पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशचा 36 वा स्थापना दिन आणि सुवर्ण जयंती समारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 20 FEB 2022 3:56PM by PIB Mumbai

 

अरुणाचल प्रदेशातील माझ्या बंधू आणि भगिनींनो!

जयहिंद!

अरुणाचल प्रदेशच्या 36 व्या (छत्तीसाव्या) राज्य स्थापनानिमित्त तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन!  50 वर्षांपूर्वी, नेफाला एक नवीन नाव,नवीन ओळख अरुणाचल प्रदेशच्या रूपाने देण्यात आली होती.  उगवत्या सूर्याचा प्रदेश  ही ओळख, ही नवी उर्जा, गेल्या  50 वर्षांत तुम्ही सर्व कष्टकरी, राष्ट्रभक्त भगिनी आणि बांधवांनो, तुम्ही सतत  बळकट केली आहे.  अरुणाचलची ही भव्यता पाहून पाच दशकांपूर्वी भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका जी यांनी 'अरुणाचल हमारा' या नावाचे  एक गाणे लिहिले होते.  मला माहित आहे की हे गाणे प्रत्येक अरुणाचल रहिवाशाला अतिशय आवडते, या गाण्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. म्हणूनच तुमच्याशी बोलताना मला या गाण्याच्या काही ओळीही म्हणाव्याशा वाटतात.

अरुण किरण शीशभूषण,

अरुण किरण शीशभूषण,

कंठ हिम की धारा

प्रभात सूरज चुम्बित देश,

अरुणाचल हमारा

अरुणाचल हमारा

भारत मां का राजदुलारा

भारत मां का राजदुलारा

अरुणाचल हमारा!

 

मित्रांनो,

देशभक्ती आणि सामाजिक समरसतेच्या ज्या  भावनेने अरुणाचल प्रदेशाला नवी उंची दिली आहे,आपला सांस्कृतिक वारसा  ज्या प्रकारे तुम्ही जोपासला आहे, परंपरा आणि प्रगती दोन्ही जपत आपण जी वाटचाल करत आहात ती  संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे.

 

मित्रांनो,

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील त्या सर्व हुतात्म्यांचेही  देश स्मरण करत आहे.  अँग्लो-अबोर युद्ध असो किंवा स्वातंत्र्यानंतर सीमेचे रक्षण, अरुणाचलच्या लोकांच्या शौर्याच्या गाथा हा प्रत्येक भारतीयाचा अनमोल वारसा आहे.  हे माझे भाग्य आहे, की तुमच्यासमवेत संवाद साधण्याची संधी मला अनेकवेळा मिळाली आहे.  तुम्ही ज्या आकांक्षेने आमच्यावर विश्वास दर्शवला,तो आमचे मुख्यमंत्री , युवा मुख्यमंत्री पेमा खांडू जी यांच्या नेतृत्वाने सार्थ ठरवला याबद्दल मला खूप समाधान आहे.  तुमचा विश्वास डबल इंजिन सरकारला अधिक काम करण्यास प्रोत्साहित करतो आणि अधिक प्रयत्न करण्याची शक्ती देतो. सब का साथ,सब का विकास आणि सब का प्रयास' हा मार्ग अरुणाचल प्रदेशचे उज्वल भविष्य सुनिश्चित करणारा आहे.

 

मित्रांनो,

21व्या शतकात पूर्व भारत आणि विशेषतः ईशान्य भारत देशाच्या विकासाचे इंजिन बनेल, असा माझा विश्वास आहे.  याच भावनेने, अरुणाचल प्रदेशच्या विकासाला गती देण्यासाठी गेल्या 7 वर्षात अभूतपूर्व काम करण्यात आले आहे.  कनेक्टीव्हिटी आणि ऊर्जेशी निगडीत पायाभूत सुविधांवर व्यापक काम  यामुळे आज अरुणाचलमध्ये जीवन आणि व्यापार उदीम  करणे  अधिक सुलभ झाले आहेत.ईटानगर  शहरासह ईशान्येकडील सर्व राजधान्यांना रेल्वेने  जोडणे याला  आम्ही प्राधान्य दिले आहे.  अरुणाचलला पूर्व आशियाचे प्रमुख प्रवेशद्वार बनवण्यासाठी आम्ही आमच्या सर्व शक्तीनिशी प्रयत्नशील आहोत.  राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अरुणाचल प्रदेशची भूमिका लक्षात घेऊन इथे आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.

 

मित्रांनो,

प्रगती, निसर्ग, पर्यावरण आणि संस्कृती यांत सुसंगती  साधत आपण अरुणाचल मध्ये वाटचाल करत आहोत.आपल्या परीश्रमांनी  तुम्ही आज देशातील सर्वात महत्त्वाच्या जैव-विविधता क्षेत्रांपैकी एक आहात.  अरुणाचलच्या विकासासाठी पेमा खांडूजी सतत प्रयत्नशील पाहून मला अतिशय आनंद होतो.  आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, बचत गट अशा प्रत्येक विषयावर ते सक्रिय असतात.  देशाचे विधी मंत्री किरेन रिजिजू जी  यांच्याशी बातचीत करतो तेव्हा त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेशला पुढे नेण्यासाठी नवीन संकल्पना असतात, सूचना असतात.  प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करून पाहण्याची ऊर्मी त्यांच्यात दिसून येत असते.

 

मित्रांनो,

निसर्गाने अरुणाचलला आपल्या खजिन्यातून खूप काही दिले आहे.  तुम्ही निसर्गाला जीवनाचा भाग बनवला आहे.  अरुणाचलची पर्यटन क्षमता संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  आज या निमित्ताने मी तुम्हाला पुन्हा आश्वासन देतो की डबल इंजिन सरकार,अरुणाचल प्रदेशची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर  ठेवणार नाही.  तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्थापना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

खूप खूप धन्यवाद!

***

N.Chitale/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799828) Visitor Counter : 250