पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)

Posted On: 16 MAY 2022 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2022

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी 16 मे 2022 रोजी  नेपाळमधील लुंबिनीला  भेट दिली. पंतप्रधान म्हणून  नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा नेपाळ दौरा होता तर लुंबिनीला त्यांनी प्रथमच भेट दिली.

पंतप्रधान देउबा, त्यांच्या पत्नी डॉ. आरझू  राणा देउबा, गृहमंत्री बाल कृष्ण खांड, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. नारायण खडका,  पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री रेणू कुमारी यादव , ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री  पंफा भुसाळ, सांस्कृतिक, नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन मंत्री  प्रेम बहादूर आले, शिक्षण मंत्री  देवेंद्र पौडेल, कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज  मंत्री  गोविंद प्रसाद शर्मा, आणि लुंबिनी प्रांताचे मुख्यमंत्री कुल प्रसाद के.सी. यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

नेपाळमध्ये आगमनानंतर, दोन्ही पंतप्रधानांनी मायादेवी मंदिराला भेट दिली, जिथे  भगवान बुद्धांचे जन्मस्थान आहे. मंदिरात, बौद्ध विधींनुसार आयोजित प्रार्थनेला  पंतप्रधान उपस्थित राहिले  आणि पूजा अर्चना केली. उभय  पंतप्रधानांनी दीप प्रज्वलन केले आणि ऐतिहासिक अशोक स्तंभाला भेट दिली, जिथे लुंबिनी हे भगवान बुद्धांचे जन्मस्थान असल्याचा पहिला अभिलेख पुरावा आहे. 2014 मध्ये नेपाळ भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भेट म्हणून आणलेल्या पवित्र बोधी वृक्षालाही त्यांनी पाणी घातले.

नवी दिल्ली स्थित आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या (IBC) लुंबिनी येथील भूखंडावर भारतीय आंतरराष्ट्रीय बौद्ध  संस्कृती आणि वारसा केंद्राच्या बांधकामासाठी  "शिलान्यास" समारंभात पंतप्रधान मोदी आणि  पंतप्रधान देउबा सहभागी झाले.  नोव्हेंबर 2021 मध्ये लुंबिनी विकास न्यासाने आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाला हा भूखंड वितरित केला होता.  "शिलान्यास" समारंभानंतर, पंतप्रधानांनी बौद्ध केंद्राच्या मॉडेलचे अनावरणदेखील केले, ज्याची कल्पना निव्वळ -शून्य मानकांचे पालन करणारी  जागतिक दर्जाची सुविधा अशी केली आहे. यामध्ये  प्रार्थना सभागृह , ध्यान केंद्र, ग्रंथालय, प्रदर्शन हॉल, कॅफेटेरिया आणि इतर सुविधा असतील तसेच जगभरातील बौद्ध यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी ते खुले असेल.

दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली , ज्यात  त्यांनी 2 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या चर्चेचा आढावा घेतला.  संस्कृती, अर्थव्यवस्था, व्यापार, कनेक्टिव्हिटी, ऊर्जा आणि विकास भागीदारी यासह विविध क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी विशिष्ट उपक्रम आणि कल्पनांवर चर्चा केली. बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांपैकी लुंबिनी आणि कुशीनगर दरम्यान  भगिनी शहर संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी तत्त्वतः मान्यता दिली. यातून दोन्ही देशांमधील सामायिक बौद्ध वारसा प्रतिबिंबित झाला.

दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या  काही महिन्यांत द्विपक्षीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यामध्ये झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले, ज्यामध्ये वीज निर्मिती प्रकल्प, वीज पारेषण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा व्यापार यांचा समावेश आहे. नेपाळमधील पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी पंतप्रधान देउबा यांनी भारतीय कंपन्यांना आमंत्रित केले. नेपाळच्या जलविद्युत क्षेत्राच्या विकासासाठी आणि इच्छुक भारतीय विकासकांना या संदर्भात नवीन प्रकल्प वेगाने निवडण्यासाठी  प्रोत्साहित करण्यासाठी भारताकडून पाठिंब्याचे पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले. दोन्ही पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील लोकांना अधिक जवळ आणण्यासाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक विस्तारण्यावर सहमती दर्शवली. पंतप्रधान देउबा यांनी  पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले होते.

नेपाळ सरकारच्या अखत्यारीतील  लुंबिनी विकास न्यासाने  आयोजित केलेल्या 2566 व्या बुद्ध जयंती उत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दोन्ही पंतप्रधानांनी भाग घेतला. या कार्यक्रमात, पंतप्रधान मोदींनी मोठ्या संख्येने उपस्थित भिक्षू, अधिकारी, मान्यवर आणि बौद्ध जगाशी संबंधित लोकांच्या  मेळाव्याला संबोधित केले.

नेपाळचे पंतप्रधान देउबा यांच्या 1-3 एप्रिल 2022 च्या दिल्ली आणि वाराणसीच्या यशस्वी दौऱ्यानंतर  नेपाळमधील  लुंबिनीला पंतप्रधानांनी भेट दिली. आजच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील बहुआयामी भागीदारी आणि विशेषत: शिक्षण, संस्कृती, ऊर्जा आणि लोकांमध्ये देवाणघेवाण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात प्रगत सहकार्याला आणखी गती मिळाली आहे.  पंतप्रधान मोदींच्या लुंबिनी दौऱ्यात  भारत आणि नेपाळ यांच्यातील दृढ आणि समृद्ध सांस्कृतिक संबंध  आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात दोन्ही देशातल्या लोकांनी दिलेल्या योगदानावर भर देण्यात आला.

नेपाळ दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी  करण्यात आलेल्या करारांची यादी येथे पाहता येईल.

 

 

 

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825843) Visitor Counter : 266