पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी संवाद साधताना केलेले भाषण

Posted On: 27 APR 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2022

 

नमस्कार!

सर्वात प्रथम मी तामिळनाडू मधल्या तंजावूर येथे आज जो अपघात झाला, त्याबद्दल शोक व्यक्त करतो. ज्या नागरिकांचा मृत्यू या अपघातामध्ये झाला, त्यांच्या परिवाराविषयी माझ्या सहवेदना आहेत. अपघातातल्या जखमी कुटुंबांना आर्थिक मदत केली जात आहे.

मित्रांनो,

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाविषयीची ही आपली चोविसावी बैठक आहे. कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्यांनी मिळून काम केले, त्यामुळे कोरोनाविरोधातल्या देशाच्या लढ्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली गेली. सर्व मुख्यमंत्री, राज्य सरकारे आणि अधिका-यांबरोबरच सर्व कोरोना योद्ध्यांचे मी कौतुक करतो.

मित्रांनो,

काही राज्यांमध्ये कोरोनाच्या केसेस पुन्हा एकदा वाढत आहेत, हे लक्षात घेवून आरोग्य सचिवांनीही आत्ता आपल्यासमोर विस्तृत माहिती सादर केली आहे. गृहमंत्र्यांनीही काही महत्वपूर्ण गोष्टीं आपल्यासमोर ठेवल्या आहेत. त्याचबरोबर, आपल्यापैकी काही मुख्यमंत्री मित्रांनी, विशेष जरूरीचे मुद्दे सर्वांसमोर मांडले आहेत. यावरून स्पष्ट होते आहे की, कोरोनाचे आव्हान अजूनही पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही. ओमिक्रॉन आणि त्यासारख्या इतर प्रकारच्या विषाणंमुळे कशा प्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याविषयी यूरोपातल्या देशांचा अनुभव आपण पहात आहोत. गेल्या काही महिन्यांमध्ये काही देशांमध्ये विषाणूंच्या उपप्रकारांमुळे बंधने आली आहेत. आपण भारतवासींच्या दृष्टीने पाहिले तर,  इतर अनेक देशांच्या तुलनेत आपल्या देशातली स्थिती बरीच चांगली आणि नियंत्रणामध्ये ठेवली आहे. तरीही गेल्या दोन आठवड्यापासून ज्या पद्धतीने काही राज्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे, त्यावरून आपल्याला दक्ष राहण्याची गरज आहे. आपल्याकडे काही महिन्यांपूर्वी जी लाट आली होती, त्या लाटेने, आपल्याला खूप काही शिकवलेही आहे. सर्व देशवासियांनी ओमिक्रॉन लाटेला यशस्वीपणे तोंड दिले, कोणत्याही प्रकारे न डगमगता देशवासियांनी या लाटेचा सामना केला.

मित्रांनो,

दोन वर्षांच्या आत देशाने आरोग्यविषयक पायाभूत सुविधांपासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत, कोरोनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे काही जिथे आवश्यक आहे, तिथे काम करून त्या गोष्टी मजबूत केल्या आहेत. तिस-या लाटेमध्ये कोणत्याही राज्यामध्ये स्थिती अनियंत्रित झाली, अशी बातमी आली नाही. या कार्यात आपल्या कोविड लसीकरण अभियानाचीही खूप मोठी मदत झाली. देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग तिथली भौगोलिक परिस्थिती कशीही असो, लसीच्या मात्रा लोकां-लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने ही गौरवाची गोष्ट आहे. आज भारतातल्या 96 टक्के वयस्कर लोकांना कोरोना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. 15 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या जवळपास 85 टक्के नागरिकांना दुसरी मात्राही देण्यात आली आहे.

