पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधील गांधीनगर इथे 'सहकार ते समृद्धी' या कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 28 MAY 2022 9:57PM by PIB Mumbai

 

भारत माता की जय, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अमितभाई शाह, मनसुखभाई मांडविया, माझे संसदेतील सहकारी सी आर पाटील, गुजरात सरकारमधील मंत्री जगदीशभाई विश्वकर्मा, खासदार, आमदार, गुजरात सरकारचे सर्व मंत्री, सहकार चळवळीशी संबंधित सर्व ज्येष्ठ मान्यवर! यासोबतच एक मोठा कार्यक्रम इफकोच्या प्रांगणातही सुरू आहे. इथे उपस्थित इफकोचे अध्यक्ष दिलीपभाई, इफकोचे सर्व सहकारी, आज देशभरातील लाखो ठिकाणी सर्व शेतकरी गुजरातमधील गांधीनगर इथल्या महात्मा मंदिराशी जोडले गेले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांनाही मी नमस्कार करतो माझा. आपण आज इथे सहकारातून समृद्धीची चर्चा करत आहोत. गावाच्या आत्मनिर्भरतेसाठी सहकार हे एक उत्तम माध्यम आहे आणि त्यात स्वावलंबी भारताची ऊर्जा आहे. स्वावलंबी भारत घडवण्यासाठी गाव स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच पूज्य बापूंनी  आणि सरदार साहेबांनी दाखवलेल्या मार्गानुसार आज आपण आदर्श सहकारी गावाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. गुजरातमध्येही अशी सहा गावे निवडली आहेत, जिथे पूर्णत: सहकाराची व्यवस्था लागू केली जाईल.

 

मित्रांनो,

देशाच्या पहिल्या नॅनो युरिया प्रकल्पाचे आज आत्मनिर्भर शेतीसाठी लोकार्पण करताना, मला विशेष आनंद होत आहे, हे मी अगदी मनापासून सांगतो. जरा कल्पना करा जेव्हा आज शेतकरी युरिया आणायला जात आहे. फक्त ते दृश्य तुमच्या मनात आणा आणि जे घडणार आहे ते मी वर्णन करू शकेन, फक्त ते तुमच्या मनात आणा. आता युरियाच्या एका गोणीची ताकद आहे. म्हणजेच युरियाच्या एका गोणीची शक्ती बाटलीत सामावली आहे. म्हणजेच नॅनो युरियाची अर्धा लिटर बाटली शेतकऱ्याची एक गोणी युरियाची गरज भागवेल. किती तरी कमी होईल, वाहतुकीचा खर्च, इतर सर्व बाबींचा खर्च. आणि कल्पना करा लहान शेतकऱ्यांसाठी हा किती मोठा आधार आहे.

 

मित्रांनो,

कलोलमध्ये उभारलेल्या या आधुनिक प्रकल्पात दीड लाख बाटल्यांच्या उत्पादनाची क्षमता आहे. मात्र येत्या काळात देशात असे आणखी 8 प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामुळे युरियावरील विदेशी अवलंबित्व कमी होईल, देशाचा पैसा वाचेल. मला आशा आहे की हा नवोपक्रम फक्त नॅनो युरियापुरता मर्यादित राहणार नाही. मला विश्वास आहे की भविष्यात इतर नॅनो खते देखील आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतील. आमचे शास्त्रज्ञ आज त्यावरही काम करत आहेत.

 

