पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले
"हे 130 कोटी भारतीयांचे कुटुंब माझे आहे, तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यातील सर्व काही आहात आणि माझे हे आयुष्य देखील तुमच्यासाठी आहे"
प्रत्येकाच्या कल्याणासाठी, प्रत्येक भारतीयाच्या सन्मानासाठी, प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या समृद्धीसाठी आणि प्रत्येकाच्या आनंदी आणि शांततापूर्ण जीवनासाठी मला जे काही करता येईल ते मी करेन, या संकल्पाचा मी पुनरुच्चार करतो.
"सेवा, सुशासन और गरीब कल्याणने लोकांसाठी सरकारचा अर्थ बदलून टाकला आहे"
“पूर्वी ज्या समस्या कायमस्वरूपी मानल्या जात होत्या, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे”
"आमच्या सरकारने पहिल्या दिवसापासून गरीबांना सक्षम बनवायला सुरुवात केली"
“आम्ही व्होट बँकेसाठी नव्हे तर नवभारत उभारणीसाठी काम करत आहोत”
“100% सक्षमीकरण म्हणजे भेदभाव आणि तुष्टीकरण संपवणे. 100% सक्षमीकरण म्हणजे प्रत्येक गरीब व्यक्तीला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळणे.
“नव्या भारताच्या क्षमतेसाठी कोणतेही उद्दिष्ट अशक्य नाही”
Posted On:
31 MAY 2022 1:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा अभिनव जाहीर कार्यक्रम देशभरातल्या राज्यांच्या राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांवर आयोजित करण्यात आला. देशभरातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी सरकारच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधतील अशी या संमेलनाची संकल्पना होती.
पंतप्रधानांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत आर्थिक लाभांचा 11 वा हप्ता देखील यावेळी जारी केला. यामुळे 10 कोटी पेक्षा अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना सुमारे 21,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करणे शक्य होईल. यावेळी पंतप्रधानांनी देशभरातील (PM-KISAN) लाभार्थ्यांशी संवाद साधला. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे शिमला येथे उपस्थित होते.
लडाखमधील लाभार्थी ताशी टुंडुप यांच्याशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी लडाखमध्ये पर्यटकांचे आगमन आणि सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव याविषयी विचारले. लष्करातील जवान म्हणून त्यांच्या सेवेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ताशी टुंडुप म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालये, गॅस जोडणी आणि शेतीशी संबंधित लाभ सारख्या योजनांचा लाभ मिळवताना त्यांना कोणतीही अडचण आली नाही.
बिहारमधील ललिता देवी जी या प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला, स्वच्छ भारत आणि जल जीवन मिशनच्या लाभार्थी आहेत. या योजनांमुळे त्यांचे जगणे सुसह्य आणि सन्माननीय झाल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, घरामुळे मुलांचे शिक्षण, लग्न अशा अनेक गोष्टी योग्य रीतीने होतील.
पश्चिम त्रिपुरा येथील पंकज शानी एक राष्ट्र एक रेशन कार्ड, पीएम गरीब कल्याण आणि इतर अनेक योजनांचे लाभार्थी आहेत. त्यांनी सांगितले की त्यांना जलजीवन मिशन, एक राष्ट्र एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना आणि वीज जोडणी यांसारख्या अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. वन नेशन वन रेशन कार्डमुळे बिहारमधून स्थलांतर करूनही त्यांना कोणतीही अडचण येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्नाटकातील कलबुर्गी येथील आयुष्मान भारतच्या लाभार्थी संतोषी यांनी या योजनेबाबतचा आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की आरोग्य आणि निरामयता केंद्र आणि मोफत तपासणी आणि औषधे यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडत आहेत. त्यांच्या उत्तम संवाद कौशल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आणि तिने निवडणूक लढवावी कारण ती खूप लोकप्रिय होणार आहे असे गंमतीत म्हणाले.
