पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी घेतली शीख शिष्टमंडळाची भेट


"गुरुद्वारांमध्ये जाणे, 'सेवे'मध्ये वेळ घालवणे, लंगर घेणे, शीख कुटुंबांच्या घरी राहणे हा माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आहे"

"आमच्या गुरुंनी आम्हाला धैर्य आणि सेवा शिकवली"

"नवा भारत नवीन शिखरे गाठत आहे आणि संपूर्ण जगावर आपली छाप सोडत आहे"

“मी नेहमीच आपल्या परदेशातील भारतीय समुदायाला भारताचे ‘राष्ट्रदूत’ मानले आहे. तुम्ही सर्वजण भारत मातेचा परदेशातील मजबूत आवाज आणि बुलंद ओळख आहात”

"गुरुंच्या चरणांनी या महान भूमीला पावन केले आणि येथील लोकांना प्रेरणा दिली"

"शीख परंपरा ही 'एक भारत श्रेष्ठ भारत'ची जिवंत परंपरा आहे"

"शीख समाज म्हणजे देशाचे साहस, पराक्रम आणि मेहनतीचे प्रतिबिंब "

Posted On: 29 APR 2022 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे शीख शिष्टमंडळाची भेट घेतली. या समूहात विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश होता. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी शीख समुदायासोबतच्या त्यांच्या प्रदीर्घ ऋणानुबंधांविषयी सांगितले. “गुरुद्वारात जाणे, सेवेत वेळ घालवणे, लंगर घेणे, शीख कुटुंबांच्या घरी राहणे हा माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. इथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी शीख संत नेहमी येत असतात. मला त्यांच्या सहवासाचे सौभाग्य मिळत राहते”, पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी परदेश दौऱ्यांदरम्यान जगभरातील शीख वारसा असलेल्या ठिकाणांना भेटी दिल्याचीही आठवण सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आमच्या गुरुंनी आम्हाला धैर्य आणि सेवा शिकवली आहे. भारतातील लोक कोणत्याही साधनांशिवाय जगाच्या विविध भागात गेले आहेत आणि त्यांच्या श्रमाने यश मिळवले आहे. आजच्या नव्या भारताचीही हीच भावना आहे,” ते म्हणाले.

नवीन भारताचा जो कल आहे त्याविषयी त्यांच्या कौतुकाचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान म्हणाले की, नवीन भारत नवीन शिखरे गाठत  आहे आणि संपूर्ण जगावर आपली छाप सोडत आहे. कोरोना महामारीचा काळ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. महामारीच्या सुरुवातीला जुनी मानसिकता असलेले लोक भारताबद्दल चिंता व्यक्त करत होते. पण, आता लोक महामारीचा सामना करण्यासाठी भारताचे उदाहरण देत आहेत. पूर्वी भारतातील प्रचंड लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली जात होती आणि अनेकांना भारतीयांसाठी लसीबद्दल शंका होती. पण आज भारत सर्वात मोठा लस निर्माता म्हणून उदयास आला आहे. “आपल्याला हे ऐकून अभिमान वाटेल की 99 टक्के लसीकरण आमच्या स्वदेशी मेड इन इंडिया लसींद्वारे केले गेले आहे”, ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, या कठीण काळात भारत जगातील सर्वात मोठ्या स्टार्ट अप परिसंस्थेपैकी एक म्हणून उदयास आला आहे. “आपल्या युनिकॉर्नची संख्या निरंतर वाढत आहे. भारताची ही वाढती उंची आणि विश्वासार्हता आपल्या परदेशातील समुदायाला जास्तीत जास्त समाधान आणि अभिमान प्रदान करते,” ते पुढे म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, “मी नेहमीच आपल्या परदेशातील भारतीय समुदायाला भारताचे राष्ट्रदूत मानले आहे. तुम्ही सर्वजण परदेशात भारत मातेचा मजबूत आवाज आणि बुलंद ओळख आहात.” ते म्हणाले की भारताच्या प्रगतीच्या वाटचालीबद्दल परदेशातील भारतीय लोकांनाही अभिमान वाटतो. “आपण जगात कुठेही असलो तरी ‘इंडिया फर्स्ट’ हा आपला प्राथमिक विश्वास असायला हवा, असेही ते म्हणाले.

गुरूंच्या महान योगदानाला आणि बलिदानाला प्रणाम करून पंतप्रधानांनी गुरू नानक देवजींनी संपूर्ण राष्ट्राचे चैतन्य कसे जागृत केले आणि देशाला तिमिरातून तेजाकडे कसे नेले याचे स्मरण केले. ते म्हणाले की, गुरूंनी भारतभर प्रवास केला आणि सर्वत्र त्यांचे संकेत आणि प्रेरणा आहेत. ते पूजनीय असून त्यांच्यावर सर्वत्र श्रद्धा आहे. गुरुंच्या पदस्पर्शाने ही महान भूमी पावन झाली आणि तेथील लोकांना प्रेरणा मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले. शीख परंपरा ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची जिवंत परंपरा आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर शीख समुदायाच्या योगदानाबद्दल देशाची कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘शीख समाज हा देशाच्या साहस, पराक्रम आणि मेहनतीला  समानार्थी शब्द आहे.

पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन विशद केला. हा संघर्ष मर्यादित कालावधीपुरता मर्यादित नसून हजारो वर्षांच्या चेतना, आदर्श, आध्यात्मिक मूल्ये आणि ‘तपस्येचे’ प्रकटीकरण आहे, असे ते म्हणाले.

गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व, गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या प्रकाश पर्व आणि गुरु गोविंद सिंग याच्या 350 व्या प्रकाश पर्व यासारख्या ऐतिहासिक कार्यक्रमांशी निगडीत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या सरकारच्या कार्यकाळात करतारपूर कॉरिडॉरचे बांधकाम, लंगर करमुक्त करणे, हरमंदिर साहिबसाठी एफसीआरए परवानगी आणि पायाभूत सुविधा आणि गुरुद्वारांच्या आसपासची स्वच्छता यासारख्या घटना घडल्या आहेत, असेही ते म्हणाले.

गुरूंनी कर्तव्यावर दिलेल्या भराचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि अमृत कालमधील कर्तव्याच्या भावनेवर त्याच भराचा संदर्भ दिला आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र या भावनेचा उत्कर्ष असल्याचे सांगितले. ही कर्तव्याची जाणीव केवळ वर्तमानासाठीच नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठीही महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. पर्यावरण, पोषण आणि सांस्कृतिक मूल्यांच्या संरक्षणासाठी नेहमीच सक्रिय असल्याबद्दल त्यांनी शीख समुदायाचे कौतुक केले. अमृत सरोवरांसाठी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत योगदान देण्याची विनंती करून त्यांनी बैठकीचा समारोप केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1821435) Visitor Counter : 158