शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तणाव मुक्त परीक्षांसाठी परीक्षा पे चर्चा ही लोकचळवळ बनवण्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन


सर्जनशील लेखन स्पर्धेसाठी उत्साहाने 15 लाख 70 हजार जणांची नोंदणी

Posted On: 28 MAR 2022 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाच्या पाचव्या सत्रामध्ये जगभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकाशी 1 एप्रिल 2022 रोजी संवाद साधणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ही माहिती दिली. 

'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाला लोकचळवळ असे संबोधून केंद्रीय मंत्री प्रधान यांनी देश कोविड-19 महामारीच्या सावटाखालून बाहेर येत असताना आणि परीक्षा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाची रूपरेषा विशद केली.

एकविसाव्या शतकातील ज्ञानाधारित अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी परीक्षा पे चर्चा सारख्या उपक्रमांचे महत्व अधोरेखित करताना ते म्हणाले की परीक्षा पे चर्चा ही एक औपचारिक संस्था बनू लागली आहे जिच्या माध्यमातून पंतप्रधान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात.

देशभरातील निवडक विद्यार्थी संबंधित राज्यांच्या राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या समवेत हा उपक्रम बघणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.

देशभरातील राज्य सरकारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे प्रक्षेपण फक्त भारतातच नाही तर प्रामुख्याने भारतीय रहात  असलेल्या इतर देशांतही होणार आहे. या कार्यक्रमाला लोकचळवळ बनवून विद्यार्थ्याना तणावरहित परीक्षांची खात्री देण्यासाठी माध्यमांनी योग्य ते सहकार्य करावं आवाहनही धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी केले.

या उपक्रमाचे हे पाचवे सत्र  नवी दिल्लीत ताल कटोरा स्टेडियमवरून सकाळी 11 वाजल्यापासून टाऊन हॉलमध्ये परस्पर संवादी स्वरूपात होईल. भारत तसेच भारताबाहेरीलही करोडो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यात भाग घेतील असे त्यांनी नमूद केले.

जे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना पंतप्रधानांना प्रश्न विचारणार आहेत त्यांची यादी  विविध प्रकारच्या संकल्पनांवर आधारित सर्जनशील लेखनाच्या ऑनलाइन स्पर्धेच्या माध्यमातून तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही स्पर्धा 28 डिसेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 या कालावधीत MyGov मंचाच्या माध्यमातून घेतली गेली होती.

यावर्षी या सर्जनशील लेखन स्पर्धेसाठी 15 लाख 70 हजार सहभागींनी नोंदणी केली होती याबद्दल मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले. Mygov वरील स्पर्धेतून निवडल्या गेलेल्या सहभागींना प्रशस्तीपत्रक  आणि पंतप्रधानांनी लिहिलेले एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक असलेले खास 'परीक्षा पे चर्चा' हे किट  मिळेल.

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1810715) Visitor Counter : 258