गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी मिशन चा ‘ओपन डेटा वीक’ उपक्रम
उपक्रमात सर्व 100 स्मार्ट शहरे होणार सहभागी; उच्च दर्जाचे डेटासेट्स आणि डेटा ब्लॉग्स स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार
Posted On:
17 JAN 2022 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2022
देशभरातील नागरी व्यवस्थेत, ओपन डेटाचा वापर वाढावा आणि अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय ‘ओपन डेटा सप्ताह’ साजरा करत आहे, अशी घोषणा मंत्रालयाने आज केली.
गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने फेब्रुवारी, 2022 मध्ये सूरत इथे, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- स्मार्ट शहरे : स्मार्ट शहरीकरण’ या विषयवार एक परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या आधी, आयोजित केला जात असलेला हा ओपन डेटा सप्ताह, परिषदेच्या आधीच्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून साजरा केला जात आहे. 17 जानेवारी ते 21 जानेवारी या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहात, ओपन डेटाच्या अधिकाधिक वापराला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले जातील.
या उपक्रमात, देशातील सर्व, 100 स्मार्ट शहरे सहभागी होणार असून, उच्च दर्जाचे डेटासेट्स आणि डेटा ब्लॉग्स, स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. सध्या या पोर्टलवर, 3800 पेक्षा अधिक डेटा सेट्स आणि 60 पेक्षा अधिक डेटा स्टोरीज उपलब्ध आहेत. विविध हितसंबंधियांनी उपलोड केलेला हा डेटा सर्वांसाठी मुक्त स्वरुपात उपलब्ध असून, कोणीही त्याचे विश्लेषण आणि त्यावर आधारित कृतीचा सल्ला देऊ शकेल.
त्याशिवाय, या उपक्रमात, ओपन डेटाच्या वापराचे लाभ, जसे की कार्यक्षमतेत वाढ, पारदर्शकतेत वाढ, नवोन्मेष आणि आर्थिक वृद्धी या सगळ्यांची माहिती दिली जाणार आहे.
देशभरातल्या सर्व स्मार्ट शहरात डेटा डे निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात चर्चासत्रे, परिषदा, हकेथॉन, प्रदर्शनी आणि प्रशिक्षण असे कार्यक्रम घेतले जातील.
विविध पार्श्वभूमीतले लोक या कार्यक्रमात सहभागी होतील. यात सरकारी संस्था, खाजगी उद्योग कंपन्या, वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योगक्षेत्र,स्टार्ट अप्स अशा क्षेत्रांचे प्रतिनिधी आणि मान्यवर नागरिकांचा समावेश असेल.
या उपक्रमाचा हेतू, ओपन डेटा- म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रात एखाद्या विषयांवरील माहिती/आकडेवारीची जास्तीत जास्त उपलब्धता, याला प्रोत्साहन देणे हा आहे. उत्तम दर्जाच्या माहिती/आकडेवारीचा लाभ अनेक समूह आणि संस्थांना मिळू शकतो. नव्या प्रकारे संकलित करण्यात आलेला डेटा, नवे ज्ञान आणि दृष्टी देणारा ठरू शकतो, ज्यातून एखाद्या समस्येवरील समाधानची अंमलबजावणी संपूर्ण वेगळ्या पद्धतीने होऊ शकेल. यातून सरकारांनाही, नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्वसामान्य समस्यांवर तोडगा काढण्यात मदत मिळू शकेल.
सर्व 100 स्मार्ट शहरांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी केली असून, भारतातील शहरांना डेटा स्मार्ट शहरे बनवण्यासाठीचा हा एकत्रित प्रयत्न असेल. हे पोर्टल https://smartcities.data.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790528)
Visitor Counter : 372