युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        देशाच्या क्रीडा विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रीडामंत्र्यांशी साधणार संवाद
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                19 SEP 2021 7:10PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
प्रमुख वैशिष्ट्ये:
* भारत सरकारचे महत्वपूर्ण कार्यक्रम, खेलो इंडिया आणि फिट इंडिया, या परस्परसंवादाचा अविभाज्य घटक असतील
* युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्री निशिथ प्रामाणिक हे देखील चर्चेत होणार सहभागी
देशातील खेळांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर सोमवारी (उद्या)देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील क्रीडामंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. टोक्यो येथील ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील  मोठ्या यशानंतर, यापुढेही खेळांना प्रोत्साहन देऊन यापेक्षाही पुढे जाण्यासाठी मार्ग आखणे आणि भारताला क्रीडाक्षेत्रात अव्वल दर्जाचे  राष्ट्र बनवण्याच्या कार्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश कोणत्या प्रकारे  योगदान देऊ शकतील,यावर या बैठकीत चर्चा होईल. त्यांच्यासोबत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक सहभागी होणार आहेत.
भारत सरकारचे प्रमुख कार्यक्रम, खेलो इंडिया आणि फिट इंडिया, यावरही  या चर्चेत अधिक भर दिला जाईल .क्रीडा हा राज्यसरकारच्या अखत्यारीतील विषय आहे आणि या परस्परसंवादाचा एकमेव हेतू ग्रामीण आणि शहरी भागात शारीरिकदृष्ट्या - सक्षम  आणि पॅराॲथलीट्स  खेळाडूंसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी तसेच तळागाळातील खेळाडूंमधील प्रतिभेचा शोध  घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे हा असेल. शालेय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देणे आणि स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाला  (एसजीएफआय) पाठिंबा देणे हा देखील या चर्चेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असेल. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील  खेळाडूंना जे रोख पुरस्कार देण्यासाठी येतील त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही निधी जमा करू शकतील.
2018 मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा भारतातील तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उचलले गेलेले महत्त्वाचे पाऊल होते. तेव्हापासून, युवास्तरावर , विद्यापीठस्तरावर  आणि हिवाळी खेळांचे आयोजन करण्यात येते. खेलो इंडिया कार्यक्रमात, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनेक क्रीडा पायाभूत सुविधांचे नूतनीकरण समाविष्ट केले गेले आहे, ज्यात खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (KISCE) आणि खेलो इंडिया सेंटर (KICs) यांचा समावेश आहे.
सध्या, 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून अशी 24 खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत तर देशातील विविध जिल्ह्यांमध्ये 360 खेलो इंडिया सेंटर्स  सुरू झालेली आहेत. सोमवारच्या बैठकीत, ठाकूर याबाबतीतील कार्य पध्दतींवर विस्तृत चर्चा करतील आणि भविष्यातील चॅम्पियन्सना सर्वोत्तम प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा ,पायाभूत सुविधा यासह सर्व महत्वाच्या सुविधांसह त्यांच्या पूर्ण क्षमतेने  कार्यान्वित करण्यास सांगतील. क्रीडा स्पर्धांद्वारे  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तालुका आणि जिल्हा स्तरावरील शैक्षणिक संस्थांमधील  नवोदित प्रतिभावंत खेळाडूंचा शोध हा देखील या चर्चेचा आणखी एक प्रमुख हेतू असेल.
2019 मधे फिट इंडिया मोहिमेला प्रारंभ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया फ्रीडम रन, फिट इंडिया मोबाईल ॲप, फिट इंडिया प्रश्नमंजुषा यासारख्या विविध मोहिमांद्वारे शारिरीक तंदुरुस्तीची सवय लावली. सोमवारी, भारत प्रश्नमंजुषा इत्यादीसारख्या  मोहिमांमध्ये सहभागी होण्याची आणि क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्याची,  विनंती ठाकूर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील क्रीडामंत्र्यांना करतील.
तसेच श्री ठाकूर, खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (KISCE) आणि खेलो इंडिया सेंटर (KICs) तसेच अकादमी सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची विनंती करतील, जेणेकरून देशातील  क्रीडा पर्यावरणाला बळकटी मिळेल.
***
R.Aghor/S.Patgoankar/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1756286)
                Visitor Counter : 255