मित्रांनो,

खतांच्या या नॅनो तंत्रज्ञानामध्ये आपण आत्मनिर्भरतेकडे टाकलेले पाऊल किती महत्त्वाचे आहे, हे प्रत्येक देशवासीयाने समजून घ्यावे असे मला वाटते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खते वापरणारा देश आहे पण उत्पादनाच्या बाबतीत आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. त्यात 7-8 वर्षांपूर्वीपर्यंत बहुतांश युरीया आमच्या शेतात जाण्याऐवजी काळ्या बाजाराला बळी पडत असे आणि शेतकऱ्यांना आपल्या गरजेसाठी लाठ्या खाव्या लागत असे. आमच्या येथे असलेले युरियाचे मोठे कारखानेही नवीन तंत्रज्ञाना अभावी बंद पडले होते आणि त्यामुळे 2014 मध्ये सरकार आल्यावर आम्ही युरीयाच्या 100 टक्के नीमवेष्टनासाठी पुढाकार घेतला. ते केले. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना पुरेसा युरिया उपलब्ध झाला. यासोबतच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि तेलंगणामधील बंद पडलेले 5 खत कारखाने पुन्हा सुरू करण्याचे काम आम्ही सुरू केले. त्यात उत्तर प्रदेश आणि तेलंगणाचे कारखाने सुरू झाले आहेत, उत्पादन सुरू आहे. आणि इतर सर्व काही लवकरच कार्यरत होईल.

 

मित्रांनो,

भारत आपली खतांची गरज भागवण्यासाठी अनेक दशकांपासून परदेशांवर अवलंबून आहे, आपण आयात करतो. आपण आपल्या गरजेच्या जवळपास एक चतुर्थांश आयात करतो, परंतु पोटॅश आणि फॉस्फेटच्या बाबतीत, आपल्याला जवळपास 100% परदेशातून आयात करावे लागते. गेल्या 2 वर्षात कोरोना टाळेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती खूप वाढल्या आहेत. ते कमी होते म्हणून की काय युद्ध सुरु झाले. युद्धाच्या परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत खताची उपलब्धता मर्यादित झाली आणि किंमती अनेक पटींनी वाढल्या.

 

मित्रांनो,

शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलेल्या आपल्या सरकारने ठरवले की, भले आंतरराष्ट्रीय परिस्थिती चिंताजनक आहे, भाव वाढत आहेत, खते मिळवण्यासाठी जगभर धाव घ्यावी लागतेय. अडथळे आहेत, अडचणी आहेत. पण आम्ही प्रयत्न केलेत की आम्ही हे सर्व त्रास सोसू. मात्र त्याचा शेतकऱ्यावर परिणाम होऊ देणार नाही. आणि त्यामुळेच अनेक अडचणी असतानाही आम्ही देशात खताचे कोणतेही मोठे संकट येऊ दिले नाही.

 

मित्रांनो,

भारत परदेशातून युरिया आयात करतो, त्यातील युरियाच्या 50 किलोच्या बॅगची किंमत 3500 रुपये आहे. तीन हजार पाचशे रुपयांची बॅग, लक्षात ठेवा. मात्र हीच युरियाची बॅग 3500 ला विकत घेऊन देशातील खेड्यापाड्यात शेतकऱ्याला केवळ 300 रुपये, तीनशे रुपयांना दिली जाते. म्हणजेच युरियाच्या एका पोत्यावर आपले सरकार 3200 रुपयांपेक्षाचा जास्त भार उचलत आहे. तसेच 50 किलोच्या डीएपीच्या पिशव्यांवर पूर्वीची सरकारे, एका पिशवीवर त्यांना 500 रुपये भार उचलावा लागत असे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डीएपीच्या किमतीत वाढ होऊनही आमचे सरकार शेतकऱ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आता आमचे सरकार 50 किलोच्या डीएपीच्या पिशव्यांवर 2500 रुपये भार उचलत आहे. म्हणजेच 12 महिन्यांत केंद्र सरकारने प्रत्येक डीएपीच्या पिशवीवर 5 पट भार उचलला आहे. भारतातील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी खतांमध्ये 1 लाख 60 हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. शेतकऱ्यांना यंदा 2 लाख कोटी रुपयांहून अधिकचा दिलासा मिळणार आहे.

