पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 12 JAN 2022 2:47PM by PIB Mumbai

पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल तमिलसाई जी, मुख्यमंत्री एन रंगासामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नारायण राणेजी, अनुराग ठाकुरजी, निशीत प्रमाणिकजी, भानु प्रताप सिंह वर्माजी, पुदुचेरी सरकारमधील वरिष्ठ मंत्री, खासदार, आमदार, देशाच्या अन्य राज्यांमधील मंत्री आणि माझ्या युवा मित्रांनो!  वणक्कम! तुम्हा सर्वाना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !

 

भारत मातेचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंदजी यांना त्यांच्या जयंती निमित्त मी वंदन करतो.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात त्यांची जन्मजयंती अधिकच प्रेरणादायक झाली आहे. हे वर्ष, दोन कारणांमुळे आणखी खास बनले आहे. आपण याच वर्षी श्री अरबिंदो यांची 150 वी जन्मजयंती साजरी करत आहोत आणि याच वर्षी महाकवि सुब्रमण्य भारती यांचीही 100 वी पुण्यतिथि आहे, या दोन विद्वानांचा पुदुचेरीशी खास संबंध राहिला आहे. हे दोघेही एकमेकांच्या साहित्यिक आणि आध्यात्मिक प्रवासाचे भागीदार होते. म्हणूनच पुदुच्चेरी येथे होत असलेला राष्ट्रीय युवा महोत्सव भारतमातेच्या या महान सुपुत्रांना समर्पित आहे. 

मित्रांनो . 

आज पुदुच्चेरी येथे एमएसएमई तंत्रज्ञान केंद्राचे उदघाटन झाले. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाची खूप महत्वाची भूमिका आहे. यासाठी हे अतिशय आवश्यक आहे की आपल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आज जगात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. म्हणूनच देशात आज तंत्रज्ञान केंद्र प्रणाली कार्यक्रमाचे खूप मोठे अभियान राबवले जात आहे. पुदुच्चेरी येथे उभारण्यात आलेले एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र त्याच दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

 

मित्रांनो ,

 

आज पुदुच्चेरीच्या युवकांना कामराजजी यांच्या नावाने मनीमंडप्पम, एक प्रकारचे बहुउद्देशीय    सभागृह भेट म्हणून मिळत आहे. हे सभागृह, कामराजजी यांच्या योगदानाची आठवण तर करून देईलच, शिवाय आपल्या तरुण गुणवंतांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देईल.

मित्रांनो ,

आज जग भारताकडे आशेच्या दृष्टिकोनातून, एका विश्वासाच्या नजरेने पाहत आहे. कारण, भारतातील लोक देखील तरुण आहेत आणि भारताचे मन देखील तरुण आहे. भारत आपल्या  सामर्थ्याने देखील तरुण आहे, भारताची स्वप्ने देखील तरुण आहेत. भारत आपल्या चिंतनाने देखील युवा आहे, भारत आपल्या चेतनेद्वारेही युवा आहे. भारत युवा आहे.कारण भारताच्या दूरदृष्टीने नेहमीच आधुनिकतेचा स्वीकार केला आहे, भारताने परिवर्तनाचा अवलंब केला आहे. भारत असा देश आहे ज्याच्या प्राचीनतेतही नावीन्य आहे. आपल्या हजारों वर्षे जुन्या वेदांमध्ये म्हटले आहे -

