युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

आम्ही भारताच्या युवकांना कौशल्ये प्रदान करुन, जागतिक बाजारपेठेत नोकरी करण्यास सुयोग्य बनवत आहोत-केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर


केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते ‘एनवायकेएस युवा स्वयंसेवक’ या प्रायोगिक ऑनलाईन प्रशिक्षणाचा शुभारंभ

Posted On: 06 JAN 2022 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022

ठळक बाबी:

  • या उपक्रमाचा हेतू, 14 ते 20 लाख युवकांना जीवनावश्यक कौशल्ये आणि व्यक्तिमत्व विकास, राष्ट्र बांधणी, नागरी कर्तव्ये, सामुदायिक एकता, सामुदायिक सेवा आणि सक्षमीकरणाची साधने अशा विषयांवर प्रशिक्षित करणे हा आहे.
  • प्रायोगिक तत्वावर पहिल्या 100 स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, ते पुढच्या दहा लाख युवकांच्या प्रशिक्षणाचा पाया रचतील: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज, नेहरू युवा केंद्र संघटनेच्या युवा स्वयंसेवकांच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. युवा व्यवहार विभागाच्या सचिव, उषा शर्मा, क्षमता बांधणी आयोगाचे, सदस्य, प्रवीण परदेशी, युवा व्यवहार विभागाचे सहसचिव नितेश कुमार मिश्रा आणि इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने, डीफीट-एनसीडी भागीदारी आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्था- युनिटार, संयुक्त राष्ट्र बाल निधी –युनिसेफ आणि नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) तसेच, क्षमता बांधणी आयोगाशी एकूण समन्वय साधत, हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

केंद्र सरकार देशातील युवकांना कौशल्ये प्रदान करत आहे, आणि त्यांना जागतिक बाजारपेठेतील गरजांनुसार नोकरीसाठी तयार करत आहे. जागतिक पुरवठा साखळी, सेवा क्षेत्र आणि एकूणच अर्थव्यवस्थेत आज तरुण, शिक्षित, कुशल मनुष्यबळासाठी नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी, भारत कुशल मनुष्यबळ पूर्ण करत आहे. एवढेच नाही, तर आम्ही स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणारी आणि युवकांमध्ये उद्यमशीलता विकसित करणारी एक भक्कम इकोसिस्टिम आम्ही उभारली आहे. असे अनुराग ठाकूर यावेळी बोलतांना म्हणाले.

या प्रायोगिक प्रशिक्षणासाठीचा मजकूर अतिशय काळजीपूर्वक निवडण्यात आला आहे, यात, व्हर्च्युअल रियलिटी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. 100 स्वयंसेवक या प्रायोगिक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले असून, हेच स्वयंसेवक पुढच्या दहा लाख युवकांच्या प्रशिक्षणाचा पाया रचतील, असे ठाकूर पुढे म्हणाले.

भारताची सध्याची युवा लोकसंख्या सुमारे 23 कोटी इतकी आहे. या प्रचंड प्रमाणातील लोकसांख्यिक लाभांश असल्याने आपल्याकडे, देशाला उंचावर नेण्याची आणि इतरांसमोर जिवंत आदर्श निर्माण करण्याची क्षमता आहे. देशात सामाजिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी युवकांजवळ अमर्याद क्षमता आहे. एकविसाव्या शतकात भारताला जगात महत्वाची भूमिका पार पाडायची आहे कारण संपूर्ण जग आज आपल्याकडे बघत आहे. अशावेळी युवकांचे योगदान लक्षणीय असेल, असेही त्यांनी सांगितले.

UNITAR आणि मंत्रालयामधील भागीदारी, युवा कार्यकर्त्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि उपजीविकेवर विशेष परिणाम करणारी ठरणार आहे. तसेच, राष्ट्रबांधणी आणि देशाची समृद्धी यातही मोलाची भर घालणारे ठरेल. भारतातील युवकांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेही हे एक महत्वाचे पाऊल आहे. यातून समविचारी आणि काही करण्याची उमेद असलेल्या युवकांचे जाळे तयार होऊ शकेल. भारतातील युवक, देशाचे भवितव्य आहेत, आणि आणि आपण त्यांच्यात गुंतवणूक केलीच पाहिजे, असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.

विचार करण्याची क्षमता, वैयक्तिक कौशल्ये आणि नेतृत्वगुण ही व्यक्तीमत्व विकास आणि सांघिक यशासाठी अत्यंत महत्वाची आहेत. या प्रशिक्षणात हीच कौशल्ये निर्माण करण्यावर भर दिला जाईल. असेही ठाकूर यांनी सांगितले.

 

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788111) Visitor Counter : 239