पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर साधलेल्या संवादाच्या समारोपाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 13 JAN 2022 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022

2022 मधली ही पहिली बैठक आहे. सर्व प्रथम तुम्हा सर्वांना लोहरीच्या खूप शुभेच्छा. मकर संक्रांत, पोंगल, भोगली बिहू, उत्तरायण आणि पौष पर्वाच्या अनेक शुभेच्छा. शंभर वर्षांतून एकदा येणाऱ्या या सर्वात मोठ्या महामारी विरोधातल्या भारताच्या लढाईने आता तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. परिश्रम हा एकमेव मार्ग आहे आणि विजय हा एक मात्र पर्याय आहे. आपण 130 कोटी भारतीय आपल्या प्रयत्नांद्वारे कोरोनावर मात करून नक्कीच त्यातून बाहेर पडू आणि तुम्हा सर्वांचं म्हणणं मी ऐकलं आहे त्यातूनही हाच विश्वास प्रकट होत आहे. आता ओमायक्रॉन च्या रूपाने जे नवीन आव्हान समोर आलं आहे, जी रुग्णवाढ होत आहे त्याबाबत आरोग्य सचिव यांच्या वतीने आपल्याला विस्तृत माहिती देण्यात आली आहे. अमित शहा यांनी देखील सुरुवातीला काही बाबी आपल्या समोर मांडल्या. आज अनेक मुख्यमंत्री समुदायाच्या वतीने देखील आणि ते देखील भारताच्या कानाकोपऱ्यामधून, अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत.

मित्रांनो

ओमायक्रॉनसंबंधी आधी जी संशयाची स्थिती होती आता हळूहळू स्पष्ट होत आहे. आधी जो उत्परिवर्तक होता, त्याच्या तुलनेत अनेक पटीने अधिक वेगाने ओमायक्रॉन उत्परिवर्तक सामान्य माणसांना संक्रमित करत आहे. अमेरिकेसारख्या देशात एका दिवसात चौदा लाखांपर्यंत नवीन रुग्ण समोर आले आहेत. भारतात आपले वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ञ परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि आकडेवारीवर सातत्याने अध्ययन करत आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे आपल्याला अधिक सतर्क राहायला हवं, सावधान राहायला हवं. मात्र भीती निर्माण होणार नाही याकडेही आपण लक्ष द्यायला हवं.

आपल्याला हे देखील पाहावे लागेल की सणांच्या या काळात लोकांची आणि प्रशासनाची सतर्कता कुठेही कमी पडणार नाही. याआधी केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्याप्रमाणे सक्रिय आणि सामूंहिक दृष्टीकोन अवलंबला तोच यावेळीही विजयाचा मंत्र आहे. कोरोना संसर्गाला आपण जेवढं मर्यादित ठेवू शकू तेवढाच आपला त्रासही कमी होईल. आपल्याला  जागरुकतेच्या बाबतीतही विज्ञान आधारित माहितीवर भर देण्याबरोबरच आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळ देखील वाढवत राहावे लागणार आहे.

मित्रांनो,

जगातील बहुतांश तज्ञांचं म्हणणं आहे की उत्परिवर्तक कुठलाही असो, कोरोना विरुद्ध लढण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र लस हेच आहे. भारतात तयार झालेल्या लसींनी जगभरात आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे की आज भारतात सुमारे 92 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. देशात दुसऱ्या मात्रेचे प्रमाणही 70 टक्‍क्‍यांच्या आसपास पोहोचलं आहे आणि आपल्या लसीकरण अभियानाला एक वर्ष पूर्ण व्हायला अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत.  दहा दिवसातच भारताने आपल्या सुमारे तीन कोटी किशोरांचे देखील लसीकरण केलं आहे. यातून भारताचे सामर्थ्य दिसून येते. या आव्हानाचा सामना करण्याची

आपली सज्जता दिसून येते. आज राज्यांकडे पुरेशा प्रमाणात लसीच्या मात्रा उपलब्ध आहेत. आघाडीचे कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांना खबरदारीची मात्रा जेवढी लवकर मिळेल तेवढेच आपल्या आरोग्य सेवा यंत्रणेचे सामर्थ्य वाढेल. 100% लसीकरणासाठी करण्यासाठी हर घर दस्तक अभियान अधिक तीव्र करावे लागेल. मी आज आपले आरोग्य सेवा कर्मचारी, आपल्या आशा भगिनींचे देखील अभिनंदन करतो ज्या या कठीण परिस्थितीतही लसीकरण अभियानाला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मित्रांनो,

लसीकरणाबाबत गैरसमज पसरविण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याला टिकू द्यायचा नाहीये. अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं कि लसीकरण होऊनही संसर्ग वाढत आहे तर मग काय फायदा? मास्कच्या बाबतीतही अशाच अफवा पसरवल्या जात होत्या की यामुळे काही फायदा होत नाही. अशा अफवा दूर करण्याचा प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे.