 

मित्रांनो,

देशातील शेतकऱ्याच्या हितासाठी आवश्यक असेल ते आम्ही करू आणि देशाच्या शेतकऱ्याची शक्ती वाढवत राहू. पण एकविसाव्या शतकात आपण आपल्या शेतकऱ्यांना केवळ विदेशी परिस्थितीवर अवलंबून ठेवू शकतो का याचाही विचार करायला हवा. केंद्र सरकार दरवर्षी जे लाखो कोटी रुपये खर्च करत आहे, ते परदेशात का जावेत? याचा भारतातील शेतकर्‍यांना उपयोग होऊ नये का? महागड्या खतांमुळे होणारा शेतकऱ्यांचा वाढता खर्च कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधायला नको का?

 

मित्रांनो,

हे असे प्रश्न आहेत जे भूतकाळातील प्रत्येक सरकारसमोर होते. असे नाही की सर्व प्रश्न माझ्यापुढेच उभी ठाकले आहेत. पण पूर्वी फक्त समस्येवर तात्कालिक उपाय केला जात होता, तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी फार मर्यादित प्रयत्न केले जात होते. गेल्या 8 वर्षांत आम्ही तात्कालिक उपायही केले आणि समस्यांवर कायमस्वरूपी उपायही शोधले आहेत. भविष्यात कोरोना महामारीसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. खाद्यतेलाची समस्या कमी करण्यासाठी मिशन ऑइल पामवर काम सुरू आहे. कच्च्या तेलावरील परदेशी अवलंबित्व कमी करण्यासाठी जैवइंधन, ग्रीन हायड्रोजन आणि इतर उपायांवर आज मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. नॅनो तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक हा देखील याच दृष्टिकोनाचा परिणाम आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन देण्यासाठी देशात सुरू असलेली मोहीम हाही कायमस्वरूपी उपायाचा भाग आहे. आणि मी विशेषतः गुजरातच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. गुजरातचा शेतकरी पुरोगामी आहे, तो अल्पभूधारक शेतकरी असला तरी त्याच्याकडे धाडसी स्वभाव आहे आणि ज्या पद्धतीने मला गुजरातमधून बातम्या मिळत आहेत, गुजरातचा छोटा शेतकरीही नैसर्गिक शेतीकडे वळू लागला आहे. गुजरातमधील लाखो शेतकरी नैसर्गिक शेतीच्या मार्गावर मार्गस्थ झाले आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि या उपक्रमासाठी मी त्यांना प्रणाम करतो.

 

मित्रांनो,

आत्मनिर्भरतेतच भारताच्या अनेक अडचणींचे उपाय आहेत. आणि आत्मनिर्भरतेचे एक उत्तम रूप, सहकार देखील आहे. गुजरातमध्ये आम्ही हे मोठ्या यशासह अनुभवले आहे आणि तुम्ही सर्व मित्र या यशाचे सेनानी आहात. गुजरातच्या सहकार क्षेत्राशी निगडित सर्व महारथी इथे बसले आहेत. मी सगळ्यांचे चेहरे बघत होतो. आज सहकार क्षेत्रात गुजरातचा विकास प्रवास पुढे नेणारे सर्व जुने मित्र. असे एकापेक्षा एक दिग्गज माझ्यासमोर बसले आहेत. ज्या तपस्येने तुम्ही हे काम पुढे नेत आहात, सहकाराच्या भावनेसह पुढे नेत आहात त्याचा आनंद आहे.

 

मित्रांनो,

पूज्य बापू आणि सरदार साहेबांचे नेतृत्व आम्हाला लाभले म्हणूनही गुजरात सौभाग्यशाली आहे. पूज्य बापूंनी दाखविलेला सहकारातून स्वाबलंबनाचा मार्ग वास्तवात साकारण्याचे काम सरदार साहेबांनी केले. अमितभाईंनी उल्लेख केल्या प्रमाणे सहकाराचा विषय येतो तेव्हा व्यंकटभाई मेहता यांची आठवण येणे साहजिक आहे. आजही भारत सरकार त्यांच्या नावाने एक मोठी संस्था चालवते. पण त्याचाही हळूहळू विसर पडला होता. यावेळी अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करून ते अधिक सक्षम करण्याचे काम सुरू केले आहे. एवढेच नाही तर येथे गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था असून, त्याचा पहिला प्रयोग येथे झाला आहे. आमच्या पालरेडीत प्रीतमनगर आहे, ते प्रीतमनगर हे त्याचेच उदाहरण आहे. देशातील पहिल्या सहकारी गृहनिर्माण योजनेचे ते जिवंत उदाहरण आहे.

 

मित्रांनो,

अमूलने सहकार क्षेत्रात ठसा उमटवला. अमूल सारख्या नाममुद्रेने (ब्रँडने) गुजरातच्या सहकार चळवळीची ताकद जगासमोर आणली आहे, ओळख निर्माण केली आहे. गुजरातमधील दुग्धव्यवसाय, साखर आणि बँकिंग सहकारी चळवळ ही या यशाची उदाहरणे आहेत. गेल्या काही वर्षांत तर फळे आणि भाजीपाला यासह अन्य क्षेत्रात सहकार्याची व्याप्ती वाढली आहे.

 

बंधू आणि भगीनींनो,

देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याबाबत सहकाराच्या यशस्वी प्रयोगांचे खूप मोठे प्रारुप आपल्यासमोर आहे. डेअरी क्षेत्राच्या सहकारी प्रारुपाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. भारत आज जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. यात गुजरातचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, दुग्धव्यवसाय झपाट्याने वाढत आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतही अधिक योगदान देत आहे. भारतात आज वर्षाकाठी सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे दूध उत्पादन होते. 8 लाख कोटी रुपयांचे दूध. मुख्यतः हा व्यवसाय आपल्या माता-भगिनी सांभाळतात. त्याची दुसरी बाजू बघा, गहू आणि धानाचा बाजार एकत्र केला तरी तो दुधाच्या उत्पादनापेक्षा कमी आहे. म्हणजेच जर दुधाचा व्यवसाय 8 लाख कोटी असेल तर एकूण गहू आणि धानाचा त्यापेक्षा कमी आहे. आपल्या देशाने दूध उत्पादनात किती शक्ती निर्माण केली आहे ते तुम्ही बघा. त्याचप्रमाणे पशुसंवर्धनाच्या संपूर्ण क्षेत्रावर नजर टाकली तर ती साडेनऊ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतातील लहान शेतकरी, भूमिहीन, मजूर यांच्यासाठी हा मोठा आधार आहे.

मित्रांनो,

गेल्या काही दशकांमध्ये गुजराथेतील गावांमध्ये अधिक समृद्धी दिसते याचे एक मुख्य कारण या दुग्धउत्पादन क्षेत्रातील सहकारी संस्था आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आम्ही जेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टींची आठवण करून देतो तेव्हा काहीजणांना वाटते की आम्ही कोणावर तरी टीका करत आहोत. टीका करत नाही पण कधी कधी या गोष्टींची आठवण यासाठी करून द्यावी लागते ही आधी काय परिस्थिती होती त्याचा अंदाज यावा. आपल्या देशात आपल्या गुजराथेत, कच्छ सौराष्ट्र येथे दुग्ध्यवसाय उभारणे, डेअरी उद्योगाचे निर्माण याला जणू काही बंधन घालण्याचीच तजवीज केली होती. एक प्रकारे ही बेकायदेशीर गोष्ट म्हणूनच ठरवले गेल्यासारखे होते.

ज्यावेळी मी इथे होतो तेव्हा म्हटलं की बंधूंनो, या अमूलचा विकास होत आहे तर कच्छ डेअरीसुद्धा आपला विकास करू शकते. अमरेलीचा दुग्धव्यवसायही वाढू शकतो. आपण ते थांबवून का ठेवले आहे? आणि आज गुजरातमध्ये चारही दिशांना दुग्धउत्पादन उद्योग समर्थपणे उभा आहे. गुजरातमध्येही दुधावर आधारित उद्योगांचा व्यापक प्रसार यामुळे झाला की सरकारने कमीत कमी बंधने घातली. सरकार जेवढे शक्य तेवढे लांब राहिले आणि सहकारी क्षेत्राला सुफळ संपूर्ण होण्याचे होण्याचे पुरेपूर स्वातंत्र्य दिले गेले. सरकारने इथे केवळ एका मदतनिसाची भूमिका बजावली. काम आपल्यासारखे आमच्या सहकारी क्षेत्राशी संबंधित असलेले आमचे साथीदार करत आहेत. आमचे शेतकरी बंधू भगिनी करत आहेत. दूध उत्पादक आणि दूध व्यवसाय करणारी खाजगी आणि सहकारी दोन्ही क्षेत्रे एकमेकांशी संलग्न आहेत आणि त्यांनी उत्कृष्ट पुरवठा व मूल्य साखळी तयार केली आहे.

