पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पावागड टेकडीवरच्या श्री कालिका मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 18 JUN 2022 3:00PM by PIB Mumbai
कार्यक्रमाला उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल जी, श्री कालिका माताजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र भाई पटेल जी, राज्य सरकारचे मंत्री भाई पूर्णेश मोदी जी, उपस्थित सर्व ज्येष्ठ पूज्य संतगण, सर्व भाविक आणि महिला-पुरुष वर्ग,
आज अनेक वर्षांनी पावागड माता कालीच्या चरणी काही क्षण विसावण्याचे, आशीर्वाद प्राप्त करण्याचे भाग्य लाभले, माझ्यासाठी जीवन कृतार्थ करणारे हे क्षण आहेत. स्वप्न जेव्हा संकल्पाचे रूप घेते आणि संकल्प जेव्हा साकारतो तेव्हा त्याचा किती अवर्णनीय आनंद असतो याची आज आपण कल्पना करू शकता.आजचा हा क्षण माझ्या अंतरात्म्यासाठी विशेष आनंददायी आहे. 5 शतके आणि स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्यानंतरही, काली मातेच्या शिखरावर ध्वज फडकला नव्हता , आज माता कालीच्या शिखरावर ध्वज फडकत आहे, हे क्षण आपल्याला प्रेरणा देतात, उर्जा देतात आणि आपली महान परंपरा आणि संस्कृतीप्रती समर्पित भावनेने जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात. आजपासून काही दिवसातच या महिन्याच्या शेवटी गुप्त नवरात्री सुरु होणार आहेत.गुप्त नवरात्री सुरु होण्याच्या आधी पावागड मध्ये काली मातेचे हे शक्तीपीठ,महाकाली मंदिर आपल्या भव्य आणि दिव्य स्वरुपात आपल्यासमोर आहे. शक्ती आणि साधना यांचे हेच तर वैशिष्ट्य असते. गुप्त नवरात्री असली तरी शक्ती सुप्त नसते, शक्ती कधी लुप्त होत नाही. जेव्हा श्रद्धा, साधना आणि तपश्चर्या फळाला येते तेव्हा शक्ती पूर्णपणे प्रकट होते. पावागड मध्ये महाकालीच्या आशीर्वादाने आपण गुजरात आणि भारताच्या याच शक्तीची प्रचीती घेत आहोत.आज शतकांनंतर महाकालीचे हे मंदिर आपल्या भव्य स्वरुपात आपल्यासमोर असून आपली मानही अभिमानाने उंचावते.आज शतकांनंतर पावागड मंदिरावर पुन्हा एकदाकळसावर ध्वज फडकला आहे. हा शिखर ध्वज आपल्या श्रद्धा आणि आध्यात्म यांचे तर प्रतिक आहेच त्याच बरोबर हा शिखर ध्वज याचेही प्रतिक आहे की शतके बदलली, युगे बदलली तरी श्रद्धेचे शिखर शाश्वत राहते.
 
बंधू-भगिनीनो,
अयोध्येत भव्य राम मंदिर सकारात आहे हे आपण पाहिले असेल, काशीमध्ये विश्वनाथ धाम असो किंवा माझ्या केदारनाथाचे धाम असो, भारतात आज आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव पुन्हा स्थापित होत आहे. आजचा नवा भारत आपल्या आधुनिक आकांक्षासह आपला प्राचीन वारसा, आपली प्राचीन ओळख त्याच उत्साहाने सांभाळत आहे, प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे.आपले हे आध्यात्मिक स्थान आपल्या श्रद्धेबरोबरच नव्या संधींचाही स्त्रोत ठरत आहे. पावागड मध्ये कालिका मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार याच गौरव यात्रेचा एक भाग आहे. या प्रसंगी महाकाली मातेच्या चरणी नमन करत आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास याचेही प्रतीक आहे.