"अपि यथा, युवानो मत्सथा, नो विश्वं जगत्, अभिपित्वे मनीषा,॥

म्हणजे , जगभरात सुखापासून सुरक्षेपर्यंत संचार करणारे हे युवा आहेत. हे युवकच  आपल्या भारतासाठी आपल्या राष्ट्रासाठी सुख आणि सुरक्षेचे मार्ग नक्कीच तयार  करतील. म्हणूनच , भारतात जन ते जग योग प्रवास असेल,क्रांती  असेल किंवा उत्क्रांती असेल, मार्ग सेवेचा असेल किंवा समर्पणाचा, विषय परिवर्तनाचा असेल किंवा पराक्रमाचा, मार्ग सहकार्याचा असेल किंवा सुधारणेचा, मुद्दा मुळांशी जोडण्याचा असो किंवा जगात  विस्ताराचा, असा कुठलाही मार्ग नाही ज्यात आपल्या देशाच्या युवकांनी  हिरीरीने भाग घेतलेला नाही.  जेव्हा कधी भारताची चेतना विभाजित होते, तेव्हा शंकराप्रमाणे एखादा युवक, आदि शंकरचार्य बनून  देशाला एकतेच्या सूत्रात बांधतो. जेव्हा भारताला अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढणे आवश्यक असते, तेव्हा गुरु गोबिन्द सिंह जी यांच्या युवा मुलांचे बलिदान आज देखील मार्ग दाखवते.

जेव्हा भारताला स्वातंत्र्यासाठी क्रांतीची गरज होती तेव्हा सरदार भगतसिंग पासून चंद्रशेखर आझाद आणि नेताजी सुभाष यांच्यापर्यंत कितीतरी युवकांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले,  जेव्हा भारताला अध्यात्माची , सृजनाच्या  शक्तीची गरज असते तेव्हा श्री अरबिंदो , सुब्रमण्यम भारती  यांच्याकडून  साक्षात्कार होतो . जेव्हा भारताला आपला हरवलेला स्वाभिमान पुन्हा मिळवण्याची, आपला गौरव जगात पुनर्स्थापित करायची  इच्छा असते तेव्हा स्वामी विवेकानंद यांच्यासारखा एक युवक भारताच्या  ज्ञानाने,  सनातन आवाहनाने जगमानसाला जागृत करतो.

मित्रांनो,

जगाने ही गोष्ट स्वीकारली आहे की आज भारताकडे दोन अफाट शक्ती आहेत -एक लोकसंख्या आणि दुसरी लोकशाही.  ज्या देशाकडे एवढी मोठी युवा लोकसंख्या आहे , तिचे  सामर्थ्य तेवढेच मोठे  मानले जाते. त्यांच्या क्षमता तेवढ्याच व्यापक मानल्या जातात. मात्र भारताच्या युवकांकडे मोठ्या लोकसंख्येबरोबरच लोकशाही मूल्य देखील आहेत, त्यांचा डेमोक्रॅटिक डिव्हिडंड देखील अतुलनीय आहे. भारत आपल्या युवकांना डेमोग्राफिक डिव्हिडंड बरोबरच विकासाचा चालक देखील मानतो.  भारताचे युवक आपल्या विकासाबरोबरच आपल्या लोकशाही मूल्यांचे देखील नेतृत्व करत आहेत. तुम्ही बघा, आज भारताच्या युवकांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल आस्था आहे तशीच लोकशाहीबद्दल चेतना देखील आहे. आज भारताच्या युवकांमध्ये जर श्रमाचे सामर्थ्य आहे तर भविष्याची स्पष्टता देखील आहे.  म्हणूनच भारत आज जे म्हणतो, त्याला जग  उद्याच्या  भविष्याचा आवाज मानते.  आज भारत जी स्वप्ने दाखवतो, संकल्प करतो त्यात भारताबरोबरच जगाचे भविष्य दिसून येतो आणि आणि भारताच्या भविष्याची,  जगाच्या भविष्याची  आज निर्मिती होत आहे.  ही जबाबदारी , हे सौभाग्य तुमच्यासारख्या कोट्यवधी युवकांना मिळत आहे. 2022 हे वर्ष तुमच्यासाठी भारताच्या युवा पिढीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.  आज आपण 25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करत आहोत. हे नेताजी सुभाष बाबू यांचे 125 व्या जयंतीचे  देखील वर्ष आहे आणि 25 वर्षानंतर देश स्वातंत्र्याची शंभर वर्ष देखील साजरी करेल, म्हणजेच 25 चा हा  योगायोग निश्चितपणे भारताचे  भव्य दिव्य चित्र रेखाटण्याचा योग देखील आहे . स्वातंत्र्याच्या वेळी जे युवा पिढीत होते , त्यांनी देशासाठी आपले सर्वस्व  समर्पित करताना एक क्षण देखील गमावला नव्हता . मात्र आजच्या युवकांना देशासाठी जगायचे आहे आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्न पूर्ण करायची आहेत.  महर्षी डॉक्टर अरविंद यांनी म्हटले होते - शूर, स्पष्टवक्ता, स्वच्छ मनाचा,धाडसी आणि महत्त्वाकांक्षी तरुण या पायावरच भविष्यातील राष्ट्राची उभारणी करता येईल.

त्यांचे हे विचार आज 21व्या शतकातील भारतीय युवकांसाठी जीवन मंत्राप्रमाणे आहेत. आज आपण एक राष्ट्र म्हणून , जगातील सर्वात मोठा युवा देश म्हणून एका वळणावर आहोत. हा भारतासाठी नवी स्वप्ने, नव्या संकल्पांचा टप्पा आहे. अशा वेळी भारतीय युवकांचे सामर्थ्य भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल.

 

मित्रहो,

श्री ऑरबिंदो तरुणांसाठी सांगत असत- 'नव्या जगताची उभारणी तरुणांनीच केली पाहिजे'. क्रांती आणि उत्क्रांतीच्या भोवतीच त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाची रचना केली होती. ते तत्त्वज्ञान म्हणजे तरुणाईचीही खरी ओळख आहे. हेच दोन गुण एका चैतन्यमयी राष्ट्राची मोठी शक्ती ठरतात. तरुणांमध्ये अशी क्षमता असते, असे सामर्थ्य असते, की ज्याच्या बळावर ते जुन्या रुढींचे ओझे घेऊन चालायला नकार देतात. ते ओझे त्यांना झुगारून देण्याचे तंत्र त्यांना माहित असते. हे तरुण स्वतःला, समाजाला नव्या आव्हानांनुसार, नव्या गरजांनुसार उत्क्रांत करू शकतात, नवनिर्मिती करू शकतात. आणि आज देशात हेच घडताना आपल्याला दिसते आहे. आज भारताचे तरुण उत्क्रांतीवर सर्वाधिक भर देताना दिसतात. आज अडथळे येत आहेत, पण ते अडथळे विकासासाठी येत आहेत. आज भारताचे तरुण नवोन्मेषाची कास धरत आहेत, समस्या सोडविण्यासाठी एकत्र येत आहेत. मित्रहो, आजच्या तरुणाईकडे 'आम्ही करू शकतो' ही दमदार भावना आहे, तीच प्रत्येक पिढीचा प्रेरणास्रोत आहे. डिजिटल पेमेंट्सच्या बाबतीत भारत जगात इतका पुढे गेला आहे तो भारतीय युवकांच्या याच सामर्थ्याच्या बळावर. आज भारताचे तरुण जगाच्या समृद्धी आणि संपन्नतेचे कोड- म्हणजे संकेतभाषा लिहीत आहेत. पूर्ण जगभरात यूनिकॉर्न इकोसिस्टममध्ये भारतीय तरुणांचा दबदबा आहे. भारताकडे आज पन्नास हजारांहून अधिक स्टार्ट अप्सचे मजबूत जाळे आहे. त्यापैकी 10 हजारांहून अधिक स्टार्ट अप्स तर कोरोनाच्या ऐन आव्हानात्मक काळात गेल्या सहा-सात महिन्यांत उदयाला आले आहेत. हीच भारताच्या तरुणाईची शक्ती आहे. तिच्याच जोरावर आपला देश स्टार्ट अप्सच्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहे.