मित्रांनो,

तुम्हालाही चांगले माहिती आहे  आणि जगातल्या बहुतांश तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस हे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. आपल्या देशामध्ये दीर्घकाळांनी शाळा आणि वर्ग पुन्हा एकदा उघडले आहेत. अशामध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे  पालकांची चिंता वाढत आहे. काही शाळांमध्ये मुलांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र समाधानाचा विषय असा आहे की, जास्तीत जास्त मुलांनाही लसीचे सुरक्षा कवच मिळत आहे. मार्चमध्ये आम्ही 12 ते 14 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरू केला होता. आता उद्यापासून 6 ते 12 वर्षांच्या  मुलांना लस देण्याची परवानगी मिळाली  आहे. सर्व पात्र मुलांना लवकरात लवकर लस दिली जावी, याला आमचे प्राधान्य आहे. यासाठी  पहिल्याप्रमाणे शाळांमध्ये विशेष मोहिमा सुरू करण्याची आवश्यकता असेल. शिक्षक आणि माता-पित्यांनी याविषयी जागरूक झाले पाहिजे, हेही आपल्याला सुनिश्चित करावे लागेल. लसीचे सुरक्षा कवच अधिक मजबूत व्हावे, यासाठी देशातल्या सर्व वयस्करांसाठी क्षमता वृद्धी मात्राही उपलब्ध आहे. शिक्षक, पालक आणि बाकी पात्र लोकही क्षमता वृद्धी मात्रा घेवू शकतात. याविषयीही आपण त्यांना जागरूक करीत राहिले पाहिजे.

मित्रांनो,

तिस-या लाटेच्या काळात आपल्याकडे प्रत्येक दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त प्रकरणे येत होत्या, हे आपण पाहिले आहे. आपल्या सर्व राज्यांनी इतक्या मोठ्या संख्येने येणारी प्रकरणे हाताळल्याही आहेत. आणि बाकी सामाजिक, आर्थिक व्यवहारांना गतीही दिली आहे. असाच समतोल यापुढेही राखला जावा, असे धोरण - आपण उपाय योजना करतो, त्या व्यूहरचनेचा भाग असला पाहिजे. आपले संशोधक आणि तज्ज्ञ, राष्ट्रीय आणि वैश्विक स्थितीवर सातत्याने अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार आपण  आधीपासूनच, सक्रियतेने आणि संयुक्तपणे काम करायचे आहे. संसर्ग वाढू नये म्हणून प्रारंभीच तो रोखण्याला आपण प्राधान्य दिले पाहिजे. आधीही आपण हे केले आहे आणि आताही आपल्याला हे काम केले पाहिजे. तुम्ही सर्वांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट हे धोरणही आपल्याला तितक्या प्रभावीपणे लागू करायचे आहे. आज कोरोनाची जी स्थिती आहे, त्यामध्ये रूग्णालयांमध्ये भर्ती झालेल्या रूग्णांमध्ये गंभीर स्वरूपाच्या इंफ्लूएंजाच्या केसेस आहेत. त्या सर्वांची म्हणजे अगदी शंभरटक्के रूग्णांची आरटी-पीसीआर चाचणी केली पाहिजे. यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळतात, त्यांचे  नमूने  ‘जीनोम सीक्वेन्सिंग’साठी जरूर पाठविण्यात यावेत. यामुळे आपण  कोरोना विषाणूचा प्रकार वेळोवेळी ओळखू शकणार आहोत.

मित्रांनो,

आपण सार्वजनिक स्थानी कोविडयोग्य वर्तनशैलीचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, त्याचबरोबर नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होवू नये, हे सुनिश्चित केले पाहिजे.

मित्रांनो,

आजच्या या चर्चेमध्ये आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अद्यतन करण्यासाठी जे काम केले जात आहे,  त्याच्याविषयीही चर्चा झाली आहे. पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू राहील, हे सुनिश्चित केले पाहिजे. बेडस्, व्हँटिलेटर्स आणि पीएसए ऑक्सिजन प्लँटस् यासारख्या सुविधांची आपल्याकडे खूप चांगली स्थिती आहे. मात्र या सर्व सुविधा कार्यरत असल्या पाहिजेत, हेही आपण सुनिश्चित केले पाहिजे आणि त्यावर देखरेख केली पाहिजे. जबाबदा-या निश्चित केल्या गेल्या पाहिजेत म्हणजे जर आवश्यकता भासलीच तर आपल्यावर संकट येणार नाही. त्याचबरोबर जर कुठे काही अंतर असेल, कमतरता असेल तर माझा आग्रह असा आहे की, वरिष्ठ स्तरावरून याची पडताळणी केली जावी. ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला जावा. वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रूग्णालये या सर्वांमध्ये आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांचे मोजमाप करण्यात यावे आणि मनुष्य बळाची गणना करण्यात यावी. मला विश्वास आहे , आपण एकमेकांमध्ये सहकार्य ठेवून आणि संवाद साधून सातत्याने सर्वोत्कृष्ट सेवा देत राहणार आहोत. आणि अतिशय मजबुतीने कोरोनाच्या विरोधातली लढाई लढत राहणार आहोत. यामधून मार्गही निघत जातील.

