माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती आणि लोकशाहीसंबंधी शिखर परिषदेला संबोधित केले


अविश्वासार्ह माहितीच्या मुद्द्यावर सर्वोच्च स्तरावर चर्चा होत आहे हे महत्वाचे : अनुराग ठाकूर

पत्र सूचना कार्यालय निराधार माहिती आणि बातम्या खोडून काढण्यात सक्रियपणे सहभागी आहे: ठाकूर

Posted On: 25 SEP 2021 11:08AM by PIB Mumbai

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल संयुक्त राष्ट्र आमसभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमधील फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासात आयोजित माहिती आणि लोकशाहीसंबंधी शिखर परिषदेला संबोधित केले. लेह, लडाख येथून या परिषदेत सहभागी होऊन त्यांनी गोलमेज चर्चेत सभाग घेतला .

गोलमेज चर्चेच्या अखेरीस आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले की, “जग महामारीशी लढत असताना, तितक्याच हानिकारक अशा अविश्वासार्ह आणि निराधार माहिती (इन्फोडेमिक) विरोधात लढण्याचे आव्हान सदस्य देशांसमोर आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च स्तरावर चर्चा होत आहे हे महत्वाचे आहे. "माहिती आणि लोकशाहीसाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी" चे संस्थापक सदस्य आणि स्वाक्षरीकर्ता असल्याचा आम्हाला आनंद आहे.

कोविड महामारीच्या काळात भारताला भेडसावणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल ते म्हणाले, “महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताला दुहेरी माहिती आव्हानाचा सामना करावा लागला. एकीकडे शहरी लोकसंख्येसमोर सोशल मीडिया आणि इतर स्मार्ट फोन ऍप्लिकेशनद्वारे दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती वेगाने पसरण्याचे आव्हान होते तर दुसरीकडे देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोक होते, जिथे शेवटच्या व्यक्तीपर्यंतचा संवाद विविध प्रांतानुसार विविध प्रादेशिक भाषांमध्ये होतो. . . 

या इन्फोडेमिकविरुद्ध भारताच्या जलद प्रतिसादाबद्दल माहिती देताना ठाकूर म्हणाले, “भारत सरकारने विज्ञान आणि तथ्यांवर आधारित जलद आणि स्पष्ट संवादाद्वारे या आव्हानांना प्रतिसाद दिला. माहितीच्या नियमित आणि विश्वासार्ह प्रवाहाची खात्री करणे हा चुकीची माहिती, बनावट बातम्या आणि खोट्या वृत्तांचा सामना करण्यासाठी भारतीय प्रतिसादाचा एक महत्त्वाचा धोरणात्मक घटक आहे. आम्ही कोविडबाबत दररोज पत्रपरिषदा घेत होतो ज्या टीव्हीवरील बातम्या, प्रिंट, रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आल्या.

ते पुढे म्हणाले की, "भारताचे पत्र सूचना कार्यालय त्याच्या विविध प्लॅटफॉर्मद्वारे निराधार माहिती आणि बातम्या खोडून काढण्यात सक्रियपणे सहभागी होते. . आम्ही भारतीय जनतेला विविध विषयांवर माहिती देण्यासाठी विनोदी शैलीचाही वापर केला. ”

ठाकूर म्हणाले, “पारदर्शक, वेळेवर आणि विश्वासार्ह माहितीचा ओघ लोकशाही बळकट करतो आणि आपल्या नागरिकांना योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवतो . यावर भारताचा ठाम विश्वास आहे. ”

आमसभेने या वर्षी 24-31 ऑक्टोबर हा सप्ताह एकमताने 'जागतिक प्रसारमाध्यमे आणि माहिती साक्षरता सप्ताह' म्हणून घोषित केला आहे जेणेकरून प्रसारमाध्यमांना साक्षरता कौशल्य देऊन निराधार आणि चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार रोखणे शक्य होईल. मला हे कळवण्यात आनंद होत आहे की ज्या देशांनी हा ठराव मांडला त्या देशांच्या मुख्य गटात भारत होता. युनेस्कोमधील अशाच ठरावाच्या सह-प्रायोजकांमध्ये आम्हीही आहोत.

कोविड -19 संदर्भात "इन्फोडेमिक" वरील क्रॉस-रीजनल निवेदन देण्यातही भारताचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक संवाद विभागाच्या "सत्यापित" आणि "प्लेज टू पॉज" उपक्रमांना आम्ही सक्रिय समर्थन दिले आहे.

जागतिक स्तरावर, इन्फोडेमिक संदर्भात सदस्य देशांसोबत चुकीच्या माहितीचे निराकरण करण्यासाठी आणि एकमेकांकडून शिकण्यामुळे समस्या समजून घेण्यास आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य उपाय शोधण्यात मदत होईल.

***

ShaileshP/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1757999) Visitor Counter : 215