मित्रहो,

नवभारताचा हाच मंत्र आहे- स्पर्धा करा आणि जिंका. एकत्र या आणि जिंका. एकत्रितपणे विजय संपादन करा. पॅरालिंपिक्समध्ये भारताने जितकी पदके जिंकली, तितकी भारताने आजवरच्या इतिहासात कधीच जिंकली नव्हती. ऑलिंपिकमध्येही आपली कामगिरी उत्तम झाली कारण, आपल्या युवकांमध्ये विजयाचा विश्वास उत्पन्न झाला. आपल्या कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वितेत तर तरुणांची भूमिका एका वेगळ्याच पातळीवर पोहोचलेली दिसते. पंधरा ते अठरा वर्षांचे तरुण किती वेगाने स्वतःचे लसीकरण करून घेत आहेत, ते आपल्याला दिसतेच आहे. इतक्या कमी वेळात 2 कोटींहून अधिक बालकांचे लसीकरण करून झाले आहे. आजच्या किशोरवयीन मुलांमध्ये जेव्हा मला कर्तव्यनिष्ठा दिसते, तेव्हा देशाच्या उज्ज्वल भविष्याप्रती माझा विश्वास आणखी भक्कम होतो. या आपल्या किशोरवयीन 15 ते 18 वर्षांच्या बाल सोबत्यांमध्ये उत्तरदायित्वाचे जे भान आहे, ते पूर्ण कोरोनाकाळात भारताच्या साऱ्या युवकांमध्ये दिसून आले आहे.

मित्रहो,

युवकांमधील याच शक्तीसाठी त्यांना पुरेसा अवकाश मिळावा, वाव मिळावा, सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असावा असाच सरकारचा प्रयत्न आहे. त्यांना अनुकूल वातावरण मिळवून देण्यासाठी, साधनसंपत्ती उपलब्ध करुवून देण्यासाठी, त्यांचे सामर्थ्य वाढविणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारी प्रक्रिया सोप्या करणे, हजारो अटींच्या ओझ्यापासून सुटका, हे सारे याच दिशेने चालू आहे. मुद्रा, स्टार्ट अप इंडिया, स्टैंड अप इंडिया अशा अभियानांमुळे तरुणांना मोठेच साहाय्य मिळत आहे. स्किल इंडिया, अटल इनोवेशन मिशन आणि नवे राष्ट्रीय शैक्षिणक धोरण म्हणजे, तरुणांचे सामर्थ्य वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नांचाच भाग आहेत.

मित्रहो,

मुले-मुली एकसमान आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. याच विचाराने सरकारने मुलींच्या हितासाठी लग्नाचे वय 21 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींनाही आपले करिअर घडवता यावे, त्यांना अधिक वेळ मिळावा, या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात आपल्या राष्ट्रीय संकल्पांची सिद्धी आपल्या आजच्या कृतींवरून ठरेल. ही प्रत्यक्ष कृती, प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रात अत्यंत आवश्यक आहे. व्होकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनांची मौखिक प्रसिद्धी करण्यासाठी आपण एखादी मोहीम उघडून काम करू शकतो का? खरेदी करताना, आपल्या निवडलेल्या वस्तूंमध्ये एखाद्या भारतीयाच्या श्रमाचा, भारतातील मातीचा सुगंध असला पाहिजे- हे कधीही विसरू नका. प्रत्येक वेळी याच तागडीत तोलून बघा आणि कोणत्याही खरेदीच्या निर्णयापूर्वी हा तराजू विचारात घ्या- त्या वस्तूमध्ये माझ्या देशातील कामगाराच्या घामाचा सुगंध आहे की नाही.. श्री ऑरबिंदों श्री विवेकानंद अशा महापुरुषांनी ज्या मातीला आपल्या मातेसमान मानले, त्या भारतमातेच्या मातीचा सुगंध त्यात आहे की नाही, हे पाहा. व्होकल फॉर लोकल, आपल्या अनेक समस्यांचे उत्तर आत्मनिर्भरतेत आहे. आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू खरेदी करण्यात ते आहे. त्यातूनच रोजगारनिर्मितीही होणार आहे. अर्थव्यवस्थाही त्यामुळेच वेगाने वाढू शकणार आहे. त्यातूनच देशातील गरिबातील गरीब व्यक्तीला उचित सन्मान मिळू शकणार आहे. आणि म्हणूनच, आपल्या देशाच्या नवतरुणांनी 'व्होकल फॉर लोकल' हा आपला जीवनमंत्र म्हणून अंगिकारला पाहिजे. तसे केल्यास, आपण कल्पना करून पाहा, स्वातंत्र्याची १०० वर्षे होतानाचे भव्यदिव्य चित्र कसे असेल. सामर्थ्याने परिपूर्ण असे ते चित्र असेल. ते संकल्पांच्या सिद्धीचे साफल्याचे क्षण असतील.

