राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिसरे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान; जलशक्ती अभियान: वर्षा जलसंधारण अभियान 2022 चा केला आरंभ

Posted On: 29 MAR 2022 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2022


जल व्यवस्थापन क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण आणि आपल्या दैनंदिन जीवनात तसेच आपल्या धरेवर पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जल मोहिमेचा विस्तार करणे कौतुकास्पद आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. 'जल शक्ती अभियान: वर्षा जलसंधारण (कॅच द रेन) 2022' ची सुरुवात करताना करताना खूप आनंद होत आहे असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले.  मोहिमेच्या या टप्प्यात ठरवलेल्या ध्येयावर काम करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. जलसंधारणाच्या कामात प्रत्येक व्यक्तीचा सक्रिय सहभाग असावा यासाठी स्थानिक जनतेला प्रेरित करण्याकरता जिल्हा दंडाधिकारी आणि गावच्या सरपंचांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे असेही ते म्हणाले. 

इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात राबवली जात आहे, त्याच प्रकारे आपण सर्वांनी मिळून ही मोहीम इतिहासातील सर्वात मोठी जलसंधारण मोहीम बनवू, अशी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

'पाणी हे जीवन आहे' असे म्हणणे अगदीच संयुक्तिक ठरेल असे राष्ट्रपतींनी सांगितले.  निसर्गाने मानवाला जलस्त्रोतांचे वरदान दिले आहे.  त्याने आपल्याला विस्तीर्ण नद्या दिल्या आहेत, त्यांच्या काठावर महान संस्कृतींचा विकास झाला. भारतीय संस्कृतीत नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांची माता म्हणून पूजा केली जाते. 

उत्तराखंडमधील गंगा आणि यमुना, मध्य प्रदेशातील नर्मदा आणि बंगालमधील गंगा-सागर या नद्या, आपण पूजेसाठी समर्पित ठिकाणे ठेवली आहेत.  अशा धार्मिक प्रथा आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतात.  तलाव आणि विहिरींचे बांधकाम हे पुण्यपूर्ण कार्य मानले जात असे. दुर्दैवाने आधुनिकता आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या आगमनाने आपण निसर्गाशी असलेला संबंध गमावला आहे. लोकसंख्या वाढ हा देखील एक घटक आहे.  ज्या निसर्गाने आपल्याला टिकवून ठेवले आहे त्यापासून आपण तुटलो आहोत असे आढळते.  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि यमुनेच्या ठायी प्रार्थना करण्यासाठी आपण यमुनोत्रीचा खडतर प्रवास करतो.  पण जेव्हा आपण राजधानी दिल्लीत परततो तेव्हा आपल्याला आढळते की तीच नदी अत्यंत प्रदूषित झाली आहे आणि ती आता आपल्या शहरी जीवनात उपयुक्त नाही. शहरांना वर्षभर पाणी पुरवणाऱ्या तलावांसारखे जलस्रोतही शहरीकरणाच्या दबावाखाली नाहीसे झाले आहेत.  त्यामुळे जलव्यवस्थापन कोलमडले आहे.  भूगर्भातील पाण्याचे प्रमाण कमी होत असून त्याची पातळीही खाली जात आहे.  एकीकडे शहरांना दूरवरून पाणी आणावे लागते आणि दुसरीकडे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबते असे राष्ट्रपतींनी सांगितले. गेल्या काही दशकांपासून शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञमंडळीही जलव्यवस्थापनाच्या या विरोधाभासाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. भारतात, ही समस्या अधिक गंभीर ठरते, कारण आपल्या देशात जगाच्या लोकसंख्येपैकी 18 टक्के लोकसंख्या आहे, तर आपल्याकडे फक्त 4 टक्के गोड्या पाण्याचे स्रोत आहेत.  पाण्याची उपलब्धता अनिश्चित आहे आणि ती बऱ्याच अंशी पावसावर अवलंबून असते.

पाण्याचा प्रश्न हा हवामान बदलाच्या आणखी मोठ्या संकटाचा एक भाग आहे.  हवामानात बदल होत असताना, पूर आणि दुष्काळाची परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत आहे. हिमालयातील हिमनद्या वितळत आहेत आणि समुद्राची पातळी वाढत आहे. अशा बदलांचे गंभीर परिणाम समोर येत आहेत, ज्याचा परिणाम शेतकरी, महिला आणि गरिबांच्या जीवनावर होत आहे असे राष्ट्रपती म्हणाले.

राष्‍ट्रपतींच्‍या संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा 


* * *

S.Thakur/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1810928) Visitor Counter : 274