पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करण्यासाठी इंडिया गेट येथे नेताजींचा एक भव्य पुतळा बसवण्यात येणार


या पुतळ्याचे काम पूर्ण होईपर्यंत याच जागेवर नेताजींचा एक हॉलोग्राम पुतळा असेल

पराक्रम दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया गेट येथे होणार हॉलोग्राम पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते 2019 ते 2022 या वर्षासाठी आपदा प्रबंधन पुरस्कारांचे वितरण देखील होणार

Posted On: 21 JAN 2022 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आणि वर्षभर चालणाऱ्या उत्सवांचा एक भाग म्हणून सरकारने इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुतळा ग्रॅनाइटपासून बनवलेला असून स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींच्या अतुलनीय योगदानाला अतिशय समर्पक अभिवादन ठरेल आणि त्यांच्याविषयीच्या देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असेल. हा पुतळा तयार होईपर्यंत त्याच जागी नेताजींचा हॉलोग्राम पुतळा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजता इंडिया गेट येथे नेताजींच्या हॉलोग्राम पुतळ्याचे अनावरण करतील. 30,000 लुमेन्सच्या 4के प्रोजेक्टरद्वारे हा हॉलोग्राम पुतळा दृश्यमान केला जाईल. या ठिकाणी एक अदृश्य, उच्च क्षमतेचा 90% पारदर्शक हॉलोग्राफिक पडदा अशा प्रकारे उभारण्यात आला आहे जो या ठिकाणी भेट देणाऱ्या अभ्यागतांना दिसणार नाही. यावर नेताजींची त्रिमितीय प्रतिमा प्रदर्शित केली जाईल. हा हॉलोग्राम पुतळा 28 फूट उंच आणि 6 फूट रुंद आहे. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान 2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांसाठी आपदा प्रबंधन पुरस्कारांचे देखील वितरण करतील. या कार्यक्रमात एकूण सात पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आणि निःस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्याला ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार सुरू केले आहेत. दरवर्षी 23 जानेवारी रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. संस्थेसाठी 51 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र आणि व्यक्तीसाठी पाच लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

स्वातंत्र्यसैनिकांचा यथोचित सन्मान करण्याचा पंतप्रधानांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. यामध्ये महान स्वातंत्र्यसेनानी आणि दूरदृष्टी असलेले नेते सुभाषचंद्र बोस यांच्यावर विशेष भर आहे. या संदर्भात अनेक पावले उचलण्यात आली असून त्यामध्ये दरवर्षी त्यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याच्या घोषणेचा समावेश आहे. याच भावनेने यंदा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्याची सुरुवात एक दिवस आधी 23 जानेवारीपासून होणार आहे.     

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791674) Visitor Counter : 297