 
मित्रहो,
आज मला श्री कालिका मंदिरात ध्वजारोहण आणि पूजा-अर्चा करण्याचे भाग्य लाभले. कालीमातेचे दर्शन घेताना मी विचार करत होतो आज काली मातेच्या चरणी काय मागू ? माता कालीच्या आशीर्वादाबाबत इतिहास साक्षी आहे. स्वामी विवेकानंद जी , काली मातेचा आशीर्वाद घेऊन जनसेवेच्या माध्यमातून प्रभू चरणी लीन झाले होते. माते मलाही आशीर्वाद दे की मी अधिक उर्जेने, अधिक त्याग आणि समर्पण भावनेने देशाच्या जनतेचा सेवक म्हणून त्यांची सेवा करत राहीन. माझे जे काही सामर्थ्य आहे,माझ्या जीवनात जे काही पुण्य आहे ते मी देशाच्या माता – भगिनींच्या कल्याणासाठी, देशासाठी समर्पित करत राहीन. गुजरातच्या या गौरवशाली भूमीवरून या समयी मी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचेही स्मरण करत आहे.
 
मित्रहो,
गुजरातने , स्वातंत्र्य लढ्यात जेव्हढे योगदान दिले तितकेच योगदान देशाच्या विकासातही दिले आहे. गर्वी गुजरात भारताचा अभिमान आणि शान यांच्या तोडीचे आहे. गुजरातने व्यापारातही भारताचे नेतृत्व केले आणि भारताच्या आध्यात्मिकतेचेही, त्याचे जतन करण्याचाही संपूर्ण प्रयत्न केला.
शतकांच्या संघर्षानंतर भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपण गुलामी आणि अत्याचाराच्या घावांनी घायाळ होतो. आपण ज्यासाठी लढलो होतो, ते अस्तित्व पुन्हा उभे करण्याचे आव्हान आपल्यासमोर होते. भारताच्या या सांस्कृतिक स्वातंत्र्याची सुरवातही सरदार साहेबांच्या नेतृत्वाखाली गुजरातमधेच झाली. सोमनाथ मंदिराची पुनर्निर्मिती, राष्ट्र पुनर्निर्माणाचा संकल्प म्हणून आपल्यासमोर आला.
पावागड आणि पंचमहल, आज सोमनाथची तीच परंपरा पुढे नेत आहेत, ज्याने संपूर्ण देशात गुजरातला ओळख दिली होती. आज जी शिखर ध्वजा फडकवण्यात आली आहे ती केवळ महाकाली मंदिराची ध्वजा नाही तर गुजरात आणि देशाच्या सांस्कृतिक गौरवाचीही ध्वजा आहे. पंचमहल आणि गुजरातच्या लोकांनी शतकांपासून या मंदिराच्या भव्यतेसाठी प्रयत्न केले. सोन्याचा मुलामा असलेल्या या कलशासह या मंदिराबाबतचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. पावागड आणि पंचमहाल यांची तपश्चर्या फळाला आली आहे.
पंचमहाल आणि या क्षेत्रात, मला आठवतेय, आजची परंपरा मला तितकी माहित नाही,मात्र जी जुनी पद्धत होती तेव्हा लग्न सोहळा असेल तेव्हा भक्त या मंदिरात मातेच्या चरणी सर्वप्रथम लग्नाची पत्रिका ठेवत असे. मला स्मरते की त्या वेळी जे पुजारी, पंडित होते ते संध्याकाळच्या आरतीच्या वेळी, दिवसभरात अशी जी निमंत्रणे आलेली असत ती मातेसमोर वाचत असत. भक्तिभावाने ऐकवत असत, सुरेंद्र काका म्हणतात की आजही असेच सुरु आहे. 
त्यानंतर ज्यांनी हे निमंत्रण पाठवले आहे त्यांना आशीर्वाद म्हणून भेटही पाठवली जाते. किती भाग्याची गोष्ट आहे.ही परंपरा दीर्घ काळापासून चालत आलेली आहे. मातेच्या दरबाराचा हा कायापालट आणि ध्वजारोहण, भक्तीसाठी, शक्तीच्या उपासकांसाठी यापेक्षा मोठी भेट काय असू शकते आणि मातेच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य तरी कसे होऊ शकते.   
