अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्यासाठीच्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान केंद्रस्थानी


‘आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा भाग म्हणून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेसाठी नवीन खुल्या मंचाची घोषणा, “डिजिटल इंडिया” च्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल

राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम, 23 उत्कृष्ट टेली- मानसिक आरोग्य केंद्रांचे नेटवर्क, तयार करणार

Posted On: 01 FEB 2022 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी तंत्रज्ञान केंद्रस्थानी ठेवले आहे. दोन नवीन डिजिटल  योजना जाहीर केल्या आहेत ज्या संपूर्ण देशभरात आरोग्य आणि वैद्यकीय सेवेच्या प्रवेशाचा विस्तार करण्यात डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका दर्शवितात.

आज केलेल्या घोषणांमध्ये कोविड-19 महामारीचा ठसा दिसून येतो. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी  त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीस, ज्यांना महामारीचा प्रतिकूल आरोग्य आणि आर्थिक परिणाम सहन करावा लागला त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. गेल्या दोन वर्षात आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने झालेल्या सुधारणांमुळे देश आव्हानांना तोंड देण्याच्या मजबूत स्थितीत आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात, त्यांनी नमूद केले की लसीकरण मोहिमेचा वेग आणि व्याप्ती यामुळे महामारी विरुद्ध लढण्यासाठी खूप मदत झाली आहे. "मला विश्वास आहे की 'सबका प्रयास' यामुळे आम्ही आमचा मजबूत विकासाचा प्रवास सुरू ठेवू,"  असे अर्थमंत्री म्हणाल्या.

निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले की गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील उपक्रमांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे आणि या अर्थसंकल्पातही पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, लसीकरण कार्यक्रमाची जलद अंमलबजावणी आणि सध्याच्या महामारीच्या लाटेला देशव्यापी लवचिक प्रतिसाद हे सर्वांसाठी स्पष्ट आहेत, असे त्यांनी नमूद केले.

आयुष्मान भारत डिजिटल अभियान 

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेसाठी एक नवीन खुले व्यासपीठ आणले जाईल. यामध्ये सर्वसमावेशकपणे आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांच्या डिजिटल नोंदणी, प्रत्येकाची नेमकी आरोग्य ओळख, संमती आराखडा यांचा समावेश असेल आणि आरोग्य सुविधांमध्ये सार्वत्रिक प्रवेश प्रदान करेल.

राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मान्य केले की, साथीच्या रोगामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश मिळावा यासाठी, आज ‘राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 23 उत्कृष्ट टेली-मानसिक आरोग्य केंद्रांचे नेटवर्क समाविष्ट असेल, ज्यामध्ये NIMHANS हे नोडल केंद्र असेल. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी-बंगलोर (IIITB) तंत्रज्ञान सहाय्य प्रदान करेल.

 

* * *

G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1794244) Visitor Counter : 353