पंतप्रधान कार्यालय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 17 MAY 2022 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2022

नमस्कार, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, देवसिंग चौहान जी, डॉक्टर एल मुरुगन जी, दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्राशी संबंधित सर्व महत्त्वाच्या व्यक्ती आणि स्त्री पुरुष हो!

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पणाच्या खुप खुप शुभेच्छा. आज आपल्या संस्थेने 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्याच वेळेला देश स्वातंत्र्याच्या अमृत काळात पुढील पंचवीस वर्षाच्या नियोजनावर काम करत आहे, नवनवीन लक्ष्य ठरवत आहे हा एक सुखद योगायोग आहे. थोड्या वेळापूर्वी मला देशातील स्वनिर्मित 5G टेस्टबेड देशाला समर्पित करण्याची संधी लाभली. हे दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाचे आणि आधुनिक तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. मी या प्रकल्पाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना  , आमच्या भारतीय तंत्रशिक्षण संस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर देशातील तरुण साथीदार संशोधक आणि कंपन्या यांना आमंत्रण देतो की ते या टेस्टिंग सुविधेचा  उपयोग तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी त्यांनी करावा. खासकरून आमच्या स्टार्ट अप्सना आपले उत्पादन परीक्षण करून घेण्यासाठीची महत्त्वाची संधी आहे . केवळ एवढेच नाही तर भारताचे स्वतःचे  5G मानक तयार केले आहे ती आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. देशातील गावागावांमध्ये 5G तंत्रज्ञान पोचवण्यात आणि त्या कामात हे मोठी भूमिका निभावेल.

मित्रहो,

एकविसाव्या शतकातील भारतात कनेक्टिव्हिटी , देशातील प्रगतीचा वेग निर्धारित करेल. म्हणूनच प्रत्येक स्तरावर कनेक्टिव्हिटीला आधुनिक करायला हवे. आणि आधुनिक मूलभूत सुविधांची निर्मिती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर याच्या पायाभरणीचे काम करेल. देशाच्या प्रशासनात जीवन सुलभता, व्यवसाय सुलभता अशा अनेक बाबींमध्ये सकारात्मक बदल 5G तंत्रज्ञान घेऊन येणार आहे. यामुळे शेती , आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रातील विकासाला बळ मिळेल. यामुळे सोयी वाढतील आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. 5G मुळे येत्या दीड दशकांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत 450  अब्ज डॉलर्सची भर पडेल असा अंदाज आहे. म्हणजेच यामुळे फक्त इंटरनेटचा वेगच नाही तर प्रगती आणि रोजगार निर्मितीचा वेगही वाढणार आहे.

म्हणूनच 5G वेगाने वापरात यावे म्हणून सरकार आणि औद्योगिक क्षेत्र दोन्हीच्या एकत्रित प्रयत्नांची जोड मिळणे आवश्यक आहे. या दशकाच्या शेवटपर्यंत आपण 6G सेवा सुद्धा आणू शकू त्यासाठी आपले  कृतीदल काम करत आहे.

मित्रहो,

दूरसंचार क्षेत्र आणि 5G तंत्रज्ञानामध्ये  आमचे स्टार्टअप्स वेगाने तयार व्हावेत असे आमचे प्रयत्न आहेत. त्यांना ग्लोबल चॅम्पियन बनता यावे. अनेक क्षेत्रात जगातील सर्वात मोठे डिझाईन पावर हाऊस आपण आहोत. दूरसंचार साधनांच्या बाजारपेठेत सुद्धा भारताच्या डिझाईन अग्रणींचे सामर्थ्य आपणा सर्वांनाच माहीत आहे. आता यासाठी आवश्यक असलेल्या संशोधन आणि विकास यासंबंधीच्या मूलभूत सुविधा आणि प्रक्रिया सोप्या करण्यावर आमचा विशेष भर आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांची  मुख्य भूमिका आहे.

