवेला (MEMU) हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधानांनी अर्सिकेरे ते तुमकुरू (सुमारे 96 किमी) आणि येलाहंका ते पेनुकोंडा (सुमारे 120 किमी) असे दोन रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरण प्रकल्पांचे देखील लोकार्पण केले.या  दोन रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पांना विकसित करण्यासाठी अनुक्रमे 750 कोटी आणि 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी बेंगळुरू रिंगरोड प्रकल्पाच्या दोन सेक्शनची पायाभरणीही केली. 2280 कोटींहून अधिक खर्च करून विकसित होणाऱ्या या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधानांनी इतर विविध सहा रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही केली: राष्ट्रीय महामार्ग-48 च्या नेलमंगला-तुमकूर विभागाचे सहापदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग-73 च्या पुंजलकट्टे-चरमाडी विभागाचे रुंदीकरण;राष्ट्रीय महामार्ग-69 च्या विभागाचे पुनर्वसन आणि सुधारणा.  या प्रकल्पांसाठी एकत्रित खर्च सुमारे 3150 कोटी रुपये आला आहे.  सुमारे 1800 कोटी रुपये खर्चून बेंगळुरूपासून सुमारे 40 किमी अंतरावर मुद्दलिंगनहल्ली येथे विकसित होत असलेल्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.  यामुळे वाहतूक खर्च, हाताळणी तसेच द्वितीयक मालवाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल.

 

 

S.Patil/Sushama/Vasanti/Sampada/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 


(Release ID: 1835668) Visitor Counter : 209