वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

डीपीआयआयटी करणार पीएम गतिशक्ती विषयीच्या पहिल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आयोजन


सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र आणण्याचा वेबिनारचा उद्देश

गतिशक्तीचा दृष्टीकोन आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये त्यावर असलेला भर याविषयी सहभागींसमोर पंतप्रधान करणार विवेचन

Posted On: 27 FEB 2022 2:56PM by PIB Mumbai

 

यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय कृती आराखड्याला चालना देण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अर्थसंकल्पपश्चात आपल्या पहिल्या वेबिनारचे आयोजन करत आहे. गतिमान आर्थिक वृद्धीसाठी समन्वयाची निर्मिती ही या वेबिनारची संकल्पना असून सोमवारी 28 फेब्रुवारी 2022 रोजी त्याचे आयोजन होणार आहे.

या वेबिनारमध्ये संबंधित मंत्रालयांमधील वरिष्ठ अधिकारी, आघाडीच्या शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत आणि भारताच्या लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्याच्या धोरणांबाबत चर्चा करणार आहेत आणि त्याची रुपरेषा तयार करणार आहेत.

या वेबिनारमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संबंधितांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी गतिशक्तीचा दृष्टीकोन आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये त्यावर असलेला भर याविषयी विवेचन करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल या वेबिनारच्या समारोपाच्या सत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. यामध्ये विविध क्षेत्रातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत आणि यासंदर्भात अधिक सविस्तर चर्चा करणार आहेत.

पंतप्रधानांच्या संबोधनानंतर भारतातील लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विविध पैलूंचा  आढावा घेणारी पाच वेगवेगळी सत्रे होणार आहेत.

डीपीआयआयटी विभागाचे सचिव अनुराग जैन पहिल्या सत्राचा प्रारंभ करतील. एकात्मिक नियोजन आणि समन्वयित कालबद्ध अंमलबजावणीसाठी एक नवा दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी संपूर्ण देश ही भावना या विषयावर हे सत्र आयोजित होणार आहे. या सत्रामध्ये गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा या भास्कराचार्य इन्स्टिट्युट ऑफ स्पेस ऍप्लिकेशन जियो इन्फरमॅटिक्सने विकसित केलेल्या पोर्टलवर सविस्तर चर्चा होणार आहे. गतिमान भौगोलिक माहितीच्या प्रणालीच्या माध्यमातून सर्व संबंधितांना रियल टाईम माहिती या पोर्टलद्वारे उपलब्ध होणार आहे.

भूतकाळातून धडा घेऊन भावी पिढीतील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा पीएम गतिशक्तीचा उद्देश आहे.

पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा हा एक एकात्मिक आराखडा असून त्यामुळे प्रगतीपथावर असलेल्या विविध योजनांमधील तफावत दूर होणार आहे आणि त्यामुळे लोक, माल आणि सेवा यांची ये-जा सहजतेने होणार आहे. यामुळे जीवनमान सुकर करणे, व्यवसायसुलभता यामध्ये आणखी वाढ करणे आणि योजनांमधील अडथळे दूर करण्यात आणि प्रकल्पांच्या पूर्ततेला गती देणे आणि प्रकल्प  किफायतशीर बनवणे शक्य होणार आहे.

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801589) Visitor Counter : 198