 

मित्रांनो,

डेअरी क्षेत्रातील सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे आमचे लहान शेतकरी, आणि मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या माता भगिनी हे काम सांभाळतात. गुजरातमध्ये 70 लाख भगिनी आज या चळवळीच्या भागीदार आहेत, म्हणजे पन्नास लाखाहून जास्त कुटुंबे असणार हे नक्की. आमच्या माता-भगिनी साडेपाच हजारांहून जास्त दूध सहकारी सोसायट्या गुजराथमध्ये चालवत आहेत. अमूल सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड मोठा करण्यात सुद्धा गुजरातमधील आमच्या भगिनींनी मुख्य भूमिका बजावली आहे. एका प्रकारे सहकारी चळवळीने गुजरातमध्ये महिला उद्योगीकरणाला नवीन आयाम दिला आहे. आपल्याला लिज्जत पापड माहिती असतोच. आदिवासी क्षेत्रातील गरीब माता भगिनींकरवी सुरू केलेले हे काम आज बहुराष्ट्रीय ब्रँड बनले आहे. जगभरा़त जिथे कुठे भारतीय गेले आहेत तिथे लिज्जत पापड सुद्धा पोचला आहे. आणि पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की इतक्या वर्षांपासून लिज्जत पापडचे काम वाढतच आहे. एवढे वाढले आहे तरीसुद्धा आणि त्याची दखल घेतली गेली नाही. आम्ही गेल्या वेळेस या लिज्जत पापड ची सुरुवात करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार दिला, आता तर त्यांचे वय नव्वदी ओलांडून गेले आहे. त्या गुजराती आहेत मुंबईत राहतात, तरीही त्या माताजी आल्या त्यांनी खूप आशीर्वाद दिले. म्हणजेच आपले सहकारितेचे स्पिरिट आणि आमच्या माता भगिनींचे कौशल्य यातून अमुल ब्रांड आकाराला येऊ शकतो. तसेच लिज्जत सुद्धा एक ब्रँड बनला आहे. आमच्या भगिनी आणि लेकींचे व्यवस्थापकीय कौशल्य बघायचे असेल तर ते आपल्याला सहकारी संस्थांमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

 

मित्रांनो,

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, और सबका प्रयास या मंत्रानुसार आम्ही चाललो आहोत. हा मंत्र सहकार क्षेत्राचा आत्मा आहे. हा मंत्र सहकारक्षेत्राच्या कक्षेत येतो म्हणूनच सहकार्याच्या उत्साहाला स्वातंत्र्याचा अमृतकाळ या उत्सवाशी जोडण्यासाठी आम्ही निरंतर पुढे जात आहोत. याच उद्देशाने आम्ही केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू केले. देशात सहकारी चळवळीवर आधारित आर्थिक मॉडेल विकसित व्हावे यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी एकापेक्षा एक नवनवीन पावले टाकली जात आहेत. सहकारी समित्यांना, संस्थांना बाजारपेठेत स्पर्धात्मक संस्था म्हणून तयार करता यावे. बाजारपेठेतल्या इतर संस्थांसोबत त्यांना लेवल प्लेईंग फील्ड उपलब्ध करून देता यावे यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या काही वर्षात आम्ही सहकारी सोसायटींना लागू असणारा कर कमी करून त्यांना दिलासा दिला आहे. अमितभाईनी अगदी कमी शब्दात याचे वर्णन केले, पण आम्ही यासाठी भरपूर पावले उचलली. अधिभाराची गोष्ट त्यांनी सांगितली आणि आधी तर याबाबत तक्रार केली जायची. यामध्ये सुधारणा करत आम्ही सहकारी समित्यांना किसान उत्पादक संघा च्या पातळीला नेले आहे त्यामुळे सहकारी समित्यांना वाढीसाठी खूप सहाय्य मिळेल.

