पंतप्रधान कार्यालय

कुशीनगर येथील महापरिनिर्वाण प्रार्थना स्थळातील अभिधम्म दिन सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग


"बुद्धांचा संदेश हा संपूर्ण विश्वासाठी असून बुद्धांचा धम्म हा मानवतेसाठी"

"बुद्ध वैश्विक आहे कारण बुद्धांची शिकवण 'स्वतःपासून सुरुवात करा' अशी आहे. बुद्धांचे बुद्धत्व आत्मिक जबाबदारीचे भान देणारे आहे"

"बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचे धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे"

"’अत्त दीपो भव’ हा भगवान बुद्धांचा संदेश भारताला स्वनिर्भरतेची प्रेरणा देणारा"

Posted On: 20 OCT 2021 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्टोबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर येथील महापरिनिर्वाण प्रार्थनास्थळी साजरा होणार्‍या अभिधम्मदिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच जी किशन रेड्डी, किरेन रिजिजू ,ज्योतिरादित्य सिंधिया हे केंद्रीय मंत्री, नमल राजपक्षा हे श्रीलंकन सरकारमधील मंत्री, श्रीलंकेतून आलेले बुद्धिस्ट शिष्टमंडळ, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, लाओ पीडीआर, भूतान, दक्षिण कोरिया, श्रीलंका, मंगोलिया, जपान, सिंगापूर, नेपाळचे राजपत्रित अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.

याप्रसंगी सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी अश्विन पौर्णिमा आणि भगवान बुद्धांच्या पवित्र अवशिष्टांच्या उपस्थितीचा उल्लेख केला. श्रीलंकेच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना पंतप्रधानांनी भारत आणि श्रीलंकेमधील संबंधांचे स्मरण करून सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी बुद्ध धर्माचा संदेश श्रीलंकेत नेल्याची आठवण करून दिली. आजच्याच दिवशी अर्हत महिंद्रा परतला आणि श्रीलंकेने बुद्धांचा संदेश मोठ्या उत्साहाने स्वीकारल्याची माहिती त्याने वडिलांना दिली असे मानले जाते असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.यामुळेच बुद्धांचा संदेश हा संपूर्ण विश्वासाठी असलेला संदेश आहे आणि बुद्धांचा धम्म हा  मानवतेसाठी आहे, यावरील विश्वास वाढला, असे पंतप्रधान म्हणाले.

भगवान बुद्धांच्या संदेशाचा सर्वदूर प्रसार करण्यात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेची असलेली महत्वाची भूमिका पंतप्रधानांनी यावेळी विशद केली.  आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे महासंचालक म्हणून शक्ती सिन्हा यांनी दिलेल्या योगदानाची ही आठवण पंतप्रधानांनी यावेळी काढली. सिन्हा यांचे हल्लीच निधन झाले.

आजचा दिवस अजून एका दृष्टीने पवित्र आहे. तुषिता स्वर्गातून याच दिवशी भगवान बुद्ध पृथ्वीवर परतले. म्हणूनच आजच्या आश्विन पोर्णिमेला भिक्षु आपला तीन महिन्यांच्या वर्षावासाची सांगता करतात. असे सांगून वर्षावासाहून परतलेल्या संघ भिख्खूंच्या वर्षावासानंतर त्यांना चिवरदान करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचं पंतप्रधान म्हणाले.  "बुद्ध वैश्विक आहे कारण बुद्धांची शिकवण 'स्वतःपासून सुरुवात करा' अशी आहे.बुद्धांचे बुद्धत्व आत्मिक जबाबदारीचे भान देणारे आहे.” असे पंतप्रधान म्हणाले

आज जेव्हा जगात वातावरणाच्या संरक्षणाबद्दल बोलले जाते, हवामान बदलाबद्दल चिंता व्यक्त केली जाते तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात पण जर बुद्धाचा संदेश आपण स्वीकारला तर हे ‘कोणी करायचं’, ‘कसं करायचं’ हे मार्ग आपोआप दिसत जातील. बुद्ध म्हणजे मानवतेचा आत्मा  असून तो विविध संस्कृती आणि राष्ट्रांमधील दुवा आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताने त्यांच्या प्रत्येक शिकवणीचा उपयोग आपल्या विकासाच्या मार्गावर केला. ‌ज्ञान तसेच महान व्यक्तींचे विचार यांना कुंपण घालण्यावर भारताने केव्हाही विश्वास ठेवला नाही. आमचे जे काही आहे ते संपूर्ण मानवजाती बरोबर आम्ही वाटून घेतले म्हणून अहिंसा किंवा सहभाग या गुणांनी भारताच्या हृदयात एवढ्या सहजपणे आपले घर केले असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.

"बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचे धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे', असे त्यांनी सांगितले. भारताच्या संसदेत धम्मचक्रप्रवर्तनाय हा मंत्र दिसतो असेही पंतप्रधानांनी नमूद केले

गुजरात आणि त्यातही पंतप्रधानांचे जन्मस्थळ म्हणजे वडनगर येथे भगवान बुद्धांचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो याबद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या पूर्व भागाएवढाच पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये बुद्धाचा प्रभाव आढळून येतो.

“गुजरातचा भूतकाळ हे स्पष्ट करतो की बुद्ध हा सीमांच्या, दिशांच्या ही पलीकडे आहे. गुजरातमध्ये जन्मलेल्या महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसा यांचा बुद्धांचा संदेश जगभरात नेला”.

अप्प दीपो भव म्हणजेच स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा हे वचन उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले की स्वयंप्रकाशी व्यक्ती विश्वाला प्रकाश देऊ शकते. भारताला आत्मनिर्भर बनवण्यामागे हीच प्रेरणा होती असेही पंतप्रधानांनी नमूद केले. जगातील प्रत्येक देशाच्या विकासात सहभागी होण्यासाठी याच प्रेरणेमुळे आम्हाला बळ येते.

भगवान बुद्धांची शिकवण ही भारताने सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रामार्गे पुढे नेली आहे असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

 

 

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765188) Visitor Counter : 365