पंतप्रधान कार्यालय

फिजीमध्‍ये श्री सत्य साई संजीवनी बाल हृदय रूग्‍णालय उद्घाटन कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 27 APR 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2022

 

फिजीचे माननीय पंतप्रधान बेनीमरामा जी, सद्गुरु मधुसूदन साई, साई प्रेम प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त, रुग्णालयाचा कर्मचारीवर्ग, माननीय आतिथी आणि फिजीतील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!

नी- साम बुला विनाका, नमस्कार!

सुवामध्ये श्री सत्यसाई संजीवनी बाल हृदय रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाशी जोडले गेल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. यासाठी मी माननीय पंतप्रधान फिजी आणि फिजीच्या जनतेचे आभार मानतो. एकमेकांशी असलेल्या आपल्या नात्यांचे आणि प्रेमभावनेचे हे आणखी एक प्रतीक आहे. भारत आणि फिजीच्या संयुक्त यात्रेचा हा आणखी एक अध्याय आहे. हे बाल हृदय रुग्णालय फक्त फिजी मधीलच नाही तर संपूर्ण दक्षिण प्रशांत भागातील पहिले मुलांसाठीचे हृदय रुग्णालय आहे असे मला सांगितले गेले आहे. जिथे हृदयाशी संबंधित आजार हे एक मोठे आव्हान आहे अशा भागामध्ये हे रुग्णालय हजारो मुलांना नवीन जीवन देणारे माध्यम बनणार आहे. मला आनंद आहे की इथे प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे उपचार मिळतीलच वर सर्व शस्त्रक्रियासुद्धा विनामूल्य होतील. यासाठी मी फिजी सरकारचे , फिजीतील साई प्रेम प्रतिष्ठानचे  आणि भारताच्या श्री सत्य साई संजीवनी बाल ह्रदय रुग्णालयाचे कौतुक करत आहे.

या विशेष क्षणी  ब्रह्मलीन श्री सत्य साई बाबांना मी नमस्कार करतो. मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी लावलेल्या  बीजाचा वटवृक्ष होऊन तो लोकांची सेवा करत आहे. सत्यसाईबाबांनी अध्यात्माला कर्मकांडापासून मुक्त करून जनकल्याणाशी जोडण्याचे काम केले‌‌ आहे; असे मी आधीही म्हणालो होतो. शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य, आरोग्याच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य, गरीब, पीडित, वंचितांसाठी त्यांनी केलेले सेवा कार्य आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. दोन दशकांपूर्वी जेव्हा गुजरातमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला होता तेव्हा बाबांच्या अनुयायांनी ज्याप्रकारे पीडितांची सेवा केली ते गुजरात मधील जनता कधीही विसरणार नाही. मला सत्य साई बाबांचा निरंतर आशीर्वाद मिळाला अनेक दशकांचा पासून मी त्यांच्याबरोबर  जोडला गेलो होतो आजही मला त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत, हे मी माझे मोठे भाग्य मानतो.

मित्रहो , 

"परोपकाराय सतां विभूतय:" हा अर्थात परोपकार हीच सज्जनांची संपत्ती असते , असे आमच्याकडे म्हटले जाते. मानवाची सेवा, प्राणीमात्रांचे कल्याण हेच आमच्या संसाधनांचे एकमात्र उद्दिष्ट आहे. याच मूल्यांवर भारत आणि फिजी यांची संयुक्त परंपरा उभी आहे. याच आदर्शांच्या मार्गावरून जाताना  कोरोना महामारीसारख्या परीक्षेच्या काळातही भारताने आपल्या कर्तव्याचे पालन केले आहे. वसुधैव कुटुम्बकम म्हणजे संपूर्ण विश्वच आपला परिवार आहे, या भावनेतून भारताने जगातील 150 देशांना औषधे पाठवली. जीवनावश्‍यक सामान पाठवले. आपल्या करोडो नागरिकांची काळजी वाहत असताना भारताने जगातील इतर देशातील लोकांची सुद्धा काळजी वाहिली. आम्ही जवळपास शंभर देशांना दहा कोटी लसी पाठवल्या. या मध्ये आम्ही फिजीला प्राथमिकता दिली. मला आनंद आहे की फिजीविषयी  संपूर्ण भारताला असलेली आपलेपणाची ही भावना साई प्रेम प्रतिष्ठान  पुढे नेत आहे.

मित्रहो,

आपल्या दोन्ही देशांच्या मध्ये समुद्र आहे. मात्र संस्कृतीने आपण जोडले गेलो आहोत. परस्पर सन्मान, सहयोग आणि आपल्या जनतेमधील मजबूत परस्पर संबंधांमुळे आपले नाते टिकून आहे. फिजीच्या सामाजिक, आर्थिक विकासात भूमिका बजावण्यासाठी योगदान देण्याची संधी मिळते आहे,  हे भारताचे सौभाग्य आहे. गेल्या काही दशकांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत आणि फिजीमधील संबंध वाढत जात आहेत, दृढ होत आहेत. फिजी आणि मान्यवर पंतप्रधान यांच्या सहयोगाने आपली ही नाती येणाऱ्या काळात अजून दृढ होतील. योगायोगाने माझे मित्र पंतप्रधान बेनिरामाजी यांचा जन्मदिवसही आहे. मी त्यांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी श्री सत्यसाई संजीवनी बाल हृदय रुग्णालयाशी संबंधित सर्व सदस्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो . हे रुग्णालय फिजी तसेच या संपूर्ण भागात सेवेचे एक अधिष्ठान बनेल आणि भारत फिजीच्या नात्यांना नवीन उंचीवर नेईल हा माझा विश्वास आहे.

खूप खूप धन्यवाद!

 

* * *

S.Bedekar/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820915) Visitor Counter : 165