पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बनासकांठामधील दीयोदर येथील बनास डेअरी संकुल येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले भूमीपूजन आणि देशाला समर्पण


बनास कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे केले उद्घाटन

बनासकांठा जिल्ह्यातील दियोदर येथे 600 कोटी रुपये खर्चून नवीन डेअरी संकुल आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी

पालनपूर येथील बनास डेअरी प्रकल्पात चीज उत्पादने आणि व्हे  पावडर निर्मितीसाठी विस्तारित सुविधा

गुजरातमधील दामा येथे सेंद्रिय खत आणि बायोगॅस प्रकल्पाची स्थापना

खिमाणा, रतनपुरा - भिल्डी, राधनपूर आणि थावर येथे 100 टन क्षमतेच्या चार गोबर गॅस प्रकल्पाची पायाभरणी

"गेल्या अनेक वर्षांमध्ये, बनास डेअरी हे स्थानिक समुदायांचे, विशेषत: शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे बनले  केंद्र"

“बनासकांठाने ज्या पद्धतीने शेतीमध्ये ठसा उमटवला ते कौतुकास्पद.  शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले, जलसंधारणावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचे परिणाम सर्वांनाच पाहायला मिळत आहेत.”

"विद्या समीक्षा केंद्र गुजरातमधील 54,000 शाळा, 4.5 लाख शिक्षक आणि 1.5 कोटी विद्यार्थ्यांच्या सामर्थ्याचे बनले चैतन्यदायी केंद्र"

"मी तुमच्या क्षेत्रात, एखाद्या  सहकाऱ्याप्रमाणे तुमच्या सोबत असेन"

Posted On: 19 APR 2022 1:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनासकांठा जिल्ह्यातील दीयोदर इथे नवीन डेअरी संकुल आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांसाठी 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. नवीन डेअरी संकुल हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे.  हे सुमारे 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यास सक्षम असेल, सुमारे 80 टन लोणी, एक लाख लिटर आइस्क्रीम, 20 टन खवा आणि 6 टन चॉकलेट इथे दररोज तयार करता येतील.  बटाटा प्रक्रिया केंद्र फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, आलू टिक्की, पॅटीज इत्यादी प्रक्रिया केलेल्या बटाटा उत्पादनांचे विविध प्रकार तयार करेल, यापैकी बरेच इतर देशांमध्ये निर्यात केले जातील. हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करतील आणि या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतील.  पंतप्रधानांनी बनास कम्युनिटी रेडिओ केंद्र ही राष्ट्राला समर्पित केले.  हे कम्युनिटी रेडिओ केंद्र शेतकऱ्यांना कृषी आणि पशुपालनाशी संबंधित महत्त्वाची वैज्ञानिक माहिती देण्यासाठी स्थापन केले आहे. हे रेडिओ केंद्र सुमारे 1700 गावांतील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांशी जोडले जाईल अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधानांनी पालनपूर येथील बनास डेअरी प्रकल्पात चीज उत्पादने आणि व्हे  पावडरच्या उत्पादनासाठी विस्तारित सुविधा राष्ट्राला समर्पित केल्या.  तसेच, पंतप्रधानांनी गुजरातमधील दामा येथे स्थापित सेंद्रिय खत आणि बायोगॅस प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला.  खिमाना, रतनपुरा - भिल्डी, राधनपूर आणि थावर येथे स्थापन करण्यात येणाऱ्या 100 टन क्षमतेच्या चार गोबर गॅस प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.  यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी, पंतप्रधानांनी बनास डेअरीसोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल ट्विट केले आणि 2013 आणि 2016 मधील त्यांच्या भेटीतील छायाचित्रे सामायिक केली. गेल्या अनेक वर्षांमध्ये, बनास डेअरी स्थानिक समुदायांच्या, विशेषत: महिला आणि शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणाचे केंद्र बनले आहे. मला विशेषतः डेअरीच्या उत्साहपूर्ण नवोन्मेषाचा अभिमान आहे. तो त्यांच्या विविध उत्पादनांमध्ये दिसून येतो. त्यांचे मध उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यातील सातत्यही प्रशंसनीय आहे असे पंतप्रधान म्हणाले.

बनासकांठातील लोकांच्या प्रयत्न आणि ध्येयासक्तीची त्यांनी प्रशंसा केली.

बनासकांठामधील लोकांचे कठोर परिश्रम आणि समर्पित भावनेबद्दल मी त्यांचे कौतुक करू इच्छितो.  या जिल्ह्याने ज्या पद्धतीने कृषी क्षेत्रात ठसा उमटवला आहे ते कौतुकास्पद आहे.  शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले, जलसंधारणावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचे परिणाम सर्वांनाच पाहायला मिळत आहेत. असे ते म्हणाले.

माता अंबाजीच्या पवित्र भूमीला नमन करून पंतप्रधानांनी आज आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी बनासच्या महिलांचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांच्या अदम्य भावनेबद्दल आदर व्यक्त केला. गावाची अर्थव्यवस्था आणि भारतातील माता-भगिनींचे सक्षमीकरण कशाप्रकारे बळकट होऊ शकते आणि सहकार चळवळ स्वावलंबी भारत मोहिमेला कसे बळ देऊ शकते हे येथे प्रत्यक्ष अनुभवता येते असे पंतप्रधान म्हणाले.  काशीचे खासदार या नात्याने वाराणसीमध्येही संकुल उभारल्याबद्दल बनास डेअरी आणि बनासकांठामधील लोकांचे पंतप्रधानांनी आभार मानले.