इथे श्री कलिका मंदिराच्या जीर्णोद्धाराचे जे काम झाले आहे, त्यात आणखी एक विशेष गोष्ट आहे. महाकाली मंदिराला इतके भव्य स्वरूप देण्यात आले, मात्र त्याच्या संपूर्ण कामात देवीच्या गाभाऱ्याचे मूळ स्वरूप तसेच कायम ठेवण्यात आले आहे. या सेवा यज्ञात, गुजरात सरकार, पवित्र तीर्थयात्रा विकास मंडळ आणि विश्वस्त मंडळाने एकत्र काम केले.मंदिर परिसराच्या पूर्ण प्रदक्षिणेसाठी दुधिया तलाव आणि छासिया तलावांना जोडणारा एक प्रदक्षिणा मार्गही लवकरच तयार केला जाणार आहे,असे मला आताच सुरेंद्र भाई सांगत होते. यज्ञशाळा, भोजनगृह, पर्यटकांसाठी भक्त निवास आणि छासिया तलावापासून माताजी मंदिरापर्यंत लिफ्ट अशा सुविधा देखील निर्माण केल्या जाणार आहेत. त्या सोबतच मांची जवळ अतिथीगृह आणि बहुस्तरिय पार्किंग सुविधा देखील उभारल्या जातील.
आधी इथपर्यंत पोचण्यासाठी भाविकांना कित्येक तास लागत असत. पायऱ्या चढणे, प्रवासाचा थकवा, अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. आधी पायऱ्या पण कशा होत्या,यापूर्वी जे इथे येऊन गेले असतील, त्यांना माहीत असेल. त्यांना पायऱ्याही म्हणू शकत नाही, अशी अवस्था होती. मात्र आज नव्या उत्तम पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आता उत्तम दगडांच्या छान पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. पायऱ्यांची उंचीही जास्त नाही. चढणाऱ्याला कष्ट होणार नाहीत, असं बरोबर अंतर ठेवण्यात आलं आहे.आधी मंदिर परिसरात एकावेळी दोन डझन लोक सुद्धा एकावेळी पोहचू शकत नसत. आता मात्र शंभर पेक्षा जास्त भाविक इथे येऊ शकतात. पूजाअर्चा करु शकतात.
आता गर्दीचा भार कमी झाला आहे तर दुसरीकडे भाविकांसाठीची सुरक्षा व्यवस्थाही वाढली आहे. मंदिर परिसराच्या विस्तारामुळे चेंगराचेंगरी सारख्या घटनांपासून संरक्षण होऊ शकेल. अशा जागांवर आपल्याला सातत्याने जागरूक राहण्याची गरज असते. आणि आता जीर्णोद्धारानंतर तर भाविकांची संख्या वाढूही शकेल. आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्थांची चिंता करावी लागेल. मी आताच सगळ्या काली भक्तांना विनंती करतो की त्यांनी नियम आणि शिस्तीचे पालन करावे कारण ही जागा कठीण आहे,इथे कुठलाही अपघात होणार नाही, याची काळजी आपल्या सगळयांना घ्यावी लागेल. याआधीही इथे अनेक दुर्घटना झाल्या आहेत, अनेकदा त्याची चिंता वाटत असते. मात्र, आईच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा गाडी सुरू व्हायची. पण आता नव्या मंदिरात सर्वांनी शिस्तीचे पालन करावे अशी माझी इच्छा आहे. कारण हा गढ कठीण आहे. ऊंच आहे. अशा अडचणींमधून माग काढावा लागतो. म्हणूनच आपण शिस्तपालन केले तर तुमचा प्रवासही चांगला होईल आणि मातेचे आशीर्वाद देखील मिळतील. ह्या टेकडीच्या वर जो दुधिया तलाव आहे, त्याचाही विकास केला जात आहे. ह्या तलावाच्या चारही बाजूनी एक प्रदक्षिणा पथ बनवला गेला आहे. त्यामुळेही लोकांची खूप सोय झाली आहे. 
