पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 12 जानेवारीला तामिळनाडूमधल्या 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे आणि केंद्रीय प्राचीन तमिळ संस्थेच्या नवीन वास्तू-परिसराचे उद्घाटन करणार


नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे एमबीबीएसच्या सुमारे 1450 जागा वाढणार; संपूर्ण देशामध्ये आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचा भाग

केंद्र सरकारव्दारे वित्तपोषित केंद्रीय प्राचीन तमिळ संस्थेची नवीन वास्तू प्राचीन तमिळ भाषेचे संरक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावणार

भारतीय वारसा सुरक्षित ठेवून, त्याचे संरक्षण तसेच प्राचीन भाषांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोणातून कार्य

Posted On: 10 JAN 2022 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दि. 12 जानेवारी, 2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तामिळनाडूमधल्या 11 नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे आणि चेन्नईच्या केंद्रीय प्राचीन तमिळ संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करणार आहेत.

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी अंदाजे 4,000 कोटी रूपये खर्च आला आहे. यापैकी जवळपास 2,145 कोटी रूपये केंद्र सरकारने आणि उर्वरित निधी तामिळनाडू सरकारने खर्च केला आहे. तामिळनाडूमधल्या विरूधुनगर, नमक्कल, नीलगिरी, तिरूपूर, तिरूवल्लूर, नागपट्टिनम, डिंडीगुल, कल्लाकुरिची, अरियालूर, रामनाथपुरम आणि कृष्णागिरी या जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत.  देशाच्या सर्व भागांमध्ये स्वस्त वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी प्रोत्साहन देणे आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात येत आहे. केंद्राने प्रायोजित केलेल्या - उपलब्ध जिल्हा/ रेफरल रूग्णालयाशी संलग्न ही नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात  येत आहेत. यामध्ये वैद्यकीय विभागाच्या एकूण 1450 नवीन वाढणार आहेत. या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारी अथवा खाजगी संस्था संचलित एकही वैद्यकीय महाविद्यालय नाही, अशा जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत.

भारताचा समृद्ध वारसा सुरक्षित रहावा, त्याचे संवर्धन, संरक्षण करावे आणि प्राचीन भाषेला प्रोत्साहन दिले जावे,  पंतप्रधानांच्या या दृष्टिकोणातून चेन्नई येथे केंद्रीय प्राचीन तमिळ संस्थेची  (सीआयसीटी)  एका नवीन वास्तू मध्ये स्थापना करण्यात येत आहे. या नवीन परिसरासाठी संपूर्णपणे केंद्र सरकारने निधी दिला आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी 24 कोटी खर्च झाले आहेत. आत्तापर्यंत प्राचीन तमिळ संस्थेचे काम एका भाडेतत्वावर घेतलेल्या भवनामधून केले जात होते. आता सीआयसीटीचे काम नवीन तीन मजली इमारतीमधून होणार आहे. नवीन वास्तूचा  परिसर भव्य ग्रंथालय, एक ई- लायब्ररी, सेमिनार सभागृह आणि एक मल्टीमिडीया सभागृह यांनी सुसज्ज आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत एक स्वायत्त संघटना असलेली ही सीआयसीटी, तमिळ भाषेची प्राचीनता आणि या भाषेचे वैशिष्ट स्थापन करण्यासाठी वेगवेगळया शोध कार्यांच्या मदतीने योगदान देत आहे. संस्थेच्या ग्रंथालयामध्ये 45,000 पेक्षा जास्त प्राचीन तमिळ पुस्तकांचा एक समृद्ध संग्रह आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी संस्थेच्या वतीने चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते,तसेच पाठ्यवृत्ती प्रदान  करण्यासारखे विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याचा उद्देश वेगवेगळ्या भारतीयांबरोबरच 100 परदेशी भाषांमध्ये ‘तिरूक्कुरल’ यांच्या साहित्याचा अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा आहे. नवीन वास्तू- परिसर संपर्ण दुनियेतल्या प्राचीन तमिळला प्रोत्साहन देण्यासाठी आणि  या संस्थेमार्फत केल्या जाणा-या प्रयत्नांमुळे एक प्रभावी, कार्यशील वातावरण निर्माण करण्यास मदत करेल.

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1788928) Visitor Counter : 209