आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. मनसुख मांडविया यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह कोविड-19 सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण प्रगतीचा घेतला आढावा


आपण यापूर्वी कोविडविरुद्ध प्रभावी लढा दिला आहे आणि यामधून मिळालेल्या शिकवणीचा उपयोग ओमायक्रॉन प्रकाराविरूद्धच्या लढयात  पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी केला पाहिजे

वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील गंभीर अडथळ्यांवर चर्चा; राज्यांनी ईसीआरपी -II अंतर्गत मंजूर निधीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्याचे आवाहन

Posted On: 02 JAN 2022 4:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज राज्यांचे आरोग्य मंत्री आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान सचिव/ अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि राष्ट्रीय कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आभासी माध्यमातून  संवाद साधला. विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचे वाढते रुग्ण  आणि 15-18 वर्षे वयोगटाचे लसीकरण करण्याचा  अलीकडील निर्णय त्याचप्रमाणे निश्चित केलेल्या असुरक्षित वर्गासाठी  खबरदारीचा उपाय म्हणून दिला जाणारा  प्रिकॉशनरी डोस लक्षात घेऊनही बैठक घेण्यात आली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या बैठकीची सूत्रे सांभाळली

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत सुरुवातीपासूनच नमूद केले की, जागतिक स्तरावर, देश त्यांच्या पूर्वीच्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या  तुलनेत कोविड-19 रुग्णसंख्येत  3-4 पट वाढ अनुभवत आहेत. ओमायक्रॉन उत्परिवर्तन मोठ्या प्रमाणात संक्रामक  आहे, रुग्णांची मोठी लाट वैद्यकीय यंत्रणेवर भार आणू शकते त्यामुळे भारत कोविड-19 च्या या लाटेतून सुखरूप बाहेर येण्यासाठी मोठ्या रुग्णवाढीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने, पायाभूत सुविधा वाढविण्यात कोणतीही कसर सोडू नये असा सल्ला त्यांनी राज्यांना दिला.

कोविड विषाणूचे उत्परिवर्तन कोणतेही असले तरी सज्जता आणि संरक्षणासाठीचे उपाय सारखेच आहेत, असे डॉ.  मांडविया यांनी यासंदर्भात बोलताना सांगतले.तळागाळाच्या स्तरावर  काम करण्यासाठी आणि देखरेख तसेच प्रतिबंधक यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने,राज्यांनी त्यांच्या पथकांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करावे  त्याचप्रमाणे राज्यांनी ईसीआरपी -II अंतर्गत मंजूर निधीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. यानंतर कोविड व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर म्हणजेच रूग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढीसह; चाचण्यांमध्ये वाढ ;संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाय; आणि जनतेमध्ये कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तनावर भर यासंदर्भात  व्यापक आणि तपशीलवार चर्चा करण्यात आली.वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील गंभीर अडथळ्यांवरही चर्चा करण्यात आली.

लसीकरण मोहिमेचे निर्णायक  महत्त्व अधोरेखित करताना मंत्री म्हणाले, "आपण 15-18 वयोगटातील लसीकरण आणि पात्र लाभार्थ्यांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रिकॉशनरी डोसच्या संदर्भात नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे". असुरक्षित वर्गात समावेश असलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण  लसीकरण करण्यात आले आहे का, हे सुनिश्चित करण्याचे आवाहन डॉ. मनसुख मांडविया यांनी राज्यांना केले. 

देशात पायाभूत सुविधांचा विकास आणि लस उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, याकडेही डॉ. मनसुख मांडविया यांनी लक्ष वेधले.संपूर्ण देशाला फायदा होण्याच्या दृष्टीने त्यांनी ,राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची विनंती केली 

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786934) Visitor Counter : 225