भारतीय निवडणूक आयोग

भारताची वर्ष 2022-24 साठी आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी निवड

Posted On: 11 MAY 2022 3:45PM by PIB Mumbai

 

भारताची वर्ष 2022-24 साठी आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. फिलिपिन्समधील मनिला इथे 7 मे 2022 रोजी कार्यकारी मंडळ आणि सर्वसाधारण सभेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. मनिला निवडणूक आयोग सध्या एएईएचे अध्यक्ष होते. कार्यकारी मंडळातील नवीन सदस्यांमध्ये आता रशिया, उझबेकिस्तान, श्रीलंका, मालदीव, तैवान आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे.

भारतीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त  नितेश व्यास यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय शिष्टमंडळ मनिला इथे कार्यकारी मंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. यात मणिपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश अग्रवाल आणि राजस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गुप्ता यांचाही समावेश होता. शिष्टमंडळाने 2022-23 साठी कामाचा आराखडा, तसेच 2023-24 साठी भविष्यातील उपक्रमांचे कार्यकारी मंडळाला सादरीकरण केले.

सर्वसमावेशक आणि सहभागी निवडणुकांसाठी, निवडणूक आणि राजकीय प्रक्रियांमधील सामाजिक-राजकीय अडथळे दूर करण्यासाठी भारताने विविध ठोस आणि लक्ष्यित पावले उचलली आहेत. त्यावर प्रकाश टाकणारे निवडणुकांमधील लिंगसमानते बाबतच्या समस्याया विषयावर एक सादरीकरण देखील देण्यात आले.

आशियाई प्रदेशात एक पक्षविरहित मंच प्रदान करणे, त्याद्वारे निवडणूक प्राधिकरणांमधे अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करता यावी. तसेच लोकशाही आणि सुशासनाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने खुल्या आणि पारदर्शक निवडणुकांना चालना देण्याच्या दृष्टीने चर्चा आणि त्यावर कृती करता यावी हे आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेचे ध्येय आहे.

अनेक एएईए सदस्य देशांचे अधिकारी वेळोवेळी भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेद्वारे (इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट, आयआयआयडीईएम) आयोजित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांना नियमितपणे उपस्थित राहतात. 2019 पासून, एएईए सदस्य देशांमधील 250 हून अधिक अधिकारी या कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहेत. आयआयआयडीईएम विशिष्ट एएईए सदस्य देशांसाठी विशेष क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित करते. बांगलादेश निवडणूक आयोगाच्या 50 अधिकाऱ्यांना 2021-22 दरम्यान प्रशिक्षण देण्यात आले.

भारतीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमात एएईएचे प्रतिनिधी देखील नियमितपणे सहभागी होत आहेत. एएईएच्या 12 सदस्यांमधील 62 अधिकार्‍यांनी 2022 मध्ये विधानसभा निवडणुकांदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आभासी निवडणूक अभ्यागत कार्यक्रमात (आयईव्हीपी) भाग घेतला. एएईए, 118 सदस्य असलेल्या जागतिक निवडणूक संघटनेचाही (असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज ए-डब्लूईबी) सहयोगी सदस्य आहे.

 

एएईएची स्थापना आणि सदस्यत्व

फिलीपिन्समधील मनिला येथे 26-29 जानेवारी 1997 या कालावधीत आयोजित, एकविसाव्या शतकातील आशियाई निवडणुकांवरील परिसंवादातील सहभागींनी संमत केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने, आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेची (एएईए) स्थापना 1998  मध्ये करण्यात आली. सध्या 20 आशियाई ईएमबी, एएईएचे सदस्य आहेत. भारतीय निवडणूक आयोगएएईएचा संस्थापक सदस्य ईएमबी आहे.  2011-13 मध्ये एएईएच्या कार्यकारी मंडळावर उपाध्यक्ष आणि 2014-16 मध्ये अध्यक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने काम केले आहे.

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824421) Visitor Counter : 273