 

मित्रांनो,

एवढेच नाही तर सहकारी समित्यांना, सहकारी बँकांना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्याचेही भरपूर प्रयत्न सुरू आहेत. गुजराथमध्ये या दृष्टीने प्रशंसनीय काम केले जात आहे. एवढेच नाही तर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अमित भाईंनी थोडे वर्णन केले त्यानुसार सहकारी क्षेत्रात आयकर लागत होता आणि मी भारत सरकारला पत्र लिहीत राहायचो आणि भारत सरकारमध्ये सहकारी चळवळीशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती हे खाते सांभाळत होती तरीही त्यांनी गुजराथचे सांगणे ऐकले नाही. देशातील सहकारीतेच्या क्षेत्रातील लोकांचे म्हणणे ऐकले नाही. आता आम्ही या समस्येवर तोडगा काढला आहे.

 

मित्रांनो,

मला कळले की जिल्हा सहकारी बँकेने साधारणपणे 8 लाख शेतकऱ्यांना रूपे किसान कार्ड दिले आहे. शेतकऱ्यांना आज इतर बँकांसारख्या ऑनलाईन बँकिंग सुविधाही मिळत आहेत. जेव्हा देशातील जसे आता अमितभाईंनी सांगितले तसे 63 हजार प्राथमिक कृषी क्रेडीट संस्था PACSचे संगणकीकरण केले जाईल. संगणकीकरण होईल तेव्हा आपल्या सहकारी संस्थांची प्रतिमा पूर्णपणे बदलून जाणार आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना खूप लाभ मिळतील कारण या सोसायटीतील बहुतेक सदस्य शेतकरी आहेत. मला अजून एका गोष्टीचा आनंद आहे, मला नुकतेच असे समजले आहे की आता सहकारी क्षेत्राशी संलग्न अनेकजण भारत सरकारच्या GEM पोर्टल आहे त्या माध्यमातून काहीही खरेदी करायची असेल तर त्या पोर्टलच्या माध्यमातून करतात. त्यामुळे एक प्रकारची पारदर्शकता राखली जाते, व्यवहारांचा वेग वाढला आहे आणि कमी खर्चात गरजा पुर्ण होतात. भारतसरकारच्या GEM पोर्टलला सहकारी क्षेत्रातील लोकांनी स्वीकारले आहे यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

 

मित्रांनो,

सहकाराची सर्वात मोठी ताकद म्हणजे विश्वास, सहयोग. या सर्वांच्या सामर्थ्याने सहकाराचे सामर्थ्य वाढवायचे आहे. हीच स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारताच्या यशाची खात्री आहे. आमच्याकडे ज्यांना लहान म्हणून कमी लेखले जाते त्यांना मोठी ताकद म्हणून तयार करण्यासाठी या अमृतकाळात आम्ही काम करत आहोत. याप्रकारे लघुउद्योगांना भारताच्या आत्मनिर्भर पुरवठासाखळीचा महत्त्वाचा भाग बनवले जात आहे. आपले छोटे दुकानदार, व्यापारी यांनाही डिजिटल तंत्रज्ञानाचा मंच म्हणजे ओएनडीसी open network for digital commerce हा डिजिटल तंत्रज्ञानाचा मंच उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे डिजिटल स्पेसमध्ये उत्तम स्पर्धेला प्रोत्साहन मिळेल. देशातील छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनाही समान संधी मिळेल भारताच्या ई-कॉमर्स बाजारपेठेच्या शक्यतांना बळ देईल. ज्यामुळे गुजरातच्या छोट्या व्यापाऱ्यांना निश्चितच फायदा होईल.

 

 

मित्रांनो,

गुजरात व्यापार व्यवसायाच्या परंपरेशी जोडले गेलेले राज्य आहे. कठीण काळातही व्यापारी कसा उत्तम प्रकारे व्यापार सांभाळतो ते चांगल्या व्यापाऱ्याला जोखण्याचे साधन आहे. सगळ्या आव्हानांना तोंड देत समस्येवर तोडगा कसा काढायचा त्यासाठी नवीन नवीन कोणते उपाय योजायचे ही सरकारची सुद्धा परीक्षा असते. आपल्याला गेल्या काही वर्षात दिसत असलेल्या सुधारणा या संकटाला संधीत बदलण्याचे आमचे प्रयत्न आहेत. सहकाराचे आमचे स्पिरिट आम्हाला आमचे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी मदत करेल आणि आत्ताच भूपेंद्रभाई यांनी आपल्या भाषणात एक महत्वाचे वाक्य सांगितले ते म्हणजे असहकार हे स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य चळवळीचे एक शस्त्र होते. स्वातंत्र्यानंतर सहकार हे समृद्धीचे एक शस्त्र बनले आहे. असहकारापासून सहकारापर्यंतचा हा प्रवास म्हणजे समृद्धीची शिखरे पार करणारा सबका साथ सबका विकास या हा मंत्र प्रत्यक्षात आणणारा आमचा मार्ग आहे. या मार्गावर आम्ही आत्मविश्वासाने पावले टाकू. देशभरातील लोकांनाही या पवित्र कार्याशी आम्ही सोडून घेऊ.  या गुजराथच्या सहकारी चळवळीचा विस्तार हिंदुस्तानमधील इतर क्षेत्रात जेवढा जास्त होईल तेवढा त्या क्षेत्रातील लोकांच्या कल्याणासाठी कामाला येईल. गुजराथ सरकारचा मी खूप आभारी आहे की मला आज सहकारी क्षेत्रातील या दिग्गजांना भेटण्याची संधी मिळाली.  मी जेव्हा गुजराथेत होतो तेव्हा त्यांना आपल्या तक्रारी घेऊन यावे लागत होते. पण आज ते आपले रिपोर्ट कार्ड घेऊन येतात. तर अगदी कमी काळात आम्ही तिथून इथे येऊन पोहोचलो. आम्ही आमच्या सोसायटींनाही इथपर्यंत आणले. आम्ही आमच्या संस्थांना येथवर आणले. आधी आमचा टर्नओव्हर एवढा होता आता आमचा टर्नओव्हर इतका आहे. छोट्या छोट्या सोसायट्यांचे लोक मोठ्या अभिमानाने भेटतात आणि म्हणतात आम्ही तर साहेब, सर्व कॉम्प्युटरवर चालवतो साहेब आमच्या इथे सर्व ऑनलाईन होत आहे. गुजरातच्या सहकारी क्षेत्रात हा जो बदल  बघायला मिळतो तो अभिमानास्पद आहे. मी आज आपल्या या तपस्येला प्रणाम करतो. या महान परंपरेला प्रणाम करतो आणि स्वातंत्र्याची जी 75 वर्षे साजरी करत आहेत तेव्हा त्याचे बीज रोवले गेले ते आज वटवृक्ष म्हणून गुजराच्या सार्वजनिक जीवनात रचनात्मक प्रभुत्वाच्या आर्थिक व्यवस्थेचा आधार म्हणून सहकारी प्रभुत्वाच्या रूपात वाढत आहे. मी स्वतः या आनंदीत करणाऱ्या विषयात प्रसन्नपणे सर्वांना प्रणाम करत आपल्याला मनापासून धन्यवाद देत माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो. माझ्यासोबत उच्चरवाने म्हणा, भारत माता की जय भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद.

***

G.Chippalkatti/V.Ghode/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829208) Visitor Counter : 191