पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य" : आईने शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यावर पंतप्रधान मोदी यांचा भावनिक ब्लॉग

Posted On: 18 JUN 2022 8:29AM by PIB Mumbai

आई शंभरव्या वर्षात पदार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी आपल्या आईसोबत घालवलेल्या बालपणीच्या काही खास क्षणांना उजाळा दिला आहे. ते मोठे होत असताना आपल्या आईने केलेल्या अनेक त्यागांची आठवण त्यांनी करून दिली आणि त्यांच्या मन, आत्मविश्वास तसेच व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या आईच्या विविध गुणांचा उल्लेख त्यांनी केला.

“आज मला हे सांगताना खूप आनंद होतोय आणि हे माझे सौभाग्य समजतो की माझी आई श्रीमती हिराबा मोदी शंभरव्या वर्षात पदार्पण करत आहे. हे तिचे जन्मशताब्दी वर्ष असणार आहे.” असे पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे.

लवचिकतेचे प्रतीक

आईने बालपणी भोगलेल्या संकटांची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य आहे. अगदी सर्व मातांप्रमाणे.” लहान वयात पंतप्रधान मोदी यांच्या आईने आपली आई गमावली. “तिला माझ्या आजीचा चेहरा किंवा तिच्या कुशीतली मायेची ऊबही आठवत नाही. तिने तिचे संपूर्ण बालपण आईशिवाय घालवले. असे मोदी यांनी म्हटले आहे.”

मातीच्या भिंती आणि छतावर मातीची कौले असलेल्या वडनगरमधील छोट्याशा घराची आठवण त्यांनी सांगितली. आई-वडील आणि भावंडांसोबत तिथे ते राहत होते. त्यावेळी असंख्य दैनंदिन संकटे उभी ठाकत. आईने तोंड देत त्यावर यशस्वी मात केली असे त्यांनी नमूद केले.

आईने केवळ घरातील सर्व कामे एकटीनेच केली नाहीत तर घराच्या तुटपुंज्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठीही काम केले. घरखर्च भागवण्यासाठी ती काही घरात धुणीभांडी करायची आणि चरखा कातण्यासाठीही वेळ काढायची असे त्यांनी सांगितले.

“पावसात आमचे छत गळायचे आणि घरभर पाणी व्हायचे. पावसाचे पाणी जमा करण्यासाठी आई गळत असलेल्या ठिकाणी बादल्या आणि भांडी ठेवायची. या प्रतिकूल परिस्थितीतही आई हे लवचिकतेचे प्रतीक भासायचे याची पंतप्रधान मोदी यांनी आठवण करुन दिली.

स्वच्छता करणाऱ्यांचा मनापासून आदर

स्वच्छतेबाबत आईचा कटाक्ष असायचा, त्याबद्दल ती फार आग्रही होती. स्वच्छता राखण्याबाबतच्या शिस्तीची झलक मिळणारे काही प्रसंग मोदी यांनी सामायिक केले.

आईला स्वच्छता आणि स्वच्छता कार्यात सहभागी असलेल्यांबद्दल खूप आदर होता. वडनगरमध्ये त्यांच्या घराशेजारील नाला स्वच्छ करायला कोणी यायचे तेव्हा आई त्यांना चहा दिल्याशिवाय जाऊ द्यायची नाही असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

इतरांच्या आनंदात आनंद शोधणे

आईला इतर लोकांच्या आनंदात आनंद मिळत असे आणि ती खूप मोठ्या मनाची होती असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. “वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला, अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. आई आम्हा सर्व भावंडांप्रमाणेच अब्बासची प्रेमाने काळजी घ्यायची. दरवर्षी ईदच्या दिवशी ती त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे याची आठवण त्यांनी सांगितली. सणासुदीला, आजूबाजूची मुले आमच्या घरी यायचे आणि आईच्या हातच्या खास पदार्थांचा आस्वाद घ्यायचे असेही त्यांनी नमूद केले ."

पंतप्रधान मोदी यांच्या आई फक्त दोन जाहीर कार्यक्रमात त्यांच्यासोबत सहभागी झाल्या आहेत.

