पंतप्रधान कार्यालय

सेमीकॉन इंडिया परिषद 2022 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


‘‘सेमीकंडक्टरच्या जागतिक पुरवठा साखळीमध्ये प्रमुख भागीदारांपैकी एक भागीदार म्हणून भारताला प्रस्थापित करणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट’’

‘‘आरोग्य आणि कल्याणापासून ते समावेशन आणि सक्षमीकरणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा आम्ही वापर करीत आहोत’’

‘‘आगामी काळातल्या तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी भारत मार्ग प्रशस्त करीत आहे’’

‘‘जगातल्या सर्वात वेगाने वाढणा-या स्टार्टअप परिसंस्थेसह जोमदार आर्थिक विकासाच्या दिशेने भारताची वाटचाल ’’

‘‘व्यवसाय सुलभीकरणासाठी भारताकडून व्यापक सुधारणा‘‘

‘‘उत्तम ‘सेमीकंडक्टर डिझाईनबाबत आमच्याकडे मोठी प्रतिभा, त्यांच्यामार्फत जगातले 20 टक्के सेमीकंडक्टर डिझाइन अभियंते तयार होतात’’

‘‘भारतामध्ये सेमीकंडक्टरचा वापर 2026 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सहून अधिक आणि 2030 पर्यंत 110 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्याची अपेक्षा’’

‘‘ज्यावेळी शतकातून एखादेवेळी येणा-या महामारीबरोबर मानवतेचा लढा सुरू होता, त्यावेळी भारताने आपल्या लोकांच्या आरोग्याबरोबरच आपल्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्यातही सुधारणा घडवून आणली’’

‘‘उद्योग व्यवसाय कठोर परिश्रमानेम करत असताना सरकारने त्यापेक्षाही जास्त कठोर परिश्रम केले पाहिजेत’’

‘‘तंत्रज्ञान आणि जोखिम स्वीकारण्याची भारतामध्ये क्षमता आहे’’

‘‘पोषक धोरण वातावरणाद्वारे आम्ही अनेक शक्यता तुमच्या बाजूने केल्या. भारत म्हणजे व्यवसाय, हे आम्ही दाखवून दिले आहे.’’

Posted On: 29 APR 2022 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेमीकॉन इंडिया परिषद 2022 चे उद्घाटन केले. उद्घाटन सत्राला त्यांनी  दूरदृष्य प्रणालीव्दारे संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री, सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्रातले मान्यवर, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ,  आणि  अधिकारी, उपस्थित होते.

भाषणाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी सर्वांचे स्वागत केले आणि ही परिषद भारतामध्ये होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आजच्या जगामध्ये सेमीकंडक्टरची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करून ते म्हणाले, ‘‘ भारताला जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीमध्ये प्रमुख भागीदारांपैकी एक म्हणून प्रस्थापित करणे हे आमचे सामूहिक उद्दिष्ट आहे. आम्हाला उच्च-तंत्रज्ञान, उच्च गुणवत्ता आणि उच्च विश्वासार्हता या तत्वांवर आधारित, त्या दिशेने काम करायचे आहे. ’’ 

सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारत हे अतिशय योग्य स्थान आहे, यामागची सहा कारणे  पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

पहिले, भारतामध्ये 1.3 अब्जाहून अधिक भारतीयांना जोडण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आर्थिक समावेशन, बँकिंग आणि डिजिटल पेमेंट क्रांतीच्या क्षेत्रामध्ये भारताने केलेल्या प्रगतीची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, ‘‘ आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाच्या सर्व क्षेत्रात अगदी आरोग्य आणि कल्याणापासून ते समावेशन आणि सक्षमीकरणापर्यंत परिवर्तन घडवून आणत आहोत.’’

दुसरे कारण सांगताना पंतप्रधान म्हणाले, 5 जी,  आयओटी आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये क्षमता विकसित करण्यासाठी ब्रॉडबँड गुंतवणूकीसह सहा लाख गावे जोडून भारत आगामी युगामध्ये तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी मार्ग प्रशस्त करीत आहे.

तिसरे, जगामध्ये सर्वात वेगाने वाढणा-या स्टार्टअप परिसंस्थेसह भारत मजबूत आर्थिक विकासाकडे वाटचाल करीत आहे. भारतामध्‍ये स्वतःचा सेमीकंडक्टर्सचा  वापर 2026 पर्यंत 80 अब्ज डॉलर्स आणि 2030 पर्यंत 110 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल अशी  अपेक्षा आहे.’’

चौथे, भारतामध्ये व्यवसाय सुलभीकरणासाठी व्यापक सुधारणा केल्या आहेत. विविध क्षेत्रातले 25,000 पेक्षा जास्त अनुपालन रद्द करणे, परवान्यांचे स्वयं-नूतनीकरण, पारदर्शक व्यवहार आणि डिजिटल कामकाज याव्दारे नियामक आराखड्याच्या अधीन कार्यपद्धतीमुळे कामांना गती, तसेच  जगातील सर्वात अनुकूल कर संरचनांपैकी एक संरचना , यासारख्या विविध उपायांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

पाचवे कारण, 21 व्या शतकातील गरज लक्षात घेऊन भारतीय युवावर्गाला कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यासाठी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आमच्याकडे उत्कृष्ट ‘सेमीकंडक्टर डिझाइन बाबत मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे, त्यामुळेज्यामुळे  जगातील 20 टक्के सेमीकंडक्टर डिझाइन अभियंते घडवतो. जवळपास सर्व अव्वल 25 सेमीकंडक्टर डिझाइन कंपन्यांचे डिझाइन किंवा संशोधन आणि विकास केंद्रे आपल्या देशात आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले. 

सहावे, भारतीय उत्पादन क्षेत्राचा कायापालट घडवून आणण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, ज्यावेळी शतकातून एखादेवेळी येणा-या महामारीबरोबर मानवतेचा लढा सुरू होता, त्यावेळी भारताने आपल्या लोकांचे आरोग्यच नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्यातही सुधारणा घडवून आणली’’ पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 14 प्रमुख क्षेत्रांमध्ये 26 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त प्रोत्साहन देणा-या ‘उत्पादन संलग्न प्रोत्साहन’ योजना तयार करण्यात आल्या आहेत. आगामी 5 वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रामध्ये विक्रमी वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडेच घोषित करण्यात आलेल्या 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्चाच्या सेमी-कॉन इंडिया कार्यक्रमाची माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. सेमीकंडक्टर्स, डिस्प्ले उत्पादन आणि डिझाइन परिसंस्थेमध्ये गुंतवणूक करणा-या कंपन्यांना आर्थिक मदत प्रदान करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

कोणत्याही उद्योगाला सरकारच्या पाठिंब्याची गरज असते, असे सांगून पंतप्रधानांनी व्यवसायासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली. ‘‘ उद्योग कठोर परिश्रम करीत असताना, सरकारनेही त्यापेक्षा जास्त कठोर परिश्रम केले पाहिजेत’’ असे आपण मानत असल्याचे  पंतप्रधान म्हणाले. नवीन जागतिक व्यवस्थेच्या निर्मितीकडे लक्ष वेधून त्यांनी उदयोन्मुख संधींचे सोने करण्यास सांगितले. ‘‘विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून कठोर परिश्रम घेतले आहेत. भारतामध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि जोखिम पत्करण्याची मोठी क्षमता आहे. त्यासाठी पोषक वातावरणाच्या माध्यमातून आम्ही अनेक शक्यता तुमच्या बाजूने ठेवल्या आहेत. भारत म्हणजे व्यवसाय हे आम्ही दाखवून दिले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821251) Visitor Counter : 200