पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी करिअप्पा मैदान येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मेळाव्याला संबोधित केले


"एनसीसीमध्ये मिळालेले प्रशिक्षण आणि शिक्षणामधून मला देशाप्रति माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी खूप बळ मिळाले आहे"

देशाच्या सीमावर्ती भागात 1 लाख नवीन कॅडेट्स तयार करण्यात आले आहेत

"अधिकाधिक मुली एनसीसीमध्ये सहभागी होतील हा आपला प्रयत्न असायला हवा"

“ज्या देशाचे युवक राष्ट्र प्रथम या ध्येयासह पुढे मार्गक्रमण करत आहेत त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही”

"एनसीसी छात्रसैनिक चांगल्या डिजिटल सवयींमध्ये मोठी भूमिका बजावू शकतात आणि चुकीची माहिती आणि अफवांविरोधात लोकांना जागरूक करू शकतात"

"संकुले अंमलीपदार्थ-मुक्त ठेवण्यात एनसीसी/एनएसएसने सहाय्य करावे"

Posted On: 28 JAN 2022 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मेळाव्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी मानवंदना स्वीकारली, एनसीसीच्या तुकड्यांनी केलेल्या मार्च पास्टचे निरीक्षण केले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकांनी लष्करी कारवाई, स्लिथरिंग, मायक्रोलाइट फ्लाइंग, पॅरासेलिंग तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपले कौशल्य दाखवले. सर्वोत्कृष्ट छात्रसैनिकांना पंतप्रधानांच्या हस्ते पदक आणि बॅटनही देऊन गौरवण्यात आले.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना  या उत्सवात एक वेगळाच उत्साह असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी एनसीसी मधल्या त्यांच्या सहभागाची  अभिमानाने आठवण सांगितली आणि राष्ट्रीय छात्रसैनिक  म्हणून मिळालेल्या प्रशिक्षणाने देशाप्रति असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे बळ मिळाल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी लाला लजपत राय आणि फील्ड मार्शल करिअप्पा यांना राष्ट्र उभारणीतल्या योगदानाबद्दल आदरांजली वाहिली. भारताच्या या दोन्ही शूर सुपुत्रांची आज जयंती आहे.

देश नवीन संकल्पांसह पुढे जात असून या काळात देशात एनसीसी अधिक बळकट करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची पंतप्रधानांनी माहिती दिली.  यासाठी देशात उच्चस्तरीय आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत देशाच्या सीमावर्ती भागात 1 लाख नवीन छात्रसैनिक तयार झाले आहेत, असे ते म्हणाले.

मुली आणि महिलांसाठी संरक्षण आस्थापनांची दारे खुली करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी दिली. एनसीसीमध्ये मोठ्या संख्येने मुलींचा सहभाग असल्याची दखल घेत ते म्हणाले की हे देशाच्या  बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. देशाला तुमच्या योगदानाची गरज आहे आणि त्यासाठी भरपूर संधी आहेत, असे त्यांनी मुलींना सांगितले. ते म्हणाले, आता देशातील मुली सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत आणि महिलांना सैन्यात मोठ्या जबाबदाऱ्या मिळत आहेत. देशाच्या मुली हवाई दलात लढाऊ विमाने उडवत आहेत. "अशा परिस्थितीत जास्तीत जास्त मुली एनसीसी मध्ये सहभागी होतील असा आपला प्रयत्न असायला हवा", असेही ते म्हणाले.

या शतकात जन्मलेल्या बहुतांश छात्रसैनिकांकडे लक्ष वेधत  पंतप्रधानांनी देशाला 2047 च्या दिशेने नेण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. तुमचे प्रयत्न आणि संकल्प आणि या संकल्पांची पूर्तता हेच भारताचे यश आणि उपलब्धी असेल, असे ते म्हणाले. ज्या देशाचे युवक राष्ट्र प्रथम या ध्येयासह पुढे मार्गक्रमण करत आहेत त्याला  जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही असे पंतप्रधान म्हणाले. खेळाच्या मैदानातले भारताचे यश आणि स्टार्टअप परिसंस्था हे याचे उदाहरण आहेत असे पंतप्रधान म्हणाले. अमृत कालमध्ये म्हणजेच आजपासून पुढील 25 वर्षांपर्यंत, आकांक्षा आणि कृतींना देशाच्या विकास आणि अपेक्षांशी जोडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी छात्रसैनिकांना केले. ‘व्होकल फॉर लोकल ’ या मोहिमेमध्ये आजचे तरुण महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतीयांच्या श्रमाने आणि घामाने उत्पादित वस्तू वापरण्याचा आजच्या तरुणांनी संकल्प केला तर भारताचे नशीब बदलू शकते, यावर त्यांनी भर दिला.

आज एकीकडे डिजिटल तंत्रज्ञान आणि माहितीशी संबंधित उत्तम संधी आहेत, तर दुसरीकडे चुकीच्या माहितीचे धोके आहेत, आहेत असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या देशातील सामान्य माणसाने कोणत्याही अफवांना बळी पडू नये हे देखील आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. यासाठी एनसीसी छात्रसैनिक जनजागृती मोहीम राबवू शकतात अशी सूचनाही त्यांनी केली.

एनसीसी किंवा एनएसएस असलेल्या शाळा/महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ पोहचणार नाहीत याकडे लक्ष देण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी छात्रसैनिकांना स्वतः अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा आणि त्याच बरोबर त्यांचा शाळेचा परिसर अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवण्याचा सल्ला दिला. एनसीसी-एनएसएसमध्ये नसलेल्या मित्रांनाही ही वाईट सवय सोडण्यास मदत करा, अशी सूचनाही त्यांनी केली.

पंतप्रधानांनी छात्रसैनिकांना Self4Society पोर्टलशी जोडले जाण्याचे आवाहन केले, जे देशाच्या सामूहिक प्रयत्नांना नवीन ऊर्जा देण्याचे काम करत आहे. 7 हजारांहून अधिक संघटना आणि 2.25 लाख लोक पोर्टलशी जोडले गेले आहेत.

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793368) Visitor Counter : 266