पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 06 DEC 2021 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2021

महामहीम,

माझे प्रिय मित्र राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करतो, तुमच्यासोबतच्या प्रतिनिधी मंडळाचे देखील स्वागत करतो. मला माहित आहे की गेल्या 2 वर्षांच्या कोरोना कालखंडातील तुमचा हा केवळ दुसरा परदेश दौरा आहे. भारताविषयी तुम्हांला वाटणारी आत्मीयता, तुमची व्यक्तिगत कटिबद्धता याचेच हे प्रतीक आहे, भारत-रशिया संबंधांबद्दल तुमच्या मनात असलेले महत्त्व यातून स्पष्टपणे दिसून येते आणि त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे.

कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील भारत आणि रशिया यांच्यातील नातेसंबंधांचा वेग कमी झालेला नाही. आपल्या दोन देशांमधली वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाची धोरणात्मक भागीदारी सतत अधिक मजबूत होत गेली आहे. कोविड विरुद्धच्या लढाईत देखील दोन्ही देशांदरम्यान उत्कृष्ट सहकार्य राहिले आहे, मग ते लसीची चाचण्या किंवा उत्पादन असो, जनतेला सहाय्य करणे असो किंवा परस्परांच्या नागरिकांचे स्वदेशी परतण्यासाठीचे प्रयत्न असो, प्रत्येक बाबतीत हे सहकार्य कायम राहिले आहे.

महोदय,

2021 हे वर्ष आपल्या द्विपक्षीय संबंधांसाठी अनेक बाबतीत महत्त्वाचे आहे. 1971 मध्ये करण्यात आलेल्या शांतता, मैत्री आणि सहकार्य कराराला या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत आणि आपल्या धोरणात्मक भागीदारीची सुरुवात झाल्याला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. या विशेष वर्षात तुमची पुन्हा एकदा भेट घडून येणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे कारण गेल्या वीस वर्षांमध्ये आपल्या धोरणात्मक भागीदारीची जी उल्लेखनीय प्रगती झाली आहे त्याचे मुख्य सूत्रधार तुम्हीच आहात.

गेल्या काही दशकांमध्ये जागतिक स्तरावर अनेक मुलभूत स्थित्यंतरे घडून आली. अनेक प्रकारची नवी भू-राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. या सतत बदलत्या काळात देखील भारत-रशिया यांच्यातील मैत्री मात्र कायम राहिली आहे. दोन्ही देशांनी परस्परांना निःसंकोचपणे सहकार्य केलेच आहे, पण त्याचसोबत परस्परांच्या संवेदनशील बाबींची देखील विशेष काळजी घेतली आहे.हा खरोखरीच,दोन देशांमधील मैत्रीचा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आश्वासक नमुना आहे.

महोदय,

2021 हे वर्ष आपल्या धोरणात्मक भागीदारीसाठी देखील विशेष महत्त्वाचे वर्ष आहे. आज आपल्या दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री यांच्यात 2+2 स्वरुपाची पहिली बैठक  झाली. यामुळे आपल्यातील व्यावहारिक सहकार्य वाढविण्याची नवी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

अफगाणिस्तान तसेच इतर प्रादेशिक प्रश्नांबाबत देखील आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात राहिलो आहोत. पूर्व आर्थिक मंच आणि व्लादिवोस्टोक शिखर परिषदे सोबत सुरु झालेली प्रादेशिक भागीदारी आज रशियाच्या अतिपूर्वेकडील प्रदेश आणि भारतातील राज्ये यांच्यादरम्यानच्या प्रत्यक्ष सहकारी संबंधांमध्ये परिवर्तीत होत आहे. 

आर्थिक क्षेत्रात देखील आपल्या नातेसंबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही एक दीर्घकालीन संकल्पना स्वीकारत आहोत. आम्ही 2025 पर्यंत 30 अब्ज डॉलर्सचा व्यापार करण्याचे आणि 50 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे ध्येय ठेवले आहे. या ध्येयांच्या पूर्तीसाठी आपल्याला आपल्या व्यापारी समुदायांना त्या दृष्टीने मार्गदर्शन करावे लागेल.

विविध क्षेत्रांमध्ये आज जे सामंजस्य करार झाले त्यांची देखील यासाठी मदत होईल. मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत सह-विकास आणि सह-उत्पादन यांच्याद्वारे आपल्या देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य आणखी दृढ होत आहे. अंतराळ क्षेत्र आणि नागरी अणुक्षेत्रांमध्ये देखील आपले परस्पर सहकार्य वाढत आहे.

नाम देशांसाठी निरीक्षक आणि आयओआरए मध्ये संवाद भागीदार झाल्याबद्दल मी रशियाचे खूप खूप अभिनंदन करतो. या दोन्ही मंचांवर रशियाचा समावेश होण्याचे समर्थन करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट होती. प्रत्येक जागतिक आणि प्रादेशिक प्रश्नावर भारत आणि रशिया यांची मते एकसमान आहेत. आजच्या बैठकीत आपल्याला त्यावर चर्चा करण्याची संधी मिळेल.

महोदय,

मी पुन्हा एकदा भारतात आपले स्वागत करतो, आपल्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करतो. तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून तुम्ही भारतात येण्यासाठी वेळ काढलात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आजची चर्चा आपल्या दोन्ही देशांतील नातेसंबंधांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास मला वाटतो.

पुन्हा एकदा, तुमचे खूप खूप आभार!

 

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1778651) Visitor Counter : 306