माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रेरणादायी कथा दाखवणाऱ्या 'आझादी की अमृत कहानियाँ' या लघु व्हिडिओ मालिकेचे केले प्रकाशन
महिलांसाठी, स्वातंत्र्य म्हणजे ठराविक चौकट, निषिद्ध गोष्टींविरोधातील लढा आहे: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
पोस्ट-प्रॉडक्शन, व्हीएफएक्स, अॅनिमेशन, संगीत निर्मितीसाठी भारतात सृजनशील परिसंस्था विकसित करण्यासाठी नेटफ्लिक्स आणि मंत्रालय भागीदारी करणार
Posted On:
26 APR 2022 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 26 एप्रिल 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नेटफ्लिक्सच्या सहकार्याने तयार केलेली ‘आझादी की अमृत कहानियाँ’ ही एक छोटी व्हिडिओ मालिका सुरु केली.
‘आझादी की अमृत कहानी’ हा एक अनोखा उपक्रम आहे जो महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शाश्वतता आणि इतर घटकांसह विविध संकल्पनांवर प्रेरणादायी भारतीयांच्या सुंदर कथा सादर करतो. वैविध्यपूर्ण कथांचा हा संच देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांना प्रेरित आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो.
मंत्रालय आणि नेटफ्लिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडिओंचा पहिला संच तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये देशभरात बदल घडवून आणणाऱ्या सात महिला आहेत ज्यांनी चाकोरीबाहेर पडण्याचे आपले अनुभव सामायिक केले आहेत. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगताना त्यांनी त्यांचे वर्णन‘निसर्गाची शक्ती’ म्हणून केले आहे. भारतातील विविधतेचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या दोन मिनिटांच्या या लघुपटांचे चित्रीकरण देशभरातील विविध ठिकाणी करण्यात आले आहे आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी निवेदन केले आहे.
बदल घडवणाऱ्या पहिल्या संचातील सात महिला पुढीलप्रमाणे -
बसंती देवी, पद्म पुरस्कार विजेत्या पिथौरागढ येथील पर्यावरणवादी आहेत , ज्या कोसी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ओळखल्या जातात.
अंशु जमसेनपा, 2017 मध्ये पाच दिवसांमध्ये दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली महिला म्हणून गौरवण्यात आलेली पद्मश्री पुरस्कार विजेती
हर्षिनी कान्हेकर, भारतातील अग्निशमन दलातील पहिल्या महिला कर्मचारी या देखील या प्रकाशनाला उपस्थित होत्या.
पूनम नौटियाल, एक आरोग्य सेवा कर्मचारी असून उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात सर्वांचे लसीकरण करण्यासाठी मैलोनमैल चालत गेल्या आहेत.
डॉ. टेसी थॉमस, भारतातील क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व करणारी पहिली महिला वैज्ञानिक
तन्वी जगदीश, भारतातील पहिली स्टँड-अप पॅडलबोर्डर स्पर्धक महिला
आणि
आरोही पंडित, लाइट स्पोर्ट विमानातून अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर एकटीने ओलांडणारी जगातील सर्वात तरुण आणि पहिली महिला वैमानिक
बसंती देवी, अंशू आणि हर्षिनी यांचे तीन व्हिडिओ; आणि मालिकेचे संक्षिप्त दर्शन घडवणारा ट्रेलर आज प्रकाशित करण्यात आला. या उदघाटन सोहळ्याला या तिन्ही महिला उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्र्यांनी व्यासपीठावर उपस्थित या तिन्ही महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली आणि त्यांच्या कथा देशभरातील लोकांना प्रेरणा देतील असे सांगितले. "स्वातंत्र्याची कल्पना भारतात स्त्री समानतेशी जोडलेली आहे. आझादी किंवा स्वातंत्र्य या शब्दाचा महिलांसाठी व्यापक सूचक अर्थ ठराविक चौकट, निषिद्ध गोष्टीं विरोधातील लढा असा आहे.” असे त्यांनी नमूद केले.
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स बरोबर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, "या उपक्रमाचा उद्देश भारतीयांच्या प्रेरणादायी कथा सर्वांसमोर आणणे हा आहे जेणेकरून या कथा जास्तीत जास्त लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित आणि सक्षम करतील".
ते पुढे म्हणाले की ही दीर्घकालीन भागीदारी असेल, ज्यात विविध संकल्पना आणि वैविध्यपूर्ण कथा अधोरेखित केल्या जातील. "नेटफ्लिक्स महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शाश्वत विकास आणि इतर महत्त्वाच्या दिवसांसह विविध संकल्पनांवर 25 व्हिडिओ तयार करणार आहे. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जातील आणि दूरदर्शन वाहिन्यांवरून प्रसारित केले जातील", असे ठाकूर यांनी सांगितले.
नेटफ्लिक्स पोस्ट-प्रॉडक्शन, व्हीएफएक्स , अॅनिमेशन, संगीत निर्मितीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून एक सृजनशील परिसंस्था विकसित करण्यासाठी मंत्रालयाबरोबर भागीदारी करेल आणि प्रत्यक्ष तसेच आभासी स्वरूपात याबाबत आयोजन केले जाईल असेही त्यांनी जाहीर केले .
तत्पूर्वी, सचिव अपूर्व चंद्रा यांनी आपल्या प्रारंभिक भाषणात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्स यांच्यातील सहकार्य अधोरेखित केले आणि सांगितले की दोन्ही संस्थांनी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे आणि आज प्रकाशित केलेले हे तीन व्हिडिओ या भागीदारी अंतर्गत तयार केलेले पहिले संच आहेत. ते पुढे म्हणाले की, या अंतर्गत आपल्या स्वातंत्र्यलढ्यावरील दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका आणि जगासमोर आणणे आवश्यक असलेल्या कथा लवकरच सादर केल्या जातील.
याप्रसंगी बोलताना, नेटफ्लिक्सच्या ग्लोबल टीव्हीच्या प्रमुख बेला बजारिया म्हणाल्या की, सुंदर कला, संस्कृती आणि कथाकथन द्वारे गेल्या 75 वर्षांतील भारताच्या उत्क्रांतीची ओळख करून देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाबरोबर भागीदारी केल्याचा नेटफ्लिक्सला अभिमान वाटतो. "नेटफ्लिक्स अशा काळाचा भाग बनण्यास उत्सुक आहे जेव्हा भारतातील कथा जगात निवडल्या जात आहेत आणि सर्वोत्तम भारतीय कथांचा शोध घेतला जात असून जागतिक स्तरावर प्रशंसाही केली जात आहे " असे त्या म्हणाल्या.
Story of Basanti Devi, the savior of Kosi River
Story of Anshu Jamsenpa, the conqueror of Mount Everest
Story of Harshini Kanhekar, brave heart who fights fire for a living
* * *
ST/S.Kakade/Sushma/Vasanti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820190)
Visitor Counter : 238
Read this release in:
Tamil
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam