पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी 82 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटनपर सत्राला संबोधित केले

“भारतासाठी लोकशाही म्हणजे केवळ एक प्रणाली नाही तर लोकशाही आपल्या स्वभावात मुरलेली असून ती भारतीय जीवनाचा एक भाग आहे”

“भारताच्या संघराज्य प्रणालीमध्ये सर्व राज्यांची भूमिका हा ‘सबका प्रयास’ उपक्रमाचा भक्कम पाया आहे”

“कोरोना महामारीशी दिलेला लढा हे ‘सबका प्रयास’ च्या यशाचे उत्तम उदाहरण आहे”

समाजासाठी काही विशेष कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सामाजिक जीवनाच्या पैलूची माहिती देशवासियांना सांगण्यासाठी आपण संसदेच्या कामकाजाचे वर्षातील 3 ते 4 दिवस राखून ठेवू शकतो का”

सदनात दर्जेदार चर्चेसाठी 'हेल्दी टाईम' आणि 'हेल्दी डे' ठेवण्याचा प्रस्ताव

संसदीय प्रणालीला आवश्यक असलेली तंत्रज्ञानविषयक चालना देण्यासाठी आणि देशातील सर्व लोकशाहीविषयक घटकांना जोडण्यासाठी ‘एक देश, एक वैधानिक मंच’चा दिला प्रस्ताव

Posted On: 17 NOV 2021 2:49AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 17 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 82 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटनपर सत्राला संबोधित केले. लोकसभेचे सभापती, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतासाठी लोकशाही म्हणजे केवळ एक प्रणाली नाही तर लोकशाही आपल्या स्वभावात मुरलेली असून ती भारतीय जीवनाचा एक भाग आहे. येत्या काळात आपल्याला आपल्या देशाला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे आणि असामान्य उद्दिष्ट्ये गाठायची आहेत. आणि हे लक्ष्य फक्त ‘सबका प्रयास’च्या माध्यमातूनच गाठता येईल. भारताच्या लोकशाही व्यवस्थेत, संघराज्य प्रणालीमध्ये जेव्हा आपण ‘सबका प्रयास’बाबत बोलतो तेव्हा सर्व राज्यांची भूमिका हा या ‘सबका प्रयास’ उपक्रमाचा भक्कम पाया आहे हे लक्षात घ्यायला हवे. एका दशकाहून अधिक काळ रेंगाळलेल्या ईशान्येकडील राज्यांच्या समस्यांवरील उपाययोजना असो किंवा अनेक दशके अडकून पडलेले सर्व विकासविषयक प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न असो, देशातील अशी अनेक कामे गेल्या काही वर्षांत पूर्ण करण्यात आली आणि त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न कामी आले असे पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना महामारीशी दिलेला लढा हे देखील ‘सबका प्रयास’ च्या यशाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या संसदेच्या सदनांतील परंपरा आणि पद्धती भारतीय असायला हव्यात असा आग्रह पंतप्रधानांनी व्यक्त केला. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भारतीयांची भावना अधिक मजबूत करण्यासाठी धोरणे आणि कायदे तयार केले पाहिजेत असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले स्वतःचे सदनातील वर्तन भारतीय मूल्यांनुसार असेल याची काळजी घेतली पाहिजे. ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.”

पंतप्रधान म्हणाले की आपला देश वैविध्याने परिपूर्ण आहे. “हजारो वर्षांच्या विकासानंतर आपल्या हे लक्षात आले आहे की या विविधतेमध्ये देखील एक भव्य, दैवी आणि अभंगपणे वाहणारा एकतेचा प्रवाह आहे. एकतेचा हा अभंग प्रवाह आपल्या विविधतेची जपणूक आणि संरक्षण करतो.” असे त्यांनी सांगितले.

समाजासाठी काही विशेष कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सामाजिक जीवनाच्या पैलूची माहिती देशवासियांना सांगण्यासाठी संसदेच्या कामकाजाचे वर्षातील 3 ते 4 दिवस राखून ठेवण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले कि यामुळे उर्वरित लोकप्रतिनिधींसह समाजातील इतर लोकांना देखील यातून अनेक गोष्टी शिकता येतील.

सदनात दर्जेदार चर्चा होण्यासाठी स्वतंत्र कालावधी निश्चित करता येईल का यावर विचार करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला. ते म्हणाले की सन्मान आणि गांभीर्य यांची परंपरा काटेकोरपणे पाळून अशा चर्चा घडायला हव्यात. यामध्ये कोणीही कोणावर राजकीय निंदानालस्तीयुक्त टीका करणार नाही. एक प्रकारे, या उपक्रमामुळे हा सदनाचा 'हेल्दी टाईम' आणि 'हेल्दी डे' असायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधानांनी यावेळी ‘एक देश, एक वैधानिक मंचा’ची संकल्पना मांडली. “हे पोर्टल संसदीय प्रणालीला आवश्यक असलेली तंत्रज्ञानविषयक चालना देईलच पण त्याचबरोबर देशातील सर्व लोकशाहीविषयक घटकांना जोडण्याचे काम देखील करेल,” असे ते म्हणाले.

आगामी 25 वर्षांचा काळ देशासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असेल यावर पंतप्रधानांनी यावेळी बोलताना भर दिला. संसद सदस्यांनी यापुढे – कर्तव्य, कर्तव्य आणि कर्तव्य- हा एकच मंत्र अनुसरायला हवा असा आग्रह पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

***

 

STupe/SChitnis/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1772547) Visitor Counter : 117