युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2022 च्या राष्ट्रीय फेरीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले
भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे जेंव्हा आपण पूर्ण करू तेव्हा भारताचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवीन उपाय योजना सुचवा : अनुराग ठाकूर
Posted On:
10 MAR 2022 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2022
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात तिसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या (NYPF) 2022 च्या राष्ट्रीय फेरीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले.
आपल्या भाषणादरम्यान अनुराग ठाकूर म्हणाले, “या वर्षीच्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाची संकल्पना ‘नव्या भारताचा आवाज बना आणि उपाय शोधा आणि धोरण आखणीत योगदान द्या’ अशी आहे. घनकचरा व्यवस्थापन, उपासमार निर्मूलन, लैंगिक समानता, परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, मी तुम्हाला विनंती करतो की, आपण आतापर्यंत केलेल्या प्रगतीवर चर्चा करा आणि स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत असताना भारताचे परिवर्तन घडवणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर करा. आरोग्य, क्रीडा, प्रसारमाध्यमं, वाहतूक, पायाभूत सुविधा, परदेशी घडामोडी या क्षेत्रात तरुण काय करू शकतात ज्यामुळे शंभर कोटी लोकांचे जीवन बदलेल? 1 अब्ज लोक मानवतेच्या भविष्यासाठी आणि 'जीवन सुलभतेसाठी' कशा प्रकारे योगदान देऊ शकतात?"
केंद्रीय मंत्री ठाकूर पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांची विचारधारा पुढे नेत राष्ट्रीय युवा संसदेने युवकांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युवकांनी या संधीचा उपयोग स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला 11 मार्च, 2022 रोजी राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभाला संबोधित करतील. अव्वल तीन राष्ट्रीय विजेत्यांना देखील समारोप समारंभात लोकसभा अध्यक्षांसमोर बोलण्याची संधी मिळेल.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव (NYPF) हा तरुणांचा आवाज ऐकण्यासाठी आयोजित केला जातो, जे सार्वजनिक सेवांसह आगामी वर्षांमध्ये विविध क्षेत्रात सामील होतील. पंतप्रधानांनी 31 डिसेंबर 2017 रोजी आपल्या ‘मन की बात’ संबोधनात मांडलेल्या कल्पनेवर राष्ट्रीय युवा संसद महोत्सव आधारित आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 87 विजेत्यांना (62 महिला आणि 25 पुरुष) संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात उपस्थित राहण्याची संधी मिळते. राज्य युवा संसद (SYP) च्या 29 विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावरील परीक्षकांसमोर (ज्युरी) बोलण्याची संधी मिळते आणि राष्ट्रीय स्तरावरील तीन अंतिम विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि पुरस्कार (रुपये 2,00,000, रुपये 150,000, रुपये 100,000 रोख बक्षिसे) आणि 2 उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी 50,000 रुपये प्रदान केले जातील.
S.Thakur/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804781)
Visitor Counter : 267