गुजरातमधील मेहसाणा इथले प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे लाभार्थी अरविंद यांना पंतप्रधानांशी बोलताना खूप आनंद झाला. त्यांनी सांगितले की या योजनेमुळे त्यांच्या मंडप सजावट व्यवसायाचा विस्तार झाला आहे आणि ते डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहेत. आपल्या कर्मचार्यांना सरकारी योजनेबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि रोजगार निर्माण करणारे बनल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी त्यांच्या मुलीला खेळातले तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वादही दिले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी, सिरमौर हिमाचल प्रदेश येथील समा देवी उपस्थित होत्या, ज्या प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुष्मान योजना, मुख्यमंत्री गृहिणी सुविधा योजनेच्या लाभार्थी आहेत. पंतप्रधानांनी शेतीतील तिची परिस्थिती आणि तिथल्या कामांबद्दल माहिती विचारली.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी या महत्त्वपूर्ण प्रसंगी हिमाचलमध्ये उपस्थित राहताना आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जाहीर करता आले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत आर्थिक लाभ देशभरातील शेतकऱ्यांना शिमला येथून जारी करताना आनंद झाल्याचे ते म्हणाले. 130 कोटी नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोरोना महासाथीत ज्या मुलांनी आपले आईवडील गमावले आहेत, त्यांची जबाबदारी पीएम केअर्सच्या माध्यमातून घेण्याच्या उपक्रमाबद्दलही पंतप्रधानांनी काल समाधान व्यक्त केले. मोदी म्हणाले की 8 वर्षाचा कार्यकाल साजरा करण्याच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशात असावे, ही सूचना मी त्वरित मान्य केली कारण हे राज्य माझी कर्मभूमी आहे. पंतप्रधान म्हणाले की मी नेहमीच स्वतःला पंतप्रधान नव्हे तर 130 कोटी नागरिकांच्या कुटुंबातील सदस्य समजतो. केवळ मी एखाद्या फाईलवर स्वाक्षरी करतो तेव्हाच मी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारतो. तो क्षण एकदा संपला की मी पुन्हा पंतप्रधान रहातच नाही तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य बनतो आणि 130 कोटी देशवासियांचा प्रधानसेवक होतो. मी जर देशासाठी काही करू शकत असेल तर ते केवळ 130 कोटी देशवासियांचा आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळेच, असे म्हणाले. पुढे ते भावनावश होऊन म्हणाले की, माझ्या कुटुंबातील 130 कोटी नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांशी जोडला जाणे, हे कुटुंबचे हेच ते काय माझ्याकडे आहे, तुम्ही लोकच माझ्यासाठी जीवनात सर्वकाही आहात आणि हे आयुष्य तुम्हालाच समर्पित आहे. पंतप्रधान म्हणाले की. सरकार 8 वर्षे पूर्ण करत असताना त्यांनी आपण प्रत्येकाच्या कल्याणासाठी, प्रत्येक भारतीयाच्या सन्मानालसाठी, प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी, आणि प्रत्येक भारतीयाच्या भरभराटीसाठी शक्य तितके करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरूच्चार केला, ज्यामुळे त्यांना आनंदी आणि शांतता लाभेल.