श्री महाकालीच्या पायाशी येऊन तिचे आशीर्वाद घेण्याची इच्छा वारंवार आपल्याला होणे साहजिक आहे. मात्र याआधी पावागढची यात्रा अतिशय कठीण असायची, लोक म्हणायचे, आयुष्यात किमान एकदा तरी मातेचे दर्शन व्हावेत. आज इथे झालेल्या सुविधांमुळे हे कठीण असलेले देवी दर्शन सुलभ झाले आहे. माता, भगिनी, ज्येष्ठ नागरिक, मुले, युवा, दिव्यांग सगळे लोक आता अगदी सहजपणे मातेच्या चरणांशी येऊन आपल्या भक्तीचा, मातेच्या प्रसादाचा लाभ सहजपणे घेऊ शकतील.
आता मी स्वतः देखील इथे पोचायला तंत्रज्ञानाची मदत घेतली. रोपवे ने आलो. रोप वे मुळे ही यात्रा तर सोपी झालीच आहे,शिवाय रोप वे मुळे पावागढचे जे अद्भुत निसर्ग सौन्दर्य आहे, त्याचा आनंदही आपल्याला घेता येतो. आज गुजरात मध्ये अनेक तीर्थ आणि पर्यटन स्थळे आहेत जिथे अशी रोपवे ची सुविधा होतांना आपल्याला दिसते आहे.
पावागढ़, सपूतारा, अंबाजी आणि गिरनार इथे रोपवे झाल्यामुळे लोकांची खूप सोय झाली आहे. 
पावागढ़, माँ अम्बा आणि सोमनाथ, तसेच द्वारकाधीशाच्या आशीर्वादामुळेच गुजरात आज 'गरवी गुजरात' ठरतो आहे.
गुजरात चे महान कवी नर्मद यांनी गुजरातच्या सांस्कृतिक महिमेचे वर्णन करतांना लिहिले आहे--
 
उत्तरमां अंबा मात, पूरवमां काली मात।
छे दक्षिण दिशामांकरता रक्षा, कुंतेश्वर महादेव।
ने सोमनाथ ने द्वारकेश ए,पश्विम केरा देव छे
सहायमां साक्षात, जय जय गरवी गुजरात।
 
(उत्तरेत माता अंबा मां, पूर्व दिशेला काली मां, दक्षिण दिशेचे रक्षण करणारा कुंतेश्वर महादेव, सोमनाथ आणि पश्चिमेकडे द्वारकाधीश आहे. हे सगळे गुजरातच्या सहाय्याला असून त्यांच्यामुळेच गुजरात, गरवी गुजरात आहे.. ..)
आज गुजरातची हीच ओळख आकाशापर्यंत पोहोचली आहे. कवी नर्मद यांनी गरवी गुजरात, म्हणजे गुजरातचे मानबिंदू म्हणून ज्या सांस्कृतिक स्थळांचा उल्लेख केला आहे, ती सगळी तीर्थे आज विकासाच्या नव्या पथावर वाटचाल करत आहेत. ह्या सर्व तीर्थस्थळांचा विकास करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सर्व तीर्थस्थळांवर हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. गुजरातच्या तीर्थस्थळांवर आता दिव्यत्व आहे, शांतताही आहे समाधान आणि संतोष आहे. आणि यापेक्षा मोठे सुख काय असू शकेल?
जर मातेच्या मंदिरांविषयी बोलायचे असेल. शक्तीच्या सामर्थ्याविषयी बोलायचे असेल, तर आपण गुजरातचे लोक इतके भाग्यवान आहोत की माँ शक्तीची उपासना करणाऱ्या भक्तांसाठी गुजरात मध्ये तर संपूर्ण शक्तिचक्र आहे. एक शक्ति रक्षा चक्र आहे, गुजरात चे रक्षा कवच म्हणून हे चक्र कार्यरत आहे. गुजरातच्या वेगवेगळ्या क्षेत्रात विराजमान असलेल्या शक्ति रूपेण माता गुजरातला सातत्यानं आशीर्वाद देते आणि गुजरातचे रक्षण करते. बनासकांठामध्ये अंबा बाई आहे, पावगडमध्ये काली माता आहे, चोटीलामध्ये चामुंडा माता, उंझामध्ये उमिया माता, कच्छला माता नो मढला आशापुरा माता आहे, नवसारी जवळ उनाई माता आहे, डेडीयापाडा जवळ देवमोगरा माता आहे, भावनगर जवळ पासमाटेल इथं खोडियार माता आहे, तिकडे उनियाधाम, गिरनारच्या वर अंबा माता, अनेक माता कानाकोपऱ्यात आहेत. आपल्यावर सतत त्यांचा आशीर्वाद असतो, म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्यावर एक शक्तीचा आशीर्वाद आहे.
अंबाजी इथं गब्बर डोंगराच्या पायथ्याशी, आत्ताच आमच्या भूपेंद्र भाईंनी वर्णन केलं, त्याचा 3D व्हिडिओ प्रोजेक्शन मॅपींग शो सुरू करण्यात आला आहे. सोबतच महाआरती देखील सुरू करण्यात आली आहे. केंद्राच्या प्रसाद योजने अंतर्गत गब्बर तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार देखील केला जातो आहे. अंबाजी मंदीर परिसर विकास योजनेवर देखील काम सुरू आहे. कोटेश्वर महादेव मंदीर, रिंछडीया महादेव मंदीर या सारख्या पुण्यस्थळांचा देखील विकास केला जातो आहे.
आत्ता काही दिवसांपूर्वीच मला सोमनाथ मंदिरात देखील अनेक विकास कामांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. द्वारकेत घाट, पर्यटक सुविधा आणि मंदिरांचे सौंदर्यीकरण यावर देखील काम केले गेले आहे. पंचमहालच्या लोकांना माझा आग्रह आहे, बाहेरून जे भाविक इथे दर्शनाला येतील, त्यांना आपल्या राज्यातल्या या सगळ्या स्थानांना भेट द्यायला जरूर सांगा.
जिथे भगवान कृष्ण आणि माता रुक्मिणी यांचा विवाह झाला होता.त्या माधवपूर येथील रुक्मिणी मंदिराचाही पुनर्विकास केला जाणार आहे. भूपेंद्रभाईंनी सांगितल्याप्रमाणे, एप्रिल महिन्यातच माधवपूर खेड मेळ्याच्या उद्घाटनासाठी आपले राष्ट्रपती स्वतः आले होते.
तीर्थक्षेत्रांचा हा विकास केवळ श्रद्धेच्या विकासापुरता मर्यादित नाही, तर आपली तीर्थक्षेत्रे ही समाजाच्या गतिशीलतेचे आणि देशाच्या एकात्मतेचे अत्यंत महत्त्वाचे जिवंत प्रतीक आहेत. या तीर्थक्षेत्रांना आणि मंदिरांना भेट देणारे भाविक त्यांच्यासोबत अनेक नवीन संधीही घेऊन येतात.कोणत्याही क्षेत्रात पर्यटन वाढले तर रोजगारही वाढतो, पायाभूत सुविधांचाही विकास होतो. आम्ही आपल्या यात्रेकरूंना केवळ स्थानिक संस्कृतीची ओळख करून देत नाही, तर स्थानिक कला, कौशल्ये आणि हस्तकला यांचाही प्रचार प्रसार केला जातो.आपले केवाडिया , तिथले आपले एकता नगर, स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतर तिथल्या पर्यटकांची संख्या वाढली याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत.आज ते जगातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्याने जगातही आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच सुविधांमध्ये वाढ केल्यानंतर काशी विश्वनाथ धाम आणि चारधाम यात्रेतील यात्रेकरूंची संख्याही नवनवीन विक्रम करत आहे अनेक भाविक तेथे पोहोचले आहेत.
पावागडच्या विकासामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल, मग त्याचा फायदा वडोदरा असो, पंचमहाल असो, आपला संपूर्ण वनवासी पट्टा असो, आदिवासी बांधव असो, प्रत्येकाच्या जीवनात खूप सामर्थ्य आणणार आहे. मंदिरात येणारे भाविक येथून विरासतवनातही जाणार आहेत.निसर्ग, पर्यावरण, परंपरा आणि आयुर्वेद यांसारख्या विषयांवर विरासतवन हे देशासाठी मोठे आकर्षण आणि प्रेरणा केंद्र बनू शकते.त्याचप्रमाणे पुरातत्व उद्यान आणि पावागड किल्ल्याचेही आकर्षण वाढणार आहे.या विकास कामांमुळे पंचमहाल देशातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येण्यास मदत होणार आहे.
पावागडमध्ये अध्यात्मही आहे, इतिहासही आहे, निसर्गही आहे, कला-संस्कृतीही आहे. येथे एका बाजूला माता महाकालीचे शक्तिपीठ आहे, तर दुसऱ्या बाजूला जैन मंदिराचा वारसा आहे.म्हणजेच पावागड हे एक प्रकारे भारताच्या ऐतिहासिक विविधतेसह सर्वधर्म समभावाचे केंद्र राहिले आहे.चंपानेरच्या पुरातत्व स्थळाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे. येथील वाढत्या पर्यटनामुळे या ठिकाणाची ओळख अधिक दृढ होणार आहे.
पंचमहालमध्ये पर्यटनाच्या शक्यतांसोबतच येथील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी निर्माण होणार आहेत.विशेषत: आपल्या आदिवासी बांधवांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.आदिवासी समाजातील कला-संस्कृती आणि पारंपरिक कौशल्यांनाही नवी ओळख मिळणार आहे.
आणि आपले पंचमहाल ही बैजू बावरा यांच्यासारख्या महान गायकांची भूमी आहे.ती प्रतिभा आजही इथल्या मातीत आहे.जिथे वारसा, जंगल आणि संस्कृती बळकट होते तिथे कला आणि प्रतिभाही फुलते. आपल्याला ही प्रतिभाही विकसित करायची आहे, नवी ओळख द्यायची आहे.
चंपानेर हे ते ठिकाण आहे जिथे 2006 मध्ये गुजरातचा गौरव वाढवणारी ज्योतिर्ग्राम योजना सुरू झाली होती. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा लोक मला म्हणायचे साहेब, संध्याकाळी जेवताना तरी वीज मिळेल अशी व्यवस्था करा, इथे माता कालीच्या चरणी बसून आम्ही ज्योतिर्ग्राम योजनेच्या माध्यमातून गुजरातमध्ये आणि देशात पहिल्यांदाच चोवीस तास घराघरात वीज पोहोचवण्यात यश मिळवले. त्यावेळचे आपले राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलामजी त्या कार्यक्रमाला आले होते आणि आम्ही त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम सुरू केला होता. ज्योतिर्ग्राम योजनेने गुजरातच्या विकासात नवा अध्याय जोडला. या योजनेमुळे गुजरातमधील जनतेला चोवीस तास वीज मिळू लागली.
पावागड हे नावच एक प्रकारे हवेचा गड आहे. येथे वायुदेवाची विशेष कृपा वास करते. मला विश्वास आहे की, आपल्या सांस्कृतिक उत्थानाची आणि विकासाची जी हवा पावागडमध्ये वाहते आहे, तिचा सुगंध संपूर्ण गुजरात आणि देशापर्यंत पोहोचेल.या भावनेने मी पुन्हा एकदा महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो.मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो.आज जेव्हा मी माता कालीच्या चरणी आलो आहे, तेव्हा गुजरातचा विस्तीर्ण परिसर आणि इतर राज्यांतूनही माता कालीचे असंख्य भक्त इथे मोठ्या श्रद्धेने येतात. त्या आपल्या भक्तांचे खुप खूप अभिनंदनही करतो. कारण त्यांनी जे स्वप्न पाहिले असेल, त्यांच्या पूर्वजांनी जे स्वप्न पाहिले असेल, त्यांचे पूर्वज आशेने येत असत आणि निराश होऊन परत जात असत. आज त्यांची मुलेही त्यांच्या पूर्वजांना सांगू शकतील की तुम्हाला त्रास झाला असेल, पण आता काळ बदलला आहे.आता माता काली पूर्ण सन्मानाने आपल्याला आशीर्वाद देत आहे. या भावनेने, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. विश्वस्त मंडळाचे, गुजरात सरकारचे, भूपेंद्रभाईंच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्याचे मी मनापासून कौतुक करतो.
 
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
***
 
SRT/N.Chitale/R.Aghor/S.Chavan/DY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835221) Visitor Counter : 367