मित्रांनो,

कोरोना विरुद्ध या लढाईत आपल्याला आणखी एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. आता आपल्याकडे कोरोना विरुद्ध लढाईचा दोन वर्षांचा अनुभव आहे, देशव्यापी तयारी देखील आहे. सामान्य लोकांची उपजीविका, आर्थिक व्यवहारांचे कमीत कमी नुकसान होईल, अर्थव्यवस्थेची गती कायम राहील, कोणतेही धोरण आखताना आपण या गोष्टींकडे लक्ष जरूर द्या. हे खूप गरजेचे आहे. आणि म्हणूनच स्थानिक प्रतिबंधांवर अधिक भर देणे उचित ठरेल. जिथून जास्तीत जास्त प्रमाणात रुग्ण वाढ दिसून येत आहे तिथे जास्तीत जास्त वेगाने चाचण्या होतील हे देखील सुनिश्चित करणे आवश्यक आहे. याशिवाय आपल्याला हे देखील सुनिश्चित करावे लागेल की गृह अलगीकरणातच जास्तीत जास्त उपचार होतील. यासाठी गृह अलगीकरणासंबंधित मार्गदर्शक सूचना,  प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल आणि परिस्थितीनुसार त्यात सुधारणा करणे देखील खूप आवश्यक आहे. गृह अलगीकरणाच्या  दरम्यान  शोध आणि उपचाराची व्यवस्था जेवढी उत्तम असेल तेवढीच रुग्णालयात भरती होण्याची गरज कमी होईल. संसर्ग झाल्याचं आढळून आल्यावर लोक सर्वप्रथम नियंत्रण कक्षाशी संपर्क सांधतात म्हणूनच योग्य प्रतिसाद आणि रुग्णांचा नियमित मागोवा आत्मविश्वास वाढवण्यात खूप मदत करतो.

मला आनंद आहे की अनेक राज्य सरकारं या दिशेने खूप चांगल्या प्रकारे नवनवीन अभिनव प्रयत्न देखील करत आहेत. प्रयोग करत आहेत. केंद्र सरकारने टेलीमेडिसीन साठी देखील अनेक सुविधा विकसित केल्या आहेत. त्यांचा जास्तीत जास्त वापर कोरोना संक्रमित रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. आवश्यक औषधे आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा मुद्दा येतो तेव्हा केंद्र सरकार नेहमीप्रमाणे प्रत्येक राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. 5-6 महिन्यांपूर्वी तेवीस हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्यात आलं होतं त्याचा सदुपयोग करत अनेक राज्यांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अधिक सशक्त केल्या  आहेत. या अंतर्गत देशभरात वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालये मुलांसाठी 800 पेक्षा अधिक विशेष पेडियाट्रिक केअर युनिट मंजूर झाले आहेत. सुमारे दीड लाख नवीन ऑक्सिजन, आयसीयू आणि एचडीयु बेड तयार केले जात आहेत.  पाच हजारांपेक्षा अधिक विशेष रुग्णवाहिका आणि साडेनऊशे हून अधिक द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन साठवणूक टॅंकची क्षमता वाढवण्यात आली आहे. आपत्कालीन पायाभूत सुविधांची क्षमता देखील वाढवण्यासाठी असे अनेक प्रयत्न झाले आहेत. मात्र आपल्याला या पायाभूत सुविधांचा विस्तार करत राहावे लागणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला आपली तयारी कोरोनाच्या प्रत्येक उत्परिवर्तकापेक्षा वरचढ ठेवावी लागेल. ओमायक्रॉनचा सामना करण्याबरोबरच आपल्याला भविष्यात येणाऱ्या कुठल्याही संभाव्य उत्परिवर्तकासाठी देखील आतापासूनच तयारी सुरू करावी लागेल. मला विश्वास आहे आपल्या सर्वांचे सहकार्य, एका सरकारचा दुसऱ्या सरकारबरोबर समन्वय, कोरोना विरुद्ध लढाई देशाला अशीच ताकद देत राहील. एक गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की आपल्या देशात प्रत्येक घरात ही परंपरा आहे.  ज्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत, काढा वगैरे पिण्याची परंपरा आहे,  या ऋतूमध्ये अतिशय उपयुक्त आहे. कोणतंही औषध म्हणून सांगितलेलं नाहीये. मात्र ते उपयुक्त आहे आणि मी विनंती करेन की जे आपले पारंपारिक घरगुती उपाय आहेत, अशा परिस्थितीत त्यामुळे खूप मदत मिळते याकडेही आपण लक्ष केंद्रित करा.

मित्रांनो,

तुम्ही सर्वांनी वेळ काढला, आपण सर्वांनी आपल्या चिंता एकमेकांसमोर मांडल्या, आणि आपण सर्वांनी मिळून संकट कितीही मोठं का असेना आपली तयारी, आपला लढण्याचा विश्वास आणि विजयी होण्याचा  संकल्प प्रत्येकाच्या बोलण्यातून दिसून आला आहे आणि तो सामान्य नागरिकांना विश्वास देतो. आणि सामान्य नागरिकांच्या सहकार्याने आपण या परिस्थितीवर यशस्वीपणे मात करू. तुम्ही सर्वांनी वेळ काढला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1789983) Visitor Counter : 189