मित्रहो,

आत्मनिर्भरता आणि निरोगी स्पर्धा समाजात, अर्थव्यवस्थेत कशा तऱ्हेने परिवर्तन आणू शकते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले दूरसंचार क्षेत्र आहे अस आपण अभिमानाने म्हणू शकतो. आपण जरा जुन्या काळाकडे नजर टाकली तर 2Gचा काळ म्हणजे निराशा, हताशा, भ्रष्टाचार, धोरण लकवा आणि आज त्या कालखंडातून बाहेर पडून देशाने 3G, 4G, 5G आणि 6G पर्यंत वेगाने पावले उचलली आहेत. हा बदल अत्यंत सहज आणि खूप पारदर्शकपणे होत आहे . आणि यात ट्रायची  मुख्य भूमिका आहे. पूर्वलक्षी प्रभावाने होणारी कर आकारणी असो किंवा AGR सारखे मुद्दे जेव्हा जेव्हा उद्योग क्षेत्राच्या समोर आव्हाने आली आहेत तेव्हा आम्ही तेवढ्याच वेगाने त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रयत्नांमुळे एक नवीन विश्वास निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे 2014 च्या आधी एक दशकापेक्षा जास्त काळात जेवढी परदेशी गुंतवणूक दूरसंचार क्षेत्रात आली आहे त्याच्या दीडपट अधिक गेल्या आठ वर्षात आली आहे. भारताच्या क्षमतेवर गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या याच विश्‍वासाला मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.

मित्रहो,

गेली काही वर्षात सरकार ज्याप्रकारे नवीन विचार आणि नव्या या दिशेने पुढे जात काम करत आहे. आपण आज देशातील टेली डेन्सिटी आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात सर्वात वेगाने विस्तारत आहोत. सर्वात मुख्य भूमिका इंटरनेटची आहे. 2014 मध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा सबका साथ सबका विकास आणि त्यासाठी तंत्रज्ञानाच्या व्यापक उपयोगाला प्राधान्य दिले. त्यामुळे देशातील करोडो लोक एकमेकांशी जोडले जावेत, सरकारी सेवांचा त्यांना विनाभ्रष्टाचार लाभ घेता यावा म्हणून जनधन, आधार व मोबाईल या गोष्टींना थेट प्रशासनाचे माध्यम बनवायचे ठरवले. यासाठी सरकारची सर्व माध्यमे मग ते केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व एक प्रकारे सेंद्रिय युनिट म्हणून पुढे गेले पाहिजे. गरिबातील गरीब कुटुंबाला सुद्धा मोबाईल वापरणे शक्य व्हावे म्हणून आम्ही देशातील मोबाईल फोनच्या उत्पादनावर भर दिला. परिणामी मोबाईल उत्पादन युनिटची संख्या आधी दोन होती ती वाढून 200 पेक्षा जास्त झाली. आज भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक आहे. आणि जिथे आपण आपल्या आवश्यकतेसाठी फोन आयात करत होतो तिथे आज आपण मोबाईल फोन निर्यातीचे नवीन उच्चांक गाठत आहोत.

मित्रहो,

मोबाईल कनेक्टीव्हिटी वाढवण्यासाठी आवश्यक होते ते म्हणजे कॉल आणि डेटा महाग असता कामा नये. म्हणूनच दूरसंवाद क्षेत्रात निकोप स्पर्धेला आम्ही प्रोत्साहन दिले. परिणामी आज जगातल्या सर्वात स्वस्त डेटा पुरवणाऱ्यापैकी आपण एक आहोत. देशातल्या प्रत्येक गावापर्यंत ऑप्टीकल फायबरने जोडले जाण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. आपल्याला माहित असेलच की 2014 पूर्वी भारतात शंभर ग्राम पंचायतीसुद्धा ऑप्टीकल फायबरने जोडलेल्या नव्हत्या. आज आपण सुमारे पावणेदोन लाख ग्राम पंचायतीपर्यंत ब्रॉडबॅन्ड कनेक्टीव्हिटी पोहोचवली आहे. देशाच्या नक्षलग्रस्त अनेक आदिवासी जिल्ह्यात 4G कनेक्टीव्हिटी पोहोचवणाऱ्या मोठ्या योजनेलाही सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. 5G आणि 6G तंत्रज्ञानासाठीही हे महत्वाचे आहे त्याच बरोबर मोबाईल आणि इंटरनेट कक्षेचाही यामुळे विस्तार होईल. 