मित्रांनो,

राज्यघटनेत व्यक्त केलेल्या सहकारी संघराज्यवादाच्या भावनेला अनुसरून भारताने कोरोनाविरुद्धची ही प्रदीर्घ लढाई खंबीरपणे लढली आहे. जागतिक परिस्थिती, बाह्य कारणांमुळे देशाच्या अंतर्गत परिस्थितीवर जो  परिणाम होत आहे त्याचा  केंद्र आणि राज्यांनी मिळून सामना केला आहे आणि यापुढेही करावा लागणार आहे.केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच आज देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या आहेत.  पण मित्रांनो, आजच्या या चर्चेत मला आणखी एका पैलूचा उल्लेख करावासा वाटतो.आजच्या जागतिक परिस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी, आर्थिक निर्णयांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय हा त्यांच्यातील  पूर्वीच्या सामंजस्यापेक्षा अधिक आवश्यक आहे.आपणा सर्वांना माहीत आहे की, युद्धजन्य  परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ज्याप्रकारे पुरवठा साखळीवर  परिणाम झाला आहे आणि अशा वातावरणात आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत.हे संकट जागतिक संकट अनेक आव्हाने घेऊन येत आहे.  संकटकाळात  , केंद्र आणि राज्यांमधील समन्वय ,सहकारी संघराज्यवादाची भावना वाढवणे अत्यावश्यक झाले आहे.आता मी एक छोटेसे उदाहरण देतो.  जसा पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा विषय आपल्या सर्वांसमोर आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे  देशवासीयांवर पडणारा  बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती.गेल्या नोव्हेंबरमध्ये कपात केली होती. केंद्र सरकारने राज्यांनाही त्यांचे कर कमी करून हे लाभ नागरिकांना हस्तांतरित करण्याचे आवाहन केले होते.यानंतर काही राज्यांनी भारत सरकारच्या भावनेनुसार, तेथील कर कमी केला, मात्र काही राज्यांनी त्यांच्या राज्यातील जनतेला कोणताही लाभ दिला नाही.त्यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही इतरांपेक्षा जास्त आहेत.  एकप्रकारे हा या राज्यांतील लोकांवर अन्याय तर आहेच, पण शेजारील राज्यांचेही नुकसान करत आहे.जी राज्ये करात कपात करतात, त्यांचा महसूल बुडणे स्वाभाविक आहे. उदाहरणार्थ, कर्नाटकने करात कपात केली नसती तर या सहा महिन्यांत 5 हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला असता. गुजरातनेही कर कमी केला नसता तर साडेतीन हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला असता. मात्र अशा काही राज्यांनी आपल्या नागरिकांच्या भल्यासाठी, आपल्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मूल्यवर्धित कर कमी केला आहे, सकारात्मक पावले उचलली आहेत.दुसरीकडे, गुजरात आणि कर्नाटक या शेजारील राज्यांनी कर कपात न करता  या सहा महिन्यांत  साडेतीन हजार कोटी रुपयांपासून ते साडेपाच हजार कोटी रुपयांपर्यंतचा अतिरिक्त महसूल मिळवला.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मूल्यवर्धित कर  कमी करण्याबाबत चर्चा झाली होती, मी सर्वांना आवाहन केले होते.पण अनेक राज्ये, मी येथे कोणावरही टीका करत नाही आहे , मी केवळ तुम्हाला विनंती करत आहे.तुमच्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी विनंती  करत आहे.आता जसे सहा महिन्यांपूर्वी त्या वेळी काही राज्यांनी ही गोष्ट मान्य केली, तर काही राज्यांनी मान्य केली नाही.आता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, झारखंड यांसारख्या अनेक राज्यांनी काही कारणास्तव ही गोष्ट मान्य केली नाही आणि त्यांच्या राज्यातील नागरिकांवर हा बोजा कायम राहिला आहे.या कालावधीत या राज्यांनी किती महसूल कमावला त्यामध्ये मी जाणार नाही. पण आता मी तुम्हाला विनंती करतो की, गेल्या नोव्हेंबरमध्ये तुम्हाला देशहितासाठी जे काही करायचे होते,त्याला आता सहा महिने विलंब झाला आहे. आता तरी तुम्ही तुमच्या राज्यातील नागरिकांवरचे ओझे कमी करून त्याचे फायदे पोहोचवावेत.  तुम्हा सर्वांना माहिती आहे की, भारत सरकारला येणाऱ्या महसूलापैकी 42 टक्के महसूल राज्यांनाच जातो.मी सर्व राज्यांना विनंती करतो की ,या जागतिक संकटाच्या काळात, सहकारी संघराज्यवादाच्या भावनेनुसार, आपण सर्वांनी एक संघ म्हणून काम करावे, आता बरेच विषय आहेत ज्यात मी तपशीलवार जाणार नाही.जसे की खते, आज आपण खतांसाठी जगातील देशांवर  अवलंबून आहोत. किती मोठे संकट आले आहे.अनुदानात सातत्याने अनेक पटींनी वाढ होत आहे. हा बोजा आम्हाला शेतकऱ्यांवर टाकायचा नाही. आता अशा संकटाचा सामना करावा लागत आहे,तेव्हा मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही तुमच्या राज्याच्या, तुमच्या शेजारील राज्याच्या आणि सर्व देशवासीयांच्या हितासाठी या गोष्टीसाठी सर्वोच्च प्राधान्य द्या.मी आणखी एक उदाहरण देतो. आता नोव्हेंबरमध्ये जे करायचे होते ते झाले नाही. मग गेल्या सहा महिन्यात काय झाले?  आज चेन्नई, तामिळनाडूमध्ये पेट्रोल 111 रुपयांच्या आसपास आहे.  जयपूरमध्ये 118 रुपयांपेक्षा पेक्षा जास्त आहे. हैदराबादमध्ये 119 पेक्षा जास्त आहेत.  कोलकातामध्ये 115 पेक्षा जास्त आहेत.  मुंबईत 120 पेक्षा अधिक आहे आणि ज्यांनी करात कपात केली आहे त्या मुंबईच्या जवळच्या दीव दमणमध्ये 102 रुपये आहे.