बनास डेरी संकुलातील चीज आणि व्हे भुकटीच्या निर्मितीसाठी सुरु करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांच्या विस्तारविषयक कामांची नोंद घेताना, दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या विस्तारासाठी हे सर्वच प्रकल्प महत्त्वाचे आहेत असे सांगून पंतप्रधान म्हणाले, स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी इतर साधनसंपत्ती देखील वापरता येऊ शकते हे बनास डेरीने सिद्ध केले आहे. ते म्हणाले की  बटाटा, मध आणि अशाच प्रकारची इतर उत्पादने शेतकऱ्यांचे नशीब बदलून टाकत आहेत. खाद्यतेल आणि शेंगदाणा या क्षेत्रात डेरीच्या विस्तारित कार्याची दाखल घेत ते म्हणाले की, हा विस्तार व्होकल फॉर लोकलअभियानाला देखील पूरक ठरला आहे. गोवर्धन येथील डेरीच्या प्रकल्पांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली तसेच अशा प्रकारचे प्रकल्प संपूर्ण देशभरात स्थापन करून टाकाऊ गोष्टींपासून उत्पन्न मिळविण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या प्रयत्नांना देखील या डेरी प्रकल्पांमुळे पाठबळ मिळत असल्याबद्दल डेरी संचालकांचे कौतुक केले. ते म्हणाले की, गावांमध्ये स्वच्छता राखणे, स्थानिक शेतकऱ्यांना शेणापासून उत्पन्न मिळवून देणे, वीजनिर्मिती करणे आणि नैसर्गिक खतांच्या वापराच्या माध्यमातून पृथ्वीचे संरक्षण करणे यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प उपयुक्त ठरणार आहेत. असे उपक्रम आपल्या गावांना आणि महिलावर्गाला सशक्त करतील आणि आपल्या धरतीमातेचे संरक्षण करतील असे त्यांनी सांगितले.

गुजरातने केलेल्या प्रगतीबद्दल  अभिमान व्यक्त करताना पंतप्रधानांनी काल विद्या समीक्षा  केंद्राला दिलेल्या भेटीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र नवीन उंची गाठत आहे. आज हे केंद्र गुजरातमधील 54 हजार  शाळा, 4.5 लाख शिक्षक आणि 1.5 कोटी विद्यार्थ्यांच्या सामर्थ्याचे  केंद्र बनले आहे. हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता , मशीन लर्निंग आणि बिग डेटा अॅनालिटिक्सने सुसज्ज आहे. या उपक्रमाअंतर्गत  केलेल्या उपाययोजनांमुळे शाळांमधील उपस्थिती 26 टक्क्यांनी वाढली आहे. पंतप्रधान म्हणाले की अशा  प्रकारचे प्रकल्प देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेत  दूरगामी बदल घडवून आणू शकतात आणि शिक्षणाशी संबंधित हितधारक, अधिकारी आणि इतर राज्यांना या प्रकारच्या सुविधेचा अभ्यास करून त्याचा अवलंब करायला सांगितले.

यावेळी पंतप्रधानांनी गुजराती भाषेतही भाषण केले. बनास डेअरीने केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी पुन्हा एकदा आनंद व्यक्त केला तसेच बनासच्या महिलांच्या कर्तृत्वाचे  कौतुक केले. त्यांनी बनासकांठामधील महिलांना वंदन  केले , या महिला आपल्या  मुलांप्रमाणे गुरांची काळजी घेतात. पंतप्रधानांनी बनासकांठामधील लोकांवरील प्रेमाचा पुनरुच्चार केला आणि ते जिथे जातील तिथे नेहमीच त्यांच्याशी जोडले जातील असे सांगितले. मी तुमच्या क्षेत्रात, एखाद्या  सहकाऱ्याप्रमाणे तुमच्या सोबत असेन, असे पंतप्रधान म्हणाले.

बनास डेअरीने देशात नवी आर्थिक ताकद निर्माण केली आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की बनास डेअरी चळवळ उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, ओदिशा  (सोमनाथ ते जगन्नाथ), आंध्र प्रदेश आणि झारखंड सारख्या राज्यांमधील शेतकरी आणि पशुपालन समुदायांना मदत करत आहे. दुग्धव्यवसाय आज शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हातभार लावत आहे. ते म्हणाले की, 8.5 लाख कोटी रुपयांच्या दुग्धोत्पादनासह, दुग्धव्यवसाय हे पारंपरिक अन्नधान्यांपेक्षा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे मोठे माध्यम म्हणून उदयास येत आहे, विशेषतः शेतीमध्ये   जमीन अल्प प्रमाणात आहे  आणि परिस्थिती कठीण आहे. शेतकर्‍यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण  केले जात असल्याबद्दल  पंतप्रधान म्हणाले की, आता लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण लाभ पोहचत आहेत , पूर्वीच्या पंतप्रधानांनी म्हटले होते की पूर्वी एका रुपयातले केवळ 15 पैसे लाभार्थीपर्यंत पोहोचायचे.

नैसर्गिक शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी बनासकांठाने जलसंधारण आणि ठिबक सिंचन पद्धती स्वीकारल्याचे नमूद केले. पाण्याला 'प्रसादआणि सोने माना असे सांगतानाच त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात 2023 च्या स्वातंत्र्य दिनापर्यंत देशभरात 75 भव्य सरोवरे बांधण्यात यावीत असे त्यांनी  सांगितले.

***

Jaydevi PS/V.Ghode/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818029) Visitor Counter : 262