मित्रहो,

फोन आणि इंटरनेट जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचत असल्याने भारतात मोठ्या शक्यतांची दालने उघडली आहेत. देशात एका बळकट डिजिटल पायाभूत सुविधांचा पाया घातला आहे. याने देशात सेवेची मोठी मागणी निर्माण केली आहे. याचे उदाहरण म्हणजे देशाच्या काना कोपऱ्यात निर्माण करण्यात आलेली 4 लाख सामायिक सेवा केंद्रे आहेत. या सामायिक सेवा केंद्राद्वारे आज सरकारच्या शेकडो सेवा गावातल्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. ही सामायिक सेवा केंद्रे लाखो युवकांसाठी रोजगाराचेही माध्यम ठरली आहेत. काही दिवसांपूर्वी मी गुजरातमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे दाहोड या आदिवासी जिल्ह्यातले एक दिव्यांग जोडपे मला तिथे भेटले. ते सामायिक सेवा केंद्र चालवतात. आपण दिव्यांग असल्याने थोडी मदत मिळाली आणि हे केंद्र सुरु केल्याचे त्यांनी मला सांगितले. आज ते 28-30 हजार रुपये आदिवासी भागातल्या दुर्गम गावात सामायिक सेवा केंद्राद्वारे कमवत आहेत. म्हणजेच आदिवासी भागातले नागरिकही या सेवा काय आहेत, या सेवांचा लाभ कसा घेतला जातो, या सेवा किती उपयुक्त आहेत हे जाणतात आणि एक दिव्यांग जोडपे तिथे छोट्याश्या गावात लोकांची सेवाही करते आणि रोजीरोटीही कमावते. डिजिटल तंत्रज्ञान कशा प्रकारे परिवर्तन घडवत आहे हे यातून दिसून येते.

मित्रहो,

आमचे सरकार, देशात, सातत्याने तंत्रज्ञान अद्ययावत करण्याबरोबरच सेवा पोहोचवणाऱ्या प्रणालीतही निरंतर सुधारणा करत आहे. यामुळे देशात सेवा आणि उत्पादन अशा दोन्ही क्षेत्रांशी निगडीत स्टार्ट अप परीसंस्थेला बळकटी मिळाली आहे. भारत, जगातली सर्वात मोठी तिसरी स्टार्ट अप परिसंस्था बनण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे.

मित्रहो,

संपूर्ण समावेशी सरकार हा दृष्टीकोन टीआरएआय, ट्राय सारख्या सर्व नियामकांसाठीही वर्तमान आणि भविष्यातल्या आव्हानांचा निपटारा करण्यासाठी महत्वाचा आहे. आज नियमन केवळ एका क्षेत्राशी मर्यादित नाही. तंत्रज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रांना परस्परांशी जोडत आहे. म्हणूनच आज सहकार्यात्मक नियमनाची आवश्यकता प्रत्येकाला भासणे स्वाभाविक  आहे. यासाठी सर्व नियामकांनी एकत्र येऊन सामायिक मंच तयार करून उत्तम समन्वायासह तोडगा काढणे आवश्यक आहे. या परिषदेत या दिशेने महत्वपूर्ण तोडगा निघेल असा मला विश्वास आहे. आपल्याला देशाच्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षणही करायचे आहे आणि जगातल्या सर्वात आकर्षक दूरसंवाद बाजारपेठेच्या विकासालाही प्रोत्साहन द्यायचे आहे. ट्रायची रौप्य महोत्सवी परिषद, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळातल्या विकासाला वेग देणारी ठरावी, उर्जा दायी, नवा विश्वास देणारी, नवी भरारी घेण्याचे स्वप्न दाखवणारी आणि ते साकार करण्याच्या संकल्पाने युक्त असावी या सदिच्छेसह आपणा सर्वांचे आभार ! आपणा सर्वाना खूप- खूप शुभेच्छा ! खूप- खूप धन्यवाद !

  

 

 

 

 

S.Tupe/S.Kane/V.Sahjrao/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826360) Visitor Counter : 140