आई फक्त दोन जाहीर कार्यक्रमात त्यांच्यासोबत सहभागी झाल्याचे ब्लॉग पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावून एकता यात्रा पूर्ण केली. तिथून परतल्यावर अहमदाबादमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात आईने त्यांच्या कपाळावर कुमकुम तिलक केले होते, हे एक आणि दुसरे उदाहरण म्हणजे 2001 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती तेव्हा.

पंतप्रधान मोदी यांच्याच्या आईने त्यांना जीवनाचा धडा शिकवला

आईने त्यांना जाणीव करून दिली की औपचारिक शिक्षण न घेताही शिकणे शक्य आहे. त्यांनी एक घटनाही सांगितली. मोदी यांना त्यांच्या सर्व शिक्षकांचा जाहीर सन्मान करायचा होता, त्यात त्यांच्या सर्वात मोठ्या शिक्षिका - त्यांच्या आईचा समावेश होता. मात्र, त्यांच्या आईने नकार दिला. त्या म्हणाल्या “हे बघ, मी एक सामान्य माणूस आहे. मी कदाचित तुला जन्म दिला असेल, परंतु तुला त्या सर्वशक्तिमान शक्तीने शिकवले आहे आणि वाढवले ​​आहे.”

त्यांची आई कार्यक्रमाला आली नाही. मात्र त्यांनी जेठाभाई जोशीजी यांच्या कुटुंबातील कोणाला तरी बोलावले जावे हे सुनिश्चित केले. - ते त्यांचे स्थानिक शिक्षक होते. त्यांनी मोदी यांना वर्णमाला शिकवली होती. "आईची विचार प्रक्रिया आणि दूरदृष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करते," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

एक कर्तव्यपरायण नागरिक

पंतप्रधान मोदी म्हणतात, त्यांची आई एक कर्तव्यपरायण नागरिक असून, त्यांनी (आईने) निवडणुका सुरु झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे- अगदी पंचायतीच्या निवडणुकीपासून ते संसदेच्या निवडणुकीपर्यंत.

अत्यंत साध्या राहणीमानाचा अंगीकार

आपल्या आईच्या अत्यंत साध्या राहणीमानाविषयी पंतप्रधान सांगतात, की आजही त्यांच्या (आईच्या) नावावर कोणतीही मालमत्ता नाही. "तिला मी कधीही कोणतेच सोन्याचे दागिने घालताना बघितले नाही, नि तिला त्यात काही स्वारस्यही नाही. पूर्वीप्रमाणेच आजही एका छोट्याशा खोलीत अतिशय साधेपणाने ती राहते", पंतप्रधान म्हणतात.

ताज्या घडामोडींशी सातत्याने जवळून परिचय

जगातील ताज्या घडामोडींशी आपल्या आईचा सातत्याने जवळून परिचय असल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात. आपल्या ब्लॉगमध्ये ते म्हणतात, "मी नुकतेच तिला विचारले, की ती दिवसभरात किती वेळ टीव्ही बघते. ती म्हणाली, टीव्हीवरील बहुतेक लोक एकमेकांशी भांडत असतात. मग जे लोक शांतपणे वृत्तनिवेदन करतात आणि सर्व काही उकलून सांगतात, त्यांचेच कार्यक्रम/बातम्या ती बघते. आई इतक्या गोष्टींकडे लक्ष देते, हे बघून मला आनंदही वाटलं आणि नवलही !

इतक्या वयातही तीव्र स्मरणशक्ती

इतक्या वार्धक्यातही पंतप्रधानांच्या आईचा सावधपणा आणि तरतरीतपणा कायम आहे. हे सिद्ध करणारा 2017 मधील एक प्रसंग पंतप्रधान सांगतात. 2017 मध्ये पंतप्रधान मोदी काशीहून परस्पर त्यांना भेटायला गेले होते आणि जाताना त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन गेले होते. "मी आईला भेटल्याबरोबर लगेचच तिने मला विचारले की मी काशी विश्वनाथ महादेवाला दक्षिणा अर्पण केली की नाही.. आई आजही पूर्ण नावाचा उच्चार करते- काशी विश्वनाथ महादेव. पुढे गप्पा मारताना तिने विचारले, "काशी विश्वनाथ मंदिराकडे जाणारे गल्लीबोळ अजूनही तसेच आहेत का, जणू काही एखाद्याच्या घराच्या आवारातच देऊळ असल्यासारखे?" .. मी चकित झालो आणि तिला विचारले की ती त्या देवळात कधी गेली होती.. ती अनेक वर्षांपूर्वी काशीला जाऊन आल्याचे तिने सांगितले. परंतु आश्चर्य म्हणजे तिला तेथील सर्व काही आठवत होते"- पंतप्रधान म्हणतात.