आता कोलकात्यात 115, लखनौमध्ये 105. हैदराबादमध्ये  सुमारे 120, जम्मूमध्ये 106.  जयपूरमध्ये 118, गुवाहाटीमध्ये 105.  गुरुग्राममध्ये 105 रुपये आहे, डेहराडूनमध्ये आपले छोटे राज्य उत्तराखंडमध्ये 103 रुपये आहे.  मी तुम्हाला विनंती करतो की ,तुमचा सहा महिन्यात जो काही महसूल वाढला ,तुमच्या राज्यासाठी तो उपयोगी पडेल, मात्रा आता तुम्ही संपूर्ण देशाला सहकार्य करा, हीच माझी आज तुमच्यासाठी  विशेष विनंती आहे.

मित्रांनो,

अजून एक विषय ज्यावर मला आज माझा मुद्दा मांडायचा आहे.  देशात उष्मा झपाट्याने वाढत आहे आणि वेळेआधीच खूप गर्मी वाढली आहे आणि अशा वेळी विविध ठिकाणी आगीच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत जंगलात, महत्त्वाच्या इमारतींना, रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.  गेल्या वर्षी जेव्हा अनेक रुग्णालयांना आग लागली तेव्हा ते दिवस किती वेदनादायक होते हे आपल्या सर्वांना आठवणीत आहे आणि ती खूप वेदनादायक परिस्थिती होती.तो काळ खूप कठीण होता.  या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला.

त्यामुळे मी सर्व राज्यांना आवाहन करतो की, आतापासून विशेषत: रुग्णालयांचे सुरक्षा परीक्षण करावे, सुरक्षा व्यवस्था बळकट करावी आणि ते प्राधान्याने करावे. आपण अशा घटना टाळू शकतो, अशा घटना कमीत कमी व्हाव्यात ,आपला प्रतिसाद वेळ देखील कमीत कमी असावा, कोणतीही जीवित आणि वित्तहानी होऊ नये, यासाठी देखील मी आपणास विनंती करतो की ,आपण या कामासाठी आपला चमू विशेषरित्या तैनात  करा आणि  देशात कुठेही अपघात होणार नाही,आपल्या निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागू नये,यासाठी पूर्ण लक्ष ठेवून देखरेख ठेवा.

मित्रांनो,

तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो.आणि मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असतो. तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असल्यास मला आवडेल.  मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.

 

* * *

S.Tupe/S.Kane/S.Bedekar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1820888) Visitor Counter : 241