पंतप्रधान कार्यालय

जपानच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले संयुक्त निवेदन

Posted On: 19 MAR 2022 10:55PM by PIB Mumbai

महामहिम पंतप्रधान किशिदा,

मान्यवर प्रतिनिधी,

नमस्कार!

 

भारताच्या भेटीला प्रथमच आलेले जपानचे पंतप्रधान किशिदा यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.

जपानमध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल मी संपूर्ण भारताच्या वतीने सहानुभूती व्यक्त करतो.

 

मित्रांनो,

पंतप्रधान किशिदा हे भारताचे जुने मित्र आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा भारताला भेट दिली होती आणि मला त्यांच्याशी विचार विनिमय करण्याची संधी मिळाली होती.  गेल्या काही वर्षांत भारत-जपान यांच्यातील  विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीमध्ये अभूतपूर्व प्रगती करण्यात पंतप्रधान किशिदा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


आजची शिखर परिषद अत्यंत महत्त्वाच्या वेळी आयोजित करण्यात आली आहे. जग अजूनही कोविड-19 संकटाशी झुंज देत आहे.

 

जागतिक आर्थिक पुनरुत्थानाच्या प्रक्रियेत अजूनही अडथळे येत आहेत.


भौगोलीक-राजकीय घडामोडीही नवी आव्हाने उभी करत आहेत.


या संदर्भात, भारत-जपान भागीदारी आणखी वाढवणे हे दोन्ही देशांसाठीच महत्त्वाचे आहे. यामुळे भारत-प्रशांत महासागर प्रदेशात आणि संपूर्ण जागतिक स्तरावर शांतता, समृद्धी आणि स्थिरतेला प्रोत्साहन मिळेल.


आमचा परस्परांवरील  विश्वास, आमची सामायिक मूल्ये जसे आमचे सांस्कृतिक संबंध, लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य, हा आमच्या संबंधांचा गाभा आहे, ज्यामुळे त्यांना बळ मिळते.

आज आमच्यात झालेल्या चर्चेने आमच्यातील परस्पर सहकार्याला नवीन उंचीवर नेण्याचा मार्ग मोकळा केला आहे.


द्विपक्षीय मुद्द्यांसह अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आम्ही विचार विनिमय केला आहे.


आम्ही संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आमचा समन्वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


 मित्रांनो,

भारत-जपान आर्थिक भागीदारीने गेल्या अनेक वर्षांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. दोन्ही देशांच्या व्यवसायात प्रचंड विश्वास, उत्साह आहे. जपान हा भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक,जागतिक दर्जाचा भागीदार, आहे.

 

या योगदानाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत.


मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची प्रगती चांगली होत आहे. 'वन टीम वन प्रोजेक्ट' या दृष्टीकोनातून दोन्ही देश यावर काम करत आहेत. हा प्रकल्प भारत-जपान भागीदारीचे उत्तम उदाहरण आहे.


मला आनंद आहे की आम्ही 2014 मध्ये निर्धारित केलेले 3.5 ट्रिलियन जपानी येनचे गुंतवणुकीचे लक्ष्य ओलांडले आहे.


आता आम्ही आमच्या आकांक्षाना नव्या उंचीवर नेण्याचे ठरवले आहे आणि येत्या पाच वर्षांत 5 ट्रिलियन येन म्हणजेच सुमारे तीन लाख वीस हजार कोटी रुपयांचे नवीन लक्ष्य ठेवले आहे.


तुम्हा सर्वांना माहीत आहे, की गेल्या काही वर्षांत भारताने सर्वसमावेशक आर्थिक सुधारणांचा अवलंब केला आहे आणि व्यवसाय सुलभतेत (ईज ऑफ डुईंग बिझनेस) मोठी झेप घेतली आहे.

आज भारताने "जगासाठी मेक इन इंडिया"या मंचावरून अमर्याद शक्यता निर्माण केल्या आहेत.  


या संदर्भात, जपानी कंपन्या बर्‍याच काळापासून आमच्या प्रसिद्धी दूत(ब्रँड ॲम्बेसेडर) आहेत.

 

तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रातील आमच्यातील भागीदारीत नवीन आयाम तयार होत आहेत.


जपानी कंपन्यांना भारतात अनुकूल वातावरण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.


आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारत-जपान औद्योगिक स्पर्धात्मक भागीदारीच्या आराखड्यावरून ही एक प्रभावी यंत्रणा आहे,हे सिद्ध होईल.


जपानसोबतची आमची कौशल्य भागीदारीही या दिशेने प्रभावी भूमिका बजावेल.


मित्रांनो,

सुरक्षित, विश्वासार्ह, अंदाज लावता येण्याजोगी आणि स्थिर ऊर्जा पुरवठ्याचे महत्त्व भारत आणि जपान या दोघांनाही समजले आहे.


शाश्वत आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि हवामान बदलाच्या समस्येला तोंड देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.


आमची स्वच्छ ऊर्जा भागीदारी या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरेल.

 

आज आमचे इतर अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर एकमत झाले आहे आणि घोषणाही जाहीर झाल्या आहेत.


पंतप्रधान किशिदा यांचा हा दौरा भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला नवे आयाम देण्यात यशस्वी ठरला आहे.

पुन्हा एकदा, मी पंतप्रधान किशिदा आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो.


 धन्यवाद!

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1807403) Visitor Counter : 418