इतरांच्या आवडीनिवडीचा आदर

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्यांची आई इतरांच्या आवडीनिवडीचा केवळ आदरच करते असे नाही तर तिच्या आवडी/तिची मते इतरांवर कधी लादतही नाही. "विशेषतः माझ्याबाबतीत, ती माझ्या निर्णयांचा आदरच करत आली आहे, कदापि कोणत्या अडचणी निर्माण न करता, मला कायम प्रोत्साहन देत आली आहे. बालपणापासून तिला हे जाणवत होते की माझ्यामध्ये एक वेगळी मनोभूमिका वाढत आहे", पंतप्रधान आवर्जून उल्लेख करतात.

पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा आपले घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला तो त्यांच्या आईनेच. त्यांच्या आकांक्षा समजून घेत त्यांना आईनेच आशीर्वाद दिला, "तुझे अंतःकरण जे सांगते ते कर."

गरीब कल्याणावर भर

गरीब कल्याणाचा ठाम निर्धार करून त्यावर भर देण्यासाठी आईने त्यांना सतत प्रेरणा दिल्याचे पंतप्रधान सांगतात. 2001 मध्ये जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदीजींचे नाव घोषित करण्यात आले, तेव्हाचा प्रसंग ते वर्णन करतात. गुजरातमध्ये पोहोचल्यावर ते थेट आईला भेटायला गेले. तिला पराकोटीचा आनंद झाला होता. ती त्यांना म्हणाली, "मला तुझे सरकारमधले काम काही कळत नाही, पण तू कधीही लाच घ्यायची नाहीस, इतकेच सांगते."

त्यांनी तिची काळजी करू नये आणि अधिक मोठ्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करावे, असे त्यांची आई त्यांना नेहमीच सांगत आली आहे. ते जेव्हा जेव्हा आईशी फोनवर बोलतात, तेव्हा तेव्हा ती सांगते, "कधीही काही चुकीचे करू नकोस, कोणाशीही वाईट वागू नकोस नि सतत गरिबांसाठी काम करत राहा."

कठोर परिश्रमाचा जीवनमंत्र

पंतप्रधान मोदी सांगतात की त्यांच्या आईवडिलांचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे त्यांचे सर्वात मोठे गुण होते. "गरिबीशी आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या अनेक आव्हानांशी झुंज देत असूनही आईवडिलांनी कधी प्रामाणिकपणाची कास सोडली नाही की कधी स्वाभिमान बाजूला ठेवला नाही. कोणत्याही आव्हानांवर मात करण्यासाठी 'सातत्यपूर्ण कठोर परिश्रम' हाच त्यांचा पहिला मंत्र असे !", पंतप्रधान सांगतात.

मातृशक्तीचा आदर्श

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, "माझ्या आईच्या जीवनात मला दिसते ते तपाचरण, त्याग आणि भारताच्या मातृशक्तीचे योगदान. मी जेव्हा जेव्हा आईकडे आणि तिच्यासारख्या कोट्यवधी स्त्रियांकडे बघतो, तेव्हा तेव्हा मला असे जाणवते की भारतीय स्त्रियांना मिळवता येणार नाही, असे काहीच नाही. त्या सर्व काही संपादन करू शकतात."

आपल्या आईची प्रेरक जीवनगाथा

पंतप्रधान सारांशाने शब्दबद्ध करतात-

"वंचिततेच्या प्रत्येक कहाणीच्या पार पलीकडे असते, एका मातेची तेजस्वी कथा, प्रत्येक संघर्षापेक्षा कितीतरी उंचावर असते, एका मातेच्या ठाम निर्धाराची गाथा".

***

STupe/VGhode/JaeeV/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835008) Visitor Counter : 569