2014 च्या अगोदरच्या सरकारचा भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग आहे, अशी समजूत होती आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्य़ाच्या ऐवजी सरकार त्याला शरण गेले, त्यानंतर देशाने पाहिले की योजनांचा पैसा गरजूंपर्यंत पोहचण्याआधी तो लुटला जात होता, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. जनधन, आधार आणि मोबाईल (जेएएम) या त्रिसूत्रीमुळे पैसा लाभार्थींच्या खात्यांमध्ये थेट जमा होत आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. पूर्वी स्वयंपाकघरात धुराच्या त्रासाची सक्ती होती, आज उज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर्स मिळवण्याची सुविधा आहे. पूर्वी उघड्यावर शौचाला जाण्याचे लज्जास्पद कृत्य नशिबी होते. आता गरीबांना शौचालयांची प्रतिष्ठा लाभली आहे. पूर्वी आजारावरील उपचारांसाठी पैसा जमा करण्याची असहाय्यता होती, आज प्रत्येक गरीबाला आयुषमान भारत योजनेचा आधार आहे. पूर्वी तिहेरी तलाकची भीती होती, आज आपल्या हक्कासाठी लढण्याचे धैर्य आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की, कल्याणकारी योजना, सुशासन आणि गरीबांचे कल्याण (सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण) यांनी लोकांसाठी सरकारचा अर्थ बदलून टाकला आहे. आता सरकार लोकांसाठी काम करत आहे. मग ती पंतप्रधान गृहनिर्माण योजना असो, शिष्यवृत्ती असो की निवृत्तीवेतन योजना असो, भ्रष्टाचाराची संधी किमान मर्यादित झाली आहे. पूर्वी ज्या समस्या कायमस्वरूपी म्हणून गृहित धरल्या जात होत्या, त्यावर सरकार कायमस्वरूपी तोडगा देण्याचा प्रयत्न करत आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे लाभार्थीच्या यादीतून 9 कोटी नावे वगळून चोरी आणि गळतीचा अन्याय संपुष्टात आणला आहे.
पंतप्रधान म्हणाले की, गरीबाला तो सक्षम झाल्यामुळे त्याचा दैनंदिन आयुष्यातील संघर्ष संपतो, तेव्हा तो आपली गरीबी दूर करण्यासाठी नव्या उर्जेसह कामाला लागतो. या विचारासह आमच्या सरकारने पहिल्या दिवसापासूनच गरीबाला सक्षम करण्यास सुरूवात केली. त्याच्या जीवनातील प्रत्येक लहान काळजीची गोष्ट आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आमच्या कोणत्या न कोणत्या योजनेमुळे देशातील बहुतेक सर्व कुटुबांना लाभ होत आहे.
सशस्त्र दलांमध्ये हिमाचलच्या प्रत्येक कुटुंबाचे योगदान नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, वन रँक वन पेन्शन ही योजना चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर आमच्या सरकारने राबवली आणि माजी सैनिकांना थकबाकी दिली. त्यामुळे हिमाचलमधील प्रत्येक कुटुंबाला लाभ झाला आहे. आमच्या देशात कित्येक दशकांपासून व्होट बँक राजकारण चालत आले आहे आणि त्याने देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आम्ही नवीन भारत उभारण्यासाठी काम करत आहोत, व्होटबँक नव्हे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की शंभर टक्के लाभ शंभर टक्के लाभार्थींकडे पोहचावेत, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. लाभार्थींच्या परिपूर्णतेपर्यत पोहचण्याची आम्ही प्रतिज्ञा केली आहे. शंभर टक्के सक्षमीकरण याचा अर्थ पक्षपात संपवणे, शिफारशींचा अडथळा दूर करणे आणि लांगूलचालन संपवणे हा आहे. शंभर टक्के सक्षमीकरण याचा अर्थ, प्रत्येक गरीबाला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळणे असाही आहे.
देशाच्या वाढत्या प्रतिष्ठेवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत सक्तीमुळे कुणापुढेही मैत्रीचा हात पुढे करत नाही तर मदतीचा हात देतो. कोरोना काळातही, आम्ही औषधे आणि 150 देशांना लसी पुरवल्या.
पुढील पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच एकवीसाव्या शतकात उज्वल भारत निर्माण करण्यासाठी काम करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी जोर दिला. असा भारत की ज्याची ओळख ही वंचितपणा नाही तर आधुनिकता आहे. आमच्या क्षमतेपुढे कोणतेही उद्दिष्ट अशक्य नाही. पंतप्रधान पुढे म्हणाले की भारत आज जगातील सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात आज विक्रमी संख्येने परकीय चलन येत आहे आणि निर्यातीत भारत विक्रम प्रस्थापित करत आहे. देशाच्या प्रगतीत आम्ही पुढे येऊन आमची भूमिका बजावावी, असे त्यांनी शेवटी आवाहन केले.
***
Jaydevi PS/S.Tupe/S.Kane/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829762)
Visitor Counter : 333
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam