पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन


पंतप्रधानांनी त्रिपुरातील आगरतळा येथे दोन प्रमुख विकास उपक्रमांचा केला प्रारंभ

"हिरा HIRA प्रारूपाच्या आधारे त्रिपुरातील दळणवळणाचा विस्तार आणि बळकटीकरण "

"रस्ते, रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व गुंतवणुकीमुळे त्रिपुरा व्यवसाय आणि उद्योगाचे नवीन केंद्र तसेच व्यापार कॉरिडॉरमध्ये परिवर्तित होत आहे"

"दुहेरी इंजिन सरकार म्हणजे संसाधनांचा योग्य वापर, याचा अर्थ संवेदनशीलता आणि लोकशक्तीला चालना देणे, म्हणजेच सेवा आणि संकल्पांची पूर्तता आणि समृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न"

Posted On: 04 JAN 2022 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी महाराजा बीर बिक्रम (MBB) विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन केले.  मुख्यमंत्री त्रिपुरा ग्राम समृद्धी योजना आणि 100 विद्याज्योती शाळा प्रकल्प मोहीम ,यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभही त्यांनी  केला. यावेळी त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, केंद्रीय मंत्री  ज्योतिरादित्य सिंदिया  आणि  प्रतिमा भौमिक उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांनी एका मेळाव्याला संबोधित केले.  21 व्या शतकातील भारत 'सबका साथ, सबका विकास और  सबका प्रयासया भावनेने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाईल, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. विकासात संतुलन नसेल तर काही राज्ये मागे राहतात आणि काही मूलभूत सुविधांपासूनही लोक वंचित राहतात. त्रिपुरातील जनतेने अनेक दशकांपासून हेच पाहिले, असे ते म्हणाले.  सततचा भ्रष्टाचार आणि राज्याच्या विकासाबद्दल  कोणतीही दृष्टी किंवा उद्दिष्ट नसलेल्या सरकारांच्या काळाची आठवण पंतप्रधानांनी यावेळी करून दिली.  अशा परिस्थितीनंतर,  सध्याचे  सरकार  त्रिपुरातील दळणवळण  सुधारण्यासाठी HIRA - H अर्थात  हायवे(महामार्ग), I अर्थात  इंटरनेट जाळे , R म्हणजे  रेल्वे आणि A म्हणजे हवाई मार्गहा मंत्र अनुसरत आहे, असे त्यांनी सांगितले. त्रिपुरा  हिरा HIRA  प्रारूपाच्या आधारे आपल्या संपर्क आणि दळणवळणाचा विस्तार आणि बळकटीकरण करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

नवीन विमानतळ  त्रिपुराची संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिक सुविधा यांचे मिश्रण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ईशान्येकडील हवाई संपर्क वाढवण्यात हा विमानतळ मोठी भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले. त्रिपुराला ईशान्येचे प्रवेशद्वार करण्याचे काम जोरात सुरू असल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. रस्ते, रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. यामुळे त्रिपुरा व्यवसाय आणि उद्योगाचे नवीन केंद्र तसेच व्यापार कॉरिडॉरमध्ये  परिवर्तित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुप्पट गतीच्या कामासाठी दुहेरी इंजिन सरकारला पर्याय नाही. दुहेरी इंजिन सरकार म्हणजे संसाधनांचा योग्य वापर, याचा अर्थ संवेदनशीलता आणि लोकशक्तीला चालना देणे, म्हणजेच  सेवा आणि संकल्पांची पूर्तता, याचा अर्थ समृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करणे.

सरकारच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या बाबतीत त्रिपुरा राज्याने केलेल्या विक्रमी कामगिरीचे कौतुक करत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री त्रिपुरा ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात केल्याबद्दल राज्य सरकारची प्रशंसा केली. सर्वसामान्य लोकांसाठी सरकारने आखलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची आणि अधिकाधिक लोकांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याची जी संकल्पना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना मांडली होती त्यानुसार या योजनेची आखणी करण्यात आली आहे. त्रिपुरा राज्य सरकारच्या या योजनेद्वारे प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा, गृहनिर्माण, आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी, विमा संरक्षण, शेतकरी क्रेडीट कार्ड आणि रस्त्यांची सोय करून ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संपादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी अनेक बाबतीत ठराविक व्याख्या बदलण्याचे कार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. या कार्यवाहीमुळे, राज्यांतील 1 लाख 80 हजार कुटुंबांना पक्की घरे मंजूर झाली आहेत.आणि त्यापैकी 50 हजार घरांची उभारणी पूर्ण होऊन लाभार्थी कुटुंबांना त्यांचा ताबा देखील देण्यात आला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, 21 व्या शतकातील आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी युवकांना कौशल्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या धोरणात, स्थानिक भाषेतून शिक्षण देण्यावर तितकाच भर देण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. त्रिपुरा राज्यातील विद्यार्थ्यांना आता अभियान-100 आणि ‘विद्या-ज्योती’ मोहिमेअंतर्गत मदत मिळणार आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

वय वर्षे 15 ते 18 या गटातील किशोरवयीनांचे लसीकरण करण्यासाठी सुरु केलेल्या अभियानामुळे या तरुण विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची सुनिश्चिती होईल. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची शिक्षणाबाबतची चिंता कमी होईल असे ते म्हणाले. त्रिपुरा राज्यातील 80% जनतेला कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा आणि 65% जनतेला या लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत अशी महिती पंतप्रधानांनी दिली. त्रिपुरा राज्यांतील 15 ते 18 वर्ष वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य लवकरच पूर्ण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

एकाच वेळी वापरून टाकून देण्याच्या प्रकारातील प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून देण्यात त्रिपुरा महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. इथे बांबूपासून तयार केलेले झाडू, बांबूपासून बनविलेल्या बाटल्या इत्यादी उत्पादनांसाठी देशात मोठी बाजारपेठ निर्माण केली जात आहे, त्यामुळे, बांबूच्या वस्तू तयार करण्याच्या क्षेत्रात हजारो लोकांना रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलंध होत आहेत असे त्यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीबाबत राज्याने केलेल्या कार्याची देखील त्यांनी प्रशंसा केली.

सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्चून महाराजा वीर विक्रम सिंग विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी करण्यात आली असून ही अत्याधुनिक इमारत, 30 हजार चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारलेली आहे आणि अनेक आधुनिक सुविधा तसेच अद्ययावत माहिती तंत्रज्ञानविषयक एकात्मिक यंत्रणेच्या नेटवर्कच्या पाठबळावर या इमारतीमधील कामकाज होणार आहे. त्रिपुरा राज्यात सध्या कार्यरत असलेल्या 100 उच्च/उच्च माध्यमिक शाळांचे रुपांतर अत्याधुनिक सुविधा असलेल्या आणि उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या विद्याज्योती शाळांमध्ये करून राज्यांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने   विद्याज्योती शाळांमध्ये अभियान -100 हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. आगामी तीन वर्षांमध्ये अंदाजे 500 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प बालवर्ग ते बारावी इयत्तेपर्यंतच्या सुमारे 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार आहे.

ग्रामीण पातळीवर, प्रमुख विकासात्मक क्षेत्रांमध्ये सेवा वितरणासाठीचे ठराविक मानदंड गाठण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री त्रिपुरा ग्राम समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत घरगुती नळ जोडण्या, घरांना वीज जोडण्या, सर्व प्रकारच्या हवामानात टिकून राहणाऱ्या रस्त्यांची निर्मिती, प्रत्येक घरासाठी उपयुक्त शौचालय, प्रत्येक लहान मुलाला शिफारस करण्यात आलेले संपूर्ण लसीकरण आणि स्वयंसहाय्यता बचत गटांमध्ये महिलांचा सहभाग इत्यादी महत्त्वाच्या घटकांची निवड करण्यात आली आहे.

 

Jaydevi PS/S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1787494) Visitor Counter : 325