मित्रहो,

दरवेळी मी एका गोष्टीबद्दल आवर्जून बोलतो. पुन्हा सांगेन, आणि तुम्हा सर्वांना सांगण्याची इच्छा होते कारण, तुम्ही या विषयाचे नेतृत्व पत्करले आहे, तो म्हणजे स्वच्छता. स्वच्छतेलाही जीवनशैलीचा एक भाग बनवण्यामध्ये आपणा सर्व तरुणांचे योगदान अत्यन्त महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील आपले अनेक सेनानी असे राहून गेले आहेत, की त्यांच्या योगदानाचा यथोचित गौरव झाला नाही, त्यांना ती ओळख मिळाली नाही. त्यांच्या त्याग, तपस्या आणि बलिदानामध्ये काहीच त्रुटी नव्हत्या. तथापि त्यांना तो हक्क मिळाला नाही. अशा व्यक्तींबाबत आपले युवक जितके अधिक लेखन करतील, संशोधन करतील, तितके ते त्यांना इतिहासाच्या पानांमधून शोधून काढतील. तितकीच देशाच्या आगामी पिढ्यांमध्ये जागरूकता वाढीस लागेल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अधिक सशक्त होईल अधिक स्फूर्तिदायी होईल.

मित्रहो,

'एक भारत श्रेष्ठ भारत' संकल्पनेचे सुंदर उदाहरण म्हणजे पुदुचेरी. वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या वेगवेगळ्या प्रवाहांमुळे या ठिकाणाला एकात्मतेची निराळीच ओळख प्राप्त होते. येथे होणारा संवाद, 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेतील भावनेला अधिक सुदृढ करेल. आपल्या विचारांमधून जो एक नवीन भाव उत्पन्न होईल आणि आपण ज्या काही नवीन गोष्टी येथे शिकून जाल, त्या पुढची वर्षानुवर्षे राष्ट्रसेवेची प्रेरणा बनून राहोत. राष्ट्रीय युवा महोत्सवाबद्दल मला पूर्ण खात्री आहे की, आपल्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी त्यातून आपल्याला दिशा मिळेल, मार्ग समजेल..

मित्रांनो,

हे सणासुदीचेही दिवस आहेत. असंख्य सण, हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सण. कुठे मकरसंक्रांत, कुठे लोहडी, कुठे पोंगल, कुठे उत्तरायण, कुठे बीहू - अशा सर्व सणावारांच्या निमित्ताने आपणा सर्वाना आधीच शुभेच्छा ! कोरोनाविषयी पूर्ण सावधगिरी आणि दक्षता पळून आपल्याला सण साजरे करायचे आहेत. तुम्ही आनंदी राहा, निरोगी राहा. खूप खूप शुभेच्छा ! धन्यवाद !

 

***

MC/Sushma/Jaae/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1789615) Visitor Counter : 337