पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते औषधनिर्माण क्षेत्रातील पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन


“भारतीय आरोग्यक्षेत्राने जागतिक पातळीवर निर्माण केलेल्या विश्वासार्हतेमुळेच, अलीकडच्या काळात, भारताला ‘जागतिक औषधनिर्मितीचे केंद्र’अशी बिरुदावली मिळाली”

“संपूर्ण मानवतेच्या कल्याणावर आमचा विश्वास आहे आणि, कोविड-19 महामारीच्या काळात आम्ही आमचा हा ध्येयवाद संपूर्ण जगाला दाखवला आहे”

“औषधनिर्मिती उद्योगाला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांची भारताकडे मोठी उपलब्धता, ‘संशोधन करा आणि भारतात निर्मिती करा’ यासाठीही या शक्तिची जोपासना करणे आवश्यक.”

“लसी आणि औषधांमधील प्रमुख घटकांचे देशांतर्गत उत्पादन झपाट्याने वाढवण्याविषयी विचार करणे अत्यावश्यक. या क्षेत्रात भारताने आघाडी घेण्याची गरज”

“भारतात संकल्पना तयार करा, संशोधन करा, भारतात निर्मिती करा आणि जगासाठी निर्मिती करा यासाठी सर्वांना माझे आमंत्रण”आपली खरी शक्ति ओळखा आणि विश्वाची सेवा करा

Posted On: 18 NOV 2021 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज औषधनिर्मिती क्षेत्रातील पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन झाले . यावेळी केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया उपस्थित होते.

कोविड-19 महामारीमुळे औषध निर्मिती क्षेत्र प्रकाशझोतात आले आहे. जीवनशैली असो, की वैद्यकीय तंत्रज्ञान, अथवा लसी, आरोग्य क्षेत्राच्या प्रत्येक पैलूकडे गेल्या दोन वर्षात, जगाचे लक्ष वेधले गेले आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

या संदर्भात पंतप्रधान म्हणाले की, भारतीय औषध निर्मिती उद्योगही आव्हानाचा सामना करण्यासाठी पुढे सरसावला आहे. भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राने कमावलेल्या जागतिक विश्वासामुळे अलीकडच्या काळात भारताला जगाचे औषध निर्मिती केंद्र म्हटले जात आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आपली  निरामय आरोग्याची  व्याख्या भौतिक सीमांपुरती मर्यादित नाही. आमचा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणावर विश्वास आहे. आणि, कोविड-19 या जागतिक महामारीच्या काळात आम्ही या भावनेचे दर्शन   संपूर्ण जगाला घडवले आहे. महामारी दरम्यान, सुरुवातीच्या टप्प्यात 150 हून अधिक देशांमध्ये जीवरक्षक औषधे आणि वैद्यकीय उपकरणे आम्ही निर्यात केली. आम्ही यावर्षी जवळपास 100 देशांना  कोविड लसींच्या  65 दशलक्षाहून अधिक मात्रा निर्यात केल्या आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

नावीन्यपूर्ण संशोधनासाठी एक परिसंस्था निर्माण करण्याची कल्पना पंतप्रधानांनी मांडली जी भारताला औषधांचा  शोध आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणांमध्ये अग्रेसर बनवेल. ते म्हणाले की सर्व हितधारकांशी व्यापक सल्लामसलत करून धोरणात्मक उपाययोजना केल्या  जात आहेत. भारतात औषध निर्मिती उद्योगाला आणखी उंचीवर नेण्याची क्षमता असलेले शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचा मोठा समूह असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या ताकदीचा उपयोग डिस्कव्हर अँड मेक इन इंडिया साठी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

स्वदेशी क्षमता विकसित करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. आज, जेव्हा भारतातील 1.3 अब्ज लोकांनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला  आहे, तेव्हा आपण लसी आणि औषधांच्या प्रमुख घटकांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा विचार केला पाहिजे. या आघाडीवर  भारताला यश मिळवायचे आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी  केले.

पंतप्रधानांनी हितधारकांना  देशात नवीन कल्पना मांडण्याचे , नवसंशोधन करण्यासाठी , मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्डसाठी आमंत्रित केले. तुमची खरी ताकद शोधा आणि जगाची सेवा करा, असे  त्यांनी सांगितले.

 

 

SP/RA/SK/PM

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1773049)