पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी देशातील लस निर्मात्यांशी साधला संवाद


देशातील लसीकरणाच्या प्रवासात 100 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा ज्यांच्यामुळे गाठता आला त्या लस निर्मात्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

गेल्या दीड वर्षांत शिकलेल्या उत्तम पद्धती आता देशाने संस्थात्मक केल्या पाहिजेत असा पंतप्रधानांनी दिला सल्ला

लस निर्मात्यांनी पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि प्रभावी नेतृत्व यांची प्रशंसा केली; सरकार आणि उद्योग क्षेत्रातील यापूर्वी कधीही दृष्टीस न पडलेल्या सहकार्य संबंधांचे त्यांनी कौतुक केले

Posted On: 23 OCT 2021 9:53PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  नवी दिल्ली येथील लोक कल्याण मार्ग येथे देशातील लस निर्मात्यांशी संवाद साधला.

देशातील लसीकरणाच्या प्रवासात 100 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा ज्यांच्यामुळे गाठता आला त्या लस निर्मात्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या यशोगाथेत लस निर्मात्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांची मेहनत आणि महामारीच्या काळात त्यांनी दिलेला विश्वास, याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

गेल्या दीड वर्षांत शिकलेल्या उत्तम पद्धती आता देशाने संस्थात्मक केल्या पाहिजेत असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. ते म्हणाले की आपल्या सध्याच्या पद्धती जागतिक मानकांशी अनुरुप होतील अशा प्रकारे सुधारण्यासाठी मिळालेली ही संधी आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या इराद्याने लस निर्मात्यांनी एकत्रितपणे कार्य सुरु ठेवले पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी दिला.

लस विकसित करण्याच्या कामात सतत मार्गदर्शन आणि आणि पाठींबा देण्यासाठी पंतप्रधानांनी दाखविलेल्या दूरदृष्टीचे आणि प्रभावी नेतृत्वाचे देशातील लस निर्मात्यांनी कौतुक केले. सरकार आणि उद्योग क्षेत्रातील यापूर्वी कधीही दृष्टीस  न पडलेल्या सहकार्य संबंधांचे त्यांनी कौतुक केले. आता करण्यात आलेल्या नियामकीय सुधारणा, प्रक्रियांचे सुलभीकरण, वेळेवर मंजुरी मिळणे आणि संपूर्ण लस विकसन प्रक्रियेत सरकारची तत्पर आणि पाठींबा देण्याची भूमिका यांची देखील त्यांनी प्रशंसा केली. देशात जर पूर्वीच्याच नियमांची अंमलबजावणी सुरु राहिली असती तर लस विकसित करण्यास खूप वेळ लागला असता आणि आता आपण देशात जे लसीकरणाचे लक्ष्य गाठू शकलो आहे तसे लक्ष्य कधीच गाठता आले नसते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

अदर पूनावाला यांनी सरकारने केलेल्या नियामकीय सुधारणांची प्रशंसा केली तर सायरस पूनावाला यांनी महामारीच्या संपूर्ण कालावधीत पंतप्रधानांनी केलेल्या उत्तम नेतृत्वाचे कौतुक केले. पंतप्रधानांनी कोवॅक्सीन लसीच्या मात्रा  घेतल्याबद्दल तसेच कोवॅक्सीन लसीच्या विकसन कार्यात दिलेला अखंडित पाठींबा आणि प्रोत्साहनासाठी  डॉ.कृष्ण ईल्ला यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत डीएनए आधारित लसीची चर्चा केल्याबद्दल पंकज पटेल यांनी त्यांचे आभार मानले. लसीकरणाच्या प्रवासात इतका मोठा टप्पा गाठण्यासाठी पंतप्रधानांनी दाखविलेल्या दूरदृष्टीची महिमा दातला यांनी प्रशंसा केली. लस विकसित करण्याच्या क्षेत्रात अभिनव संशोधन आणि पाठींबा देणाऱ्या बाबींचे एकत्रीकरण यांचे महत्त्व डॉ.संजय सिंग यांनी विषद केले. लस संशोधनाच्या संपूर्ण प्रवासात सरकार आणि उद्योग क्षेत्राने एकमेकांना  केलेल्या सहकार्याचे सतीश रेड्डी यांनी कौतुक केले तर महामारीच्या कालावधीत सरकारने ठेवलेल्या अखंडीत संपर्काची डॉ. राजेश जैन यांनी प्रशंसा केली.

या चर्चात्मक कार्यक्रमात सिरम संस्थेचे सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला, भारत बायोटेकचे डॉ कृष्ण ईल्ला आणि सुचित्रा ईल्ला, झायडस कॅडीला कंपनीचे पंकज पटेल आणि डॉ.शर्विल पटेल, बायोलॉजिकल ई. कंपनीचे महिमा दातला आणि नरेंद्र मंतेला, जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल कंपनीचे डॉ.संजय सिंग आणि सतीश रमणलाल मेहता, डॉ.रेड्डीज लॅबचे सतीश रेड्डी आणि दिपक सप्रा, पॅनासिया बायोटेकचे राजेश जैन आणि हर्षित जैन यांनी भाग घेतला.  केंद्रीय आरोग्य मंत्री, आरोग्य राज्यमंत्री तसेच केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री देखील या परस्पर संवादाच्या वेळी उपस्थित होते.

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766030) Visitor Counter : 249